नाही

Submitted by रोहितकुलकर्णी on 31 July, 2020 - 12:37

जे बोलत आहेस ती ज्ञानाची देवघेव नाही
तू चांगदेव नाही अन मी ही ज्ञानदेव नाही

ह्या जगात सगळ्यांना नशिबाने छळलेले आहे
प्राक्तनास तळतळ देणारा तू एकमेव नाही

चक्रवाढ व्याजाने नेले जे होते तू दुःखा
मज जातमुचलका देण्याला कसलीच ठेव नाही

उदासीनसे रक्त धावते नाडी लागत नाही
कुठलाच जोश नाही मजला कुठलाच चेव नाही

अस्सल नाटक झोपेच्या सोंगाचे वठले आहे
बेशुद्धपणाइतकी जालीम कुठलीच टेव* नाही

(टेव - लत, व्यसनासारखी सवय. मूळ शब्द हिंदी असल्याने ही सूट घेता येते का हे जाणकारांनी सांगण्याची विनंती)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults