"अरे या क्रीमला तर वास येतोय शिवाय डबा पण फुगल्यासारखा वाटतोय , एक्सापयरी अजून झाली नाही तरीही, ही उष्णता+आर्द्रता ह्याने असंच होत रहाणार काही महिने......."
खरं तर वरील संवादाला अवतरण चिन्हे द्यायची काहीच गरज नव्हती कारण ते मनात म्हंटलं होतं , पण तुम्ही लक्ष देऊन वाचावं म्हणून केलेली आयडिया का काय आहे .
भाचीला युट्यूबवर स्ट्रीटफुड विडिओ बघून पेढे खावे वाटले मगं काय मला फार कौतुक आहे तिचे ..आणले लगेच क्रीम आणि मिल्क पावडर , मी नेहमी याचीच आधी कढी करून त्याला आटवत ,आटवत, आटवत खवा करते.
ही युक्ती मला निरंजनच्या मराठी (शिकवणाऱ्या) आजी यांनी दिली तेव्हापासून आम्ही कित्येक मथुरेसदृश पेढे, खव्याचे मोदक गट्टम केले तेवढी त्यानी मराठी पुस्तकं सुद्धा वाचली नसतील.
पणं आमचे काळ काम वेग +स्वयंपाक याचे गुणोत्तर काहीही असू शकते. सगळ्या बाबतीत छोटे छोटे व्यवस्थित नियोजन करणारी मी रोजच्या स्वयंपाकाच्या बाबतीत मात्र spontaneous वगैरे आहे. ऊरक फारसा नाही तरी आत्मविश्वास दुर्दम्य आहे.
रिबेल खवय्ये असल्याने क्रीम आणून ठेवल्यावर भाची सकट आम्हाला खमंग, चमचमीत खायचे डोहाळे लागले. घरातला किराणा हा डोहाळ्याच्या विरूद्धार्थी शब्द झालाय सद्ध्या !! ते बिचारे निमूटपणे फ्रीजच्या शेल्फवर वाट बघत होते. मध्ये एकदा मला त्याची दया आली अगदीच नाही असं नाही आणि म्हणून मटर पनीरमध्ये दोन चमचे घातले होते.
शेवटी भाची परत गेली... जाताना गहिवरल्या आवाजात म्हणाले तिला पुढच्या वेळेपासून महिनाभर आधी सांग आणि जमले तर सहा महिने रहायला ये म्हणजे मला सगळे पदार्थ तुला खाऊ घालता येतील. तिनं सारवासारव केली 'एवढे काय.. वजन वाढलयं इथं आल्यापासून वगैरे म्हणून' !! सहा महिने रहाणे अशक्य आहे माहिती आहे पण आमचे गुणोत्तर साधारण तेच भरेल त्याला काय करणार.
कालनिर्णयचे पान वेळीच न उलटल्याने मला राखी पौर्णिमा नक्की कधी आहे हेच माहिती नव्हते , कायप्पा वर शुभेच्छा आल्या भारतातल्या मगं मला क्लिक झाले. तरी मायबोलीवरील 'नारळीभात' ही सुरेख रेसिपी बघूनही मी दूर्लक्ष करून शब्दकोडी खेळत बसले. माझी स्वयंपाकाची शून्य तयारी असताना त्या धाग्यावर करंजीवर मारे चर्चा सुद्धा केली. निगरगट्ट का काय झाले आहे मी !!
भारतातून चार वर्षाच्या भाचीने फोन केला व तिनं मिळालेली खेळपाणीची ओवाळणी दाखवली , तिचा खोटाखोटा पिझ्झा खाल्ला (मला खोटा पिझ्झा विडिओ call मधूनही खाता येतो ) तिने ताई दादा उठले का /तुम्ही ओवाळले का असे सांस्कृतिक प्रश्न विचारले मगं मला वाटले पाणी गळ्यापर्यंत आलं आता. दोन तीन दिवसापूर्वी आणलेली रसमलाई ठेवली असती तर.. पण रात्री दहाला can फोडून आम्ही प्रत्येकी दोन-दोन खाल्ल्याने दोनच उरल्या होत्या.
पौर्णिमा आहे असं कसं काही तरी करावं असं माझ्या मनातली माझी आई म्हणाली. खरीखुरी आई आणि मी दोघीही खोटा पिझ्झा खाण्याच्या गडबडीत असल्याने तिने फोनवर माझ्या 'तयारी' बद्दल विचारले नाही. असंही तिनं माझा नाद सोडलाय बहुतेक !! अधूनमधून मुलं रोडावलीत गं म्हणून सुस्कारे टाकते झालं..मगं मी हिरिरीने मुलांची वजनं / उंची / BMI सांगते ...ती अजून दोन मुलांचे दोन असे सुस्कारे टाकते.
मी चारचौघांसारखी नसल्याने वेळ कमी असताना मला प्रयोग करावा वाटला. किंचीत/ बराच वास असलेले क्रीम उकळायला घेतले मगं त्याला फाडून कलाकंद करावा म्हणून अर्धी वाटी व्हाइट विनेगर घातले . कसचं काय फाटेचना. नासण्याच्या मार्गावर असूनही न फाटण्याच्या या क्रीमच्या हट्टीपणाला काय म्हणावे कळतं नव्हते. नवरा मगं फूड फूडच्या टिप्स द्यायला लागला, त्याला फारच प्रो वाटायला लागलेयं आजकाल.. पण वाद घालायचा नव्हता मला... सगळे लक्ष क्रीमकडे होते. तरी एक वाक्य फेकलेच 'वाया गेले तर गेले, नाही तर काही तरी चांगले होईल, रसगुल्ल्याचा शोध असाच लागला होता म्हणे'....असे म्हणत ढवळत राहिले. मगं आटावे म्हणून अर्धी वाटी मिल्क पावडर घातली. फाटण्याची आशा सोडली होती या स्टेजला फक्त त्याची बदललेली चव + व्हाइट विनेगर याने आंबट तूरट होईल (किंवा सहा चवीपैकी काही तरी) का असं वाटंत होतं...शेवटी तर यात आता साखर घालून सगळं वाया जाण्यापेक्षा नवऱ्याला चव घ्यायला बोलवले बाकी कुणाची हिंमत होणार !! एरवी त्याचे आणि मुलाचे सेन्सेस कसे रिफाईन्ड नाहीत हे मी पटवून देते. पण अशा संकटात तेच धावून येतात , अनरिफाइन्ड सेन्सेस चा मोठाच फायदा आहे हा !!
खाण्याच्या बाबतीत तो माझ्या पहिल्या हाकेला धावून येतो त्याप्रमाणे येऊन त्याने चांगले म्हणाल्यावर तर माझा आश्चर्य वाटून विश्वास बसला नाही. मगं साखर घातली पुन्हा आटवले, थोडे corn starch घातले (तसं हाताबाहेर/ वहावत गेलं होतं प्रकरण) अर्धी लढाई जिंकली होतीच, एकीकडे पोळ्या करत बारीक आच करून ढवळत राहिले. बरेच आटल्यावर ट्रेमध्ये ओतून ठेवले तर त्याची कंसिस्टन्सी काही बरोबर वाटली नाही ट्रे जिकडे हलवला तिकडे जायला लागले... मगं पुन्हा फ्रिजमध्ये , आणि थोड्या वेळाने तर फ्रिझरमध्ये!! बऱ्याच गोष्टी फ्रिजमध्ये ठेवून गुरुत्वाकर्षणावर तात्पुरती मात दिली आहे मी. हा 'तात्पुरता' वेळ गोडघाशांच्या घरी काही सेंकद ते काही मिनिटं असतो !! त्यामुळे सहज मात देता येते. या स्टेजला मला आत्मविश्वास आल्याने बदामाच्या कापांची इनवेस्टमेंट केली.
जेव्हा माझ्या हातात नसलेली कला मला छळते तेव्हा मी आईचं कसं दिसायचं + विज्ञान + common sense यांचा आधार घेते. आता चव चांगली असल्याने माझी वाटीत घालून खायला देण्याची तयारीही होती. खव्याचा शिरा तर शिरा..
पण जमली एकदाची ... स्वतःच्या आळशीपणाच्या आणि प्रयोगाच्या हुक्कीला मी निगूतीने केलेली बर्फी म्हणणार आहे. मलाही घटकाभर 'निगूतीने संसार' करणारी बाई मिरवताना मजा आली. नवऱ्याला माझ्या निगूती- प्रुफपेक्षा खाण्यात इंटरेस्ट होता मगं त्याने हो ला हो (सत्यनारायणाच्या पूजेसाठी हाताला हात लावतात तसे ) लावले. मुलाने खाऊन "छान आहे आई , It tastes like orange पेढा " हा अभिप्राय दिला त्याने ओरेंज पेढा कधीच खाल्ला नाहीये (बहुतेक ) . मुलीला सगळी प्रक्रियाच संशयास्पद वाटल्याने तिने खाल्ली नाही अजून. नवऱ्याला खूप आवडली. मीही कणभर खाल्ली, बरी आहे .
तर ही निगूतीच्या बर्फीची कहाणी सुफळ (शब्दशः) संपूर्ण.
*
*
*
*
Assorted shapes and sizes of निगूती बर्फी !

******
धन्यवाद
!
-अस्मिता
भारीच की
भारीच की
एक नंबर product झालंय
बर्फी खूप छान दिसतीय. लेखही
बर्फी खूप छान दिसतीय. लेखही खुसखुशीत. मुंबई हलवा म्हणतात तो कसकाय वर बरेच वेळा आला होता , सोपाही वाटला म्हणून केला पण सेट केल्यावर नुसतच देखणं रुपडं झालं, उचलताना चिकटत होता आणि चवही खास नव्हती. आता वाटतय बहुतेक निगुती ने केला नाही .
छान! खरं तर सीता और गीता
छान! खरं तर सीता और गीता बर्फी नाव द्यायला हवं होतं. सकाळी दोन धागे दिसत होते. दोन्हीवर प्रतिसाद होते.
(चहा प्यायलावर मात्र आता एकच धागा दिसतोय.)
छे, ग्रुपमध्ये नवीन मध्ये मला
छे, ग्रुपमध्ये नवीन मध्ये मला दोन धागे दिसत आहेत.
(हम है राही प्यार के मधला मिश्राजी झाला काय माझा.... हम झूठा नही हूं... आय वील शो यू फोर...)
एक लिटरचा अमूल क्रिमचा डबा
एक लिटरचा अमूल क्रिमचा डबा आणला होता तो मी सगळा घरच्या प्लॅस्टिकच्या डब्यात रिकामा केला आणि फ्रिझरमध्ये ठेवला. काही दिवसांनी बघितले तर क्रीम बदलून क्रीमयुक्त पाणी राहिले होते. ते सगळे बराच वेळ आटवून जे काही राहिले तो गोड पदार्थ चवीला छान होता. ही रेसीपी आधी समजली असती तर मीही अशी बर्फी करून बघितली असती. अमूल क्रीम फ्रिजबाहेर आणि आतमध्ये लगेच खराब होतं. त्याचं गणित काही समजत नाही.
त्यांनी दोन ग्रुप निवडलेत.
त्यांनी दोन ग्रुप निवडलेत. माझ्यासाठी नवीनमध्ये आपण निवडलेल्या ग्रुपमधले लेखन दिसते.
मायबोलीवर नवीन मध्ये एकदाच दिसेल.
मस्त लेखन. मुलीने खाल्ली का
मस्त लेखन. मुलीने खाल्ली का बर्फी?
हाहा मस्त लिहिलंय. आमच्या घरी
हाहा मस्त लिहिलंय. आमच्या घरी गोड कोणी खात नसल्यामुळे माझे असे प्रयोग होतच नाहीत. बर्फी खरंच छान दिसतेय पण.
एकूणच-
खाणारं कोणी असेल तर निगुतीने बर्फी करण्याला अर्थ आहे, आयएफ-दीक्षित वाल्यांच्या घरी सगळंच गोडधोड व्यर्थ आहे.
छान लिहिलंय! आणि फोटोतली
छान लिहिलंय! आणि फोटोतली बर्फी पण छान दिसतेय!
मजा आली वाचायला. सुरेख दिसत
प्रयोग मात्र करणार नाही. क्रीम वगैरे अगदी किंचित वास असेल तरी वापरायला जमत नाही.
बर्फीचा मेन इंगरेडियंट निगुती
बर्फीचा मेन इंगरेडियंट निगुती कुठे मिळतो? अमेरिकेत मिळेल का??
च्रप्स... क्रीम दोन तास बाहेर
च्रप्स... क्रीम दोन तास उन्हात बाहेर ठेवा निगुती तयार होईल
! निगुती from scratch .
धन्यवाद srd कला नसल्याने
धन्यवाद srd कला नसल्याने अक्कल वापरली अक्कलाकंद
!
!
धन्यवाद सायो
धनुडी :hugs:
धन्यवाद किल्ली
धन्यवाद किल्ली
! आणि हो मलाही आवडेल तुम्हाला भेटायला
.
धन्यवाद वर्णिता...माझीही थोडी तुपकट झाली आहे , मुलीच्या भाषेत तूपी
सीमंतीनी धन्यवाद.
मी स्वतः दोन ग्रुपमध्ये टाकले आणि मलाही कळेना का दोन धागे दिसताहेत. मगं मीही सीता गीता ला घेऊन धर्मेंद्रकडे (वेमा) गेले . एक डिलीट करा म्हणून. मगं मीच एक डिलीट केला तर दुसराही झाला (I know...Right ) पुन्हा फोटो टाकले लेख पेस्ट केला. पुन्हा वेमाला माझ्या विनंती कडे दुर्लक्ष करा असा आणखी एक विपु केला !!
चंपा
चंपा
माझे डायट पोर्शन कंट्रोल आहे पण सध्या बिघडले आहे. But I do have a sweet tooth.
माझ्या ही क्रीम वर एक्सापयरी डेट 27 August आहे. हे फारच आधी खराब होते. Better to keep it in the freezer until ready to use दुसरे काय !!
धन्यवाद भरत.
धन्यवाद कमला, खाल्ली तिने ...दादाला ओवाळून मगं मीच भरवली. पण फार आवडली नाही तिला.
धन्यवाद सनव.
धन्यवाद जिज्ञासा.
धन्यवाद सीमा. सध्या फार वारंवार खराब होतंय , काय करणार !!
फार भारी लेख आहे आणी बर्फी पण
फार भारी लेख आहे आणी बर्फी पण झक्कास.
लेख वाचून झाल्यावर त्या वड्या पडलेल्या बघून जीव गार झाला कारण ट्रे मधे तर थलथलीत मिश्रण वाटले (नुकताच माझा नारळाच्या वडीचा एक्सपिरिअन्स घेऊन झालाय, युक्ती धाग्यावर विचारले ही होते बिघडलं सगळं प्रकरण तर काय करावं)
प्रतिसाद पण भन्नाट. मेधावी
ते पेढे प्रकरण माझे पहिल्यांदा फसले होते त्याची आठवण झाली. डब्यात ठेवलेले तर दगडांसारखे खडखड वाजत होते .
सिझलर्स असतं तसं शेकर्स पेढे
सिझलर्स असतं तसं शेकर्स पेढे म्हणून द्यायचे हाय काय नि काय .... खाताना बत्ता पण द्यायचा सोबत. सुपारी वाईट तरी कुटून कुटून खातात, मग पेढे तर दूधा-तूपाचे ....

हो अगदी अगदी वडी बघून माझा पण जीव भांड्यात पडला. नाहीतर तोवर वाढता वसा होणार असंच वाटत होतं.
धन्यवाद अंजली आणि सीमंतिनी ,
धन्यवाद अंजली आणि सीमंतिनी ,
.
...एकदा पास्ता जळून चीज चिकटून कढई शहीद झाली आहे... हे फेसबुकमध्ये तोंड घालून बसण्याने झाले
!
पेढे
एकदा माझा पिझ्झा बेस 'फ्रिस्बी' झाला होता आणि केकच्या 'पोटात खड्डा' पडून 'विहीर' झाली होती . एकदा जवळच्या नातलगांनी मैसूर पाक दिला होता तो आम्हाला खलबत्त्यात कुटून खावा लागला होता. काकू देताना म्हणाल्या ' थोडा पक्का झालायं पाक ' ....एकदा शंकरपाळे मुलाला खायला दिले 'तो म्हणाला लाळेत भिजवून मऊ करून मगं चावायला सोपे जातात
कारण ट्रे मधे तर थलथलीत
कारण ट्रे मधे तर थलथलीत मिश्रण वाटले~~~~
!
फ्रिझगं फ्रिझ दुसरे काय , बाहेर काय बिशाद आहे त्यांची !!
पेन्ग्विन किंवा पोलर बेअर सारखे त्या थंड तापमानातच जिवंत राहू शकतात
मांड्याचा कोंडा धागा काढावा
मांड्याचा कोंडा धागा काढावा का !!
एकदा जवळच्या नातलगांनी मैसूर
एकदा जवळच्या नातलगांनी मैसूर पाक दिला होता तो आम्हाला खलबत्त्यात कुटून खावा लागला होता. >> वेळीच लांबचे नातलग करा बरं त्यांना, नाहीतर कवळी लागायची.

मांड्याचा कोंडा धागा काढावा का !! Proud >> _/\_
>>>>नासण्याच्या मार्गावर
>>>>नासण्याच्या मार्गावर असूनही न फाटण्याच्या या क्रीमच्या हट्टीपणाला काय म्हणावे कळतं नव्हते. >>>> हाहाहा!!
>>>त्याने ओरेंज पेढा कधीच खाल्ला नाहीये (बहुतेक )>>>>
छान खुसखुशीत झालाय लेख. बर्फी तर मस्तच दिसते आहे.
धन्यवाद सामो सीमंतिनी .
धन्यवाद सामो
.
सीमंतिनी
निगुतीची बर्फी वाचून,
निगुतीची बर्फी वाचून, फ्रीजमध्ये पडीक फ्रेश क्रीमचा डबा सारखा समोर येत होता. शेवटी काल हिम्मत करून एक्सपायरी डेट पाहिली आणि आता थोडेच दिवस हातात आहेत , हे समजलं. तुनळीवर शोधाशोध केल्यावर बऱ्याचशा पेढ्यांच्याच पाककृती दिसल्या. मग फार विचार न करता, संकष्टीच्या दिवशी 'निगुतीचे पेढे' करावे असं ठरवलं.
संध्याकाळी क्रीम आटवायला घेतलं. कोणाची पाककृती करावी, हे काही नक्की ठरवलं नसल्यामुळे अंदाजाने दूध पावडर टाकली. खास चव म्हणून केशर भिजवलेले दूध पण घेतलं थोडं. तुनळीवर साधारण दहा मिनिटात आटलेली क्रीम, प्रत्यक्षात अर्धा ते पाऊण तासाने आटलेली दिसली. ( एवढ्या वेळात लेकीने संधी साधून विविध वाट्या चमचे आणि तिची खेळणी याचा एकत्रित पसारा माझ्या मागे करुन ठेवला. ती आणि तिच्यावर वैतागलेल्या सासूबाई यांच्याकडे मी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं. कारण मी क्षणभरही न थांबता क्रीम हलवत होते. )
शेवटी भांड्याला न चिकटणारा घट्ट गोळा तयार झाल्यावर तो थोडा थंड होऊ दिला. आता यात पिठीसाखर मिसळून गोळा मळून पेढे तयार करायचे होते. पण थोडी पिठीसाखर टाकून त्या माव्यात हात टाकला तर, तो सोडेचना हात. सगळं प्रकरण चिकट झालेलं. थोडी साखर वाढवून बघितलं, पण छे... वाटलं, आता माकाचु मध्ये सल्ला विचारावा. पण इथली यशस्वी पाककृती आठवून, अस्मितासारखाच, फ्रीजचा आधार घेतला.
रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्याने एकदम कडक झालेला तो गोळा, थोडासा मैदा ( नाहीतरी बाजारातल्या खव्यात मैद्याची भेसळ असतेच, असा स्वतःला दिलासा दिला मनातल्या मनात
), लागेल तशी दूध पावडर आणि पिठीसाखर मिसळून कमीत कमी चिकट केला. आणि अजून बिघडायच्या आत पटापट पेढे करून घेतले.
सासऱ्यांना खायला दिल्यावर त्यांना आवडला. मावा आणला होतास का , असं विचारल्यावर चवीची खात्री पटली. मगच बदामाचे काप लावून सजावट केली. अशा प्रकारे, 'खटाटोपाचे पेढे' तयार झाले. नवरोबाने तर गणपतीसाठी घरीच कर पेढे असं सांगितलंय.
आता पुन्हा एवढे उद्योग करण्यापेक्षा, रीतसर पाककृती पाहून योग्य मापाने करून बघेन. बिघडलंच तर दुरुस्त करण्यचा आत्मविश्वास दिलाय, ' निगुतीच्या बर्फीने'.
अरे वा , माऊमैया खूपच छान
अरे वा , माऊमैया खूपच छान खटाटोपीचे पेढे, जमल्यास फोटो टाका.
!
. Because you found your निगूती self
.
अस्मितासारखाच, फ्रीजचा आधार घेतला.
नाहीतरी बाजारातल्या खव्यात मैद्याची भेसळ असतेच..।असतेच की त्यापेक्षा हा कितीतरी पवित्र
सासऱ्यांना खायला दिल्यावर त्यांना आवडला. मावा आणला होतास का , असं विचारल्यावर चवीची खात्री पटली. मगच बदामाचे काप लावून सजावट केली. अशा प्रकारे, 'खटाटोपाचे पेढे' तयार झाले. नवरोबाने तर गणपतीसाठी घरीच कर पेढे असं सांगितलंय~~~जिंकलंच की , अभिनंदन. Now treat yourself with a खटाटोपी पेढा
*****
माझा व तुमचा अनुभव बघून आई म्हणायची ते वाक्य आठवतंय 'दूधातूपाच काही वाया जात नाही ' !
प्रतिसाद खूपच आवडला.
इजा झाला, बिजा झाला, आता तिजा
इजा झाला, बिजा झाला, आता तिजा नक्कीच येऊ द्या.
बाप्पा येतोय, "स्फुर्ती दायी मावा मोदक" बाप्पाला नैवेद्य दाखवा.
{घरी असे मावा मोदक करा असे पटवायची माझी हिंमत नाही. तशीही मी घरी बसून खावखाव करतो [हे पोटातल्या कावळ्यांच्या कावकाव च्या सुरात वाचावे, ते कावळे बिचारे (पोट)वाढीला लागले आहेत तर मी काय करणार बापडा ] .
पावसामुळे बाहेर न पडता आल्याने लेक + लेकीची माय + मायची सासू ही त्रिमुर्ती वैतागली आहे, आयते मागच्या बागेत पावसामुळे तळे साचलेय, गणपती आधीच माझे विसर्जन करतील.}
जमल्यास फोटो टाका.>≥>>>> तेच
जमल्यास फोटो टाका.>≥>>>> तेच जमत नाही ना... फोटो साईझ जास्त आहे बहुतेक. प्रयत्न करून बघेन.
घरी असे मावा मोदक करा असे पटवायची माझी हिंमत नाही>>> पाफा, तुम्ही स्वहस्ते मोदक बनवण्याची हिंमत करून पहा मग. मदतीला हा धागा आहेच.
माऊमैया इमेज कॉम्प्रेसर
माऊमैया इमेज कॉम्प्रेसर वापरून बघं.
पाफा
तुम्हीच करून बघा त्यांनाही आवडेल / धक्का बसेल.
क्रीम नासले नसेल तर खूपच सोपे आहे .
जमल्यास फोटो टाका.>≥>>>> तेच
जमल्यास फोटो टाका.>≥>>>> तेच जमत नाही ना... फोटो साईझ जास्त आहे बहुतेक. प्रयत्न करून बघेन.
घरी असे मावा मोदक करा असे पटवायची माझी हिंमत नाही>>> पाफा, तुम्ही स्वहस्ते मोदक बनवण्याची हिंमत करून पहा मग. मदतीला हा धागा आहेच.
नवीन Submitted by माऊमैया on 9 August, 2020 - 01:52
>>>>>>>
फोटो अगोदर व्हॉट्सॅप करा, मग फोन गॅलरीतून इथे अपलोड करा. सगळे प्रॉब्लेम सोल्व्ह होतील.
वातावरण गरम आहे, खायला मागायला तोंड उघडायची भिती वाटते. किचन मधे जायला परवानगी लागते अन तुम्ही असे वेडे धाडस करायला लावता?
ते न्युज चॅनेल वाले सुशांतची बातमी सोडून माझ्या घरचे महाभारत कव्हर करायला धावतील.
पाफा
पाफा
.
त्रिमूर्तींना (घरातल्या ) या नैवेद्याने प्रसन्न करा व तुमची व्रत कहाणी येऊ द्या
किंवा वातावरण थंड होण्याची वाट बघा व जे मिळतयं त्याला छान छान म्हणतं रहा त्रिमूर्ती प्रसन्न होईल.
Pages