इक मंज़िल राही दो..

Submitted by एविता on 26 July, 2020 - 04:35

नेहमीच्या पिझ्झा आउटलेटला थांबव." आम्ही मंड्या या गावात प्रवेश केला तसं मी त्याला सांगितलं. म्हैसूर आता फक्त एकच तास.

"तुझी ही जंक फूड खाण्याची सवय बंद कर." तो गाडी लाल सिग्नलला थांबवत म्हणाला, "दर वीकएंडला इथे येताना तुझा पिझ्झा ठरलेलाच. एक वर्ष झालं आता लग्न होऊन. महिन्यात चार पिझ्झा. अठ्ठेचाळीस टू मच..." तो कपाळावर आठ्या चढवत बोलला.

"हे... हे... पावसाळ्यात आपण आलो नव्हतो आठ वेळा. आणि हे चाळीस पिझ्झा आपण दोघांनी मिळून खाल्लंय. आणि यू एस मध्ये तर दर सेकंदाला पाचशे स्लाइस खातात. दीडशे एकर दिवसाला."

"आपण यू एस मध्ये नाही."

"सिलिकॉन व्हॅली मध्ये आहोत आपण. बेंगलोर इंडियाचं सिलिकॉन व्हॅली आहे ना...?"

"पिझ्झा इज अँन् अमेरिकन ओबसेशन. तू नको खाऊ. मी तुला पहिल्यांदा क्रॉसवर्ड मध्ये भेटलो त्यावेळी कशी चवळीची शेंग होतीस, साडी नेसल्यावर फक्त साडीच दिसायची, आणि आता....?" तो कपाळावर आठ्या आणत म्हणाला.

"आता ऍपल म्हणायचं आहे का तुला डिअर...? अँन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे... हाहाहा... आणि तू आयफोन कुठला वापरतोस? सांग की....!"

"मला तुला ऍपल म्हणायचं नव्हतं." सिग्नल हिरवा झाला तसं त्याने गियर बदलला आणि गाडीला वेग देत म्हणाला. " क अक्षरावरून आहे.. ओळख.."

"थांब. लेट मी गेस्.....काकडी?कोवळी की जून? काकडीची कोशिंबीर... ब्याडगी मिरची घालून फोडणी..!कांदा चिरून घालायचा..आणि दही.. अश्शी मस्त लागते, जरा दाण्याचा कूट... ओह... आताच पाणी सुटलं तोंडाला.....!"

"तू काकडी? छे.. नाही."

"कॉली फ्लॉवर? थॅन्क्स हनी.. शेवटी फ्लॉवर तरी म्हणालास रे... शोना मेरा..."

तो चौथा गियर टाकत म्हणाला," कॉली फ्लॉवर नाही. ओळख."

"कैरी? अरे तू.. अंग शहारून येतेय रे... तिखट,मीठ, एमटीआर मसाला लावलेल्या कैरीच्या फोडी... गुजबम्पस्...."

"कैरी नाही.."

"कॅप्सीकम्? अहाहा.. का रे माझा अंत बघतोस..? पिझ्झा...! आणि तो लार्ज वेगी पिझ्झा वुईथ चीझ... पाइनऍपल.. व्वा.. आज माझ्या तोंडाला पाणी सुटत राहावं असा बेत आहे तुझा की काही काँक्रिट जमवणार आहेस?"

"हेच ते.. पिझ्झा..! कॅप्सीकम् इज राँग."

"केळ? फेडरर आणि नदालची मॅच चालू असते तेंव्हा एक गेम संपला की राफा एक बनाना खातोच. खूप एनर्जेटिक असतो बनाना..."

" नो, नॉट बनाना."

"ओह्.. कांदा?...!अनियन.. वाव...!" मी जरा घुश्यातच उत्तरले, "आजपासून रात्री खाली फरशीवर गादी टाकून झोप. माझ्या शेजारी झोपू नकोस."

"का?"

"अँन अनियन अ डे किप्स एवरीवन अवे.. इंक्लुडिंग हजबंड."

"मी कांदा म्हंटलं पण नाही. ..."

मी काहीच बोलले नाही.

"का गं," तो बोलला, "क वरून फळं, भाज्या संपल्या की काय?"

"आहे की. कोबी म्हणणार आहेस तू मला. हो ना? कोबीचा गड्डा. हो ना..?"

"नाही."

"मग?.. कारलं? हो तेच. आहेच मी कडू. तू धारवाडचा मिश्रा पेढा आहेस ना गोड? असू दे मी आपली कडवट. नंतर मस्का लावत येऊ नकोस, आणि काय रे, तुला असं नाही वाटत की अगदी छोट्या गोष्टीला तू फार महत्त्व देतोयस?"

"ह्याच छोट्या गोष्टी आपल्यात अंतर निर्माण करतायत. गोष्ट फक्त पिझ्झाची नाही. तुला सकाळी वॉक घ्यायला सांगतो तर झोपून राहतेस. दोन दोन चमचे साखर घालून चहा पितेस. जिमला रेगुलर नाहीस. रोज दोरीच्या उड्या मारायला सांगतो तर दोन उडीतलं अंतर अर्धा तास असतं. यू हॅव बीकम लेझी."

" हो का? मी लेझी? आणि तू...? सकाळी तोंड न धुता चहा घेतोस. पांघरूणाच्या घड्या घालत नाहीस. पेपर घेऊन अर्धा तास आत बसतोस आणि ओला करून आणतोस. दाढी करतोस तेंव्हा बेसिनचा नळ चालू ठेवतोस. दाढी झाल्यावर ओ द कोलोन लावत नाहीस. बाथरूममध्ये तुझे कपडे अस्ताव्यस्त पसरलेले असतात. अंघोळ केल्यावर टॉवेल बेडवर टाकतोस. इस्त्री करतोस आणि तसच ठेऊन जातोस. प्लग मधून वायर न काढता. ब्रेकफास्टचे प्लेट्स, चहाचा कप टेबलावर टाकून जातोस. डायनिंग टेबलपासून बेसिन किती लांब आहे? तेवढं उचलून तू ठेवत नाहीस. शर्टाची बटणं, बेल्टची बक्कल, पँटची फ्लाय एका रेषेत असायला हवीत. तुझी नसतात. पँट काळी असेल तर पायमोजे फेंट ब्ल्यू असतात. आणि वायसे वर्सा. पँट आणि सॉक्सचा रंग एकच हवा. ऐकतोस कधी? संध्याकाळी आल्यावर शूज रॅक मध्ये ठेवत नाहीस. सॉक्स लोळत राहतात. टाय, शर्ट, बेल्ट बेडवर फेकतोस. पँट हँगरला लावत नाहीस. त्यातले रुमाल दोंनदोन दिवस तसेच पडून राहतात. बर्म्युडा घालून सोसायटीत फिरतोस. जीन्स घालून फिरत जा असं मी तुला कितींदा सांगितलं." मी क्षणभर थांबले." ह्या नाहीत का छोट्या छोट्या गोष्टी?"

त्यानं गाडी पिझ्झा आउटलेटच्या बाहेर थांबवली आणि इंजिन बंद केलं. गाडीत शांतता पसरली.

" तुम्हा पुरुषांना काय रे... एक्स किंवा वाय क्रोमोसोम स्त्रीच्या गर्भाशयात टाकलं की तुमचा रोल संपला. पुढची सगळी उस्तवार आम्हालाच करायची. हे म्हणजे ९९ वर्षांच्या लिजवर गर्भाशय दिल्यासारखच." मी मुसमुसू लागले.

त्याने माझा हात हातात घेतला. डावा हात पाठीवर ठेवून थोपटू लागला. " सॉरी... स्वीटहार्ट.. सॉरी.. मी उगीच बोललो. सॉरी. चल पिझ्झा खाऊया."

"मला नको पिझ्झा."

"पुळीओगरे?"

"नको."

"बोंडा? भज्जे?"

"नो."

"बिसी ब्याळी?"

नाही

अन्ना सारू?

.....

मसरू अवलक्की?

....

"चित्रान्ना?"

....

"होळगी?"
.....

उप्पिन काई?

अरे, तू पदार्थांची नावं सांगतोयस की मेन्यू कार्ड वाचतोयस? मला काहीच नको."

"सॉरी. चल. काहीतरी खा."

"नाही उतरणार मी गाडीतून."

"बर. इकडे गाडीत आणू का?"

"नको. चल आपण जाऊ आता घरी. तासाभरात पोचतोय आपण. मीच बनवते बिशी ब्याळी गेल्यावर. चल."

त्याने गाडी स्टार्ट केली आणि थोड्याच वेळात गाडीने वेग घेतला.

" तुला ना, वजायना मोनोलॉग्ज कम्पल्सरी वाचायला लावणार आहे मी." मी त्याला तंबी दिली. "त्या शिवाय तुला वुमेन्स साईक कळणारच नाही. बहीण नाही ना तुला. तुम्ही दोघच भाऊ. एकतरी बहीण हवीच भावाला.राखी पौर्णिमा,भाऊबीज सगळंच मिस् करतोयस तू.. प्लस वुमन सायकॉलॉजी."

श्रीरंगपट्टण आल्याचा बोर्ड वाचला. हा बोर्ड वाचला की म्हैसूरचे वेध लागतात. म्हैसूरच्या हेब्बाळ भागात मागच्या वर्षी एक फ्लॅट घेतला होता. सेकंड होम. इन्फोसिसच्या जवळच.

पेट्रोल पंपावर त्याने गाडी थांबवली. "टँक फुल्ल करून घेतो." तो म्हणाला. मी उतरले आणि जरा लांब जाऊन उभी राहिले. पेट्रोल भरल्यावर माझ्याजवळ गाडी उभी केली आणि तो उतरला. मी प्रश्नार्थक चेहरा केला."टँक रिकामा करून येतो." असं म्हणत मला गाडीत बसून रहा असं सांगून तो टॉयलेटच्या दिशेने गेला. मला हसू फुटले.

" तुला जायचय का?" त्यानं गाडीचं दार उघडत विचारलं.

" नको. आलंच की घर आता जवळ."

"का हसतेस?" व्हीलच्या मागे बसत त्याने विचारले.

" ती समोर डॅशबोर्डवरची छोटी लाकडी बाहुली बघ ना कशी ठुमकतेय! नर्गिस नाचते ना चोरी चोरी मध्ये, राज कपूर सोबत. तशी. 'जहां मै जाती हूं वहीं चले आते हो...' हिला बाहुला आणायला हवा एखादा.."

" नक्कीच," तो गाडीला वेग देत म्हणाला, " तिला बघून तो, " सौ साल पहले, मुझे तुम से प्यार था, आज भी है..." असं म्हणणारच.

"माझ्या ९९ वर्षाच्या लिजला सौ साल तुझं उत्तर ना?"

"नो नो नो..! बाहुला बाहुलीचं डेस्टिनेशन एकच ना...! इक मंज़िल राही दो फ़िर प्यार ना कैसे हो....!"

त्यानं माझ्याकडं पाहिलं आणि हसला. मी पण से चीझ म्हंटल्यावर करतात तस केलं. गाडी सोसायटीच्या आवारात शिरून आमच्या टॉवर खाली थांबली. रिव्हर्स घेऊन त्याने पार्क केली आणि मी उतरले, बॅग घेतली आणि आम्ही लिफ्टच्या दिशेने चालू लागलो. अकराव्या मजल्यावर फ्लॅट आहे. लिफ्टच्या बाहेर पडल्यावर डाव्या बाजूचा दुसरा फ्लॅट. दार उघडून आत गेले आणि अगोदर सगळ्या खिडक्या उघडल्या. थंड हवेची झुळूक आत आल्यावर एकदम शांत वाटलं. गाडीत बसून अंग एकदम आंबून गेलं होतं.

"मी अंघोळ करून येतो गं.." तो म्हणाला. " मेन स्विच ऑन करून जा." मी सांगितलं. शनिवारी बेंगळूरुहून इथे येताना ट्रॅफिक टाळण्यासाठी सकाळी साडेसहाला निघायचं म्हणून तो आंघोळ करायचं टाळतो. आता निवांत अर्धा तास करेल.. मी सोफ्यावर आडवी पडले.

"डिंग डोंग," दारावरची बेल वाजली. अरे, अजून घरात आताच पाऊल ठेवतोय तर हे कोण? शेजारची ललिता असावी बहुतेक. मी दार उघडलं. समोर डोमिनोज पिझ्झाचा डिलिवरी बॉय आणि हातात पीझ्झाचा बॉक्स. "One large Cheese Veggie pizza with pineapple madam." मी तो बॉक्स घेतला, सही केली आणि दरवाजा बंद केला.

तो आतल्या खोलीतून कपडे चढवत बाहेर आला. "कोण आलं होतं गं?"

" जणू काही तुला ठाऊकच नाही."

" नाही, खरंच."

" तू पेट्रोल भरल्यावर जे मागवलस ते घेऊन आला होता तो. देऊन गेला."

"काय मागवलं मी?"

"प वरून आहे. ओळख."

तो हसला. " किती सोपं कोडं घालतेस, पिझ्झा. चल खाऊन घेऊ. आणि हो.. मी टॉवेल बेडवर फेकला नाहीये बरं का, बाहेर गॅलरीत वाळत टाकलाय."

"सुधर गया तू बहुत जल्दी," असं म्हणत मी दोन प्लेट्स घेतले, पिझ्झा बॉक्स उघडला आणि स्लाइस वाढले. आम्ही खायला सुरुवात केली.

"क वरून तू मला काय म्हणणार होतास ते मला माहित आहे." मी म्हणाले.

"काय म्हणणार होतो?"

"कलिंगड. हो ना?"

"नाही."

"मग काय? करवंद? उगीच काहीतरी बनवू नकोस मला. आणि हे बघ डिलिवरी नंतर माझं वजन वाढणारच. मी कायम कलिंगडच असेन. आता मी चवळीची शेंग वगैरे बनू शकणार नाही. आणि मला काय मॉडेल बनायचं नाही रॉम्प वर जाऊन. कळलं?"

तो माझ्याजवळ आला, गळ्यात हात टाकले आणि म्हणाला, "उन्हाळ्यात कलिंगड ही प्यास बुझाती है. आणि मला हे कलिंगड बाराही महिने हवंय. ट्वेंटी फोर बाय सेवन." मग त्याने पीझ्झाचा एक मोठा तुकडा ओठात पकडला आणि माझ्या ओठाला लावला.

"मी पण तुला एक नाव ठेवलंय," मी म्हणाले, "ट वरून आहे ओळख."

"टोनी कर्टिस?"

"शहाणाच आहेस. नाही."

"टॉम हँक्स?"

"डबल शहाणा आहेस. नाही."

"टॉम क्रुझ?"

"बाथरूम मध्ये आरसा नव्हता का रे?"

"टायगर वूड्स?"

"गोल्फ कोर्स कधी बघितलंय का तू?"

"टोनी ब्लेअर?"

"कुठल्या अँगलने?"

"हरलो. सांग काय ते."

"टरबूज." मी म्हणाले.

तो जोरात हसला. "खरंच की! कलिंगड आणि टरबूज, मेड फॉर इच अदर," आणि मग आम्हा दोघांनाही हसू आवरेना.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कित्ती मस्त... फार आवडतात तुमचे भाग!!!
मिस झालेलं लिखाण शोधून शोधून वाचते हल्ली Happy

वाह, एकदम भारी.

मी पण लेखिकेचा नाव वाचल की पटकन वाचायला घेतो.

एविता , तुझं नाव दिसलं कि उडी मारून वाचायला येते मी. आणि तू कधीच निराश नाही करत. किती मस्त!>>
धनुडी, अगदी माझ्या मनातलं बोललीस, मस्तच ग एविता

एविता, तू काय ,कविन काय ,तुमच्यामुळे सद्ध्या मायबोलीवर इतकं मस्त मस्त वाचायला मिळतय . कविन( फ्लोरल क्विन Happy )च्या गोष्टीतली हिरो हिरॉइन म्हणून मला तुमचीच जोडी येतेय डोळ्यासमोर. तुझ्या साठी डोळ्यात बदाम. खुप थँक्यू तुलाच.

ओजस તમે નવસારીમાં રહો છો તે જાણીને ખુશ થઈ ગઈ. અમે લોકો સુરત માં રહેતા હતા ત્યારે ઘણીવાર નવસારી આવેલી. એની વે તમારો આભાર.