आठवणीतला गणेशोत्सव

Submitted by वावे on 23 August, 2020 - 14:16

लहानपणी मी दरवर्षी गणपतीसाठी आईबरोबर आजोळी मुरुडला जायचे. मुरुड म्हणजे जंजिरा-मुरुड. आमच्या गावाहून आधी एसटीने किंवा कधी बाबाही सोबत असतील तर मोटरसायकलवर, दिघीला जायचं. तिथे लॉंचच्या धक्क्यावर पोचलं, की ’आगरदांडा की राजपुरी’ असा एक पर्याय असायचा. राजपुरीला जाताना लॉंच जास्त हलायची, कारण ते खुल्या समुद्राच्या जास्त जवळ आहे. अर्थात अगदी लहानपणापासून हा प्रवास अनेकदा केल्यामुळे लॉंच कितीही डुचमळली, तरी मला कधीच भीती वाटली नाही. लॉंच चालवणारी माणसं तर लीलया मोटरसायकली, स्कूटर्स लॉंचच्या टपावर वगैरे चढवायची. पलीकडच्या काठाच्या जवळ पोचलो, की आधीच सराईतपणे धक्क्यावर उडी मारून लॉंचला बांधलेला जाड दोरखंड धक्क्यावरच्या हुकांमध्ये अडकवायची. अर्ध्याच तासाचा हा प्रवास, पण मजा यायची. एसटीच्या तिकिटापेक्षा वेगळ्या, जाड कागदाचं, वेगळ्या रंगाचं लॉंचचं तिकीट. खारा, ओलसर वारा, चमचमणारं पाणी. मी खूप लहान असताना खाडीत एक जहाज नांगरून ठेवलेलं होतं. बरेच दिवस ते तिथेच होतं. त्याच्या जवळून लॉंच जाताना उगाचच काहीतरी गूढ वाटायचं.

पलीकडे पोचलो आणि समोरच मुरुडची एसटी उभी असली, की लगेच एसटीत जाऊन बसायचं. नेहमीच असं सुख नसायचं अर्थात. कधीकधी आधीच्या लॉंचने आलेली माणसंही तिथे एसटीची वाट पहात रखडलेली दिसली, की समजायचं, आज तोबा गर्दीत उभं राहून जावं लागणार. (अशा गर्दीत चेंगरत उभं राहून जाताना हवेशीर सीटवर एकट्याच बसलेल्या ड्रायव्हरचा हेवा वाटायचा. Wink )

’गणपती म्हणजे मुरुडला जायचं’ आणि ’मुरुडला जायचं म्हणजे गणपती’ ही समीकरणं माझ्या डोक्यात घट्ट बसलेली आहेत. त्यामुळे एकदा कधीतरी दत्तजयंतीच्या उत्सवासाठी मुरुडला गेलो, तेव्हा घरात गणपती नसल्यामुळे चुकल्यासारखं वाटलं होतं. घरात शिरलं, की डाव्या बाजूला देव्हार्‍यात गणपतीची मूर्ती बघण्याचीच सवय होती.

सकाळच्या वेळी शेजारपाजारच्या दादा-ताया आमच्या विहिरीत पोहायला यायच्या. जेव्हा मला पोहता येत नव्हतं, तेव्हा मी (कुणी पकडून पोहायला नेऊ नये म्हणून) विहिरीपासून सुरक्षित अंतरावर सावधपणे उभी राहून धबाधब उड्या मारणार्‍यांकडे आदरयुक्त भीतीने बघायचे. अर्थात नंतर मला पोहता यायला लागलं तरी विहिरीच्या काठावर उभं राहून अशी उडी मारण्याइतकं धाडस माझ्यात कधीच आलं नाही, पण निदान पाण्याची भीती कमी झाली. एकेकजण काठावरून विहिरीच्या मधोमध उडी मारायचा. त्यामुळे निर्माण झालेली लाट काठाला आपटून परत मधे येण्याच्या वेळी बरोब्बर पुढचा भिडू उडी मारायचा. मग आणखी मोठी लाट. ती परतून आली की तिसरा भिडू. (याला 'मुंडा फोडणं' असं म्हणतात, असं कालच बाबांशी बोलताना त्यांनी सांगितलं Happy ) असं करत करत शेवटी शेवटी पाणी प्रचंड उसळायला लागायचं. ते बघताना एकीकडे मज्जा आणि दुसरीकडे भीती वाटायची. त्यांचा दुसरा एक खेळ म्हणजे एखादं नाणं किंवा वेगळ्या रंगाचा दगड पाण्यात टाकायचा आणि बुडी मारून तो तळातून शोधून वर आणायचा. श्रीवर्धन, दिवेआगर, मुरुड या आणि अशा आगरी गावांमध्ये ( म्हणजे समुद्रकिनार्‍यावरच्या, जिथे नारळ-पोफळींची आगरं-वाड्या असतात) प्रत्येक घरामागे विहीर असतेच. त्यामुळे सगळ्या मुलामुलींना पोहता येतंच. साधारणपणे श्रावण महिन्यात विहिरींचं पाणी पुरेसं वर आलं, की दर रविवारी पोहणं सुरूच होतं. या गावांमध्ये कुठल्या मुलाला किंवा मुलीला पोहायला शिकवावं लागत नाही. आजूबाजूच्या मुलांचं बघून आपोआप पोहता यायला लागतं. माझं गाव श्रीवर्धन तालुक्यात असलं, तरी आगरी नाही, डोंगरी आहे. म्हणजे समुद्रकिनार्‍यावर नाही, डोंगरी भागात आहे. त्यामुळे आमच्या गावात अशा विहिरी नाहीत. त्यामुळे मला मात्र पोहणं खास शिकावं लागलं.

श्रीवर्धन-दिवेआगर-मुरुड आणि अशा सगळ्याच गावांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या वेळी वाडीतल्या प्राजक्त, अनंत, कण्हेर, सोनटक्का अशा फुलांचा, सगळीकडे भरून राहिलेला मिश्र सुवास. त्यात मिसळलेला, चुल्यात जळणार्‍या (माडाच्या) पात्या, झावळ्यांच्या धुराचा विशिष्ट खरपूस वास. जवळच गाई-म्हशींचा गोठा असेल, तर त्याचाही एक विशिष्ट वास त्यात मिसळलेला असतो. हे सगळे सुवास मिळून गंधांचं एक सुंदर रसायन निर्माण झालेलं असतं. एकीकडे सतत ऐकू येणारी समुद्राची गाज!
समुद्राची गाज नसली, तरी आमच्या गावातही हे गंधांचं रसायन आहेच. त्यामुळे असं रसायन जिथे कुठे सापडतं, ते गाव मला ’आपलं’ वाटतं.

गणपतीची आरती करण्यासाठी आसपासच्या चारपाच घरातली सगळी तरुण मंडळी एकत्र यायची. एका घरची आरती झाली, की प्रसाद तोंडात टाकत पुढच्या घरी! पंधरा-वीस-पंचवीस जणांच्या एकत्रित उंच आवाजातल्या आरत्या ऐकताना अंगावर रोमांच उभे रहायचे. आरती करताना प्रत्येक घरचा गणपती बघितला जायचाच अर्थात, पण तरी शिवाय ’गणपती बघायला जाणं’ हा एक स्पेशल कार्यक्रम असे. नातेवाईक, शेजारी, ओळखीच्यांकडे तर जायचोच, पण मला मामाबरोबर कोळीवाड्यातसुद्धा गणपती बघायला गेल्याचं आठवतंय. केवढेतरी प्रचंड गणपती असायचे त्यांचे! सुंदर सजावट असायची. सार्वजनिक नाही, हे घरोघरचे गणपती. सार्वजनिक गणपती मुरुडला बघितल्याचं मला तरी आठवत नाही. गणपती बघायला जाताना जर आजीबरोबर गेलं, तर ती हमखास वाडीतून नेणार. या प्रकाराची एक मला गंमत वाटायची. प्रत्येक घरामागे असलेल्या वाड्या एकमेकींना जोडलेल्या असल्यामुळे पाखाडीतल्या (म्हणजे आळीतल्या) कुठल्याही घरी थेट वाडीतून जाता येतं. दोन वाड्यांमध्ये कुंपण वगैरे नसतं.

गणपती विसर्जनाचा एक वेगळाच माहोल असायचा.

IMG-20200828-WA0001.jpg

दुपारनंतर उत्तरपूजा करून गणपती पाटासहित उचलून खाली जमिनीवर आणून ठेवलेला असायचा. एकमेकांना हाका मारत शेजारीपाजारी गणपती घेऊन घराबाहेर पडले, की मामाही निघायचा. गणपती ठेवलेला पाट डोक्यावर घेऊन मामा चालायचा. आम्ही सगळे त्याच्या मागेपुढे. हळूहळू मोठी मिरवणूक तयार होत जायची. कुणी फटाक्यांची माळ लावायचं, कुणी सुतळी बॉंब. वाद्यंही असायचीच. श्रीवर्धनला भजन म्हणत विसर्जनाची मिरवणूक निघते. अगदी टाळ वगैरे वाजवत सुरेल आवाजात गायली जाणारी ती भजनं ऐकायला छान वाटायचं.

समुद्रावर पोचलं, की जवळ-जवळच्या पाचसहा घरांमधले गणपती एकत्र पुळणीवर ठेवून भोवती गोल करून सगळे उभे रहायचो. विसर्जनापूर्वीची आरती म्हणण्यासाठी. आरती झाली की प्रसाद. खोबर्‍याचे तुकडे आणि साखर किंवा साखर घातलेलं सोललेलं पपनस हा दरवर्षीचा ठरलेला प्रसाद मामीने डब्यातून आणलेला असायचा.

मुरुडला गेल्यावर एरवीही आम्ही संध्याकाळी वगैरे समुद्रावर फिरायला जायचोच, पाण्यातही जायचो. पण विसर्जनाच्या दिवशी मामा वगैरे मोठी माणसंही सोबत असल्यामुळे जास्त खोल पाण्यात जायला मिळायचं. मजा यायची. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, नखशिखान्त भिजणे असे प्रकार आम्ही कधी केले नाहीत मात्र. फार फार तर लाट आली की उडी मारायची, एवढच.
IMG_20180917_184026987.jpg

पाण्यात जायला जेवढी मजा यायची, तेवढंच बाहेर पडणं नको वाटायचं. कपड्यांमध्ये वाळू अडकलेली असते. पाण्यात असेपर्यंत पाय स्वच्छ दिसतात, पण एकदा वाळूतून चालायला लागलं, की पावलांना भरपूर वाळू चिकटायला लागते. चपला घातल्या की त्याही वाळूने भरून जातात. चालताना ओल्या कपड्यांनी थंडी वाजायला लागते. अशा वेळी घर खूपच लांब वाटायला लागतं. लहानपणी मला समुद्राजवळ दिसणार्‍या घरांमध्ये राहणार्‍या माणसांचा प्रचंड हेवा वाटायचा. Happy कंटाळून, दमून घरी पोचून एकदा गरम पाण्याने आंघोळ केली, की जे सुख वाटायचं, त्याला तोड नाही.

कॉलेजला गेल्यावर गणपतीसाठी मुरुडला जाणं थांबलं. तरीही गणपती आले, की मुरुडचाच गणेशोत्सव डोळ्यासमोर येतो. आता तोही बदलला असेल कदाचित. यावर्षी चक्रीवादळामुळे मुरुड-दिवेआगर-श्रीवर्धन आणि आमच्या भागातल्या सगळीकडच्याच वाड्यांची प्रचंड पडझड झाली आहे. लोकांमध्ये गणेशोत्सवाचा कितपत उत्साह असेल, माहिती नाही. पण ’मोडला नाही कणा’ असं म्हणणारी माणसं नव्याने डाव मांडतील याचीही खात्री आहे.

IMG_20180917_184139788.jpg

गणपतीबाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे , किती मस्त आठवणी आणि किती बारीक सारीक गोष्टींचं वर्णन केलंय ! मस्तच !
वासाच वर्णन वाचून मला अगदी अगदी झालं ..
गंधांचं रसायन जिथे कुठे सापडतं, ते गाव मला ’आपलं’ वाटतं>> हे मला पण अस्संच वाटतं .. असे सगळे आवडीचे , ओळखीचे गंध डबीत भरून सोबत घेऊन यावेत असं मला खूपदा वाटतं Happy
खूप सुंदर लेख !!

काय सुंदर लिहिलं आहे. मलासुद्धा न जाताच नॉस्टॅल्जीक वाटलं.
हल्ली अशा आठवणी काढूच नयेत असं वाटतं. पण दुसऱ्या कुणी त्या अशा लिहिल्या की आपल्याही आपोआप येतात जोडीला.
फार सुंदर आहे ही पोस्ट.

धन्यवाद सगळ्यांना Happy
अंजली, खरं आहे.
सई, खूप छान वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून!
असं कुठे तरी वाचलं होतं की आठवणी या नेहमी क्लेशकारकच असतात. कारण त्या जर दुःखद असतील तर ते दुःख उगाळलं जातं आणि सुखद असतील तरी ते सुखाचे क्षण आता नाहीत म्हणून वाईट वाटतं.
पण मला नाही हे पटत.आता ते दिवस परत आले नाहीत तरी त्या दिवसांच्या आठवणीत काही क्षण मनाला आनंद मिळतो तो स्वीकारावा असं वाटतं.

सुंदर लिहीलंय!! वाचताना तुमचा अनुभव समोर जिवंत होऊन उभा राहिला. आगरी-डोंगरी शब्द अनेक वेळा वापरात / वाचनात / ऐकण्यात आले होते, पण तुमचा लेख वाचून त्याचे अर्थ आज कळले. इतक्या छान आठवणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

सुरेख लेख! धन्यवाद!
फेफ, +१ आगरी डोंगरी हे शब्द नव्याने कळले!
फुलांच्या आणि वातावरणाच्या गंधाविषयी अगदी अगदी झाले! प्रत्येक जागेला एक वास असतो.
तुमच्या आठवणीतला गणेशोत्सव तुम्हाला लवकरच पुन्हा एकदा अनुभवायला मिळो!

मस्त लिहिलंयस वावे.
आमचं गाव पण श्रीवर्धन आणि आजीचं माहेर जंजिरा मुरुड! कोकणावरचे तुझे लेख वाचले की कायम मन भूतकाळात आडावर, झोपाळ्यावर, समुद्रावर, वाडीत आणि चुलीवरच्या फुंकणीत जाऊन बसतं. मिश्र सुवासाबद्दल तर अगदी अगदी. जळणाचा, फुलांचा आणि समुद्र जवळ असल्याने वाडीतल्या मातीचा आणि सारवलेल्या माजघराचा वास आठवतो.
गणपतीला मात्र कधीच कोकणात गेलो नाही, त्यामुळे त्याची काही आठवण नाही.

फेरफटका, जिज्ञासा, अमितव, देवकीताई, मनःपूर्वक धन्यवाद !
आगरी आणि डोंगरी हवेत, पाण्यात. बराच फरक असतो. आगरी गावात विहिरीच्या पाण्याची चव मचूळ असते. डोंगरी पाणी गोड.
आगरी गावातले नारळ, सुपारी जास्त चांगल्या प्रतीचे. डोंगरी गावातले आंबे जास्त चांगले. (त्यात परत खाली काळा कातळ आहे की जांभा दगड यावरही आंब्याच्या चवीत फरक पडतो.)

प्रत्येक जागेला एक वास असतो.>> +१.
वास सूटकेसमधून प्रवासही करतो. Happy मे महिन्यात मुंबईची आत्या आली की तिची सूटकेस उघडल्यावर जो गंध यायचा तो पुण्याच्या बहिणीच्या बॅगेला नाही यायचा Happy मीच नंतर पुण्यात रहायला गेल्यावर सुट्टीसाठी घरी गेले की दुसऱ्या दिवशी बॅग उघडताना माझा मलाही तोच गंध जाणवायचा. (जो पुण्यातल्या पुण्यात यायचा नाही)
अमितव, विपू करत आहे.

वास सूटकेसमधून प्रवासही करतो. >> +१
मी लहान असताना माझ्या २ मावश्या दरवर्षी अमेरिकेहून यायच्या. त्या आमच्या साठी नेहमीच काहीतरी भेटवस्तू आणायच्या. त्यांनी आणलेल्या वस्तूंना पण असाच एक विशिष्ट सुवास यायचा. त्याला आम्ही अमेरिकेचा वास म्हणायचो. नंतर मोठी झाल्यावर मी स्वतः १० वर्ष अमेरिकेत राहिले. तिथे मला कधीच तसा कोणताही वास जाणवला नाही.

वावे,
प्लीज, मला घेऊन जा ना एकदा कोकणात....!

हो, फोटो पाहिजेत असं मलापण वाटतं. पण लहानपणचे फोटो नाहीत कुठले माझ्याकडे. आत्ताचे फोटो मिळाले की देते इथे. गेल्या वर्षीचे होते पण आत्ता सापडत नाहीयेत.
एविता,नक्की Happy बंगलोर ते थेट श्रीवर्धन !
सोहा , हो, आपला आपल्याला तो वास येत नाही Happy पण प्रत्येक ठिकाणचा असा वास असतो हे नक्की.

दोन वर्षांपूर्वीच्या विसर्जनाचे फोटो मामेबहिणीकडून मिळाले ते जोडले आहेत. पहिला गणपतीचा फोटो तेवढा यावर्षीचा आहे. यावर्षी अर्थात मिरवणूक निघाली नाही. बाप्पा यावर्षी कारमधून विसर्जनाला गेले Happy

समुद्राच्या फोटोंमध्ये दिसतोय तो कासा किल्ला, म्हणजेच पद्मदुर्ग आहे.