आठवणींचा झोपाळा

Submitted by काव्यसखी on 2 September, 2020 - 08:13

आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारं
असं एक आडनाव
आणि सगळ्यांच्या आठवणीतलं
आपलं घर, आपलं गाव..

कोबा, ओटी, माजघर, स्वैपाकघर
अंधारी बाळंतीणीची खोली
मागच्या अंगणातील गोठा आणि
वकील मास्तराची खिल्लारी जोडी..

आंब्या फणसांनी रसरसलेल्या बागा
माडीवर भरभरून सांडणारी सुपारी
ह्या घरात उठल्या असतील
कितीक असंख्य जेवणावळी...

वादविवादांच्या वादळांनी
हलल्या असतील घराच्या भिंती
तरी जखमेवर फुंकर घालणारी
इथल्याच तुळशीची माती...

आता बहरलंय झाड
डवरतय फळाफुलांनी
विस्तारलेल्या फांद्यांनी
कुंपणाची वेस मात्र ओलांडली...

तरी सुट्टया, जत्रा, सणवारी
पावलं वळतातच घराकडे
हसण्या खिदळण्याला येतो ऊत
चहाचे कप रेंगाळतात गप्पांच्या फडापुढे..

चार दिवस मजेचे
मग निरोपाचे उसासे
माहेरवाशिणींच्या भरलेल्या ओट्या
नमस्कार जडावलेसे..

भरल्या डोळ्यांनी, कातर मनानी
ठेवणीतलं हसू आणून
प्रत्येक पिढीला घर देतय
आशिर्वाद भरभरून...

सख्खं, चुलत, आते, मामे
नात्यांचा किती हा पसारा
गजबजलेल्या घराची गोष्ट सांगणारा
ओटीवरचा हा झोपाळा....!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users