कृपया नोंद घ्या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लहान मुलांसाठी (१२-१४ वर्षे) दहा मिनिटांचे skit एका ठिकाणी लिहून हवे होते. त्यासाठी केलेला हा प्रयन्त. जिथे हवे तिथे ते accept झाले आहे. मी या आधी लहान मुलांसाठी असे काही लिहिण्याचा प्रयोग केलेला नाही. त्यामुळे अभिप्राय फार गरजेचा वाटतो. वाचा आणि नक्की कळवा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(राघव, वय, १२-१४ त्याचे काही मित्र जवळच्या एका टेकडीवर आणि तिथल्या पायथ्याच्या गणपतीच्या देवळात गेले होते. संध्याकाळी खेळून, तिथून परतताना राघवच्या लक्षात येते की मोबाईल देवळात विसरला. तो मोबाईल घ्यायला परत देवळात जातो. आतमध्ये कसलेतरी आवाज येत असतात. त्यालाही एकट्याला जायला थोडी भीती वाटत असतेच पण तो तसं दाखवत नाही. हळूच देवळात डोकावतो आणि आतलं दृश्य पाहून घाबरतो. आत मध्ये गणपतीबाप्पा आणि त्याच्या हातात राघवचा फोन. फोन मधून काहीतरी आवाज येत असतो.)
बाप्पा: अरे, काय हे? कोणीतरी हे बंद करा रे? रात्री तरी हे असले आवाज नको इथे. कसा बंद करतात हा आवाज? ए अरे उंदरा, जरा बघ याचं काहीतरी.
उंदीर: चलाम च्याद्या चोतो चोनफो. चमी चघतोब. (उंदीर फोन घेतो आणि त्याला तोंड लावणार इतक्यात)
राघव: अरे, माझा फोन खराब होईल. (मग घाबरून लक्षात येत की आपल्या समोर चक्क गणपती आहे) म्हणजे बाप्पा, तो फोन मीच विसरलो, घेऊ का?
बाप्पा: घे बाबा आणि त्याचा आवाज बंद कर आधी. आणि इतका घाबरलास कशाला?
राघव: (खोटं अवसान आणून) नाही. कुठे काय? मी… मी नाही घाबरलो.
बाप्पा: ए उंदरा, याला जरा त्या कलशातलं पाणी दे. बस रे पोरा. नाव काय तुझं? राघव ना?
उंदीर: चशालाक चाणीपा च्याचदा? चतो च्हणतोम, चेवदे चसआ चाहिका चसतना.
बाप्पा: अस्स.
राघव: हा असा काय बोलतोय? म्हणजे तुम्ही सगळे खरंच बोलता?
उंदीर: (रागाने) चगम चायका? चुलातु चायका चाटते वा?(अजून रागाने) चिकिपिकी-चीकिपिकी.....
राघव: मला काही कळत नाहीये. मला येत नाही ही भाषा.
बाप्पा: अरे ए उंदरा. त्याला नीट सांग. (उंदीर रागावलेला.)
उंदीर: फक्त तुम्ही माणसंच राहता का या जगात? आम्ही पण आहोत.
बाप्पा: (हसतो) अरे हा म्हणतो तुझा देवावर विश्वास नाही. (जरा ओरडून) खरं काय? आणि मग मी कोण रे इथे?
घंटा: (जोरजोरात) ढण, ढण, ढण. बाप्पा, मी बोलू काय याच्याशी? बघतोच त्याच्याकडे.
राघव: नाही, म्हणजे मी तसं नाही म्हटलं. म्हणजे मी आत्ताच पाहिलं न तुम्हाला.
बाप्पा: (मोठ्याने हसतो) घाबरू नकोस. मला माहितेय सगळं.
राघव:(जरा धीर करून) तुम्हाला खरंच सगळं माहिती असतं का? म्हणजे आजी म्हणते तसं. पण मला असं वाटतं की असं कसं सगळं समजेल. आजीचं काहीतरीच. (आणि त्याच्या लक्षात येतं की आपण बाप्पासमोरच बोलतो आहे) सॉरी म्हणजे मला…
बाप्पा: अरे हे एवढे मोठे कान आहेत माझे. मगाशी तुम्ही पोरं काय बोलत होतात ते ऐकलं आहे की मी.
राघव: तसं नाही. ऐकलेले तर मला पण माहिती असतं की. (एवढ्यात फोन मधून अलेक्सा बोलायला लागते)
फोन-अलेक्सा: हॅलो, बाप्पा. Glad to meet you. How may I help you? I am so pleased that we can see you in reality. (आता बाप्पाच घाबरतो आणि उंदीर बाप्पाच्या मागे लपतो)
बाप्पा: अरे, तो आवाज बंद कर रे. मगाशी पण असाच आवाज आला म्हणून उठून आलो. कोण आहे?
राघव: बाप्पा, तुम्हाला नाही माहित ही गमंत? अहो ही अलेक्सा. पण ही माझ्या फोन मध्ये काय करते? मला पण माहिती नाही.
अलेक्सा: Hey I just want to greet Mr.Ganpatibappa. I know he is so sweet and his tummy is so funny. I liked his small vehicle. I don’t know how do you both manage to wander here & there? I have lots of questions. Can we talk? Oh, I am so excited. I will update my information. Wow…(एवढ्यात कुठूनतरी मुसुमुसु रडण्याचा आवाज येतो.)
जास्वदीं: (रडत रडत) बाप्पा, आता तुम्हीपण मला काढून, या बयेला घेणार का तुमच्या हातात? सगळे लोकं तर वेडे झाले आहेत. तुम्ही काही तिचं ऐकू नका. (अलेक्सा कडे रागाने बघते.) हुं, तू गप गं.
अलेक्सा: Hello, wonderful flower. I know you. You are hibiscus. May I know why you are so angry? Oh, now I know why are you so red. Take a deep breath, drink water and you will feel peace.
जास्वदीं: (रागाने) ए गप ए. कानामागून आली आणि तिखट झाली.
अलेक्सा: What does this mean?
उंदीर: अंग, चिचुन्द्रे, चलातु चाहिक चळणारक चाही ना. बाप्पा, चिलात चंदब चराक.
राघव: बाप्पा, मला काही कळत नाहीये. तुम्ही सगळे बोलताय? अलेक्सा कशी इथे आली? काय चालू आहे?
बाप्पा: अरे आधी हा प्रकार काय आहे ते सांग. हे यंत्र म्हणजे फोन आहे. पण त्यात आजकाल काय काय असतं? आणि आता ही इंग्लिश बाई कुठून आली?
राघव: (हसतो) इंग्लिश बाई... अलेक्सा. अलेक्सा नाव तिचं. पण ती खरं म्हणजे इथे नसते. कशी आली काय माहित. मला गूगल करून पहावं लागेल, ती इकडे activate कशी झाली?
बाप्पा: म्हणजे हे काय आता?
जास्वदीं: ही activate म्हणजे बाकी सगळे deactivate.
राघव: अगं, नाही असं काही नाही. मी बघतो गूगल करून.
उंदीर: चलातू चायक चळणारक?चिकिपिकी-चीकिपिकी (राघवला काही कळत नाही. मग उंदीर रागाने) अरे तुला साधी माझी भाषा कळत नाही. तुला काय समजणार?
बाप्पा: अरे मला पाहू तरी दे, ते गूगल, अलेक्सा काय आहे ते.
राघव: (खुश होवून, फोन घेतो आणि बाप्पाला दाखवतो) हे गूगल. इथे काहीही मिळत. म्हणजे जे काही माहिती नसेल ते इथे type करायचं, हे असं. (type करतो) आता आली बघा, अलेक्साची information. मग आपण गणपती असं टाकलं तर तुमची पण information इथे येते.
जास्वदीं: (खुशीत) अय्या, माझं पण नाव टाक रे. बघू बघू. (राघव type करतो) ए माझ्या किती मैत्रिणी आहेत इथे. ह्या फोनमध्ये काय बसल्यात पण? शी.. यांना काही वास सुद्धा येत नाही बाई इथे. काय उपयोग? ए बंद कर रे ते.
अलेक्सा: Hello Hibiscus, we do not have this facility yet. But we will try to add this in our next upgrade. Till then good bye.
राघव: अरे, ही अलेक्सा आज काहीतरी वेगळंच वागते आहे. बाप्पा, पण ह्या गूगल भगवान (त्याला कळत की आपण देवासमोर, गूगलला भगवान म्हणत आहोत.) म्हणजे बाबा म्हणतो गूगल भगवान. काहीही हवं असलं की तिथे लिहा मग झालं.
घंटा: ढण, ढण, ढण. आम्हाला हे अजिबात पसंत नाही. आमच्या देवळात फक्त आमचाच नाद असेल. ही बाष्कळ बडबड कदापि खपवून घेतली जाणार नाही.
बाप्पा: म्हणजे असं आहे तर? म्हणून आमच्यावरचा विश्वास उडाला आहे वाटतं? (हसतो) हरकत नाही. मोदक खाणार का? (आणि हातात एक मोदक येतो). घे खा.
राघव: अरे हा कुठून आला?
बाप्प्पा: (हसतो) मोदक आणि आनंद आमच्याकडे बारा महिने, २४ तास उपलब्ध आहे. काय? खा रे. तुला मोदक आवडतो माहितेय मला. तुझी आई मला देते, त्याआधी पळवून खातोस तू.
राघव: नाही म्हणजे मला... म्हणजे आता तसं नाही करणार.
उंदीर: चमी चाहलयपा. म्हणजे मी पण पाहिलंय.
राघव: सॉरी. आता खरंच नाही खाणार.
बाप्पा: अरे घाबरू नकोस. खा बिनधास्त. आईला माहितेय का इथे आलायस ते?
राघव: अरे, विसरलोच मी. ती आता जाम ओरडेल उशीर झाला की.
अलेक्सा: You can tell her the truth. She may not believe it but I can serve as a witness.
बाप्पा: (मोठ्याने हसतो) ही तुझी अलेक्सा हुशार आहे खरी. पण काय आहे, आईला तू गूगलवर सापडणार नाहीस ना? म्हणून तुला आठवण केली.
जास्वदीं: हो, आणि काही हरवलं की मग सगळे धावणार बाप्पाकडे. तोपर्यंत काही आठवण नाही बाप्पाची.
राघव: बाप्पा, एक विचारू.
बाप्पा: अरे बिनधास्त बोलने का... (हसतो)
राघव: (आश्चर्याने) बाप्पा, तुम्ही असं पण बोलता?
बाप्पा: I can talk in the language that people understand and connect with me. What say?
राघव: भारी. म्हणजे माझा नं विश्वासच बसत नाहीये की हे सगळं.. म्हणजे मला पटलंय की बाप्पा आहे पण म्हणजे एरवी कसं शांत असतं न देऊळ. मग कसं समजणार?
बाप्पा: अरे नेहमी कशाला समजायला पाहिजे? सारखे माझ्याकडे आलात तर तुम्ही कधी शिकणार? आणि मी तरी किती पुरणार? तुमचा गूगल भगवान सुद्धा range गेली की बंद पडतो. मग कसा शोधता रस्ता?
राघव: हो रे. मागे एकदा ट्रीपला गेलो होतो. बाबाला वाटलं गूगलवर सापडेल पण कसलं काय range गेली. नुसता गोधंळ.
बाप्पा: मग, काय केलंत?
राघव: शोधलं विचारून. आईकडे लिहून ठेवलं होत आणि फोनवर खुणा विचारत शोधलं. पण मज्जा आली. काय सॉलिड experience होता. कधीच विसरणार नाही मी.
बाप्पा: बरं मला सांग. या गूगलवर किती वेळ घालवतोस रोज? फोन वर किती आणि अभ्यास किती?
राघव: तू आता आई सारख बोलतो आहेस हं.
घंटा: ढण, ढण, ढण. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला?
जास्वदीं: आजकालची मुलं नुसती फोन,फोन. काय हे, इकडे तिकडे पाहत पण नाहीत.
अलेक्सा: what are you saying lady?
उंदीर: ए चिंचुद्रे, तुला गप सांगितलं न आता?
घंटा: ढण, ढण, ढण. इथे आमचाच आवाज.
बाप्पा: अरे, शांत व्हा सगळे. राघव, फोन वापर, काही हरकत नाही.
राघव:(खुश होऊन) खरंच? तुम्ही माझ्या आईला पण सांगाल?
उंदीर: (वैतागून) बाप्पा, चमीतु चायका चोलतायबो?
घंटा: (जोरजोरात) ढण, ढण, ढण., ढण, ढण, ढण.
बाप्पा: अरे राघव, फोन वापर पण गरजेपुरता. नाहीतर वेळ येईल तेव्हा, ना गूगल काही करू शकेल, ना मी. त्यामुळे स्वतःच्या डोक्यात सगळं हवं. काय? समजतंय ना?
राघव: हो, म्हणजे आता समजतंय…
बाप्पा: काय समजतंय? तुला अथर्वशीर्ष येतं का रे?
राघव: (चाचरत) थोडं, आता सगळं पाठ करेन.
बाप्पा: झालं. मी पाठ कर असं म्हटलं का? पण समजून घे. म्हणजे एक तरी ऋचा लक्षात ठेव.
राघव: म्हणजे? मला नाही समजलं.
बाप्पा: त्वमेव केवलं कर्तासी! अलेक्सा, tell us about this?
अलेक्सा: The Ganapati Atharvashirsa is a Sanskrit text and these are lines from the text. These are called shlokas.
बाप्पा: (मोठ्याने हसतो) हे असं आहे. माहिती मिळेल पण खरा अर्थ समजून घ्यावा लागतो. याचा अर्थ, तुम्ही मला म्हणता तूच आहेस कर्ता-करविता. पण मी म्हणतो, प्रत्येकाने आपल्या कामाची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. मदत जरूर घ्या पण स्वतः करा. काय मग?
राघव: त्वमेव केवलं कर्तासी! गणपती बाप्पा…
सगळे : मोरया!
(मागून आवाज येतो)
अर्णव: (राघवला हलवत) अरे राघव, उठ. लायब्ररी मध्ये झोपलेला टीचरला कळलं ना, ओरडे बसतील. आत्ता काय झोपतोस? आणि हे काय, हे कुठलं पुस्तक वाचत झोपलास?
राघव:(जागा होतो, स्वतःशीच हसतो) त्वमेव केवलं कर्तासी!
अर्णव: काय? हे काय?
राघव: काही नाही. चल नंतर सांगतो तुला.
(समाप्त)
मस्त आहे.
मस्त आहे.
@सामो, मनापासून आभार.
@सामो, मनापासून आभार.
या विभागात फार कोणी येत नाही का? मी सुद्धा पहिल्यांदाच इथे पोस्ट केला.
माहीत नाही मलाही. पण तुम्ही
माहीत नाही मलाही. पण तुम्ही ग्रुप अॅक्सेस बदलून प्लीज अॅक्सेस टु ऑल कराल का? इतकी गोड कथा निसटते आहे.
छान आहे नाटुकली!
छान आहे नाटुकली!
एक सांगा लहान मुलांना ही च ची भाषा समजली क? मला समजायाला थोडे कष्ट लागले. तसेच इंग्रजी मिडीयम नसणार्या मुलांना कशी समजणार ?
आपण जर हे सर्व साध्या मराठीत लिहाल तर ह्याचा रीच अजून वाढेल. म्हणजे सगळ्या शाळेतली मुले
ही सादर करू शकतील
@सामो, मी ग्रुप access बदलला
@सामो, मी ग्रुप access बदलला आता. मी default setting वापरत होते. त्यात लक्षात आलं नाही. खूप आभार.
@प्रभुदेसाई,अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. आजच्या मुलांसाठी लिहिताना मलाही हे tension होतंच. उंदराला मुद्दामच "च" ची भाषा दिली आहे. ती समजायला वेळ जातो आहे. पण समजली तर गंमत वाढेल म्हणून सध्या तरी तसंच ठेवलं आहे. तो बदल बसवताना करता येऊ शकेल.
जी मुलं हे करत आहेत, सगळीच इंग्लिश मीडिअमची आहेत. अलेक्सा हे पात्र कदाचित अवघड जाऊ शकत, इंग्लिश मीडिअम नसेल तर. पण कधी कधी मुलं आपल्याला वाटतं त्यापेक्षा पटकन शिकतात आणि त्यांना पात्र आवडलं की आपणहून करतात. अजून कुठे सादर झालं तर आनंदच वाटेल.
तृप्ती
तृप्ती
छान लिहिले आहे .
सादर होताना जास्त मजा येईल.
बालविभाग हा दुर्लक्षित आहे .
बालविभाग हा दुर्लक्षित आहे . आणि असं का याचं मलाही आश्चर्य आहे .
लहान मुलं असणारी मंडळी इथे माबोवर असणारच की पण त्यांना रमवण्याचे वेगळे मार्ग ते योजत असावेत असं वाटतं