तो साधारणत: फेब्रुवारी २०२० मधल्या शेवटच्या आठवड्यातला एखादा दिवस असावा. "सध्या दिवस असे आहेत कि कोरोना व्हायरस च्या चर्चेशिवाय एक तास सुद्धा जात नाही" कोणत्यातरी अमेरिकन पत्रकाराने लिहिलेला लेख मी ऑफिस मध्ये बसून वाचत होतो. युरोपात कोरोनाने थैमान घातले होते. अमेरिकेत लॉकडाऊन सुरु झाला होता. तिथे कसे वातावरण असेल, लॉकडाऊन मध्ये लोक कसे जगत असतील वगैरे कल्पना मी करत होतो. चीन मध्ये तर तिथल्या प्रशासनाने अक्षरशः घरांचे दरवाजे खिळे ठोकून बंद केल्याचे ऐकायला मिळाले. मागच्याच डिसेंबरमध्ये, मुळच्या सातारच्या पण तेंव्हा चीन मधल्या वूहान शहरात घरी अडकून पडलेल्या एका मराठी कुटुंबाशी पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क करून त्यांना धीर दिल्याचा व्हिडीओ पाहण्यात आला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यामानाने आपण भारतात किती सुखी आहोत असे मी मनोमन वाटून घेत होतो. कसले कसले आजार येतात आणि जातात. भारतात काही फरक पडत नाही. गेल्या दशक दोन दशकातल्या साथी आठवल्या. सार्स, मर्स, स्वाईन-फ्लू, इबोला, झिका, निपाह इत्यादी इत्यादी. काय न बाय येऊन गेले. २००९ स्वाईन फ्लूच्या वेळची हाईप आठवली. माध्यमांतून पसरलेल्या रोगाच्या बातम्या वाचून पुण्यातून कॉलेजची मुलं, नोकरदार वगैरे लोक भीतीने गळपटून गावाकडे निघून जात होते. पण सरकारी स्तरावर कोणताही धोक्याचा इशारा दिला जात नव्हता. "परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये" अशा प्रकारचे विधान केली जात होती. हे सगळे आता मला स्पष्ट आठवत होते. त्या पार्श्वभूमीवर आताचा हा नोवेल कोरोना. अजून एक आजार येईल आणि परस्पर जाईल यापलीकडे त्याला महत्व नाही. थंड प्रदेशांत विषाणू पसरतात. पण भारतातल्या उष्ण वातावरणात कोणता विषाणू तग धरेल? आणि आता तर कडक उन्हाळा आहे. काय त्या कोरोनाची बिशाद आहे? वगैरे वगैरे विचार माझ्या मनात येत होते.
"दुबई मध्ये सुद्धा जोमाने पसरतोय म्हणे" शेजारी बसलेल्या माझ्या कलीगने माझ्या सुखद विचारधारेत बिब्बा घातला.
"तुला कुणी सांगितलं?" प्रचंड त्रस्त होऊन मी तिला विचारले.
"हे बघ" हातातल्या मोबाईलवरची बीबीसीची का कसली लाइव फीड माझ्यापुढे नाचवत ती बोलली.
मी डोळे बारीक करून ते वाचल्या सारखे केले. मनातल्या मनात चरकलो. पण लगेचच सावरले स्वत:ला. आणि मिनिटभरात स्व-विश्लेषण करून म्हणालो,
"ह्या... अगं ते दुबईत ऊन कितीही कडक असले तरी लोकं सदानकदा थंड एसी मध्येच असतात ना. एअरपोर्टवर, ऑफिसात, घरात, कारमध्ये, हॉटेलात सगळीकडे एसी असतो त्यांच्याकडे. कसा मरणार व्हायरस? पसरणारच..."
या थियरीने तिचे समाधान झाले खरे पण माझ्या मनात शंकाकुशंका दाटल्या, कि हा भारतात सुद्धा थैमान घालणार. आणि पुढच्याच काही आठवड्यातच त्याचा प्रत्यय येत गेला. एक दिवस सीइओ कडून इमेल आली कि सरकारी आदेशानुसार इथून पुढे काही दिवस ऑफिसमधील सर्वाना घरून काम करावे लागेल. तेंव्हा सर्वात प्रथम परिस्थितीचे गांभीर्य कळून आले. आपण समजतो तितके हलक्यात घेण्याचा हा विषाणू नाही याची जाणीव झाली. अर्थात, घरून काम करणे हे आमच्या ऑफीसमध्ये नवीन नव्हते. पूर्वीही अनेकजण अधूनमधून करत असंत. त्यामुळे हा बदल स्वीकारायला कोणाला फार अडचणीचे झाले नाही. पण पुढे येणाऱ्या काळाची कुणकुण मात्र अनेकांना लागली होती जणू. त्यामुळेच कि काय, ऑफिसमधल्या अनेक जणांनी "वर्क फ्रॉम होम" सुरु होताच शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आपापल्या गावातले "होम" गाठले. तिकडे नेटवर्क आहे का, गावाकडे स्थलांतरीत होणे योग्य आहे का वगैरे चिंता दुय्यम ठरल्या.
मी ज्या प्रोजेक्टवर काम करायचो तो क्लायंट स्पेनचा होता. तिकडे तर तेंव्हा आपल्यापेक्षा भयाण परिस्थिती झाली होती. त्यामुळे क्लायंट सुद्धा घरून कॉल घेत असे. एकदा आमचा टीम कॉन्फरन्स कॉल सुरु असताना त्याच्या बाजूने बॅकग्राउंडला सतत एका स्त्रीच्या रडण्या ओरडण्याचा आवाज येत होता. सुरवातीला आम्ही सर्वांनीच दुर्लक्ष केले. पण पुढे आवाज व ओरडणे वाढतच गेले. अंगावर काटा येणारा आवाज. आम्हाला वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. तसे क्लायंटने स्वत: स्पष्टीकरण दिले कि त्याच्या बाजूच्या घरात राहणारी एक स्त्री आरडाओरडा करत होती. तिला काहीतरी समस्या होती. पण त्याचा या कोरोनाच्या साथीशी काही संबंध नाही असे सांगायला तो विसरला नाही. कोरोनाने सगळ्या जगाला एकाच "पेज"वर आणून ठेवले होते.
आमच्या सोसायटीमधले आम्ही काही मित्र जे एरवी नेहमी संध्याकाळी गप्पा मारायला एकत्र जमायचो. लॉकडाऊनच्या दोन दिवस आधीची संध्याकाळ मात्र वेगळी होती. आम्ही नेहमीचे मित्र ठराविक ठिकाणी नेहमीप्रमाणे जमलो होतो खरे. पण सगळी दुकाने बंद, एरवी गजबज असलेल्या रस्त्यावर कोणीही नाही. शुकशुकाट. सर्वत्र सामसूम. त्यामुळे सात साडेसात वाजता रात्री बारा वाजल्यासारखे वातावरण झाले होते. अशी सायंकाळ मी पुण्यात त्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. आम्हीही जास्तवेळ थांबलो नाही. आमच्यातला एकजण दुसऱ्या दिवशी आपल्या गावी चालला होता. आता परत भेट लवकर होण्याची शक्यता नाही अशा थाटात त्याने आमचा निरोप घेतला. तेंव्हा वाटले होते हा जरा अतीच करतोय. पण आज लक्षात येतेय त्याचा अंदाज बरोबर होता! कारण त्यानंतर दोनच दिवसानी लॉकडाऊन सुरु झाला.
आणि त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. एक दिवसाचा लॉकडाऊन "साजरा" करून झाला. लोकांना गम्मत वाटली खरी. पण पुढे तो वाढवला आणि सगळी सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद केली गेली तेंव्हा मात्र कधी नव्हे तो तणाव जाणवू लागला. लोकांना गांभीर्य कळू लागले. समाजमाध्यमांतून सातत्याने येणाऱ्या नवनवीन माहितीमुळे गोंधळात आणि तणावात अधिकच भर पडत होती. एका मित्राने एका अज्ञात व्यक्तीच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग ग्रुपवर पाठवले होते. त्यात हि व्यक्ती फोनवर कोणालातरी सांगत होती कि,
"WHO चा इशारा आहे कि युरोप अमेरिकेची परिस्थिती पाहता, आतापासून उपाययोजना केल्या नाहीत तर भारतात पुढे अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे त्यांनी तीन ते चार महिन्याच्या लॉकडाऊनची शिफारस सरकारला केली आहे. पण लोकांमध्ये हल्लकल्लोळ माजू नये म्हणून सरकार एकदम लॉकडाऊन न लावता टप्प्याटप्प्याने पण तीन ते चार महिने लावणार आहे"
हा ऑडीओ मेसेज माझ्या मनात त्यानंतर वारंवार घुमत राहिला. तो खोटा आहे असे सांगणारे मेसेज पण नंतर आले. पण आज मागे वळून पाहता लक्षात येते कि तो संदेश खराच होता.
लॉकडाऊनच्या काळाबाबत एका वाक्यात बोलायचे तर सुरवातीचा काळ आव्हानात्मक वाटला. पण नंतर त्याची सवय होत गेली. लाइफस्टाइल बदलली होती. विशेष करून बाहेरून आणले जाणाऱ्या वस्तू/पदार्थ एकतर साबणाने स्वच्छ धुवून घ्यायच्या किंवा शक्य तितक्या काळ विलगीकरण करून ठेवायचे. हे आजतागायत सुरु आहे. सुरवातीच्या काळात फारच भीतीचे वातावरण होते. सोसायटीच्या ग्रुपवर एकापाठोपाठ एक थरारक मेसेज येत होते. आणि एक दिवस मेसेज आला राज्यात १४४ लागू झाले आहे. याचा अर्थ संकट कल्पनेपेक्षा भयंकर आहे. आउटब्रेक नावाचा एक इंग्रजी चित्रपट आहे. अगदी याच विषयावर. अज्ञात विषाणूंमुळे पसरणाऱ्या आजाराचा एका शहरात उद्रेक होतो आणि त्या शहराच्या सीमा बंद केल्या जातात असे काहीसे. काहीच दिवसांपूर्वी आम्हा मित्रांच्यात त्यावर चर्चा झाली होती. आता मात्र प्रत्यक्षात तसे घडते कि काय हे मनात येऊन हादरलो. मुख्य चिंता होती कि समजा जर साथीचा अतिरेक झालाच आणि त्यामुळे अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या तसेच आवश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा कोलमडल्या तर काय? तो विचार मनात येताच धाबे दणाणले. त्यानंतर शहरातले एकेक भाग सील होत आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येऊन धडकू लागल्या. लागण झालेल्यांची आणि मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत होती तसा काळजाचा ठोका चुकत होता. एका पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूची वार्ता सर्वाना व्यथित करून गेली. मनात विचार आला, आपण सदोदित चार भिंतींच्या आत राहूनही इतके घाबरतोय. वर्क फ्रॉम होम करून चिंतातूर जंतू बनतोय. पण ज्यांचे काम लोकांच्यात मिसळल्याशिवाय होत नाही त्यांची मानसिक अवस्था काय असेल? कितीवेळा हात धुणार? कितीवेळ मास्क मध्ये राहणार? कशाकशाचे विलगीकरण करणार? काय अवस्था असेल शेकडो हजारो किलोमीटर चालत गेलेल्यांची? हे सगळे अगदी थेट त्या आउटब्रेक चित्रपटासारखेच घडतेय असे वाटू लागले.
आमचा भाग अद्याप तरी सुरक्षीत होता. आसपासच्या सोसायट्यांमध्ये सुद्धा कोणी रुग्ण सापडल्याची बातमी नव्हती. काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे याची सर्वाना जाणीव झाली. Prevention is better than cure. आमच्या सोसायटीच्या अध्यक्षांनी फर्मान काढले. सोसायटीच्या आवारामध्ये सुद्धा कुणीही फिरायचे नाही. बाहेरच्या लोकांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला (विशेषतः घरकाम करणाऱ्या मावशी किंवा इतर सर्विसेस इत्यादी). सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी किरणा आणि नेहमी लागणारे साहित्यासाठी दुकानांत गर्दी करण्यापेक्षा, सामानाची यादी व्हाट्सपद्वारे दुकानदारांना द्यावी आणि दुकानदारांनीच साहित्य घरोघरी पोहोचते करावे असे फर्मान निघाले. त्याबरोबर मॉर्निंग वॉक करणारे, जॉगिंग करणारे, डॉगला वॉकसाठी घेऊन येणारे, शतपावली करणारे सगळे आपापल्या घरी चिडीचूप झाले. बघता बघता इथे कोणी माणसे राहतात कि नाही असे वाटू लागले. जे रस्ते कधीकाळी मुलांच्या गलक्याने आणि फिरायला येणाऱ्या लोकांमुळे सदोदित गजबजलेले असंत ते सुनसान झाले. बाग बाकडी ओस पडली.
कामवाल्या मावशी बंद झाल्याने घरकाम करणे (कचरा फरशी भांडी इत्यादी) सुरवातीला जिकीरीचे वाटले पण काही दिवसांतच ते अंगवळणी पडले. आपण सवयीचे किती गुलाम असतो याची जाणीव झाली. पण एक बारीक चिंता मनात सतत असायची. समजा घरातले एखादे अत्यावश्यक उपकरण बंद पडले किंवा त्यात बिघाड झाला तर मोठीच पंचाईत होणार होती. इतक्या वर्षांत गैरसोयींमध्ये जगण्याची सवय राहिली नव्हती. जसे कि फ्रीज, कुकर, मिक्सर, मायक्रोवेव्ह किती कायकाय असते. कुणाला बोलवणार आणि दुरुस्त करणार तरी कोण. पण सुदैवाने असे काही झाले नाही.
कित्येक दिवस घरात बंदिस्त होतो. एक दिवस नाईलाजाने एका आवश्यक कामासाठी म्हणून घराबाहेर जावेच लागले. तोंडाला मास्क लावून दबकत दबकत बाहेर गेलो. पाहतो तर सोसायटीचे वातावरण एखाद्या खंडहरच्या आसपास असते तसे झाले होते. नेहमीच्या बसण्याउठण्याच्या जागा धुळीने माखल्या होत्या. पार्किंगमध्ये गाड्यांवर धुळीची पुटे जमली होती. इथे कोणी राहते कि नाही असे वाटावे अशी कळा आली होती. निर्मनुष्य वातावरण फारच विचित्र वाटत होते. पक्षी आणि प्राणी मात्र मजेत इकडे तिकडे हिंडत होते. भरधाव गाड्यांची नेहमी ये जा असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर एक मांजरी बिनधास्त ऊब घेत लोळत पडली होती. कबुतरांचा आणि इतर पक्षांचा कलकलाट वाढला होता.
एकीकडे घरी आणि आसपास हे सगळे सुरु असतना तिकडे ऑफिसमध्ये सुद्धा फारसे चांगले घडत नव्हते. एकाला लागून एक उद्योग असतात. दळणवळण, करमणूक व्यवसाय, हॉटेल्स, पर्यटन ही मोठमोठाली चाके बंद पडल्याच्या परिणाम अर्थातच बाकीच्या उद्योगांवर झाला. अस्थिरता लक्षात घेऊन अनेक क्लायंटनी आपले प्रोजेक्ट "तात्पुरते स्थगित" करण्याच्या सबबीखाली थांबवलेच. कोव्हीड साथीच्या तणावात हि अजून एका चिंतेची भर पडली.
प्रत्येक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते. तसे ह्या सर्व नकारात्मक परीस्थितीत काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडून आल्या. काही साक्षात्कार झाले. काही सत्ये कळून चुकली. घरी अडकून पडण्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोनचे अखंड मानवजातीवर अनंत उपकार झाले आहेत. कनेक्टीव्हिटी शिवाय लॉकडाऊनची कल्पनाच करता येत नाही. कित्येक लोक मनोरुग्ण झाले असते.
या सुविधांमुळे जुन्या मित्रांचे संपर्क पुन्हा दृढ झाले. कित्येक वर्षांत एकत्र न येऊ शकलेले मित्रांचे ग्रुप व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कनेक्ट झाले. अनेक वर्षांपूर्वी सिंगापूरला असताना एक छान ग्रुप तयार झाला होता. एक दिवस मेसेज आला, आपण सगळे आज रात्री कनेक्ट होऊ. वा! काय मजा आली त्या कॉन्फरन्स मध्ये. कितीतरी वर्षांनी आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो. लॉकडाऊनच्या काळात ती एक अविस्मरणीय अशी मैफिलच जमली होती. तीच गोष्ट कोलेजमधल्या जुन्या मित्रांची. लॉकडाऊनमुळे कित्येक वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) आणि गप्पा मारू लागलो.
काही साक्षात्कार सुद्धा झाले. मुव्हीज, डायनिंग आउट, व्हेकेशन या जीवनावश्यक गोष्टी नाहीत पूर्वी "चेंज" म्हणून अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला जायचो. एखादा चित्रपट पाहायचो. अधूनमधून कुठेतरी फिरायला जायचो. मॉल, खरेदी हे सुद्धा जगण्याचा भाग झाले होते. गेल्या सहा महिन्यांनी दाखवून दिले कि या शिवायसुद्धा छान जगता येते आणि अजून एक साक्षात्कार म्हणजे घरकाम हे जितकी आपण कल्पना केली होती तितके जिकिरीचे मुळीच नसते थोडक्यात काय, तर ज्या जीवनशैलीत बालपण गेले होते, ज्या जीवनशैलीची सवय आता मोडली होती ती जीवनशैली अंशत: का असेना पण पुन्हा एकदा जगण्याची संधी लॉकडाऊनने उपलब्ध करून दिली असेच मी म्हणेन.
जाता जाता अजून एक गोष्ट नमूद करायलाच हवी. काही वर्षांपूर्वी गरम पाणी पिण्याची सवय मी स्वत:ला लावून घेतली होती (वेगळा विषय आहे. त्याविषयी स्वतंत्र लेख लिहायचा आहे). हि सवय या काळात माझ्या पथ्यावर पडली. अन्यथा पूर्वी दरवर्षी न चुकता वर्षातून किमान एकदा तरी (बहुतांशी जून जुलै मध्ये) सर्दीफ्लूने आजारी पडणारा मी, गरम पाणी पिण्याची हि सवय लागल्यापासून गेल्या काही वर्षांत एकदाही आजारी पडलेलो नाही. आता मनात येते, जर हि सवय नसती आणि यावर्षी मला फ्लू वगैरे झाला असता तर माझी काही धडगत नव्हती
असो! एकंदर लॉकडाउनचा अनुभव वेगळा आणि खूप काही शिकवण देणारा ठरला.
विनंती: मागचे काही दिवस कामात खूप व्यस्त राहिल्याने हा लेख द्यायचे राहून गेले.
जर लेख स्पर्धेत समाविष्ट करण्याची कालमर्यादा संपली असेल तर हा लेख केवळ एक लेख म्हणूण ग्राह्य धरावा.
स्पर्धेसाठी विचारात घेतला नाही तरी चालेल.
- अतुल
छान लिहिले आहे, आवडला लेख.
छान लिहिले आहे, आवडला लेख.
छान लेख. बरेच मुद्दे छान आले
छान लेख. बरेच मुद्दे छान आले आहेत.
सर्वोत्कृष्ट लेख.. सगळ्याच
सर्वोत्कृष्ट लेख.. सगळ्याच बारीकसारीक गोष्टी छान रीत्या मांडल्या आहेत..
आणि आता तर कडक उन्हाळा आहे. काय त्या कोरोनाची बिशाद आहे? >>उन्हाळ्यात उष्णतेने मेला नाही तरी पावसाळ्यात पाण्यात वाहून निघून जाईल असंही काही जण म्हणत होते
काही साक्षात्कार सुद्धा झाले. मुव्हीज, डायनिंग आउट, व्हेकेशन या जीवनावश्यक गोष्टी नाहीत पूर्वी "चेंज" म्हणून अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला जायचो. एखादा चित्रपट पाहायचो. अधूनमधून कुठेतरी फिरायला जायचो. मॉल, खरेदी हे सुद्धा जगण्याचा भाग झाले होते. गेल्या सहा महिन्यांनी दाखवून दिले कि या शिवायसुद्धा छान जगता येते आणि अजून एक साक्षात्कार म्हणजे घरकाम हे जितकी आपण कल्पना केली होती तितके जिकिरीचे मुळीच नसते थोडक्यात काय, तर ज्या लाइफस्टाइलमध्ये बालपण गेले होते, ज्या लाइफस्टाइलची सवय आता मोडली होती तीलाइफस्टाइल अंशत: का असेना पण पुन्हा एकदा जगण्याची संधी लॉकडाऊनने उपलब्ध करून दिली असेच मी म्हणेन. >>> बेस्ट पॅरा..फारच आवडला
चांगले लिहीले आहे.
चांगले लिहीले आहे.
आपण भारतीय आणि इतरही जगातले लोक (असू तेव्हा/असू तर) मुला नातवंडाण्ना '१८४० साली बघा..मोठी प्लेग ची साथ आली होती' वाल्या सुरात '२०१९ मध्ये बघा.. करोना नावाचा आजार आला होता.त्याने जग बंद पाडलं होतं ' लिहू.
पण आता जग वर आणायचं आहे आधी परत...
सुरेख लेख.
सुरेख लेख.
खूप छान अनुभव लिहिला आहे
खूप छान अनुभव लिहिला आहे अतुलजी... लेखनशैली उत्तम.
जबरदस्त लिहिलंय. खूपच आवडलं.
जबरदस्त लिहिलंय. खूपच आवडलं.
छान लेख
छान लेख
घरकाम हे जितकी आपण कल्पना केली होती तितके जिकिरीचे मुळीच नसते>>>> अगदी अगदी आणि घरून काम (वर्क फ्रॉम होम) यामुळे ऑफिसकाम सुद्धा तितके जिकीरीचे नसते हे स्य्द्धा घरच्यांना समजले
छान लेख
छान लेख
मुग्धमोहिनी, मानव, म्हाळसा,
मुग्धमोहिनी, मानव, म्हाळसा, अनु, मामी, रूपाली विशे - पाटील. बोकलत, ऋन्मेऽऽष. कविन... सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद प्रतिक्रियांसाठी.
>> उन्हाळ्यात उष्णतेने मेला नाही तरी पावसाळ्यात पाण्यात वाहून निघून जाईल असंही काही जण म्हणत होते
>> '२०१९ मध्ये बघा.. करोना नावाचा आजार आला होता.त्याने जग बंद पाडलं होतं ' लिहू. पण आता जग वर आणायचं आहे आधी परत...
खरं आहे. पूर्वीच्या साथी कित्येक वर्षे चालत. आताच्या काळात मात्र हे सगळे लवकर आटोक्यात येईल अशी सर्वांनाच आशा आहे.
>> ऑफिसकाम सुद्धा तितके जिकीरीचे नसते हे स्य्द्धा घरच्यांना समजले
हो! एक विनोद आला होता. आई वफॉहो वाल्या इंजिनीअर मुलाला सांगत आहे: कॉल मध्ये आय एम ऑन इट आणि आय विल गेट ब्याक टू यू ऑन धिस इतकेच बोलायचे असते ना? ठीक आहे मी बोलते. तू जा जरा दुकानात जाऊन गव्हाचे पीठ घेऊन ये आधी.
छान लिहिलंय! सगळे मुद्दे
छान लिहिलंय! सगळे मुद्दे चांगले कव्हर केलेत.
< घरी अडकून पडण्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोनचे अखंड मानवजातीवर अनंत उपकार झाले आहेत. कनेक्टीव्हिटी शिवाय लॉकडाऊनची कल्पनाच करता येत नाही. कित्येक लोक मनोरुग्ण झाले असते.>
अगदी खरं आहे.
छान लेख अतुल, मुद्देसूद लेखन
छान लेख अतुल, मुद्देसूद लेखन!
छान लेख, आवडला☺️
छान लेख, आवडला☺️
<<<उन्हाळ्यात उष्णतेने मेला नाही तरी पावसाळ्यात पाण्यात वाहून निघून जाईल असंही काही जण म्हणत होते>>> हो न, एकजण अत्यंत भाबडेपणाने बोलत होती की जर पावसाचे पाणी अंगावर पडले तर वाहून जाईल की कोरोना, असा सगळे भिजले की गेलाच बघ आपल्या शहरातून तो कोरोना फोरोना
छान लेख!
छान लेख!
फार सुंदर मनोगत. थट्टा मस्करी
फार सुंदर मनोगत. थट्टा मस्करी कधी गंभीर बनली समजलेच नाही. संपूर्ण कालावधीचे यथार्थ वर्णन केले आहे. भविष्यात ज्याच्या वाचनात हा लेख येईल त्याला या महारोगाचे अक्राळ विक्राळ स्वरूप समजेल. सुंदर लेखनशैली.
वावे, ज्वाला, VB, विनिता
वावे, ज्वाला, VB, विनिता.झक्कास, किशोर मुंढे...
मन:पूर्वक धन्यवाद सर्वाना
प्रत्येक काळ्या ढगाला एक
प्रत्येक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते. तसे ह्या सर्व नकारात्मक परीस्थितीत काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडून आल्या. काही साक्षात्कार झाले. काही सत्ये कळून चुकली. ... अगदी सहमत.
काही काही गोष्टी बाबत कितीही टेन्शन घेतले तरी आपल्या हातात काही नाही हे कोरोनाच्या अनरिलायेबल pattern ने अधोरेखित झाले. शिवाय आता अशा गोष्टींंना पण appreciate करायची सवय लागली ज्या आधी लक्षात पण यायच्या नाही.
छान लिहीलयं , आवडले.
प्रत्येक काळ्या ढगाला एक
प्रत्येक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते. >> हा दृष्टीकोन आवडला. संपूर्ण लेख सुंदर.