लेखनस्पर्धा - माझा अनुभव कोविड-१९ लॉकडाऊन - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 August, 2020 - 19:13

तसे प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक कमालीचा आत्मकेंद्रीत मनुष्य आहे.
किंवा कदाचित होतो, वा अजूनही थोडाफार असेन. पण मुले आयुष्यात आली आणि बघता बघता हे केंद्र त्यांच्याभोवताली सरकले. त्यानंतर आयुष्यात जे काही केले, वा जे काही प्लान केले ते त्यांना डोळ्यासमोर ठेऊनच केले. मग ते घर सजवणे असो, वा नवीन घर घेणे असो. सुट्यांचा प्लान असो वा विकेंडची भटकंती असो, पिकनिक असो वा पार्टी असो, अगदी आमच्या लग्नाचा वाढदिवस देखील मुलांच्या आवडीचेच सारे करायचे आणि मुलांनीच केक कापून साजरा करायचा हे ठरलेलेच. नऊ ते साडेपाच ऑफिस करायचे, आणि कुठलेही प्रोजेक्ट टार्गेट अचिव्ह करायच्या फंदात न पडता शक्य तितके लवकर घरी सटकायचे. वर्क लाईफ बॅलन्स वगैरे संज्ञा निव्वळ कागदावर राहू नयेत हे बघायचे. मग घरी पोहोचल्यावर मी आणि माझी पोरं. त्यांच्यासोबत खायचे, खेळायचे, अभ्यास करायचे, त्यांची सूसूशीशी साफ करण्यापासून आंघोळीपर्यंत जे काही एकत्र करता येईल ते करायचे, आणि त्यातून जसा वेळ मिळेल तसे ईतर वैयक्तिक छंदही जपायचे. अशी अगदी टिपिकल कुटुंबवत्सल तरीही माझ्यादृष्टीने ईंटरेस्टींग लाईफ मी जगत होतो. टवाळक्या करतच लहानाचा मोठा झालो आणि तसेच काही विशेष न करता एक दिवस मरणार असे आयुष्याच्या अर्ध्या टप्प्यावर वाटत होते. पण दोन ईमुकल्या चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ दिला. कोणाच्या अध्यातमध्यात न पडताही माझ्या आयुष्यात मी कालपरवापर्यंत खुश होतो. आणि मग तो आला.. कोरोना!

चिमुकलाही म्हणू नये ईतका सूक्ष्मजीव पृथ्वीवर अवतरला आणि कित्येक कुटुंब उधळवून टाकू लागला. माणसं मरत होती. पण त्यापेक्षाही वाईट म्हणजे माणसे आपल्या मनाप्रमाणे जगू शकत नव्हती. जिवंत राहण्याची किंमत जगण्यात कॉम्प्रोमाईज करून राहत होती. लॉकडाऊन लागला आणि सर्वांप्रमाणेच आम्हीही घरी अडकलो. मुलांसोबत माझे आधीसारखे दर दिवसाआड त्यांच्या आजोळी जाणे बंद झाले. दर विकेंडचे गार्डनला जाणे बंद झाले. मुलांचे खाली खेळायला जाणेही बंद झाले. आणि याचे त्यांच्यापेक्षाही मला जास्त वाईट वाटत होते. कारण ईतर सर्व नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या मुलांप्रमाणे मलाही वाटायचे की माझे बालपण खूप भारी गेले आहे. त्यातही मी दक्षिण मुंबईतील चाळ संस्कृतीत वाढलेलो असल्याने ते खरेच खूप भारी होते. त्यामुळे या पिढीतल्या आपल्या मुलांच्या नशिबी ते सुख नसणार असे वाटून मी त्यांना हवे तसे मुक्तपणे बागडू द्यायचो. पावसात भिजू द्यायचो, चिखलात लोळू द्यायचो. मातीत खेळू द्यायचो, खेळतानाही वाटेल तेव्हा, वाटेल तिथे बसकन मारू द्यायचो. फ्लॅट संस्कृतीतील चार भिंतीत वा सोसायटीतील कंपांऊड वॉलच्या आतच त्यांचे आयुष्य अडकून राहणार नाही याची काळजी घ्यायचो. पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या स्विकाराव्याच लागतात. कोरोना आणि लॉकडाऊनलाही आम्ही असेच स्विकारले.

लॉकडाउन सुरू झाला तेव्हा मुलगा सव्वादोन वर्षांचा झाला होता आणि मुलगी नुकतीच सहाची. किंबहुना १९ मार्चचा तिचा सहावा वाढदिवस हेच आमचे शेवटचे घराबाहेर पडणे ठरणार याची आम्हाला तेव्हा कल्पनाही नव्हती. दुसर्‍याच दिवशीपासून माझे वर्क फ्रॉम होम चालू झाले. मुलीच्या शाळेला आधीच सुट्टी मिळाली होती. त्यामुळे मग दिवसभर दोन्ही पोरांशी खेळताखेळताच वर्क फ्रॉम होम व्हायचे. बरेचदा मी कामात असताना, अगदी मिटींगमध्ये असताना मुलगा माझ्या मांडीवर असायचा, तर मुलगी खांद्यावर चढून वरच्या फळीवरचा तिचा खजाना चेक करत असायची. मुलांच्या दंग्यात मिटींगमध्ये काही ऐकू गेले नाही तरी न संकोचता तसे बॉसला सांगायचो आणि त्यानेही ते समजून घ्यावे अशी अपेक्षा करायचो. कारण वर्क फ्रॉम होम कल्चर आमच्या क्षेत्रात नवीनच होते. त्यामुळे कधी मी आणि बॉस डिस्कशन करत असताना मुलगा जवळ यायचा, त्याला मीच हवा असायचो. त्याच्या वयाला वर्क फ्रॉम होम हि संकल्पना मी नाही समजवू शकायचो आणि त्याला असेच दूर लोटणे मला क्रूरपणाचे वाटायचे. म्हणून मग तिथेच बॉस वा कलीग जो कोणी असेल त्याला थांबवून कामातून ब्रेक घ्यायचो. थोडक्यात घरी जरी ऑफिसचे काम करत असलो तरी घराचे ऑफिस होऊ नये याची शक्य तितकी काळजी घ्यायचो.

पण हळूहळू सारे सेट होत गेले. कामाच्या मध्ये कामात चुका न करता मुलांशी ड्रॉईंग, कलरींग, उनो, पत्ते, पझल, हाईड अ‍ॅण्ड सीक वगैरे टर्न बाय टर्न खेळणे जमू लागले. पासिंग द पार्सल, चोर शिपाई, घर घर, डान्स डान्स असे मम्मी आणि आज्जीला सोबत घेत फॅमिली खेळही रोजच रंगू लागले. मारामारी, पकडापकडी, आबादुबी आणि झाल्यास योगा असे मैदानी खेळांनाही घरच्याघरी पर्याय शोधले गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रोज संध्याकाळी थंड पाण्याच्या शॉवरखाली आम्हा तिघांची एकत्र आंघोळ होऊ लागली. हा अर्धापाऊण तास ईतका दंग्याचा असायचा की मुले ती वेळ व्हायच्या तासभर आधीच नाचतगात तयार व्हायची. हाच उत्साह ते दर दोनचार दिवसांनी होणारया मॅगी पार्टीलाही दखवायची. या काळात दोन्ही भावंडात नात्याचा जो बंध तयार झाला तो या लॉकडाऊनचा माझ्यासाठी सर्वात मोठा फायदा होता..

मग लवकरच मुलीची ऑनलाईन शाळा सुरू झाली. पण त्याचा तिला जाच वाटू नये म्हणून तिच्या मूडनुसार अध्येमध्ये लेक्चर बंक करू दिले. पण शाळेनेही त्या काळात बरेच छान आणि कल्पक उपक्रम राबवले असल्याने तिथेही ती रमू लागली. त्यात तिच्या शाळेने रेडिओ चॅनेल सुरू केले, आणि तिला पहिले ब्रॅण्ड अ‍ॅम्बासेडर बनवले. त्यामुळे त्यानिमित्ताने बरेच ऑडिओ आणि विडिओ वरचेवर रेकॉर्ड होऊ लागले. त्यात आपले काम सांभाळत सहभाग देणे हे शिवधनुष्य मला पेलावे लागले. पण बायको जॉबला नसण्याचा सर्वात मोठा फायदा मला या काळात जाणवला. वर्क फ्रॉम होम एकाचेच असल्याने पोरांची जबाबदारी वाटली गेली. साईड बाय साईड तिचेही यूट्यूब चॅनेल बघून आम्हाला नवनवीन पदार्थ करून खाऊ घालणे चालूच होते. माझा वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस हे सारे या लॉकडाऊन काळात नेहमीपेक्षा वेगळ्या स्वरुपात पण तितक्याच उत्साहात साजरे झाले. आणि रोजच काहीतरी नवीन धमाल घेऊन येणारा हा लॉकडाऊन पिरीअड आपल्या आयुष्यातील सोनेरी काळ आहे असे मला वाटू लागले.

जून महिना उजाडला. आमचा आवडता पावसाळा सुरु झाला. तसे थंड पाण्याचे शॉवर थांबले. पण त्याजागी संध्याकाळी टेरेसवर जाणे सुरू केले. खरे तर गेले चार वर्षे या भाड्याच्या घरात राहत होतो. पण कधी टेरेस कसे आहे हे बघायलाही गेलो नव्हतो. कारण घराजवळचे ‘मिनी सी शोअर’ हा आमचा ठरलेला कट्टा ज्याने गेल्या चार वर्षात कधी बोअर केले नाही. पण गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. मोकळ्या हवेत श्वास घेण्याच्या गरजेने आमच्यासाठी टेरेसचे दरवाजे उघडले. मग जे खेळ घरात खेळायचो ते तिथे जाऊन खेळू लागलो. आता धावायला जास्त जागा उपलब्ध होती. खेळ वाढले होते. तासतासभर मुलीला घेऊन टेरेसवरच्या टाकीवर बसून गप्पा मारू लागलो. तब्येत सांभाळून का होईना टेरेसवरच पावसात भिजू लागलो. सभोवताली बहुढंगी बहुरंगी पक्षी मुक्त विहार करताना दिसायचे. अगदी डोक्यावर टपली मारून जावे ईतक्या अंतरावरून उडायचे. सुर्याने अस्ताला जाताजाता उधळलेले रंग झेलत आजूबाजूचे शहरदेखील त्या पक्ष्यांईतकेच नयनरम्य जाणवायचे. ना त्यात कोरोना दिसायचा ना त्याची भिती आढळायची.

पण प्रत्यक्षात मात्र तो जगभर थैमान घालत होता. भारतातही पसरू लागला होता. पण आम्ही घरच्याघरी सुरक्षित असे वेगळ्याच विश्वात होतो. सुरुवातीला रोज नित्यनेमाने बघितल्या जाणार्‍या बातम्या मी कोरोना महाराष्ट्र मुंबईत पसरू लागताच मुलांसमोर लावणे बंद केले होते. त्यांचे लॉजिक म्हणाल तर, कोरोना हा घराबाहेर आहे आणि जोपर्यंत आपण घराबाहेर पडत नाही तोपर्यंत सुरक्षित आहोत, ईतके सिंपल होते. मी सुद्धा तेच पकडून चालत होतो. आणि अश्यातच तो आमच्या समोरच्या घरातील चारपैकी तीन सदस्यांना झाला. माझ्या मुलीच्या तिच्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या असलेल्या मैत्रीणीला, आणि तिच्या ताईला झाला. आजवर बातम्यात दिसणारा आणि चॅनेल बदलताच अदृश्य होणारा कोरोना अगदी चार फूटांवर दिसू लागला.

जी खळबळ आता आमच्या मनात उडाली होती तिला मुलांपासून लांबच ठेवायचे ठरवले. सर्वतोपरी काळजी घेत आठवड्याभराचा ब्रेक घेतला आणि पुन्हा टेरेसवर जाणे सुरू केले. तिथे पाऊस आमची वाट बघत तयारच होता. त्यात त्या कोरोनाला भिजवून, त्याला मनातून काढत आम्ही पुन्हा चारशे मैलांवर भिरकावून दिले. तसेही आमचे टेरेसवर जाण्याचे काही शेवटचे दिवसच शिल्लक होते. कारण आता आम्हाला आमच्या नवीन घराचे वेध लागले होते.

नियोजित वेळेच्या तब्बल चार महिने जास्त आम्ही भाड्याच्या घरात काढले. या काळात नाहक घरभाडे आणि नवीन घराचे लोनचे हफ्ते दोन्ही भरत होतो. आर्थिक गणित बिघडले होते, उधारखाते चालू झाले होते. सासरेबुवांकडून बिनव्याजी कर्ज घ्यावे लागले होते. घरमालकाकडून घरभाड्यात दोन महिन्याची सूट घ्यावी लागली होती. पण तरीही लॉकडाऊन शिथिल होऊनही ‘जान है तो जहान है’ म्हणत शिफ्टींगचा विचार न करता जिथे आहोत तिथे सुरक्षित आहोत हा विचार करून थांबून होतो. पण समोरच्या घरात पाहुणचार स्विकारलेल्या कोरोनाने हा विचारही मनातून पुसून काढला होता. कोरोना बॅकफूटवर गेला होता तर भाड्याच्या घरातून स्वत:च्या हक्काच्या घरात जातानाचा आनंद उपभोगण्यास आता आम्ही मुलांसोबत तयार होतो. नवीन घरात प्रवेश करताना मुलांसाठी बरेच सरप्राईज प्लान केले होते, पण पैश्याची तंगी आणि कोरोनाकाळात मुक्तसंचारावर असलेले निर्बंध यामुळे सारेच काही शक्य झाले नाही. घर शिफ्ट करताना आणि घराचे उरलेसुरले काम करून घेतानाही या काळात बरीच काळजी घ्यावी लागली. रोज रात्री झोपताना आज आपण कुठे कुठे फिरलो, कोणाकोणात मिसळलो, कुठे हलगर्जीपणा तर झाला नाही ना, उद्या ताप तर चढणार नाही ना वगैरे विचार मनात आल्यावाचून राहायचे नाही. पण मुलांनाही आता आपण एक नवीन घर, एक नवीन आयुष्य देणार आहोत या विचारांतून आलेल्या समाधानात ते विरून जायचे.

सध्या गणेशोत्सवाच्या धामधूमीतच आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो आहोत. मुले फार आनंदात आहेत. सुदैवाने आमचाही कोणाचा घसा अजून खवखवला नाहीये ना ताप आलाय. पण शेवटही गोड झालाय असे म्हणू शकत नाही कारण मुळात हा शेवट नाहीये. अजूनही कोरोना आपल्या आसपासच आहे. आणि अजूनही त्यासोबतच आयुष्य जगायचे आहे.

म्हटलं तर कित्येक किस्से घडले या काळात, काही चांगले काही वाईट. बरेच अनुभव आले, ज्यांनी घरबसल्या देखील विचार करायची, आयुष्याकडे बघायची नजर बदलून टाकली. आपण अजूनपर्यंत तरी सुखरूप आहोत याचे आभार मानावेसे वाटले, जे नाहीत त्यांच्याबद्दल वाईट वाटले. आपल्या मनातील गिल्ट जावी यासाठी का असेना, ओळखीच्या वा अनोळखी लोकांना मदत केली गेली. पण या सर्वात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आपण हे काय करून ठेवलेय? येणार्‍या पिढीचे आपण फार मोठे दोषी आहोत. आपण आपल्या सुखासाठी आणि स्वार्थासाठी जे आजूबाजूचे वातावरण विषारी आणि विखारी करून ठेवले आहे, त्याचे असेच एकेक भीषण परीणाम येणार्‍या प्रत्येक पिढीला भोगावे लागणार आहेत. ईथून आपल्या किती पिढ्या शिल्लक राहणार आहेत याचीही आता शाश्वती नाही असे वाटते. सर्वात वाईट म्हणजे जे आपण करून ठेवलेय ते आता निस्तरणेही कदाचित आपल्याला शक्य नाही असे वाटते. त्यामुळे लेखाचा शेवट करताना शाहरूखचा एक डायलॉग मारायचा मोह आवरत नाही, जो सकारात्मक आहे की नकारात्मक हे मला सांगता येणार नाही, कदाचित ज्याला त्याला आपल्या स्वभावानुसार उलगडत असावा...

तुम्हारे पास जो है वो शायद तुम्हारे हिसाब से कम है
पर शायद किसी दुसरे के नजर से देखोगे, तो तुम्हारे पास बहोत कुछ है
तो फिर जिओ, खुश रहो, मुस्कुराओ...
क्या पता,
कल हो ना हो !!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ, लेकीला बूकमार्क स्पर्धेत भाग घ्यायला लाव की.
>>>>

सस्मित येस, विचार आलेला डोक्यात. बघतो तिला विचारून. मध्यंतरी आलेली एक बूकमार्क बनवून मला दाखवत. यूट्यूबवर पाहिलेला. त्यामुळे काही सांगायची गरज नाही.

धन्यवाद निल्सन., हातखंडा वगैरे काही नाही. मला आवडते गणपती स्पर्धात सहभाग नोंदवणे. पण वैयक्तिक कारणांमुळे गेले दोन गणेशोत्सव मुकलो होतो. त्यामुळे यंदा घर शिफ्टींगमध्ये अडकलेलो तरी काढला वेळ काल लिहायला. Happy

किती छान लिहिले आहे अभिषेक.

पावसात भिजू द्यायचो, चिखलात लोळू द्यायचो.....अगदी अगदी मला वाटायचं मी एकटीच आहे की काय असे All emotions out करू देणारी. अशा मुलांचा EQ खूप चांगला होतो . शिवाय फारच शांत स्वभाव होतो हा स्वानुभव आहे.

तुझी मुलं तर गोड आहेतच पण तूही एक गोड बाबा आहेस.

आपण आपल्या सुखासाठी आणि स्वार्थासाठी जे आजूबाजूचे वातावरण विषारी आणि विखारी करून ठेवले आहे, त्याचे असेच एकेक भीषण परीणाम येणार्‍या प्रत्येक पिढीला भोगावे लागणार आहेत. >>>>
एक नेटिव्ह अमेरिकन म्हण आहे.
We borrow the mother Earth / land from our children. मनावर कोरल्या गेलीये. अगदी अगदी झाले हे वाचून.
नव्या घराबद्दल खूप खूप अभिनंदन. तुला आणि तुझ्या पिलवंडांना खूप शुभेच्छा.

मानवमामा, सुर्यगंगा आणि आस्मिता, धन्यवाद Happy

शिवाय फारच शांत स्वभाव होतो हा स्वानुभव आहे.>>> अरे देवा. पोरीबाबत हे झाले तर मी हत्तीवरून मोदक वाटेन Happy

अय्या, तुमच्या प्रिन्सेस चा आणि माझा वाढदिवस सेमच दिवशी असतो. आम्ही ही कोरोनाच्या आधी शेवटचे 19 मार्च लाच फैमिली फैमिली घराबाहेर पडलो होतो.
Happy
Submitted by mrunali.samad

<>>>>>

अरे वाह सही आहे. आमच्या जन्मदिवशी शिवजयंतीचा मुहुर्तही होता. याचा जास्त आनंद होतो Happy

बाकी त्या दिवशीही आम्ही बाहेर जायचे की नाही याबाबत साशंकच होतो. कारण लॉकडाऊन वा जनता कर्फ्यू वगैरेला सुरुवात नव्हती झाली तरी कोरोनाची चाहूल लागलेलीच. पण मुलीच्या शाळेला सुट्टी दिल्याने तिचा शाळेतला बड्डे कॅन्सल झालेला. तसेच आम्ही घरीही मुलांना बोलवायचे टाळलेले. त्यामुळे दोन्ही घरच्या फॅमिलीतील यंग मेंबर मिळूनच बाहेर सेलिब्रेट करून आलेलो. आणि संध्याकाळी घरी ज्येष्ठ नागरीकांसोबत केलेला.

गंमत म्हणजे तिचे बड्डे गिफ्ट सायकल होती. जिने त्यानंतर उंबरठा ओलांडलाच नाही.

वाह!
क्या बात!
गटणे mode on:
{
मनाच्या आतल्या।कोपऱ्यातून।उलगडलेल्या भावना शब्दरूपात अवतरल्या
}
गटणे mode of f:

खुप छान लिहिले आहे. कोरोना आणि लाॕक डाऊन मुळे आलेली निराशा शाहरुखच्या ह्या डायलाॕग सारखा विचार करुन तरलो आहे . तुम्हा सर्वांना नवीन घराच्या हार्दीक शुभेच्छा.

खूप छान. जगणे शिकवणारे लिखाण.

>> दोन ईमुकल्या चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ दिला.

वा ! Happy घरी मुलेच आपल्याला आई/वडील बनवतात. आणि ऑफिसात आपल्याला रिपोर्ट करणारे येतात तेच आपल्याला बॉस बनवतात Happy दोन्हीकडे आधी आपण वेगळेच असतो

>> चिमुकलाही म्हणू नये ईतका सूक्ष्मजीव

अगदी!!! प्रकाशकणांपेक्षाही (फोटॉन) लहान असतात विषाणू

>> अगदी डोक्यावर टपली मारून जावे ईतक्या अंतरावरून उडायचे. सुर्याने अस्ताला जाताजाता उधळलेले रंग झेलत आजूबाजूचे शहरदेखील त्या पक्ष्यांईतकेच नयनरम्य जाणवायचे.

वा! खूप सुंदर. हेवा वाटला.

मी त्यांना हवे तसे मुक्तपणे बागडू द्यायचो. पावसात भिजू द्यायचो, चिखलात लोळू द्यायचो. मातीत खेळू द्यायचो, खेळतानाही वाटेल तेव्हा, वाटेल तिथे बसकन मारू द्यायचो. फ्लॅट संस्कृतीतील चार भिंतीत वा सोसायटीतील कंपांऊड वॉलच्या आतच त्यांचे आयुष्य अडकून राहणार नाही याची काळजी घ्यायचो. >>त्यांना किती जड गेले असेल घरात अडकून रहाणे..हे मी समजू शकते.
लेख आवडला.

धन्यवाद अतुलजी
@ कमला आधी आम्हालाही असेच वाटायचे की त्यांना लॉकडाऊन जड जाणार, आपण त्यांना रमवायला काहीतरी केले पाहिजे.
पण प्रत्यक्षात तेच आम्हाला रमवत होते. ते नसते तर आमचा लॉकडाऊन फार अवघड झाला असता...

सुंदर लिहिलयं..
मायबोलीवर जरी तुम्ही खोडकर ( हलके घ्या) असलात तरि घरी एक हळवा पिता आहात हे नेहमी तुमच्या लेखनावरून जाणवतं.

मस्त लिहिलं आहेस. मी सुरुवात वाचली होती. काही कारणाने पुढचा लेख वाचायचा राहून गेला होता तो आज वाचला.
नवीन घरासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!

मायबोलीवर जरी तुम्ही खोडकर >>> प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रुपे असतात..कशी ते सविस्तर स्वतंत्र धाग्यात चर्चा करूया Happy

Pages