पान मोदक. (स्पर्धेसाठी नाही )

Submitted by नादिशा on 29 August, 2020 - 03:36

आमच्याकडे 10दिवसांचे गणपती असतात. मी दरवर्षी नैवेद्याला रोज मोदक बनवते. 11 दिवस 11 प्रकारचे मोदक. 1)उकडीचे तांदळाचे.
2)उकडीचे गव्हाचे.
3)मैद्याचे तळून.
4)गाजराचे.
5)दुधीचे.
6)बीटचे.
7)शिऱ्याचे.
8)बेसनाचे.
9)रव्याचे.
10)खव्याचे.
11)चॉकोलेट चे.
गणपतीच्या दिवसांमध्ये माझ्या दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंट ना आम्ही रोजचे हे मोदक प्रसाद म्हणून देतो. त्यामुळे बहुतेक सर्वांना माहिती आहे, हे माझ्याकडचे मोदकांचे वैविध्य आणि खूप आकर्षण असते सर्वांना.
आमच्या घरात आम्हा तिघांनाही झाडांची आवड आहे. आमच्या टेरेस वर 220कुंड्या आहेत. यावर्षी खाऊच्या पानांचा वेल लावला होता, त्याला छान पाने आली आहेत. त्यामुळे यावर्षी विचार केला, काहीतरी क्लुप्ती वापरून आपण पानांचे मोदक बनवूया का? गणपती बसल्यापासून डोक्यात हा विचार घोळत होता. अखेरीस आज बनवले पान मोदक. खूप छान बनले. त्यामुळे सर्वांसाठी रेसिपी share करते आहे. 1)सुक्या खोबऱ्याच्या 2वाट्या घेणे. त्यांचे बारीक तुकडे करून मिक्सर ला एकदम बारीक पावडर करणे.
2)बारीक गॅस वर कढई ठेवून त्या कढईमध्ये 1चमचा तूप घेणे. त्यात ही खोबऱ्याची पावडर घालून परतायला चालू करणे.
3)खाऊची 15पाने देठ काढून घेणे, त्याचे तुकडे करणे, त्यात 7-8 चमचे साखर टाकून मिक्सर मधून फिरवून बारीक करून घेणे. (माझ्याकडे घरचा पानांचा वेल होता, छोटी पाने होती. पाने मोठी असतील तुमच्याकडे, तर कमी पाने घेतली तरी चालतील )
4)हे खाऊच्या पानांचे मिश्रण कढईमध्ये टाकणे.
5)1/2 वाटी दूध त्यात टाकणे. आणि कडेने तेल सुटेपर्यंत परतणे. छान एकजीव होऊन त्याचा गोळा बनेल, असे बनले, की गॅस बंद करणे.
6)थंड झाल्यावर मोदकाच्या साचा घेणे . साच्याच्या दोन्ही बाजूमध्ये हया मिश्रणाचा पातळ थर घालणे त्यावर गुलकंद &बडीशेप घालणे, मग साचा बंद करून खालून पुन्हा पानाचे मिश्रण भरणे.(थोडक्यात ह्या पानाच्या मिश्रणाची पारी आणि मध्ये बडीशेप - गुलकंदाचे सारण )
7)असे सगळे मोदक बनवून घेणे.
8)एवढ्या साहित्यामध्ये
14मोदक बनले माझे.
9)मोदक खाताना खोबरे, पान,
बडीशेप, गुलकंद यांची खूप
छान चव लागते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फो

मस्त!

आयडिया छानच आहे
विषयात थोडा बदल आणि अजून थोडे स्टेप चे, तुमच्या बागेतल्या पानांचे फोटो टाकून स्पर्धेलाही देता येईल.
नाविन्यपूर्ण रेसिपी.

Wow!

मी नवीन आहे मायबोली वर. पहिल्यांदा तर मला फोटो upload करताच येत नव्हता. काल यशस्वी रित्या फोटो टाकू शकले या मोदकांचा, पण type करताना "फो" असे type झाले, ते तसेच save झाले.
"आमचा बाप्पा " मध्ये आमच्या गणपतीचे फोटो टाकत होते, तर तेही 2-2वेळा मजकूर & फोटो दोन्हीही प्रकाशित झाले.
माफ करा, असा प्रतिसाद पाठवला, तोही 2वेळा प्रकाशित झाला आहे.
इतक्यात मी व्हाईट मोदक ची रेसिपी प्रकाशित केली, ती पण 4वेळा प्रकाशित झाली.
असे का होते आहे?
अशा चुका झाल्या, तर ते delete करता येत नाहीत का आपल्याला?
संयोजक delete नाही करत का?
माझ्या अशा शंका आहेत. प्लीज मला कुणी मदत करेल का?

नादिशा
एकदा सर्व लिहून झाल्यावर मोबाईल नोट
पॅड ला सेव्ह करा (किंवा आधी तिथेच लिहा)
पोस्ट मध्ये विषय टाकून, मजकूर टाकून सेव्ह बटन दाबल्यावर जरा थांबा.मग हिरवा मेसेज येतो पोस्ट सेव्ह झाल्याचा. तो आला नाही तरच परत सेव्ह दाबा.
पोस्ट सेव्ह झाली की परत उघडून इमेजेस टाका.इमेज टाकणे डेस्कटॉप वरून जास्त सोपे पडते.
हळूहळू सवय होत जाईलच.

तुम्ही तुमचा धागा संपादीत करू शकता. एकदा धागा काढला की एक महिन्यापर्यंत संपादीत करून त्यात बदल करता येतो.

आणि आपली पोस्ट चार तासांपर्यंत संपादीत करता येते.
जर नुसता फो आला तेव्हा चार तासाच्या आत तुम्ही त्या पोस्ट खाली दिसणाऱ्या "संपादन" या बटनावर टिचकी मारून दुरुस्ती करू शकल्या असत्या.

आता दोन निघालेल्या धाग्यांपैकी एक धागा संपादीत करून त्याचे शीर्षक बदलून " डुप्लिकेट धागा - रद्द करा" असे करू शकता म्हणजे ऍडमिन किंवा वेमा(वेबमास्टर) याना तो दिसल्यास रद्द करतील.

तसेच पाककृतीचे धागे ललितलेखन मध्ये न काढता "पाककला आणि आहारशास्त्र" या विभागात काढा.
हा आणि तो दुसरा धागा संपादीत करून तुम्ही पाककला आणि आहारशास्त्र विभागात हलवू शकता.

धन्यवाद mi -anu आणि मानव पृथ्वीकर.
अजून दोन शंका आहेत . मानव तुम्ही म्हणालात तसे हे धागे पाककला आणि आहारशास्त्र मध्ये कसे हलवायचे?
त्यासाठी त्या विभागाचे सदस्यत्व घ्यावे लागेल का?सध्या मी फक्त ललितलेखन विभागात सदस्यत्व घेतलेले आहे.
मला माझ्या मुलाची चित्रे प्रकाशित करायची असतील, तर चित्रकला विभागाचे सदस्यत्व घ्यावे लागेल का?
मला खूप ऑकवर्ड वाटते आहे खरेतर.. मी खुप basic शंका विचारतेय कदाचित. पण मला खरेच समजत नाहीये..

हो, त्या त्या विभागाचे सदस्यत्व घेऊन त्या त्या विभागात धागे काढायचे.

ग्रुप बदलण्यास संपादनवर क्लिक करून खाली Group Audience या field मध्ये जाऊन ग्रुप बदलायचा.