काल, माझा मित्र अमितचा फोन आला. बर्याच दिवसांनी कामाव्यतिरिक्त बोलायला त्याने फोन केलेला. या आधी आम्ही सगळे मित्र कुणाच्या वढदिवसाला म्हणा, कुणी गाडी घेतली म्हणुन म्हणा किंवा इतर कसल्याही सुख-दुखाच्या क्षणी एकत्र भेटायचो, खुप हसी-मजाक करुन वेळ सत्कारणी लावायचो पण गेल्या ५ महिन्यात सर्वकाही बदललं आहे. कुणाची साधी चौकशी करायलाही वेळ मिळत नाही कारण वर्क फ्रॉम होम मुळे तेवढा वेळ मिळतच नाही.
तर अमितने फोन केल्यावर दोघांनीही इतर सर्व चौकशा, ख्याली खुशाली झाल्यावर असं लक्षात आलं की तो खूप टेंशन मधे आहे. कारण काय तर त्याच्या आजुबाजुला सोसायटी मधे खुप जण कोरोना बाधीत झाले आहेत. हा घराबाहेर जायलाही घाबरत आहे आणि जिवनावश्यक वस्तु जसे की दूध, भाज्या, किराणा आणायलाही तो स्वतः जात नाही किंवा घरातील कोणालाही जाऊ देत नाही. भयंकर पॅनिकनेस आल्यामुळे स्वारी बर्यापैकी दुर्मुखलेली आहे. त्याला मी थोडा रिलॅक्स रहा, मुवीज बघ, आवडतं म्युझीक ऐक असं सांगितलं खरं पण त्याचं काही समाधान झालेलं वाटलं नाही एवढा तो डाऊन वाटत होता. आता या अमितला कसं समजवावं
त्याचा फोन झाल्यावर मनात विचार येऊ लागले की भारतात कदाचित समुह संसर्ग सुरु झालेला आहे असं म्हणतात. मोठ्या शहरात जॉब करणारे आता वर्क फ्रॉम होम मिळाल्यामुळे आपापल्या मूळ गावी जाऊन वर्क फ्रॉम होम करत आहेत. मार्च पासुन लॉकडाऊन होता त्यामुळे गावाकडे कोरोनाच्या केसेस दुर्मिळपणे सापडत होत्या परंतु आता या क्षणी इतक्या केसेस समोर येत आहेत की काही विचारता सोय राहिली नाही.
अगदी ओळखितले, मित्रांच्या घरचेही पॉझिटीव सापडत आहेत आणि दुर्दैवाने बेड उपलब्ध न झाल्यामुळे दगावत आहेत असं भयाण वास्तव असताना अनलॉक प्रोसेस सुरु झालेली आहे. ह्या सर्वांमुळे पेशंट वाढत आहेत आणि बेड उपलब्ध न झालेल्या पेशंटला प्राणाला मुकावे लागत आहे. या सर्वांचा अति विचार करुन अमितला उगिचंच टेंशन आलं आहे असं त्याच्याशी बोलल्यावर जाणवलं.
अमितसारखी अवस्था बर्याच जणांची झाली असण्याची शक्यता आहे. अशावेळी पॅनिकनेस कमी करण्यासाठी काय काय उपाय योजना केल्या पाहिजेत...?
बेड उपलब्ध न झालेल्या पेशंटला
बेड उपलब्ध न झालेल्या पेशंटला प्राणाला मुकावे लागत आहे.
>>>>
मला तर यावरच शंका आहे आता
कोरोनाची लक्षणे दिसली तर हॉस्पिटलला जावे की घरीच अंगावर काढावीत हे समजत नाहीये.
जे होईल ते टाळता येणार नाहीये
जे होईल ते टाळता येणार नाहीये
विशेषतः को मोर्बिडीटीज असल्यास.
पण स्वतःकडे एकंदर बारीक लक्ष ठेवणे, जमेल तेव्हा ओ2 तपासणे इतके करत राहण्या सारखे आहे.
एक्सपोजर लहान एरियात, आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त नसणे ही व्हायरल ओव्हरलोड साठी महत्वाची सावधगिरी आहे.(असे वाचलंय)
म्हणजे खोकला ताप येत असल्यास लगेच डॉ ना फोन करणे(ते 2 दिवस खायला औषधे देऊन त्यानंतर कमी न झाल्यास कोविड टेस्ट चा सल्ला देतात.)
एकदा सिच्युएशन गंभीर झाली की वशिले लावून बेड मिळवणं कठीण असणार.पण ती गंभीर होण्या पूर्वी स्वतःच्या शरीरावर, बदलांवर लक्ष ठेवणं इतकं करता येईल.शरीर सांगतं आपल्याला, काहीतरी वेगळं वतातन तेव्हा.
(बाकी इथली डॉ मंडळी आणि खुद्द या अनुभवातून गेलेले सांगतीलच.)
मी_अनु, तुम्ही म्हणता ते खरं
मी_अनु, तुम्ही म्हणता ते खरं आहे.. स्वतःवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
एक्सपोजर लहान एरियात, आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त नसणे ही व्हायरल ओव्हरलोड साठी महत्वाची सावधगिरी आहे.>> हे काय आहे..? मला याचा अर्थ नाही कळाला
आमचे एक नातेवाईक आजोबा...
आमचे एक नातेवाईक आजोबा... सध्या सातारा स्थायिक.... वय 92 .. रोज सूर्यनमस्कार घालणे वगैरे .. चांगले फिट... गुडघा दुखायला लागला म्हणून त्यांना मुलगा डॉक्टर कडे घेऊन गेला... तिथे कोरोना लागला... नंतर बेड मिळत नव्हता.. वशिला लावून बेड मिळाला... दगावले.. बॉडी देखील दिली नाही... आता त्यांच्या मुलाला आणि सुनेला ला झालाय कोरोना.. आता त्यांचा नातू - माझा चुलत भाऊ... इकडून अमेरिकेतून एयर इंडिया ने निघतोय भारतात... बायको आणि मुलाला इथेच ठेऊन... ही असली उदाहरणे आहेत इथे अमेरिकेत राहून कळतात.. भारतात लोक का नाही पॅनिक होणार...
म्हणजे 15 मिनीतापेक्षा कमी
म्हणजे 15 मिनीतापेक्षा कमी काळात काम उरकावे व निघावे
जास्त वेळ थांबले तर करोनाने चान्सेस जास्त
म्हणजे 15 मिनीतापेक्षा कमी
म्हणजे 15 मिनीतापेक्षा कमी काळात काम उरकावे व निघावे>> ओह ओक.. धन्स ब्लॅककॅट
@ च्रप्स : हॉरिबल इन्सिड्न्स
जुलै पर्यंत कोरोनाच्या पुणे
जुलै पर्यंत कोरोनाच्या पुणे मुंबईच्या बातम्या बघून भीती वाटायची पण आपण लांब आहे, सुरक्षित आहोत असं वाटायचं पण म्हणता म्हणता खोलवर पसरला छोट्या शहरात सुद्धा. मागच्या महिन्यात मुलाच्या शाळेतल्या मित्राची आई काही ही हेल्थ इश्यू नाहीत ,रोज सकाळी चालणारी वगैरे कोरोना ग्रस्त झाली. पण आता होतात की बरे त्यातुन , आणि ही तर तरुण हेल्दी . पण म्हणता म्हणता आठवड्यात गेली. कुणीही एडमिट करून घेईनात. श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ही . 3 तास गाडीत बसून होती. शेवटी मिशनमध्ये स्ट्रेचर वर घेतलं आणि तिथेच गेली. खूप सुन्न झाले होते 4 दिवस.
जे होईल ते टाळता येणार नाहीये <<< अगदी खरं, पण भीती वाटतेच ना. काळजी घ्यायची शक्य तेवढी. ज्यावर श्रद्धा आहे त्याची उपासना करणे आणि इथे मायबोलीवरही कोरोनातून बरे झालेल्यानी लिहिले आहे . धागा उपयुक्त ,समयोचित आहे .
खरचं समयोचित धागा , पूर्वी
खरचं समयोचित धागा , पूर्वी बातम्यांमधील आकड्यातुन दिसणारा व्हायरस आता अगदी शेजारच्या फ्लॅट पर्यंत येऊन पोचलाय, ओळखीतली लोकं दगावत आहेत. ज्यांना कामानिमित्त रोज बाहेर जावं लागत अशा आप्तेष्टांच्या काळजी ने पॅनिक व्हायला होतय
परंतु असं पण दिसतंय की जे बाहेर जातात ते बऱ्यापैकी निवांत आहेत किंवा त्यांनी आहे ती परिस्थिती स्वीकारली आहे . घरात राहणारे जास्त पॅनिक होतात असं स्वानुभवावरून वाटत.
काळजी घेणे, अति विचार टाळणे आणि Acceptance वाढवणे
श्रद्धा और सबुरी!!
श्रद्धा और सबुरी!!
बस्स!!! यापलिकडे काही सल्ला देता येत नाहीये.
खूपच समयोचित धागा, खूप जणांना
खूपच समयोचित धागा, खूप जणांना उपयोग होणार आहे याचा . तुमच्या मित्राबद्दल खरंच वाईट वाटले. ए श्रद्धा यांचा प्रतिसाद आवडला. त्यांना जनरली सुद्धा anxiety issues होते का आणि करोनामुळे वाढले. माझ्या एका नातेवाईकाचे असेच झाले आहे.
त्यांनी सकारात्मक लोकांशी संभाषण ठेवावे आणि बातम्यांपासून दूर रहावे. इतर काम व छंदात मन रमवावे. देवाधर्माची आवड असेल तर स्तोत्रांच्या BB वर कुंजिका स्तोत्र आहे त्याने भिती जाते असे म्हणतात. शिवाय गुरूचरित्राचा पण सकारात्मकतेसाठी उपयोग होतो.
मानसिक ऊर्जेसाठी जे जमेल ते करावे. इथे कविन यांचा अनुभव आहे कोविडचा तो त्यांना पाठवता येईल. अशा परिस्थितीत खरोखरच करोना झाला तर घाबरून जीव जाईल करोनामुळे नाही. श्वसनाचे व्यायाम करावेत. झुम्बा करून पहावे ते मूडला फार uplifting आहे असा अनुभव आहे.
Basically we need to burn the adrenaline rush caused by anxiety and constant panic by doing some physically rigorous activity if possible. Adrenaline hormone अतिरिक्त प्रमाणात शरीरासाठी हानिकारक आहे जे भिती आणि स्ट्रेस मुळे तयार होते . गरजेपेक्षा जास्त होऊ नये ह्यासाठी काळजी घ्यावी.
काळजी घ्यावी , तेवढेच आहे हातात सध्या. जीना मरना तो उपरवाले के हात मे है बाबु मोशाय , हा आनंदचा संवाद लक्षात ठेवावा. हेही दिवस जातील!!
त्यांना शुभेच्छा.
प्रतिसाद पटला / आवडला नाही तर जाऊ द्या.
>>>झुम्बा करून पहावे ते मूडला
>>>झुम्बा करून पहावे ते मूडला फार uplifting आहे असा अनुभव आहे.>>> होय शक्य असेल तर आरशापुढे एकट्याने नाचावे
मला आवडते हाहाहा. दुसर्या दिवशी मूड खूप पॉझिटिव्ह होतो.
>>>>जीना मरना तो उपरवाले के हात मे है बाबु मोशाय , हा आनंदचा संवाद लक्षात ठेवावा.>>>> छान लिहीलेस. अगदी सुयोग्य.
परिस्थितीचा स्वीकार करणे,
परिस्थितीचा स्वीकार करणे, शक्य तेवढी काळजी घेणे आणि कामात लक्ष घालणे - सतत मनोरंजन जास्त काळ मदत करत नाही त्यासाठी कामच हवे, फावल्या वेळात आवडीच्या गोष्टी करणे आणि करोनाच्या बातम्या न बघणे.
वरील सर्वांनी छान पोस्ट्स
वरील सर्वांनी छान पोस्ट्स लिहील्या आहेत.
मला असे वाटते की जास्त विचार करू नये, अतिविचार आणि माणसाचं मन त्याला निराशेच्या अंधारात ढकलतं.. जिथे मन रमते तेथे रमवावे.. विश्व कल्याणाची प्रार्थना करावी
अजून काय करू शकतो आपण असेही
धाग्यात लिहिल्याप्रमाणे जवळपास करोना चे बळी गेलेले पाहिले की खूप वाईट वाटतं , ती मनस्थिती शब्दात लिहिता येत नाहीये, पण बेकार असतं ते
पॅनिकवर उपाय नाही.कोरोना.जाईल
पॅनिकवर उपाय नाही.कोरोना.जाईल तेव्हाच पॅनिकनेस कमी होईल.लवकर जाईल अशी अपेक्षा ठेवा
अजूनही बरेच लोक जास्त काळजी
अजूनही बरेच लोक जास्त काळजी घेत नाहीत असेच दिसते. गर्दी करणारी व मास्क न लावणारी बरीच जनता आहे.
अनलॉक करा म्हणून ओरडतात पण काळजी घेण्याच्या नावाने शून्य.
कोणतीही सुज्ञ व्यक्ती बाहेर बिना मास्कचे लोक दिसत असतील तर घाबरणारच.
सुरक्षित अंतर ठेवून,
मास्क व Sanitizer वापरून
आपण आपली काळजी घेणे एव्हढेच आपल्या हातात आहे.
मी राहते त्या सोसायटीत एकच
मी राहते त्या सोसायटीत एकच कोरोना रुग्ण होता मागच्या महिन्यात तो ही आता बरा झाला आहे.
सोसायटी आवारात लोक अजिबात मास्क लावत नाहीत. सोशल डिस्टंसिंग फोलो करत नाहीत.
मागच्या आठवड्यात एका मैत्रीणीचा ग्रुहप्रवेशाचा कार्यक्रम होता. बरेच लोक आले होते अगदी प्रवास करून, ई-पास काढून.
दुसर्या दिवशी काही तरी कारण सांगायचे म्हणून तब्येत ठिक नव्हती, म्हणून येऊ शकले नाही असं सांगितलं.
काही लोक ईतके कूल आहेत खरच.तामिळनाडू मधे प्रत्येक रविवारी टोटल लॉकडाऊन आहे पण इतर दिवशी नॉर्मल गर्दी आहे सगळीकडे.
हे काही या आणि आधीच्याही
हे काही या आणि आधीच्याही काळात म्हणजे कोविड पूर्व काळातही मला उपयोगी ठरलेले उपाय आहेत. माझ्या नोटपॅडवरच्या नोंदी आहेत काही नव्या काही जुन्या, त्यामुळे मधेमधे इंग्रजी वाक्य आहेत. त्याबद्दल क्षमस्व
१) ताण आहे याचा स्विकार करा . Accept and acknowledge that you are stressed
२) Breathe deeply – take several deep breaths to slow down ur heart rate & reduce ur anxiety (breath couting, Belly Breathing)
३) Relax ur muscles – by doing light exercise, yogasan
५) हसा - हसणे हे उत्तम टॉनिक आहे.
६) शक्यतो संतुलित आहार घ्या. अधूनमधून सवलत म्हणून अनहेल्दी, पण घरी केलेले खायला हरकत नाही
शरीर आणि मन दोन्हीचे आरोग्य महत्वाचे आहे. दोन्ही एकमेकांवर परिणाम करते
७)
जे टाळणे अशक्य
दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे
निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे
आहे अशक्य काय
माझे मला कळाया
दे बुद्धी देवराया
ही प्रार्थनाही मनाला बळ देते आणि तरीही खोट्या सकारात्मकतेत न अडकवता परिस्थिती खरी काय आहे ती स्विकारायचे बळ देते
८) छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टींची नोंद करायची मनाला सवय लावायची. आपल्या आजूबाजूला सकारात्मकही गोष्टी घडत आहेत नुसतेच अंधारुन आलेले नाही ही भावनाही मनाला सकारात्मक ठेवायला उपयोगी ठरते
९) नकारात्मक विचार नाकारायचे नाहीत. आपण काही ३६५ दिवस २४/७ सकारात्मक राहू शकतो असे नाही. तेव्हा अधूनमधून थोडे कल्लोळ वाढवणारे विचार मनात येणार. पण 'हे ही पालटेल' असे म्हणत त्यांना फार काळ रेंगाळत ठेवायचे नाही.
१०) आवडत्या गोष्टीत मनाला गुंतवायचे. श्रद्धा असेल तर प्रयत्नांच्या जोडीला श्रद्धेतून मिळालेली उर्जा दुप्पट एनर्जी देते. नामस्मरण, श्लोक म्हणणे / ऐकणे इत्यादीने मनाला बरे वाटते जर श्रद्धा असेल तर.
११) सुरक्षिततेचे सगळे नियम पाळायचे आणि सध्या मन जरा शांत होई पर्यंत ऑनलाईन ऑर्डरचा आधार घ्यायचा.(अमेझॉन/ बिग बास्केट / इतर काही तुमच्या भागातील ऑनलाईन शॉपिंग पर्याय)
१२) कुटूंबातील सदस्यांसोबत मिळून एकत्र सिनेमा बघणे / पुस्तक वाचणे / पत्ते खेळणे / स्वयंपाक करणे / घर आवरणे /क्राफ्ट करणे/ गप्पा मारणे अशापैकी सगळ्यांना आनंद देईल अशी ॲक्टिव्हिटी करणे
आपलं मन यातल्या कोण कोणत्या उपायांनी शांत होतय हे आपलं आपल्याला कळत जातं
आणि त्यापलीकडेही ताण अती होतोय आणि हॅन्डल होत नाहीये हे लक्षात आले तर प्रोफेशनल मदत जरुर घ्यावी. असं म्हणतात सर्दी बरेचदा आपल्या आपणही बरी होते पण तिचा त्रास वाढतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊन औषध आणतोच की, त्याचप्रमाणे 'ताण' आपण करत असलेल्या उपायांनी कमी होत नसेल तर प्रोफेशनल मदत घ्यावी.
कविन @ खूप छान लिहायला
कविन @ खूप छान लिहायला
परंतु असं पण दिसतंय की जे
परंतु असं पण दिसतंय की जे बाहेर जातात ते बऱ्यापैकी निवांत आहेत किंवा त्यांनी आहे ती परिस्थिती स्वीकारली आहे . घरात राहणारे जास्त पॅनिक होतात असं स्वानुभवावरून वाटत.
>>>>>
साईकोलॉजी
आजूबाजूला लोकं बिनधस्त फिरत आहेत. वडापाव समोसापाव चरत आहेत. डीमार्टला गर्दीत खरेदी करत आहेत. दुकानेही आता रात्री उशीरापर्यंत चालू आहेत. या वातावरणाला पाहून एकंदरीतच कोरोना गेला की काय असे वाटू लागते.
आम्ही नवीन घराच्या कामासाठी बाहेर पडू लागलो अणि बाजेरचे हे जग बघू लागलो तेव्हा आम्हीही एक प्रकारे निवांत झालो. किंबहुना हलगर्जीही झालो. अध्येमध्ये एकमेकांना आम्ही बजावत असतो की लॉकडाऊन काळात जसे बहेरून आलेली प्रत्येक वस्तू सॅनिटाईज करणे आणि स्वताही आंघोळ करणे वगैरे काळजी घ्यायचो ती अजूनही घ्यायची आहेच.
वर्स्ट केस सीनरिओ ची कल्पना
वर्स्ट केस सीनरिओ ची कल्पना करून आपण काय करणार आहोत याचा प्लॅन तयार करा. येणाऱ्या समस्येशी आपण कसे लढणार आहोत याचा प्लॅन हातात असला की अँगझायटी कमी होते.
1) लक्षणे दिसल्यावर लगेच त्या व्यक्तीला आईसोलेत करणे
यासाठी कोणत्या खोलीत करायचे,त्याखोलीत इतरांचे समान असेल तर ते बाहेर काढायचे, वगैरे प्लॅन करायला लागतो.
घरातल्या कामवाल्यांना सुट्टी द्यायची/नाही द्यायची, जर बायका येणार नसतील तर स्वयंपाक घरी बनवायचा/डबा आणायचा वगैरे गोष्टींचा विचार करा.
2) लक्षणे दिसायला लागल्या पासून व्यवस्थित नोंद ठेवा.
शक्यतो लौकर टेस्ट करून घ्या
3) शक्य तेव्हढ्या हॉस्पिटल्स चे नंबर हाताशी ठेवा. वेळ पडल्यावर हॉस्पिटल चे नंबर शोधण्यात खूप वेळ जातो
4) SPO2नियमित मॉनिटर करा, पातळी खाली जातेय असे दिसले अलर्ट व्हा. साधारण 98 97%वरून 90 च्या खाली जायला 8 10 तास लागतात,हा वेळ ऍक्शन घ्यायला हाताशी असतो. तेव्हा 90 च्या आस पास लेव्हल जातेय असे दिसले की लगेच हॉस्पिटल शोधायची हालचाल सुरु करा
5) हॉस्पिटल ला कसे जायचे ते आधीच ठरवून ठेवा- घरच्या गाडी ने जाणार असाल तर कोण गाडी चालवणार, तेव्हा घरातल्या लहान मुलांची वृद्धांची व्यवस्था काय असणार याचा विचार करून ठेवा. घरची गाडी नसेल,तर मित्र, शेजारी ,नातेवाईक ओळखीची रिक्षा यातले काय उपलब्ध आहे याची आधी जोडणी करून ठेवा.
6) ताप उतरत नाहीये असे दिसल्यावर हॉस्पिटल ची बॅग भरून तयार ठेवा. शेवटी ऑक्सिजन अचानक dip झाला तर डोके चालेनासे होते. डोके ठिकाणावर असताना या गोष्टी करून ठेवा
7) बऱ्याच हॉस्पिटल मध्ये आत्ता कॅशलेस सुविधा स्वीकारत नाहीयेत त्यामुळे पुरेशी कॅश बरोबर ठेवा. आपले मेडिक्लेम वगैरे चे कागदपत्र प्रिंट आउट काढून तयार ठेवा. (तुम्हीच रुग्ण असाल तर केअर टेकर ला समजावून ठेवा)
8) हॉस्पिटल ला वेटिंग टाइम असेल हे धरून चला, कोणत्याही हॉस्पिटल मध्ये बेड walk इन पद्धतीत मिळणार नाही. कदाचित 4 हॉस्पिटल्स फिरावे लागेल, अगदी बेड उपलब्ध आहे असे फोन वर कळले तरी ऍडमिशन होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
तितका वेळ हातात ठेऊन निघा.
हा प्लॅन फक्त रुग्ण-हॉस्पिटलीझेशन बद्दल आहे
लॉंग टर्म प्लॅनिंग विषय या पोस्ट च्या बाहेरचा आहे.
कविन, मस्त प्रतिसाद!
कविन, मस्त प्रतिसाद!
खूप चांगली माहिती सिंबा.
खूप चांगली माहिती सिंबा.
चांगली पोस्ट सिम्बा
चांगली पोस्ट सिम्बा
पॅनिकनेस हे सिकनेसपणा सारखं
पॅनिकनेस हे सिकनेसपणा सारखं झालं. नुसतं पॅनिक पुरेसं आहे.
किंवा पॅनिकीनेस ही चालेल.
सिम्बा, चांगली पोस्ट. नंबर ५ च्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीचे घरात योगदान असते. ती आजारी पडली की रहाट-गाडगं सुरळीत कसं ठेवायचं याची चर्चा घडणे आवश्यक. उदा: एकच व्यक्ती कमावणारी असेल तर काय करणार, एकच व्यक्ती सैपाक करणारी असेल तर काय करणार, एकच व्यक्ती मुलांचे करत असेल... ६ माणसांचं घर असेल तर एक आजारी झाल्यावर उरलेल्या ४-५ जणांना तो गाडा ओढायचा असतो. कसा ओढणार?
बातम्या बघू नका, फार विचार
बातम्या बघू नका, फार विचार करुन स्वतःची काळजी वाढवू नका.
कामात गुंतवून घ्या, रिकामे बसू नका. गप्पा मारतांना कोरोनाचा विषय टाळा.
आम्ही घरात कोरोना हा शब्द पण उच्चारत नाही. पण बाहेरुन आणलेल्या वस्तू बाजूला ठेवणे, काळजी घेणे सुरु आहे.
कविन छान पोस्ट. ८ नंबर माझे
कविन छान पोस्ट. ८ नंबर माझे ब्रीदवाक्य आहे! त्याबद्दल माझे २ सेंटस- आयुष्याची दिशा बदलणार्या ठळक घटना घडतच आहेत. परिणाम आपण सोसत आहोत. पण आसपास कुतूहल, आनंद, नवल वाटेल अशा घटना ही घडतात. जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा त्याचे फोटो घेत होते. (आता रिक्षा वाटेल पण - तो फोटोंचा संग्रह क्युरेट (छाटून) करून मायबोली स्पर्धेसाठी लेख लिहीला.) आता वळून बघता त्या लॉकडाउन काळात I smiled through it एवढीच गोळाबेरिज हाती आहे.
मुं बई मनपाच्या
मुं बई मनपाच्या संकेतस्थळावर बर्यापैकी माहिती उपलब्ध आहे.
पुणे मनपाची साइट भंगार वाटतेय. प्रत्येक क्लिकनंतर आरोग्य सेतू अॅप ची जाहिरात.
काळजीचं कारण आहे. गेल्या दहा बारा दिवसांत महाराष्ट्रा तला पॉझिटिव्ह केसेसचा ग्रोथ रेट वाढलाय. अॅक्टिव्ह केसेसची संख्याही आधी स्थिर होती ती वाढते आहे.
मुंबईत नव्या केसेसची संख्या मेच्या उत्तरार्धात पीक ला गेली होती आणि मग स्थिर होती. जुलैच्या दुसर्या पंधर वड्यात कमी होऊ लागली होती ती आता वाढतेय. डबलिंग पीरियड कमी होतोय.
आमच्या आणि आमच्या शेजारच्या वॉर्डात हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. आणि रस्त्याने लोक घोळक्याने / मास्क न लावता फिरताहेत. दुकानांत रांगा लावणं थांबलंय.
सिमंतिनी अगदी अगदी. अशा आठवणी
सिमंतिनी अगदी अगदी. अशा आठवणी आणि फोटो मी ही जमा केले आहेत आणि मला त्याचाही फायदा झाला.
खर सांगायचं तर शिक्षण संपल्यावर लगेच नोकरी वगैरे चक्रात अडकल्याने घरात जरा निवांतवेळ फा फक्त विकेंडपुरताच मिळत होता आणि या लॉकडाऊनने अचानक लॉटरी लागल्यासारखा वेळच वेळ भेट म्हणून दिला. वेळे अभावी करायच्या राहून जात असलेल्या बऱ्याच गोष्टी मला करता आल्या, एरव्ही ट्रेकला गेल्यावर डोंगरावरून किंवा समुद्रकिनारी गेल्यावर क्षितिजावर दिसणारा मोहक सुर्यास्त /सूर्योदय माझ्या घराच्या गच्चीतूनही तितकाच मनमोहक दिसत असेल हे माहिती होतं पण ते बघायला एरव्ही मिळायच नाही ते ही भाग्य या लॉकडाऊनने दिलं
अधूनमधून मळभ दाटून यावं तसं काही घटनांचे मळभ यायचे नाही असे नाही पण या छोट्या आनंदाच्या नोंदी त्यातून बाहेर यायला मदत करायच्या
Work from home
Work from home
ची सुविधा भारतात किती लोकांना आहे ,तशा प्रकारच्या नोकऱ्या किती लोकांना आहेत.
भारतीय लोकसंख्येचा विचार केला तर अतिशय नगण्य लोक ह्या सुविधेचा फायदा घेत आहेत.
ज्याचे घरी बसून नोकरी पण चालू आहे आणि पगार पण चालू आहे.
भारतीय लोकसंख्येत मजूर,शेतकरी,पोलिस,सुरक्षा रक्षक,दुकानदार,फेरीवाले,हॉटेल वाले, लॉज वाले,बार,pubs, सैनिक,डॉक्टर्स,नर्सेस,वॉर्ड बॉय,हाऊस कीपिंग,ड्रायव्हर्स,अशा किती क्षेत्रातील लोकांना प्रतक्षत कामाच्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे किंवा घरा बाहेर पडणे गरजेचं आहे.
घरा बाहेर नाही पडले तर त्यांचा रोजगार,नोकरी,अस्तित्वात राहत नाही आणि घरी बसून त्यांना कोणी पगार ही देत नाही.
उदर निर्वाह चलवण्या साठी घरा बाहेर पडणे हाच त्यांच्या समोर मार्ग आहे.
ह्या गटा मधील लोक corona ची भीती जास्त दिवस घेवून जगू शकत नाहीत .
नाही तर उपाशी राहून मरतील.
त्या मुळे ती लोक आता परिस्थिती मान्य करून जे होईल ते होईल असा विचार करत आहेत.
कारोना च्या बातम्या त्यांना विचलित करत नाहीत.
Pages