मराठीवर अजूनही अन्याय होतोच आहे !

Submitted by केअशु on 25 July, 2020 - 05:13

हिंदी भाषेच्या ज्या बोली आहेत त्यामधे खडी बोली सर्वात प्रभावी असल्याने तिचा वापरही सर्वाधिक आहे.विशेषत: दिल्लीसारख्या महानगरात आणि आसपासच्या प्रदेशात.
देवनागरी लिपीत ै या दोन मात्रांचा उच्चार ऐ असा केला जातो.पैलवान , दैव इ.
पण याच दोन मात्रांचा खडी बोलीतला उच्चार मात्र इंग्रजीतल्या ॲ सारखा आहे. यामुळे आपल्याला बँकेच्या नावाच्या पाट्यांवर 'बैंक' असे लिहिलेले दिसते.ते आपणा मराठी लोकांच्या दृष्टीने ब+ऐ+न्+क = बैंक असे असले तरी हिंदी भाषिकांच्या दृष्टीने ते ब+ॲ+न्+क = बँक असेच आहे.

स्मार्टफोनवर मराठी आणि हिंदी या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणार्‍या दैनंदिन वापरातल्या दोन भाषांपैकी हिंदी ही मराठीपेक्षा तुलनेने अधिक वापरली जाते.साहजिकच जी भाषा जास्त वापरली जाईल तिच्याकडे अधिक लक्ष हे कळफलक निर्मात्यांकडून दिले जाणार आणि तसेच घडले देखील.

गुगलपोषित इंडीक हा कळफलक स्मार्टफोनवर वापरताना शब्द सुचवणीत अनेकदा चुकीचे शब्द सुचवले जातात. यातले बहुतांश शब्द ॲ किंवा ऑ हा ध्वनी समाविष्ट असणारे आहेत.म्हणजे ॲप , डॉक्टर याऐवजी अँप , डाँक्टर हे पर्याय सुचवले जातात.ॲ ध्वनी असणारे मराठी शब्द गुगल इंडीकवर सहजपणे लिहीता येत नाहीत. ते सहजपणे का लिहिता येत नाहीत किंवा सुचवणीत का सुचवले जात नाहीत हे आता लक्षात येईल.
इंग्रजीतले ॲ आणि ऑ ध्वनी असलेले शब्द अचूक लिहिता येण्यासाठी मराठी भाषेने ॲ आणि ऑ हे दोन ध्वनी या आधीच स्विकारले आहेत.शिवाय आता शाळेतही बाराखडीऐवजी चौदाखडी शिकवली जात आहे.पण ही माहिती गुगलला त्यांच्या मराठी कळफलकासाठी मदत करणार्‍यांनी दिलीच नसावी असे आता वाटते आहे; किंवा त्यांची मराठी कळफलकासाठी मदत करणारी टीम पुरेशी माहितगार नसावी अशी शंका येते आहे.म्हणजे जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमधली एक असणार्‍या मराठीने इंग्रजीतले जे ध्वनी स्विकारले त्याची खबरबातच गुगलला अद्याप नाहीये.

इंडीक कळफलकातला मराठी भाषा वापरातला हा दोष दूर व्हायला हवा. जे शब्द मराठीत नाहीच आहेत ते सोसावे लागतायत.शिवाय यातून अजून एक संदेश जातो तो म्हणजे मराठीला गृहीत धरलं तरी चालतं; किंवा मराठी ही हिंदीची बोलीभाषा आहे वगैरे.
माझ्या कितीतरी दक्षिण भारतीय मित्रांना मला मराठी ही स्वतंत्र भाषा असल्याचं सांगावं लागलं आहे. त्यांच्या मते देवनागरीत फक्त दोनच भाषा लिहिल्या जातात; हिंदी आणि संस्कृत.
असाच गैरसमज गुगलचा व्हायला नको.
गुगल ट्रान्स्लेटरवरही हीच समस्या आहे.मराठीला गृहीत धरले जाते.

मराठीला गृहीत धरणे यापुढे न थांबल्यास मराठीसाठी स्वतंत्र लिपी बनवावी असा विचार कट्टर मराठीप्रेमींकडून लावून धरला जाण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अन्याय असे नाही मात्र वर लेखात लिहिल्याप्रमाणे गृहीत धरणे, दुर्लक्षित करणे होत आहे. मोबाईलवरून एखादा पॅरा लिहून पहा किती अडचणी आहेत ते. गुगलवर आधी मराठीत सर्च केले की मराठी साईट इत्यदी रिझल्ट दिसायचे. आता पहिली दहा पाने हिंदीच असते. देवनागरी जणू केवळ हिंदीची लिपी आहे असाच विचार दिसतो. >>>> अनुमोदन

इथला वाद थांबत नाही हे लक्षात घेऊन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नवीन मराठी लिपी बनवण्याचे शिवधनुष्य उचललं आहे. लवकरच नवीन मराठी लिपी तुमच्यासमोर सादर करणार आहे.

Pages