तुम्ही चहा कसला पिता...?

Submitted by बिथोवन on 11 September, 2020 - 06:56

"आपली ऑर्डर काय आहे सर?"

"एक चहा."

"ओके सर. कसला चहा सर?"

"म्हणजे?"

"म्हणजे आसाम टी की दार्जिलिंग टी सर?"

"अं.... मेक इट आसाम."

"ओके सर. सर लिप्टन की ब्रुक बॉण्ड?"

"जेम्स बॉण्ड आहे काय?"

"नो सर. त्याचा भाऊच आहे. ब्रुक बॉण्ड."

बर बर.. आणि तो शेन बॉण्ड?

तो व्हॅगाबॉण्डचा नातू आहे सर.

"ओके ओके.. बर.. लिप्टन घे."

"चहा कोरा की दूधवाला सर?"

"ऑफकोर्स दूध घातलेला! हा हा!"

"ओके सर. सर दूध गायीचं की म्हशीचं सर?"

"अं? गायीचं चांगलं लागतं?"

"यूअर चॉईस सर."

"ओके. गायीचं."

"ओके सर. जर्सी गाय की न्यू जर्सी गाय सर?"

"न्यू जर्सी? ते तर अमेरिकन स्टेट आहे ना?"

"हो सर. आम्ही देशी गायीला न्यू जर्सी म्हणतो सर."

"ओह...के...! जाऊ दे. म्हशीचं दूध घे."

"ओके सर. सर म्हैस जाफराबादी, सुरती की म्हैसाणा सर?"

"यमाच्या म्हशीचं मिळेल काय?"

"सॉरी सर. यम कडे रेडा असतो सर. रेडा दूध देत नाही सर."

"ओ ओ... खरंच की. बरं मग जाफराबादी घे."

"ओके सर. सर चहा गोड की अगोड सर?"

"अरे.. गोडच कर. मी डायबेटिक नाही. हाहा!"

"ओके सर. सर साखर घालू की गूळ सर?"

"खडीसाखर घालता येते का?"

"नाही सर. सर ती लवकर मेल्ट होत नाही सर."

"बर. साखर घाल. साखर पांढरी की काळी विचारू नकोस."

"ओके सर. सर कप मध्ये आणू की किटलीत सर?"

"कपात आण रे बाबा.."

"ओके सर. सर कप प्लॅस्टिक की पोर्सलेन?"

"कुठलाही आण पण लवकर आण."

"ओके सर. सर ट्रे मध्ये आणू की हातात घेऊन येऊ?"

"हे बघ. तो चहा तूच पी."

ओके सर, कसा पीऊ? चमच्याने, स्टाॅने का सरळ कप तोंडाला लावून?"

" बशी घे, त्यात ओत, फुर्र कर आणि पी."

"अरे सर का उठताय? कुठे चाललात आपण सर?"

"अरे माझी किल्ली गाडीलाच राहिली. तू तो चहा पिऊन टाक, फुर्र. मी चहाशी ब्रेक अप केलाय, बाय...!"

....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एंड युज पिणे असल्यामुळे आमच्याकडे संभाषण असे असते:
"काय पिणार? चहा की कॉफी?"
"तुम्ही पाजाल ते पिणार."
मग कधी चहा, तर कधी कॉफी.

मस्त लिहिलेय.
वरती डाव - पळी अशी चर्चा वाचली, त्यावरून एक किस्सा आठवला.
आमच्या इथल्या एका मुलींच्या वसतिगृहात आरोग्य तपासणीसाठी मी आणि माझ्या 2 मैत्रिणी अशा आम्ही तिघी गेलो होतो. तपासणी आवरल्यावर आमच्यासाठी-रेक्टरसाठी चहा -बिस्किटे आली. चहा इतका गोड होता, की आपण पाक च पितो आहोत, असे वाटत होते. कसाबसा चहा संपवून आम्ही विचारले, "कुणी केलाय चहा? "तर रेक्टर मॅडम कौतुकाने म्हणाल्या, "आमच्या मुलींनीच केलाय. छान केलाय ना? तरी साखर जरा कमीच झालीय ना हो. मी पोरींना 6 डाव घालायला सांगितली होती , त्यांनी 4 डाव च घातली बघा !"
साखर चमच्याने घालायची असते, हे आम्हाला माहिती होते, डावाने पण साखर घालतात, हे ज्ञान तेव्हा मिळाले.
4 कप चहाला 4डाव साखर घातली, तर पाक च पिल्यासारखे वाटत होते. जर 6 डाव घातली असती, तर ओठच चिकटले असते एकमेकांना , असा विचार करत रेक्टर बाईंचे न ऐकल्याबद्दल त्या चहा बनवणाऱ्या अनाम मुलींना मनोमन धन्यवाद देऊन काढता पाय घेतला आम्ही तिथून !

आमच्या गावीही बऱ्याच लोकांकडे हे चालायचे.
तेव्हा कुणाकडे गेले की जास्त करून कच्चे पोहे तेल, तिखट, मीठ, शेंगदाणे आणि कांदा घालून कालवत आणि मग चहा.
पोह्यात जेवढं जास्त तेल आणि चहात जेवढी जास्त साखर तेवढं जास्त जंगी स्वागत समजल्या जाई.

Pages