घारीचा घरोबा

Submitted by वावे on 11 September, 2020 - 09:01
Black kite chick

आमच्या घराच्या गॅलरीसमोर थोडं लांब एक नारळाचं झाड आहे. साधारणपणे गेल्या ऑक्टोबर अखेरपासून त्या झाडावर दोन-तीन घारींची ये-जा सुरू होती. त्यापैकी दोन घारींनी नोव्हेंबर महिन्यात झाडाच्या शेंड्यावर एका बाजूला घरटं बांधायला सुरुवात केली. लांब काड्या-काटक्या आणून ते घरटं बांधत होते. कधीकधी एक घार (बहुधा नर) मेलेला उंदीर किंवा पक्षी आणून, ते खाण्यासाठी दुस‍र्‍या घारीची वाट पाहताना दिसत असे.

1_1.JPG

हा त्यांच्या प्रियाराधनाचा प्रकार असावा.

2_0.jpg

दोघे मिळून घरट्याची पाहणी करत, सुधारणा करत. जानेवारीच्या वीस तारखेच्या सुमारास माझ्या लक्षात आलं की घारीने आता अंडं घातलं असणार. कारण दिवसभर ती घरट्यात बसून असायची. नर तिच्यासाठी खायला आणायचा. ती घरट्याबाहेर येऊन ते खायला लागली की नर अंडं उबवायला बसायचा.

2_1.jpg

असा जवळजवळ दीड महिना गेला आणि मार्चच्या चार तारखेला पांढर्‍या रंगाचं, तपकिरी चोचीचं छोटंसं पिल्लू मला घरट्यात अस्पष्ट दिसलं.

3_0.jpg

त्याचे आईबाबा त्याला खायला देत होते. आधी एक घार खाऊचे लहान लहान तुकडे करून पिल्लाला भरवत होती. तिला ते फारसं जमत नव्हतं. मग ती बाजूला गेली आणि दुसर्‍या घारीने हे काम हातात घेतलं. तिने मात्र सफाईदारपणे पिल्लाला ते तुकडे भरवले.

व्हिडिओ इथे पहा
एक घास घारीचा

त्यानंतर मग हा रोजचा दिनक्रम झाला. सतत दोघांपैकी एकजण घरट्यात किंवा घरट्याजवळ राखणीला बसणार आणि दुसरी घार खाऊ आणणार. त्याचे लहान लहान तुकडे करून ते पिल्लाला भरवणार. निवांतपणा कसा तो नव्हताच त्यांना.

5_0.jpg

पिल्लाला भरवण्याची तयारी

हे काम कमी म्हणून की काय, दोनतीन दिवसांनंतर एक शिक्रा जवळच्या एखाद्या झाडावर येऊन बसायला लागला. नुसता बसत नव्हता, तर अखंड ओरडायचा. सकाळी सातच्या आधीच त्याचा आवाज यायला लागायचा. अखंड ओरडत असताना मधेच तो उडत उडत घारीजवळ जायचा, तो जवळ आला, की घार उडायची, मग शिक्रा तिचा पाठलाग करायचा, वेगाने उंच उंच घिरट्या घालत घालत दोघेही लांब उडत जायचे. थोड्या वेळाने शिक्रा परत यायचा आणि एखाद्या झाडावर किंवा आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर बसून पुन्हा ओरडायला सुरुवात! हा त्याचा उद्योग जवळजवळ दीड महिना रोज चालू होता.

4.JPG

सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत, कधीकधी परत संध्याकाळीही हाच क्रम असायचा. मात्र कधीही शिक्रा घारीच्या घरट्याजवळ गेला नाही किंवा घरटं असलेल्या झाडावरही बसला नाही. त्याने पिल्लाला काही इजा करण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. शिक्रा हा अगदी पक्का शिकारी पक्षी, तर घार ही निसर्गातली एक उत्कृष्ट सफाईकार ( scavenger). मग या दोघांची ही दुष्मनी कशासाठी असेल? मी हे निरीक्षण किकांना, म्हणजे श्री. किरण पुरंदरे यांना कळवलं आणि शिक्र्याच्या या वागणुकीचं कारण काय असेल, असं विचारलं. त्यांनी असं सांगितलं की शिक्रा स्वतःच्या विणीच्या परिसराचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असावा. बहुधा जवळपासच दुसर्‍या कुठल्यातरी झाडावर त्याचंही घरटं असावं. एक मात्र नक्की, की घारीने स्वतःहून जाऊन शिक्र्याला हुसकवण्याचा प्रयत्न क्वचितच केला. ९९% वेळा शिक्राच घारीजवळ येत होता.

या काळात मला एक चांगलाच धडा मिळाला. एकदा असाच शिक्रा येऊन ओरडत बसला होता. मला माझ्या घरातून तो स्पष्ट दिसत नव्हता. म्हणून मी फोटो काढण्यासाठी गच्चीवर गेले. तेव्हा एक घार नारळाच्या एका झाडावर बसली होती आणि शिक्रा दुसर्‍या झाडावर. मी गच्चीवर जिथे उभी होते तिथून हे दोघेही मला स्पष्ट दिसत होते. घरटं मात्र तिथून दिसत नव्हतं. मी एकदोन फोटो काढले. तेवढ्यात दुसरी घार माझ्या नकळत माझ्या मागून उडत अगदी खाली आली, तिचे पंजे माझ्या डोक्याला घासत तशीच सावकाश पुढे उडत निघून गेली. मला साधा ओरखडाही उठला नाही, पण पंजा डोक्यावर चांगलाच जोरात घासला गेला होता. हे नक्कीच तिच्याकडून चुकून झालेलं नव्हतं. मी तिथे उभी राहून असं निरीक्षण करणं त्यांना मान्य नव्हतं, असा त्याचा अर्थ मी काढला आणि गच्चीवरून लगेच खाली आले. पंजा घासलेल्या जागी बराच वेळ हुळहुळत राहिलं. परत कधीही गच्चीवरून घारींचे फोटो काढायला मी गेले नाही. गॅलरीतून, खिडकीतून जेवढं दिसेल तेवढंच पहायचं, असं ठरवलं. पिल्लू आणि घरट्याच्या बाबतीत पक्षी काय, प्राणी काय आणि आपण माणसं काय, खूप संवेदनशील असतो. याचं भान निसर्गनिरीक्षण करताना सतत ठेवलं पाहिजे. घारीने नुसताच पंजा घासला, चोचबीच मारली नाही याबद्दल मनातल्या मनात मी तिचे आभारच मानले. Happy

पिल्लू आता घरट्यातल्या घरट्यात जास्त जास्त हालचाल करायला लागलं होतं. सुरुवातीला ते फक्त खाणं आणल्यावरच उठायचं, पण जसजसं मोठं होऊ लागलं, तसतसं ते घरट्यात उभं राहून एकदोन पावलं टाकू लागलं, पंख फडफडवू लागलं. काही दिवसांनी ते घरट्याच्या टोकाशी येऊन बसू लागलं. त्या बाजूला पश्चिम दिशा असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी घरट्यात पिल्लू आणि वरच्या झापावर घार, दोघे मस्त ऊन खात बसलेले दिसायचे. अजून थोडे दिवस गेल्यावर पिल्लू घरट्याच्या बाहेर येऊन, आधी त्याच झापावर, मग हळूहळू दुसर्‍या झापावर येऊन बसायला लागलं. संध्याकाळी बहुधा शिक्राही जवळपास नसायचा.

6_0.jpg

असे दिवस जात राहिले. पिल्लू चांगलंच मोठं झालं होतं. पण त्याचा उडण्याचा विचार अजून दिसत नव्हता. आम्हालाच उगाच घाई झाली होती, त्याला उडताना पाहण्याची. पण ते आपलं त्याच झाडावर बसून आजूबाजूला उडणार्‍या साळुंक्या आणि कबुतरांकडे बघत बसायचं.

पंधरा एप्रिलला सकाळी सकाळी मला पलीकडच्या दुसर्‍या नारळाच्या झाडावर एक घार बसलेली दिसली. नंतर पाहिलं तर अलीकडच्या झाडावरचं घरटं रिकामं होतं! मग दुर्बिणीतून नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की पलीकडच्या झाडावर हे पिल्लूच जाऊन बसलं होतं. अखेर त्याने धीर करून झेप घेतली होती! बर्‍याच वेळाने ते उडत उडत आमच्या डावीकडच्या बिल्डिंगच्या गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलं. डब्याशिवाय पहिल्यांदा पोहताना आपल्या पोटात जो गोळा आलेला असतो, तसाच गोळा त्याच्याही पोटात आलेला असणार. नंतर मग दिवसभर ते कुठे दिसलं नाही. संध्याकाळी मात्र परत ऊन खायला येऊन बसलेलं दिसलं.
नंतर मग काही दिवस पिल्लू अधूनमधून दिसत होतं. त्या कुटुंबाचा ’बेस’ अजूनही त्या झाडावरच होता. दिवसभर कुठेही फिरले, तरी संध्याकाळी परत त्याच झाडावर किंवा कुठेतरी आसपास दिसायचे. अजूनही पिल्लू तसं परावलंबीच होतं. आईबाबा आणून देतील तेच खाणं. फक्त त्याला आता स्वत:ला मांसाचे तुकडे तोडता यायला लागले होते. तरीही कधीतरी घार त्याला भरवताना दिसायची. शिक्राही अधूनमधून येत होताच, पण आता पहिल्यासारखा दिवसभर येऊन अखंड ओरडत बसायचा नाही.

8_0.jpg

होता होता लॉकडाऊन शिथील झाला. नारळाचं झाड जिथे उभं आहे, तिथल्या जमिनीचे प्लॉट्स पाडून तिथे बंगले बांधण्याच्या कामाला लॉकडाऊनच्या आधीच थोडी सुरुवात झालेली होती. ’अनलॉक’ सुरू झाल्यावर नवीन जोमाने परत तिथे काम सुरू झालं. घरटं ज्या झाडावर होतं, ते झाड अजूनही उभं आहे, पण बाकी आजूबाजूची काही झाडं तोडली गेली. गॅलरीसमोरचं दृश्य या दोन-तीन महिन्यात खूप बदललं. बांधकामावरच्या सततच्या वर्दळीमुळे आणि आवाजांमुळे आता पक्ष्यांचे आवाज जरा कमीच ऐकू येतात. गच्चीवर वगैरे गेल्यावर अनेक घारी उडताना दिसतात, पण त्यात या दोन विशिष्ट घारी आणि त्यांचं मोठं झालेलं पिल्लू आता ओळखता येत नाही. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! मस्त लेख आणि निरीक्षण सुद्धा छान detailed !! शिक्रा जरा आगाऊच प्रकरण दिसतंय
पिल्लाचे फोटो मस्त, घारींचं असूनही चक्क निरागस वाटतंय !
चौथ्या फोटोत पांढऱ्या रंगाचं आहे ते पिल्लू आहे का ? आधी पांढरं होतं का ते ?

खूप मस्त. माझा अनुभवही अगदी सेम आहे. मी वाचत असतानाच पंजा मारण्याचा किस्सा येईलच पुढे असा विचार करतच वाचलं Lol आमच्याकडचा गेल्यावेळचा अनुभव असा की फक्तं बायकांना पंजाचा फटका बसलाय. पुरुष मंडळींना अभय मिळाले होते Lol

एकदा वाटलं तुम्ही माझे शेजारी आहात की काय, इतका सेम अनुभव लिहिला आहे तुम्ही Happy

यंदा आमच्या इथे लगबग सुरु झालेय घरटं बांधण्याची. बांधकाम सुरु आहे
आणि गच्ची डेटवर जायला कितपत आवडेल अशी चाचपणी मिस्टर / मिस घार करुन जातायत रोजच. Lol

हा त्यांच्या प्रियाराधनाचा प्रकार असावा........ म्हणजे boyfriend कडून gifts मिळवणे हा तमाम girlfriends cha हक्क आहे.

मस्त लेख.

धन्यवाद मंडळी.
मृणाली, अगदीच! नंतर किती तरी वेळ मला धडधडत होतं.
हर्पेन, येस, कापशीची डायरी किकांचीच!
कविन, अरेच्चा, तुम्हालापण पंजाचा फटका मिळाला? Lol
घारींची ही आवडती मेथड दिसतेय राग व्यक्त करण्याची. शिक्रापण येतो का तुमच्या इथे?
अंजली, येस, पिल्लू अगदी निरागस आहेच, पण मला आता घारीही आवडायला लागल्या. शांत, भारदस्त वाटतात. Happy
देवकी Proud

कविन, अरेच्चा, तुम्हालापण पंजाचा फटका मिळाला? Lol
घारींची ही आवडती मेथड दिसतेय राग व्यक्त करण्याची. शिक्रापण येतो का तुमच्या इथे?>> हो तीनवेळा फटका मिळालाय. एकातून धडा घेतला नाही असं म्हणाली असेल घार Lol त्यानंतर मात्र मी सबंध महिनाभर झाडांना पाणी घालायच काम नवरोबाला दिलं. त्याला चुकूनही कधी फटका मारला नाही घारीने. मी, अहो आई आणि शेजारीण तिघींनी फटके खाल्लेत गेल्या वर्षी.

अंड्यातून पिल्लू बाहेर येऊन ते घरट्याबाहेर पडण्या इतकं सक्षम होई पर्यंत पालक भुमीकेतली घार ॲग्रेसिव्ह असते असे माझे निरीक्षण. आत्ताही घारी घरटं बांधायला ये जा करत आहेत. आत्ता फक्त त्या कावळे आणि मंडळींना दूर पळवतायत. ऑथोरिटी सिद्ध करत असाव्यात जागेवरची. पण आता त्या आमच्यावर ॲटॅक नाही करत. गेल्यावर्षीही या काळात नव्हता ॲटॅक केला कधी. पिल्लू लहान असताना प्रोटेक्टिव्ह मोड ऑन होऊन पंजे मारुन लांब ठेवत असतील त्या घरट्यापासून.

आमच्या इथे शिक्रा नाही दिसला मला अजूनतरी. घारीच या काळात जास्त दिसतात. बाकी कावळे चिमण्या पॅराकिट्स कोकीळ सनबर्ड पिवळ्या टिवटिव्या वगैरे दिसतात.

गेल्यावर्षी घारीने एक शिकवलं - मार्च एंड पर्यंत ॲग्रेसिव्ह असलेली घार सगळ्यांना घाबरवून दूर पळवणारी पालक मोड मधली घार पिल्लू उडण्यासाठी सक्षम होताच घरटे सोडून सहज जागा रिकामी करुन निघून गेली. त्याच झाडावर कावळ्याने दुसऱ्या फांदीवर घरटे करायला घेतले. घारी आजूबाजूला उडत असायच्या पण आता त्या कावळ्यांना पळवत नव्हत्या. गरज होती तेव्हा त्या जागेसाठी हक्काने लढणारी घार त्या जागेची तिची गरज संपल्यावर तितक्याच सहजतेने हक्क सोडून बाजूलाही झाली.

आता यंदा पण असच सर्कल बघायला मिळेल बहुतेक.

वावे, मस्त निरीक्षण. फोटो पण मस्त.. लिहिलयस पण छान.
तुला जशी वॉर्निंग घारीने दिली तशी मला कावळ्याने दिली आहे २ वेळा. कारण सेम.. मी त्याच्या घराट्याच फार निरीक्षण करतेय हे त्याला मुळीच आवडलं नव्हतं पण त्याला आवडत नाहीये हे कळायला २ वेळा तो कावळा मला पंख मारून गेला. तिसऱ्या वेळेस बहुतेक चोच मारली असती.
माझ्या टेरेस वरच हे घडायचं. नंतर मी झाडांना पाणी पण घाबरत घाबरत द्यायचे

छान लेख आणि फोटो आणि वरचे प्रतिसादही!
यावर्षी पक्ष्याच्या पंखाने (रादर माझ्या मूर्ख वायर्ड रिस्पाँसने) खांद्याचं हाड मोडून घेतलंय! Proud

कविन, तीन वेळा फटका? बापरे!! माझी एका फटक्यानंतरच हिंमत नाही झाली गच्चीवर परत जायची.
<<गरज होती तेव्हा त्या जागेसाठी हक्काने लढणारी घार त्या जागेची तिची गरज संपल्यावर तितक्याच सहजतेने हक्क सोडून बाजूलाही झाली.>> अगदी बरोबर! मीही हेच पाहिलं. पिल्लू घरट्यात असेतोवर साळुंक्या, कावळे यांना अजिबात त्या झाडाकडे फिरकू देत नव्हत्या घारी. साळुंकी चुकून जाऊन बसली असली तर कुठूनतरी घार येऊन तिला उडवून लावायची.
पण पिल्लू उडायला लागल्यावर मात्र मग घारींना काहीच प्रॉब्लेम नव्हता. In fact, नंतर एकदा तर त्या झाडाची शहाळी पाडायला माणसं आली होती त्यांनी घारीचं घरटंपण मोडून टाकून दिलं. Sad पण तेव्हा घारी आल्या नाहीत.

केशव तुलसी, धन्यवाद! साक्षी, Happy
अमित, खांद्याचं हाड मोडलं? पक्ष्यामुळे? अरे बापरे!

मस्त लेख. आमच्या सोसायटीच्या मागे स्टेज आहे त्याचा काटकोनी खंब असाच आहे. त्याच्यावरही २ घारी असायच्या.
त्यातली एक लॉन वर पडली होती. बहुतेक काहीतरी पिसं उचकटून, साप कात टाकतात तशी. आम्ही तिला कुंपणातून शेंगदाणे टाकले, मोनॅको बिस्किट पण जवळ टाकले. कुंपण चढून पाणी द्ययचा विचार होता पण तिथे एक धामण असतो स्टेज वरच्या पसार्‍यात. त्यामुळे लांबूनच तिला ते बघ, खा वगैरे सांगितलं. पण तिने नुसतंच पाहिलं. (काय घाण देतायत उंदीर किडे द्यायचे सोडून असं म्हणत असेल.)
ती घार मेली. आणि तिचा बॉयफ्रेंड किंवा तिची मैत्रिण पण यायची बंद झाली. ३महिन्यांनी ती त्या खांबावर परत आली. पण उत्साही वाटत नव्हती.
घारीने पंजा घासला म्हणजे डेंजर आहे. घार जवळ असेल तर कबूतरं येत नाहीत असं काही दिसलं का?

वॉव! छान लेख ! आमच्या मुंबईच्या घरातून बरेच घारी उडताना दिसतात. पण फारच ऊंचावर वा लांब.. अश्या जवळून बघायचा योग नाही.. सहीये !

Happy
खरा भाबडा प्रश्न होता हो.आणि साप झुरळे पाली मुंग्या वाला धागा आहे.त्याचाच पक्ष्यांसाठी कोंड्याचा मांडा करता येईल.

कबुतरे कमी येतात घारीच प्रस्थ वाढलं की पण तरी सुरक्षित अंतर पाळून आणि तिच्या वर्किंग टायमिंगचा अंदाज घेऊन येतात काही गच्चीत आमच्या इथे

कबुतरं भरपूर आहेत आमच्या इथे. घारींना घाबरत नसावीत. शिक्रा यायचा तेव्हा सुरुवाती-सुरुवातीला साळुंक्या, कबुतरं यांची धांदल उडायची. पण मग त्यांनाही सवय झाली शिक्रा येऊन ओरडत बसण्याची.
घारीने पंजा घासला म्हणजे डेंजर आहे>> हो ना, आणि घार मेलेले उंदीर बिंदीर त्याच पंजात पकडते या कल्पनेने किळसही वाटली. शिवाय काही इन्फेक्शन वगैरे तर होणार नाही ना, अशीही भीती वाटली. पण जखम नव्हती, त्यामुळे मग फार काळजी केली नाही.
प्राचीन, अवलताई, जयु, जिद्दु, ऋन्मेष, धन्यवाद Happy
जिद्दु, सध्या पक्षीनिरीक्षण गच्ची आणि बाल्कनीपुरतं मर्यादित आहे Happy

FB_IMG_1599886500102.jpg

(महाशय विटॅमीन डी मिळवताना )

FB_IMG_1599886509015.jpg

हे आमचे गेल्यावर्षीचे शेजारी. यंदा बांधकाम सुरु आहे. यंदाचे फोटो बाकी आहेत.

खूप छान लेख आणि फोटोही छान. घारीने चांगलीच भीती दाखवली की.
घारीचं पिल्लू खरच निरागस ,गोड दिसतंय.
कविन तुमचे ही शेजारी पक्षी छान.

मस्त लेख Happy

फोटो पण छान! कविता, तुझे पण फोटो, माहीती छान आहे.
काळजी घ्या पण, विनाकारण जख्मी होवू नका.

वा !मस्त लिहिलेय.. अगदी चित्रमय वर्णन आहे. नुसते वर्णन वाचले, तरी सगळे नजरेसमोर येते. फोटो तर त्यात भरच घालतात अजून.

छानच अनुभव.
प्रकाशचित्रांमुळं मजा आली.

छान फोटो आणि वर्णन तर मस्तच. घारीचे पिल्लू तर सुंदरच. कविन चे व्हिटॅमिन डी वाले फोटोही छान.
आमच्या इथे सुद्धा घारी खूप दिसतात. सध्या मधमाश्या सुद्धा. गेले काही दिवस घरात दोन माश्या सतत भिरभिरत असायच्या. आज तर गमतच झाली. अशोकाच्या झाडावर एक मोठी काळी वस्तू प्लॅस्टिक च्या पिशवीसारखी ओघळून लोंबत होती. टक लावून पाहिले तर एक मोठे पोळे. बरेच मोठे. अगदी खाली पडायला आलेले. काही वेळाने ते हलताना दिसले .पाहतो तर कितीतरी मधमाश्या त्याला चिकटल्या होत्या आणि पोळे हलवत होत्या. दुसऱ्याच क्षणी ते आकाशात तरंगू लागले आणि एखादी डिस्क उडावी तसे बऱ्यापैकी वेगाने सरकत सरकत दिसेनासे झाले. मध इतका दाटला होता की खाली ठिबकत होता. सध्या इथे ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि धुळीचे हलके वादळ असते. म्हणून सुरक्षित ठिकाणी नेले असेल का? की अन्नाचे दुर्भिक्ष्य झाल्यामुळे खाण्यासाठी साठवण बाहेर काढावी लागत असेल?

Pages