घारीचा घरोबा

Submitted by वावे on 11 September, 2020 - 09:01
Black kite chick

आमच्या घराच्या गॅलरीसमोर थोडं लांब एक नारळाचं झाड आहे. साधारणपणे गेल्या ऑक्टोबर अखेरपासून त्या झाडावर दोन-तीन घारींची ये-जा सुरू होती. त्यापैकी दोन घारींनी नोव्हेंबर महिन्यात झाडाच्या शेंड्यावर एका बाजूला घरटं बांधायला सुरुवात केली. लांब काड्या-काटक्या आणून ते घरटं बांधत होते. कधीकधी एक घार (बहुधा नर) मेलेला उंदीर किंवा पक्षी आणून, ते खाण्यासाठी दुस‍र्‍या घारीची वाट पाहताना दिसत असे.

1_1.JPG

हा त्यांच्या प्रियाराधनाचा प्रकार असावा.

2_0.jpg

दोघे मिळून घरट्याची पाहणी करत, सुधारणा करत. जानेवारीच्या वीस तारखेच्या सुमारास माझ्या लक्षात आलं की घारीने आता अंडं घातलं असणार. कारण दिवसभर ती घरट्यात बसून असायची. नर तिच्यासाठी खायला आणायचा. ती घरट्याबाहेर येऊन ते खायला लागली की नर अंडं उबवायला बसायचा.

2_1.jpg

असा जवळजवळ दीड महिना गेला आणि मार्चच्या चार तारखेला पांढर्‍या रंगाचं, तपकिरी चोचीचं छोटंसं पिल्लू मला घरट्यात अस्पष्ट दिसलं.

3_0.jpg

त्याचे आईबाबा त्याला खायला देत होते. आधी एक घार खाऊचे लहान लहान तुकडे करून पिल्लाला भरवत होती. तिला ते फारसं जमत नव्हतं. मग ती बाजूला गेली आणि दुसर्‍या घारीने हे काम हातात घेतलं. तिने मात्र सफाईदारपणे पिल्लाला ते तुकडे भरवले.

व्हिडिओ इथे पहा
एक घास घारीचा

त्यानंतर मग हा रोजचा दिनक्रम झाला. सतत दोघांपैकी एकजण घरट्यात किंवा घरट्याजवळ राखणीला बसणार आणि दुसरी घार खाऊ आणणार. त्याचे लहान लहान तुकडे करून ते पिल्लाला भरवणार. निवांतपणा कसा तो नव्हताच त्यांना.

5_0.jpg

पिल्लाला भरवण्याची तयारी

हे काम कमी म्हणून की काय, दोनतीन दिवसांनंतर एक शिक्रा जवळच्या एखाद्या झाडावर येऊन बसायला लागला. नुसता बसत नव्हता, तर अखंड ओरडायचा. सकाळी सातच्या आधीच त्याचा आवाज यायला लागायचा. अखंड ओरडत असताना मधेच तो उडत उडत घारीजवळ जायचा, तो जवळ आला, की घार उडायची, मग शिक्रा तिचा पाठलाग करायचा, वेगाने उंच उंच घिरट्या घालत घालत दोघेही लांब उडत जायचे. थोड्या वेळाने शिक्रा परत यायचा आणि एखाद्या झाडावर किंवा आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर बसून पुन्हा ओरडायला सुरुवात! हा त्याचा उद्योग जवळजवळ दीड महिना रोज चालू होता.

4.JPG

सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत, कधीकधी परत संध्याकाळीही हाच क्रम असायचा. मात्र कधीही शिक्रा घारीच्या घरट्याजवळ गेला नाही किंवा घरटं असलेल्या झाडावरही बसला नाही. त्याने पिल्लाला काही इजा करण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. शिक्रा हा अगदी पक्का शिकारी पक्षी, तर घार ही निसर्गातली एक उत्कृष्ट सफाईकार ( scavenger). मग या दोघांची ही दुष्मनी कशासाठी असेल? मी हे निरीक्षण किकांना, म्हणजे श्री. किरण पुरंदरे यांना कळवलं आणि शिक्र्याच्या या वागणुकीचं कारण काय असेल, असं विचारलं. त्यांनी असं सांगितलं की शिक्रा स्वतःच्या विणीच्या परिसराचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असावा. बहुधा जवळपासच दुसर्‍या कुठल्यातरी झाडावर त्याचंही घरटं असावं. एक मात्र नक्की, की घारीने स्वतःहून जाऊन शिक्र्याला हुसकवण्याचा प्रयत्न क्वचितच केला. ९९% वेळा शिक्राच घारीजवळ येत होता.

या काळात मला एक चांगलाच धडा मिळाला. एकदा असाच शिक्रा येऊन ओरडत बसला होता. मला माझ्या घरातून तो स्पष्ट दिसत नव्हता. म्हणून मी फोटो काढण्यासाठी गच्चीवर गेले. तेव्हा एक घार नारळाच्या एका झाडावर बसली होती आणि शिक्रा दुसर्‍या झाडावर. मी गच्चीवर जिथे उभी होते तिथून हे दोघेही मला स्पष्ट दिसत होते. घरटं मात्र तिथून दिसत नव्हतं. मी एकदोन फोटो काढले. तेवढ्यात दुसरी घार माझ्या नकळत माझ्या मागून उडत अगदी खाली आली, तिचे पंजे माझ्या डोक्याला घासत तशीच सावकाश पुढे उडत निघून गेली. मला साधा ओरखडाही उठला नाही, पण पंजा डोक्यावर चांगलाच जोरात घासला गेला होता. हे नक्कीच तिच्याकडून चुकून झालेलं नव्हतं. मी तिथे उभी राहून असं निरीक्षण करणं त्यांना मान्य नव्हतं, असा त्याचा अर्थ मी काढला आणि गच्चीवरून लगेच खाली आले. पंजा घासलेल्या जागी बराच वेळ हुळहुळत राहिलं. परत कधीही गच्चीवरून घारींचे फोटो काढायला मी गेले नाही. गॅलरीतून, खिडकीतून जेवढं दिसेल तेवढंच पहायचं, असं ठरवलं. पिल्लू आणि घरट्याच्या बाबतीत पक्षी काय, प्राणी काय आणि आपण माणसं काय, खूप संवेदनशील असतो. याचं भान निसर्गनिरीक्षण करताना सतत ठेवलं पाहिजे. घारीने नुसताच पंजा घासला, चोचबीच मारली नाही याबद्दल मनातल्या मनात मी तिचे आभारच मानले. Happy

पिल्लू आता घरट्यातल्या घरट्यात जास्त जास्त हालचाल करायला लागलं होतं. सुरुवातीला ते फक्त खाणं आणल्यावरच उठायचं, पण जसजसं मोठं होऊ लागलं, तसतसं ते घरट्यात उभं राहून एकदोन पावलं टाकू लागलं, पंख फडफडवू लागलं. काही दिवसांनी ते घरट्याच्या टोकाशी येऊन बसू लागलं. त्या बाजूला पश्चिम दिशा असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी घरट्यात पिल्लू आणि वरच्या झापावर घार, दोघे मस्त ऊन खात बसलेले दिसायचे. अजून थोडे दिवस गेल्यावर पिल्लू घरट्याच्या बाहेर येऊन, आधी त्याच झापावर, मग हळूहळू दुसर्‍या झापावर येऊन बसायला लागलं. संध्याकाळी बहुधा शिक्राही जवळपास नसायचा.

6_0.jpg

असे दिवस जात राहिले. पिल्लू चांगलंच मोठं झालं होतं. पण त्याचा उडण्याचा विचार अजून दिसत नव्हता. आम्हालाच उगाच घाई झाली होती, त्याला उडताना पाहण्याची. पण ते आपलं त्याच झाडावर बसून आजूबाजूला उडणार्‍या साळुंक्या आणि कबुतरांकडे बघत बसायचं.

पंधरा एप्रिलला सकाळी सकाळी मला पलीकडच्या दुसर्‍या नारळाच्या झाडावर एक घार बसलेली दिसली. नंतर पाहिलं तर अलीकडच्या झाडावरचं घरटं रिकामं होतं! मग दुर्बिणीतून नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की पलीकडच्या झाडावर हे पिल्लूच जाऊन बसलं होतं. अखेर त्याने धीर करून झेप घेतली होती! बर्‍याच वेळाने ते उडत उडत आमच्या डावीकडच्या बिल्डिंगच्या गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलं. डब्याशिवाय पहिल्यांदा पोहताना आपल्या पोटात जो गोळा आलेला असतो, तसाच गोळा त्याच्याही पोटात आलेला असणार. नंतर मग दिवसभर ते कुठे दिसलं नाही. संध्याकाळी मात्र परत ऊन खायला येऊन बसलेलं दिसलं.
नंतर मग काही दिवस पिल्लू अधूनमधून दिसत होतं. त्या कुटुंबाचा ’बेस’ अजूनही त्या झाडावरच होता. दिवसभर कुठेही फिरले, तरी संध्याकाळी परत त्याच झाडावर किंवा कुठेतरी आसपास दिसायचे. अजूनही पिल्लू तसं परावलंबीच होतं. आईबाबा आणून देतील तेच खाणं. फक्त त्याला आता स्वत:ला मांसाचे तुकडे तोडता यायला लागले होते. तरीही कधीतरी घार त्याला भरवताना दिसायची. शिक्राही अधूनमधून येत होताच, पण आता पहिल्यासारखा दिवसभर येऊन अखंड ओरडत बसायचा नाही.

8_0.jpg

होता होता लॉकडाऊन शिथील झाला. नारळाचं झाड जिथे उभं आहे, तिथल्या जमिनीचे प्लॉट्स पाडून तिथे बंगले बांधण्याच्या कामाला लॉकडाऊनच्या आधीच थोडी सुरुवात झालेली होती. ’अनलॉक’ सुरू झाल्यावर नवीन जोमाने परत तिथे काम सुरू झालं. घरटं ज्या झाडावर होतं, ते झाड अजूनही उभं आहे, पण बाकी आजूबाजूची काही झाडं तोडली गेली. गॅलरीसमोरचं दृश्य या दोन-तीन महिन्यात खूप बदललं. बांधकामावरच्या सततच्या वर्दळीमुळे आणि आवाजांमुळे आता पक्ष्यांचे आवाज जरा कमीच ऐकू येतात. गच्चीवर वगैरे गेल्यावर अनेक घारी उडताना दिसतात, पण त्यात या दोन विशिष्ट घारी आणि त्यांचं मोठं झालेलं पिल्लू आता ओळखता येत नाही. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे,
सुंदर वर्णन, चित्रदर्शी
घारी बरेचदा नारळ किंवा ताडाच्याच झाडावर घरटे बांधतात अस पाहिलय
काही विशेष कारण?

धन्यवाद मंडळी _/\_
कविन, मस्त फोटो. अगदी पंख वगैरे पसरून सूर्यस्नान करतात पक्षी.
हीरा, गंमतच आहे पोळंच्या पोळं उचलून नेलं माश्यांनी म्हणजे Happy
ऋतुराज, घारींसाठी घरट्याची विशिष्ट उंची आवश्यक असते. (७ ते २५ मीटर्स- किरण पुरंदरे) त्यामुळे त्यांना नारळाचं झाड सोयीस्कर वाटत असेल. पण इतर झाडांवरही घरटी करतात घारी. माझ्या घराजवळ एक तळं आहे तिथल्या एका वेगळ्या झाडावरही घारीचं घरटं होतं. (कसलं झाड आहे ते मला ओळखता येत नाही) पुढे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मी तिकडे जाणं सोडलं त्यामुळे निरीक्षण करता आलं नाही. तिथेच दुसऱ्या एका झाडावर ब्राह्मणी घारीचंही घरटं होतं. दोन्ही झाडं चांगलीच उंच आहेत.

धन्यवाद कमला!
नवीन सोय वापरून धाग्यात मुख्य चित्र देऊन बघितलं. सोपी आणि मस्त सोय आहे.

वाह!! फार मस्त लेख आहे. उत्तम नीरीक्षणशक्ती तसेच निष्कर्षही अचूक काढण्याचे कौशल्य किरण पुरंदरे यांचे लेख लहानपणी तहानभूक विसरुन वाचत असू मी व माझी मैत्रिण.

छान फोटो आणि वर्णन तर मस्तच. घारीचे पिल्लू तर सुंदरच. कविन चे व्हिटॅमिन डी वाले फोटोही छान. +1
हे आवडलं , एकतर तुम्हाला घारीने अजून काही न करता तिचा राग दाखवला म्हणून जीव भांड्यात पडला.
किती चांगले पालकत्व करतात हे पक्षी , हे तुमच्या निरिक्षणामुळे पुन्हा नव्याने कळलं.

सामो, अस्मिता, फेरफटका, धन्यवाद Happy
कालच बऱ्याच दिवसांनी परत त्या नारळाच्या झाडावर एक घार येऊन बसली होती. पुढचा 'सीझन' सुरू होण्याची चाहूल Happy

धन्यवाद सामी आणि कुमार सर!
यावर्षी परत घारींची नवीन घरोब्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. त्याच झाडावर काटक्या आणायला सुरुवात झाली आहे, पण आत्ता तरी पलीकडच्या बाजूला ठेवतायत आणून. अधूनमधून गच्चीवर जाऊन लक्ष ठेवलं पाहिजे. पण घारींच्या लक्षात न येता. Lol नाही तर परत फटका मिळेल.

Pages