माफिया डॉन.
सदाशिवनगर मधलं आमचं घर जुनं असलं तरी प्रशस्त आहे. पूर्व दिशेला असलेल्या गेटपासून व्हरांडाच्या पायऱ्यापर्यंत यायला पंधरा सोळा पावलं टाकावी लागतात. पाच पायऱ्या चढल्या की व्हरांडा आणि मग दोन पावलं टाकली की मुख्य दार.
पाच पायऱ्या चढायच्या अगोदर डावीकडे वळून पंधरा पावलं चालून गेलात की उजवीकडे सरळ वीस पावलं चालायची आणि परत उजवीकडे वळून पंधरा पावलं चाललं की उजवीकडे वळून... बरोबर! वीस पावलं! ते झालं की परत उजवीकडे. मग त्या पाच पायऱ्या लागतात. हा डावा उजवा कदमताल करताना डाव्या बाजूला पेरू, आंबा, नारळ, विलायती चिंचा, कढीपत्ता, लिंबू, चिक्कू, सीताफळ, डाळिंब अशी झाडं चालताना आपल्याकडे बघत असतात आणि सोनचाफा, लाल चाफा, पांढरा चाफा, कृष्ण कमळ, गुलाब, जाईजुई, रातराणी, मोगरा वगैरे फुलझाडं हवेत डोलत असतात. गेटच्या वरती बोगनवेलीची कमान पसरलेली असते.
रविवार असो वा कुठलाही वार, अप्पा सकाळी पाच वाजता उठतात आणि चहा करतात, दहा कप. तो बिन दुधाचा चहा मोठ्या थर्मास मध्ये भरून ठेवतात जो नंतर आम्ही दूध घालून घेतो. दुसऱ्यांदा चहा करावा लागू नये म्हणून दहा कप. घरातले सगळे पक्के चहाबाज आहेत. मी धरून.
रोज बागेला पाणी घालण्याचा कार्यक्रम अप्पा करतात पण रविवारी सकाळी सातला ते मंडईत भाजी आणायला जातात आणि त्यांच्या मित्रांना भेटून साडे दहा अकरा पर्यंत परत येतात. एकदा भाजी घेताना इन्फोसिसच्या श्रीमती सुधा मूर्ती पण त्यांच्या बाजूला भाजी घ्यायला उभ्या होत्या असं त्यांनी सांगितलं होतं.
रविवारी सकाळी सातच्या सुमाराला तुम्ही गेट उघडून आत आलात की समोरच्या पाच पैकी सर्वात वरच्या पायरीवर मी बसलेली असते आणि खालच्या पायरीवर माई बसलेल्या असतात. साडेसातला गेट मधून आत आलात की आमची जागा बदललेली असते. म्हणजे मी खालच्या पायरीवर बसलेली असते. आम्ही एकमेकींच्या केसांना तेल चोळत असतो.
रविवार म्हणजे खरं तर उशिरा उठायचा दिवस पण माई असल्या की लवकर उठावं लागतं. त्याचं कारण म्हणजे आमच्या दोघींचा न्हाण्याचा कार्यक्रम. सकाळचं चहा पाणी आटपलं की मग आम्ही एकमेकींच्या केसांना तेल चोळतो. म्हणजे अगोदर मी त्यांच्या केसांना तेल चोळते आणि मग त्या माझ्या केसांना. घड्याळातली बरोबर वीस मिनिटे तेल चोळून झाल्यावर ते तासभर जिरवायचं आणि मग आंघोळ.
मी स्वतः लग्नापूर्वी असं सगळं तेल चोळणं रविवारीच करायचे. अगोदर केस बॉब कट वगैरे केले होते पण लग्न ठरलं तसे केस वाढवले. आता मात्र वेणी घालते आणि ते ही माई असताना. आम्ही दोघेच असतो तेंव्हा केस मोकळे सोडून ठेवते, जीन्स आणि टॉप घालते. पण माई असताना साडी, आणि त्याच्यावर अंबाडा वगैरे घालून मोगऱ्याचा गजरा माळला की माईंच्या गुड बुक मध्ये ताबडतोब एंट्री मिळते. माई पण अंबाडा घालून एखादं फूल खोचून ठेवतात.
त्यांच्या केसांना तेल चोळताना मला प्यासा सिनेमातलं गाणं हमखास ओठावर येतं. 'चंपी..s s तेल मालीश... सर जो तेरा चकराए, या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए...' पण त्या कुठे मला घाबरायला बसलेत..? मीच त्यांना घाबरते. पण सासूचं डोकं हातात असल्याने बरेच विचार डोक्यात (माझ्या) येत असतात. उदाहरणादाखल, त्यांच्या डोक्यावर वरवंटयाने मिरे वाटावेत, त्यांचं डोकं तबला आहे असे समजून यथेच्छ थापा माराव्यात आणि झाकीर हुसेन असल्याचा आनंद लुटावा, त्यांचे केस करकचून ओढावेत, डोक्यात नखांनी ओरबाडावं, दुकानात जर डोक्यातल्या उवा मिळत असतील तर अर्धा एक डझन आणून हळूच त्यांच्या केसात सोडून द्यावेत किंवा रात्री झोपलेल्या असतील तेंव्हा कात्रीने केस वेडेवाकडे कापून काढावेत वगैरे वगैरे. हे सगळे विचार वाईट आहेत मला कळत असतं आणि मनात असले विचार आल्यावर अपराधीपणाची भावना पण निर्माण होते. पण आपलं मन असं आहे ना..! मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते खरंच. पण हे सगळे विचार मी प्रत्यक्षात कधीच उतरवत नाही आणि ते शक्यही नाही. गम्मत म्हणजे असले विचार मी माझ्या आईचं डोकं चोळत असते तेंव्हा माझ्या मनात फिरकत पण नाहीत. आईचं डोकं हातात धरलं की मीच तिची आई आहे अशी भावना मनात निर्माण होते आणि आपसूक माझे ओठ तिच्या गालावर टेकतात.
माझ्या केसांना माई तेल चोळतात तेंव्हा त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं माहित नाही पण मी जसा वाईट विचार करते तसं त्या करत असतील तर, असं वाटून मी मनातल्या मनात देवाला हात जोडून क्षमा मागते. शान्तम् पापम्।शान्तम् पापम्।
तर हा असा तेलकट कार्यक्रम रविवारी असतो म्हणून आम्ही ऋषीन् ला आमच्या दोघींच्या अगोदर आंघोळ करून घे म्हणून पिटाळतो कारण नंतर बाथरूमच्या फरशा तेलकट होणार असतात.
असच एका रविवारी तो बाथरूम मधून डोळे चोळत बाहेर आला तेंव्हा त्याचे डोळे लाल झालेले दिसले.
" ऋ.. अरे, डोळे बघ किती लाल झालेत? कशानी झालेत रे..? " मी विचारलं.
"अगं तो शाम्पू लावल्यानंतर डोळे चुरचुरायला लागले बघ. लाल झालेत का फार?"
"अरे एकदम ब्लड रेड झालेत. कुठला शाम्पू वापरलास?"
"अगं जो हाताला लागला तो वापरला. तो हिरव्या बाटलीत ठेवला होता तो." तो लुंगी नेसत बोलला.
"तो? अरे त्यात मी शिकाकाईचं पाणी ठेवलं होतं.. ते तू घेतलंस... छान.. धन्य आहेस.."
"अगं मला काय माहित कसलं काय आहे ते? तू पण ना...? बाटलीवर लेबल काय आणि तू सांगतेस काय.. परत मलाच बोलतेस.." केस पुसत तो म्हणाला
"अरे मला विचारायचं तरी हे घेऊ का म्हणून?"
"शहाणे, तू लेबल तरी काढून टाकायचं ना? अजून त्याच्यावर मियामा दि बिल्स लेबल आहे. हे म्हणजे मुंग्यांना फसवण्यासाठी साखरेच्या डब्यावर तिखट लिहिलेलं लेबल चिकटवणे, असा प्रकार आहे."
"तू? आणि मुंगी? मुंगळा आहेस तू.."
"का गं?... ओठाला जखम झाली का रात्री..?"
"हट, चावट माणूस..."
"म्हणजे मी चावतो म्हणायचंय काय तुला?"
"फाजीलपणा बंद कर.. माई ऐकतील."
"माई शिरली बाथरूममधे," तो अंगातलं जानवं कोरडं करत म्हणाला, "आणि काय गं? काय म्हणालीस तू? कसलं पाणी?"
"आवळा, रिठा आणि शिकाकाई."
"शेवटचं काय म्हणालीस?"
"शिकाकाई.".
"जॅपनिज प्रॉडक्ट आहे काय? नावावरून तसं वाटतंय पण काम ओसामा बिन लादेन सारखं करतंय. ब्लड रेड."
त्याने आरशात डोळे बघितले. "बाप रे. सुजलेत पण. कंजक्टिविटीस झाल्यासारखं दिसतंय. गॉगल घालून बसतो आता." असं म्हणत ड्रावर मधला गॉगल काढून त्यानं डोळ्यावर चढवला.
मी हसायला लागले. "अरे होतील थोड्या वेळानी कमी. चुरचुरत असतील तर पाणी लाव अजून. डॉन दिसतोयस गॉगल घालून."
"ते कैझान सिस्टिम असतं बघ जपानचं त्यात फाइव एस् असतात ना.. सेइरी,सेइतोन,सेईसो,सईकेत्सू आणि शित्सुके, त्या पैकी वाटलं मला ते तुझं... काय म्हणालीस शिक..?"
"शिकाकाई. थांब तुला सगळा इतिहासच सांगते. मुंज झाल्यावर तुला शेंडी ठेवली होती की नाही?"
"होय. ठेवली होती. त्याच्याभोवती बिस्कीट पण होतं."
"त्या शेंडीला म्हणतात शीखअंड. शीख प्लस अंड पासून शिखंड. ज्या शेंडीला चाणक्य गाठ मारणार होता त्याला म्हणायचं शिखंडिका. डोक्यावर म्हणजे शिखावर असलेली केसांची गाठ. संस्कृत मध्ये चूडा, आणि चूडाकरण म्हणजे मुंडण. शिखा, शिखु, शिखरम्, शिखरिणी ही सगळी शिखापासून तयार झालेले शब्द आहेत. कळलं?"
"इशान तर शेंडीला अँटेना म्हणायचा.."
"हो का? आता तो अँटेना असता ना.. तर मी माझ्याकडे वळवला असता. शंकराला डोक्यावर जटा आहे म्हणून तो शेखर आणि तिथून गंगा वाहते म्हणून ती शिखरिणी. तमिळमध्ये सिक्कम्,सिक्कु सिकाईताटू,सिका, सिकुरम, सिकरिन आणि तेलगू भाषेत सिगा, सिगाई. आता, काई म्हणजे कच्चे फळ, जसं नेल्लिकाई, हुणचीकाई, उप्पिनकाई, माविन काई, कुंबळकाई, हिरीकाई, बद्नीकाई तसच शिकाकाई म्हणजे केसांना उपयोगी असे फळ म्हणून शिकाकाई. समजलं?"
"हो मॅडम."
"काय?"
"शिका काही.. तुमच्याकडून."
मी हसत त्याच्या गालावर हलकीशी चापट मारली.
" बरं, नेल्लिकाई म्हणजे मराठीत काय सांग बरं?
"आवळा."
त्याने लगेच मला विळखा घातला. मी माई येतील या भीतीने पटकन् मला सोडवून घेतलं.
"हे काय अचानक? असं काय घट्ट धरलंस?"
"तूच म्हणालीस ना आवळा? म्हणून...."
मी मोठे डोळे करून त्याच्याकडे बघतच राहिले. "तुला दुसरं काही सुचत नाही का रे?"
"अगं तू समोर असलीस ना की माझा विश्वामित्र होतो. माझी तपस्या भंग पावते."
मी हसून म्हणाले, " होय काय? हाँटेड रोड वर ती म्हातारी भेटली तेंव्हा तू साधा ऋषी होतास आणि आता लगेच विश्वामित्र झालास? त्याची तपस्या मोडणारी मेनका होती आणि मी मेनका नाही, ती गोरी होती मी गोरी नाही."
"अगं तू मेनका, रंभा, उर्वशी या सर्वांचं काँकोकशन् आहेस."
"बस्, बस् बस्.. ही मस्का चस्काची वेळ नाही." त्याने माझे हात पकडले आणि जवळ ओढत म्हणाला, "तुझी शिकाकाईची केस स्टडी बाकी जबरदस्त आहे गं.." असं केस या शब्दावर जोर देत बोलला.
तेवढ्यात माईनी हाक मारली. "अगं ते शाम्पूच्या बाटलीत शिकाकाईचंच पाणी होतं ना गं?"
" हो माई, " मी आत जाता जाता म्हणाले. माई आरश्यासमोर उभ्या होत्या. "बाप रे. लाल भडक झालेत डोळे, आणि सुजलेत पण,. कंजक्टिविटीस झाल्यासारखं दिसतंय गं!"
" अहो नाही माई.. कमी होतील आता तासाभरात.."
" नाही व्हायचे. तू रिठा आणि आवळ्याचं पाणी पण त्याच्यात घातलयस ना.. राहू दे.. मी आता गॉगल घालून बसते. तुझा तो काळा गॉगल आणून दे बाई म्हणजे जरा गार वाटेल.."
मी गॉगल आणायला बेडरुमकडे निघाले तेंव्हा हसू फुटत होतं. मी गॉगल घेताना त्यानं बघितलं. " गॉगल? कुठे चाललीस आता बाहेर? स्कूटर मध्ये पेट्रोल कमी आहे शिवाय अजून तुझं न्हाऊन व्हायचंय ना?"
"अरे माईना हवाय गॉगल. त्यांचेही डोळे लाल झालेत शिकाकाई लावून.." मला हसू आवरेना.
" :-D:-D:-D " त्याला ही हसू आवरेना. माई आता नऊवारी नेसून, अंबाडा बांधून, त्यात फुल खोचून वरती गॉगल घालणार!.:-D:-D:-D तिला म्हण, माई तुम्ही एकदम डॉन दिसताय बरं का....!"
"म्हणायला कशाला पाहिजे? आहेतच त्या डॉन. आपण सगळे कसे टरकून असतो त्यांना.."
"जा मग, सांग तिला तसं..."
"बाप रे.. नको रे बाबा..माझी हिम्मत नाही.."
"का नको? म्हणून तर बघ....!!"
"नो, नेवर... त्या माझा नवीन "केस" पेपर बनवतील आणि इंजेक्शन पण त्याच देतील." मी माईना गॉगल दिला. त्या साडी नेसत होत्या. नऊवारी नेसतात रविवारी; पूजा करायची असते म्हणून.
माझी आंघोळ झाली आणि बाथरूमच्या फरश्या साबणाच्या पाण्याने घासून आणि धुवून मी बाहेर आले तेंव्हा अकरा वाजले होते. मी साडी नेसून डोक्याला टॉवेल गुंडाळला आणि तयार झाले तसं गेटबाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. अप्पा येतात भाज्यांच्या पिशव्या घेऊन रिक्षातून. तेच आले होते. मी त्यांच्या हातातून पिशव्या घ्यायला गेटकडे निघाले तर व्हरांड्यात माई नऊवारी नेसून, अंबाडा बांधून, त्यात फुल खोचून आणि डोळ्यावर काळा गॉगल घालून आरामखुर्चीत बसल्या होत्या. मी आणि अप्पा पिशव्या घेऊन व्हरांड्यात पोचलो तसं ऋषीन् ही आला. अप्पांनी माईना बघितलं आणि हसायला लागले. आता कानडी माणसांचं हसणं स्मितहास्य या प्रकारात मोडत नाही. ऋषिन् ला पण स्माईल प्लीज म्हणावं लागत नाही. गडगडाटी हास्य. हास्य क्लब वगैरेला न जाता. अप्पा एकदा म्हणाले होते की मेधुमेही व्यक्तीने जेवण झाल्यावर कॉमेडी शो बघितला तर ब्लड शुगर नियंत्रणात राहते. दिलखुलास हसायला पाहिजे. तसाच गडगडाट करत, " ओ हो...:-D:-D:-D:-Dडॉन राधाबाई..." अप्पा बोलले, " माफिया बॉस डॉन कार्लीऑन दिसतेस बघ अगदी...!:-D:-D:-Dअजून एक गडगडाट..! " मार्लन ब्रांडो सारखी..हा s हा s हा. ":-D:-D:-D", माईही स्वतःच्या गडगडाटी स्टाईलने हसण्यात सामील झाल्या.
ऋषिन् ला हसू आवरत नव्हते. मी पण कानडी हसणं शिकले होते, पण भाज्यांच्या पिशव्या आत नेता नेता मी हसायला लागले आणि माझ्या खिदळण्याने टोमॅटो भरलेली पिशवी हातातून निसटली आणि सगळे टोमॅटो फरशीवर गडगडले आणि सैरावैरा धावू लागले. माईना पिशवीतून डोकावून बघताना टोमॅटो पण खिदळायला लागले होते बहुतेक.
अप्पा आणि ऋषीन् चा हसण्याचा आवाज हॉलमध्ये घुमत राहिला.
मी टोमॅटो गोळा करायला सुरुवात केली तसं ऋषिन् आणि अप्पाही मदत करायला लागले. मी ते मोठ्या पातेल्यात भरून बेसिनच्या नळाखाली ठेवलं.
"टिंग..." ऋषिन् च्या हातातला मोबाईलचा मेसेज. त्यानं मेसेज वाचला आणि खदखदून हसत माझ्या हातात दिला. इराचा व्हॉट्सऍप मेसेज होता. माईंचा वरांड्यात बसलेल्या फोटोखाली तिनं कॉमेंट टाकली होती, "डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है..:-D:-D:-D.!
.....
ह्या ह्या ह्या!!...ही ही.. हो
ह्या ह्या ह्या!!...ही ही.. हो हो हो....
छे बाई.. लिखाणातून व्यक्त होणं जमतचं नाही मला... म्हणून मी वाचकच बरी...
पण सासूच्या डोक्याचे जे काही होतंय मनात, ते वाचून मला गुदगुल्या च झाल्या... खिक्.. भारी...
सदाशिवनगरातली घरं छान वाटतात
सदाशिवनगरातली घरं छान वाटतात बघायला! शांत, निवांत, भारदस्त.
मस्त मस्त..लेख आवडला.. मला
मस्त मस्त..लेख आवडला.. मला माझ्या सासूची फार आठवण आली.. फरक एवढाच कि तेला ऐवजी डाय देऊन ती मला तीचे तोंड साॅरी डोकं काळ करायची परवानगी देते
एविता, वाचते तुमचे लिखाण
एविता, वाचते तुमचे लिखाण नेहमीच पण प्रतिसाद आज पहिल्यान्दा देते आहे. मस्त असत तुमचे लिखाण! खूप हसते आणि enjoy करते. पुलेशु! असेच लिहित रहा!
भारी आहे हे डॉन प्रकरण
भारी आहे हे डॉन प्रकरण
छान एविता, मजा आली .
छान एविता, मजा आली
.
अशीच आनंदात रहा.
कसली क्युट फ्यामीली आहे एकदम.
कसली क्युट फ्यामीली आहे एकदम. मस्तच
खूप भारी लिहल आहेस. खूप हसले
खूप भारी लिहल आहेस. खूप हसले
सोपं, साधं, घरगुती, प्रेमळ,
सोपं, साधं, घरगुती, प्रेमळ, किंचित्चावट, जुन्याची सय आणून देणारं पण आधुनिकही.....
आवडलंच...
मस्त मस्त...
मस्त मस्त...
शिकेकाईचा नावाचा उगम माहीत नव्हता. भारी आहे एकदम.
एवि भारीच आहेस तू. मस्त
एवि
भारीच आहेस तू. मस्त लिहीतेस नेहेमीप्रमाणेच.
आणि काय गं तुझ्या मनातले विचार तुझ्या माई ने वाचले तर?
गंमत गं, लिहीत रहा लिहीत रहा
आज पण रविवार , तुमचा तेलमालिशचा कार्यक्रम डोळ्यासमोर आला
निरू. +१११
निरू. +१११
सेम. मस्त घरगुती निवांत. गंगाधर गाडगीळ यांच्या कथांत असं वातावरण सापडत असे. हसत खेळत चिमटे चापट्या गालगुच्चे युक्त.
आडाडता आयुष्य? ( मला कन्नड येत नाही)
त्या शेंडीला म्हणतात शीखअंड.
त्या शेंडीला म्हणतात शीखअंड. शीख प्लस अंड पासून शिखंड. ज्या शेंडीला चाणक्य गाठ मारणार होता त्याला म्हणायचं शिखंडिका. डोक्यावर म्हणजे शिखावर असलेली केसांची गाठ. संस्कृत मध्ये चूडा, आणि चूडाकरण म्हणजे मुंडण. शिखा, शिखु, शिखरम्, शिखरिणी ही सगळी शिखापासून तयार झालेले शब्द आहेत. कळलं?"
"इशान तर शेंडीला अँटेना म्हणायचा.."
"हो का? आता तो अँटेना असता ना.. तर मी माझ्याकडे वळवला असता. शंकराला डोक्यावर जटा आहे म्हणून तो शेखर आणि तिथून गंगा वाहते म्हणून ती शिखरिणी.
>> Aa usual, मस्त गोष्ट पण हा पॅरा विशेषच आवडला
हाहाहा...., भारिये डॉन प्रकरण
हाहाहा.... भारिये हे डॉन प्रकरण
मस्त ! काय गोड लिहीलंय
मस्त ! काय गोड लिहीलंय
मस्त आहे हे
मस्त आहे हे
मस्तच आहे हे तर. आणि
मस्तच आहे हे तर. आणि सद्यस्थितीत मायबोलीच्या सर्व लिखाणात तुमचे लेख म्हणजे मायबोलीचे एकाधिकार शाही डॉनच आहेत.
नेहमीप्रमाणे गोगोड!
नेहमीप्रमाणे गोगोड!
मस्त लिहीतेस तू .. एकदम
मस्त लिहीतेस तू .. एकदम खुसखुशीत..
नेहमीप्रमाणेच खूप छान.. गोड
नेहमीप्रमाणेच खूप छान.. गोड गोड
खूप छान लिहीत राहा
खूप छान
लिहीत राहा
नेहमीप्रमाणे खूप मस्त लिहिलंय
नेहमीप्रमाणे खूप मस्त लिहिलंय....
पण सासूबद्दल मनात येणारे विचार वाचून खूप हसू आलं,,, असे विचार जाहीर करण्याच्या हिंमतीला मनापासून दाद...
@ नंबर १ वाचक तुला एवढं हसू
@ नंबर १ वाचक तुला एवढं हसू आलं ते वाचून मलाही हसू आलं! असो. आभारी आहे.
@ वावे. हो. इथली घरं जुन्या धाटणीची आहेत आणि शांत वातावरण आहे.
@ म्हाळसा, :-D:-D:-D डोकच काळं कर बाई!!!
@ peacelily.हसतेस आणि एन्जॉय करतेस ते वाचून बरं वाटलं. थॅन्क्स!
@ नियती, आभारी आहे डॉन प्रकरण वाचल्या बद्दल!
@ मी अस्मिता, आभारी आहे गं!
@ अभ्या. Thank you so much..
@ प्रि तम. हसायलाच पाहिजे!
@ निरू, Thank you so much.
@ साधना, नवी माहिती मिळाली ना..?!
@ धनुडी, अगं माईनी वाचलं आणि माझे केस धरून ओढले की! अगं गंमत! माई माबो वर नाहीत त्यामुळे त्या कुठून वाचणार?..! थॅन्क्स एनी वे!
@ हीरा, होय बरोबर आहे आडाडता आयुष्या!
@ शब्दसखी, thank you.
@मीनाक्षी कुलकर्णी, आभारी आहे डॉन प्रकरण वाचल्या बद्दल!
@ऋन्मे ss ष Thank you so much.
@ जाई, Thank you so much.
@ अनंतनी, Thank you so much.
@ मंजुताई, Thank you so much.
@ अनघा, Thank you so much.
@ मनिम्याऊ, Thank you so much.
@किल्ली, Thank you so much.
@माऊ मैय्या, Thank you so much.
एवि खुप छान लिहितेस ....एकदम
एवि खुप छान लिहितेस ....एकदम खुसखुशित