ओव्हरटाईम - भूत कथा (भाग-२. झोनल ऑफिस कडे प्रयाण)

Submitted by बिथोवन on 20 August, 2020 - 08:22

"ओव्हरटाईमचा रेट काय असतो?"

"डबल. म्हणजे रोजच्या आठ तासाचे हजार रुपये मिळत असतील तर ओव्हरटाईमला आठ तासाचे दोन हजार मिळतात."

"वोव! पण फक्त ३१ डिसेंबरलाच ना?"

"होय पण समजा तुझी बदली दिल्लीला झाली तर दोन हजार प्लस बोनस असतो. म्हणजे प्रत्येक डेड बॉडी मागे पाचशे रुपये."

" अरे, तू मला माझा असिस्टंट बनवलास, माझा इंटरव्ह्यू झाला नाही, इन फॅक्ट मी ह्या जॉब साठी ऍप्लिकेशनच केलं नाही तरी मला लगेच हा जॉब कसा काय मिळाला?" मी त्याला विचारलं.

"अरे तू ड्रिंक घ्यायला सुरुवात केली तेंव्हाच तू तुझा मार्ग निश्चित केलास. एका विशिष्ट लिमिट बाहेर तू प्यायला लागलास तेंव्हा आम्ही तुला प्रोस्पेक्टिव एम्प्लॉइ म्हणून तुझ्या नावासमोर टिक् केलं होतं. हे बघ, आम्हाला पण दारू आवडते. नथिंग रॉंग इन दॅट. बर आम्ही स्मशानात असतो हे तू ऐकलंय का?"

"होय."

"आणि कोण असतं स्मशानात सांग बरं?"

"काय ते तुमची हेरार्की असते ते, भूत, खवीस, पिशाच्च, समंध, ब्रह्मसमंध, हडळ वगैरे... हो ना?"

"फार मोठं आहे, ऐक, अवगत, अलवंत, आसरा, कालकायक, गानगूड, गिर्‍हा, बायांगी, चिंद, जखीण, झोटिंग, तलखांब, दाव, देवाचार, ब्रह्मसमंध, ब्रह्मग्रह, मुंजा, राणगा, लावसट, शाखिणी, सैतान, सटवी, हडळ, खविस, पिशाच्च आणि वीर वगैरे."

"इतके सगळे... कुठे असतात हे?"

"अरे, जुनी पडकी घरं, जंगल, चिंचेच्या झाडावर, नागचाफा आणि आवळ्याच्या झाडावर, गावाच्या वेशीवर, डोंगरावर, पिंपळावर, विहिरीत, आणि मी उभा आहे तसा हायवेवर. बरेच एम्प्लॉइ झोनल ऑफिसला आहेत. फिमेल भुतं झोनल ऑफिसला असतात."

"अरे व्वा, फिमेल कोण कोण आहे?"

"अवगत, अलवंत, जखीण, लावसाट,शाखिणी,
डाकण, सटवी, हडळ..वगैरे."

"दिसायला छान आहेत काय?"

"इंडक्शनच्या वेळी बघशीलच की. त्यातल्या त्यात हडळ छान आहे. झीरो फिगर मेन्टेन केलंय. मिस् कोकण होती म्हणे. जायचयं आपल्याला झोनल ऑफिसला इंडक्शनसाठी."

"कुठे आहे झोनल ऑफिस?"

"कोकणात. आणि हो, आमच्याकडे पण विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे फीमेल स्टाफशी बोलताना बी कोर्टस् अँड जंटल. खास करून मिस् हडळशी. तिचे बरेच आशिक आहेत. अगदी हाडाचे. सो बी केअरफुल."

"येस बॉस."

"मी विचारलं स्मशानात अजून कोण राहतेय ते तू सांगितलच नाहीस."

"जेवढं माहित आहे तेवढं सांगितलं."

"अरे शंकर पण असतो."

"कोण? शंकर..? देव? म्हणजे महादेव? शिव?"

"होय. आणि त्यांचा लेफ्टनंट कमांडर पण."

"हो? म्हणजे कोण?"

"कालभैरव. त्यांचं हेड ऑफिस उज्जैनला. त्यांना दारूचा नैवेद्य दाखवतात. भक्तांना प्रसाद म्हणून दारू देतात. म्हणून मी म्हणालो की आम्हाला पण दारू आवडते. तुमच्याकडे ओल्ड माँक आहे तसं आमच्याकडे वृद्ध मुनी आहे, रेड लेबल आहे तसं रक्तवर्णी आहे, टीचर्स तसं गुरु आहे, एट पीएम् तसं ट्वेलव ओ क्लॉक आहे, डिप्लोमॅट तसं भूतकारणी आहे. नथिंग रॉंग इन दॅट. पण लिमिट बाहेर नाही."

"पण मला अजुन अपॉईंटमेंट ऑर्डर मिळाली नाही."

"तेच घ्यायला जाणार आहे आपण उद्या."

"कुठे? "

"एच आर डिपार्टमेंट. आपल्या झोनचं कोकणात आहे. तुझं इंडक्शन पण होऊन जाईल. प्रोबेशन संपलं की मग पर्मनंट."

"कोण आहे एच आर हेड?"

"मिस् सटवी भूतानी."

" सिंधी की पारसी?"

"नो आयडिया."

"ओके. माझी सध्याची पोस्ट कुठली आहे?"

"ट्रेनी घोस्ट. सहा महिन्याची प्रोबेशन. बघ बघ... ती एस यू वी.. १२० स्पीडने येतीय.. हात दाखव.... तुझी ट्रेनिंग सुरू…"

…..

Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे
फुल्ल डिपार्टमेंट ची ओळख झाली.

काय ईन्ट्रोडक्शन आहे भुतांच्या प्रकारांचे आणि इन्डक्शन प्रोग्राम पण भारी.
फिमेल भुतं, मिस हडळ. Lol

Lol मस्तच!
फार फार वर्षांपूर्वी साप्ताहिक सकाळच्या कथा विशेषांकात अशी भुतांच्या दुनियेतली अफाट कथा आली होती.

बी फॉर बोकलत
बी फॉर बिथोवन
बी फॉर भूत
बी फॉर बाई बाई.. आता काई खरं नाई
मायबोलीचं

वावे,
ती कथा जागतिक भूत महासभा या नावाची होती का?

काय लक्षात नाही गं नाव. पण एका गावातल्या भुतांचा संवाद होता. ती भुतं माणसांबद्दलपण बोलतात. त्यांची अशीच हायरार्की असते.
खूप वर्षं झाली. १९९५/९६ वगैरे साली असेल.