त्याचं आपलं काहीतरीच..

Submitted by पाचपाटील on 7 September, 2020 - 16:34

त्याच्यापुढं बऱ्याचदा दोन प्रश्र्न असतात.
एक म्हणजे उद्याचं काय? आणि दुसरा म्हणजे पुढं काय?
उद्याचे प्रश्र्न अर्थातच सोपे असल्यामुळे तो बहुतेक वेळेस त्यांनाच चिकटतो...त्यामुळं त्याला काहीतरी केल्यासारखं वाटतं... किंवा अस्तित्वाला तात्पुरता अर्थ वगैरे मिळतो असं वाटत असेल कदाचित...
आता तुम्ही म्हणाल की हा अॅप्रोच काही बरोबर नाही..
तर ते असूच द्या... कारण आपल्याला काय करायचंय? हो की नाही??

तर मग नंतर काय होतं की तो रिलॅक्स होऊन ठरवतो की आता उरलेला वेळ फक्त आपल्या मालकीचा... म्हणजे कुणी बोकांडी बसलेलं नसण्याचा वेळ... मेंदूला शांतवणारा वेळ.. स्वत:चा फैलाव करायला स्कोप देणारा वेळ... जाणिवांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असणारा पोषक वेळ....
बास का? समजलं ना?.. ओके.! तर अशाच कुठल्यातरी वेळी तो एखादी कथा ट्राय करावी म्हणून लिहायला बसतो.. पण दोन ओळी टाईप करून झाल्यावर वाचून बघतो तर त्याला स्वत:लाच एक दणदणीत जांभई येते...!

मग तोपण नाद सोडून तो नेटवर अस्ताव्यस्त ब्राउजिंग करत राहतो...असाच एका ब्लॉगवर थांबतो. पण एकाच पॅराग्राफमध्ये त्याला कळतं की ह्या आर्टीकलमध्ये काहीही दम नाही.. पण तरीही पुढं कदाचित काहीतरी हाँटींग‌ असेल म्हणून तो स्क्रोल करत राहतो.. आणि शेवटी त्या ब्लॉगरला शिव्या घालत दुसऱ्या ब्लॉगवर जातो.. तर तिथंही तेच..!
मग नाईलाजाने न्यूजचॅनेल्स..! तिथं एकजण जागतिक
कारस्थानाचा भांडाफोड केल्याची गुप्त बातमी देत असतो..!
दुसरीकडे एकजण ओरडून ओरडून तो कुणाच्या बापाला घाबरत नाही असं पटवून देत असतो..!

काय म्हणालात तुम्ही?? त्यापेक्षा त्याने एखाद्या गुहेत जाऊन नुसतं शांत बसायला पाहीजे?? कारण स्वत:पासून सुटण्याचे हे सगळे मार्ग विफल आहेत असं म्हणताय??? पण काही न करता, फक्त शांत बसता येत नाही, हाच जर प्रॉब्लेम असेल तर !! म्हणजे समजा गुहेत जाऊन तिथे पण त्याने
उदाहरणार्थ गुहेची साफसफाई किंवा
बांधबंदिस्ती वगैरे कामं चालू केली तर काय करायचं?? अर्थात तुमचं निरीक्षण नोंदवायला तुम्ही मोकळे आहातच... पण एक आपलं सांगितलं सहज..
अरेच्चा!! पण तुम्ही अजून हे वाचत होता काय ?? कमाल आहे तुमची पण!! इंटरेस्ट वगैरे यायला लागला होता की काय?? नाही ना?? मग ठीक आहे..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users