आठवणींच्या राज्यात- किस्सा क्रमांक ७ मराठीचे तीन तेरा

Submitted by पूजा जोशी on 26 August, 2020 - 12:26

किस्सा क्रमांक ७

मराठीचे तीन तेरा

काय बाई सांगू, कसं ग सांगू? मलाच माझी वाटे लाज. ... पण हि लाज गाण्यात ज्या अर्थी वापरली आहे त्या अर्थी मला वाटली नाही खरतर. पण लाज वाटली हे खर

तर त्याच झाले असे की चिरंजीव मराठी वाचत होते. तसे त्याचे मराठी बरं आहे पण वाचनाचा आनंदच आहे सारा. आपण काय वाचतो आहोत? त्याचा अर्थ काय? ह्याचा आम्ही फारसा विचार करत नाही. आईने सांगितले म्हणून जबरदस्तीने वाचन करायचे.

तर चिरंजीव सचिन तेंडुलकरवर लिहिलेला लेख वाचत होता. 'सचिनची आई तो विशेष कामगिरी करून आला कि त्याची दृष्ट काढायची ' असं एक वाक्य होत. खणखणीत आवाजात नील वाचत होता. 'सचिनची आई तो विशेष कामगिरी करून आला कि त्याची दृष्टी काढायची '.

मला हसू आवरता येत नव्हते आणि नीलच्या गावी आपण काही चुकिचे वाचले ह्याचा गंधही नव्हता. अर्थात त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपणच कुठे तरी कमी पडतो मायबोली शिकवायला. त्याच लेखात 'अलौकिक' असा शब्द होता. नीलने मला ह्या शब्दाचा अर्थ विचारला. सवयीने मी extraordinary असा इंग्लिश मधला त्याला पटकन समजेल असा अर्थ सांगितला. लगेच घाणेकरांच्या काशिनाथ स्टाईलने म्हणजे 'एकदम कडडडक' असंच ना? नीलने मला विचारले . मी निमूटपणे त्याला मान हलवून पुढचे वाचायची खूण केली.

तिसर्‍या वाक्याला माझा त्रिफळा उडाला. 'सचिन अनुकरणप्रिय नाही ' हे वाक्य चिरंजीवाने 'सचिन अनुकर्णप्रिय नाही ' असे वाचले.
पदलालित्य, हा शब्द पदला लित्य असा तोडून वाचल्याने ..... .नीलला मारून मुटकून वाचनाला बसवू नये हा धडा मी घेतला.

किस्सा क्रमांक 1
http://www.maayboli.com/node/58891
किस्सा क्रमांक 2
https://www.maayboli.com/node/58921
किस्सा क्रमांक ३
https://www.maayboli.com/node/76102
किस्सा क्रमांक ४
https://www.maayboli.com/node/76216
किस्सा क्रमांक ५
https://www.maayboli.com/node/76219
किस्सा क्रमांक ६
https://www.maayboli.com/node/76220

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults