La Flor del amor - Blossom of love (भाग १)

Submitted by कविन on 19 July, 2020 - 12:19

"जाई यार इथे अजून थोडी ग्रिनरी हवी होती", चहाच्या वाफेने डोळे शेकत मी म्हंटलं तेव्हा बाजूला येऊन उभी रहात ती कुजबुजली, "समोर सिनियर सिटिझन सोसायटी आहे सायु. इथे तुला 'मेरे सामनेवाली खिडकी मे' गायचा चान्स नाहीच मिळणार"

"शटअप जाई. मी बाल्कनीतल्या झाडांबद्दल बोलतेय" मी तिला धपाटा घालत ऐकवलं तर डोळे मिचकावून बया आतच निघून गेली.

तिच्या बोलण्यामुळे खरंतर लक्ष समोर गेलं माझं. समोरच्या बाल्कनीत चक्क मदनबाण फुलला होता. आजीच्या बागेत असाच एक मदनबाण होता, आजोबांनी तिच्यासाठी लावलेला आणि त्याच्या शेजारी रातराणी लावली होती. बेडरुमच्या खिडकीतून ही दोन्ही झाडं व्यवस्थित दिसायची आणि डोळे मिटले तरी त्याचा सुगंध सोबत करायचा. आजही करतो.

"ड्रिमीगर्ल कम बॅक टू प्रेझेंट डे."पाठीमागून मिठी मारत जाई म्हणाली.

"जाई ऐक ना. ती समोरची बाल्कनी बघ ना"

"ती चड्डी बनियन वाळत घातलेली?"

"श्शी!" मी चापट मारत तिची नजर त्या मदनबाणवाल्या बाल्कनीकडे वळवली. "आपण पण असा मदनबाण इथे या कोपऱ्यात लावायचा आणि जमलं तर रातराणी, जाई, मोगरा पण"

"मिस वनराणी, आपण इथे शिफ्ट होऊन जेमतेम आठवडा होतोय. सोसायटीचे टेनंट्ससाठीचे जे रूल आहेत ते आपण अजून पूर्ण वाचले नाहीयेत. तू हट्ट केलास म्हणून बाबाने हे फर्न तुला गिफ्ट केलं. but I don't understand why this? really? आपल्या घरी इतकी फुलांची झाडं आहेत. काही नाही तर एक गुलाबाचं तरी द्यायच ना"

"जाईजी आप की डिमांड जायज है पर एक राज की बात सुनाऊ?"

"सुनाईये"

"हर एक पौधे की अपनी दास्ता होती है| हे जे फर्न आहे ना त्याच सायंटिफिक नाव आहे Adiantum pedatum."

"बाऊन्सर. फर्नही ठिक है मेरे लिए"

अगं गंमत केली. फर्न म्हणजे नेचे . तुला हे राहील बघ लक्षात" मी हसून तिच्या हाताला विळखा घालत म्हंटलं, "हे झाड उत्तम आरोग्य, भाग्य आणि सुरक्षेच प्रतिक आहे. बाबाने म्हणूनच दिलय ते आपल्याला."

"so cool. हे नव्याने समजलं. तसही हे तुमच्या दोघांच symbolism & all मला बाऊन्सर जातं नेहमी. चला वनराणी आवरायला घ्या आता. आपल्याला बाहेर फिरुन काही जुजबी सामान भरायचय."

"आलेच पाच मिनिटात. उषा मावशी उद्यापासून येणार आहेत ना स्वयंपाकाला? आणि इंदूमावशी येतायत ना घरकामाला?"

"हो ते एक टेंशन मिटलं आपलं. आता तिकडे मा बाबालाही शांत झोप लागेल"

"जाई आपण बाहेर पडलो की आधी दोन कामं करायच्येत हा, आठवण कर मला. माझ्यासाठी ते रेल्वेच स्मार्ट कार्ड घ्यायचय स्टेशनवरुन. ती रुही आहे ना आपल्या कॉर्नरच्या बंगल्यातली, ती वर्षभरापूर्वी शिफ्ट झालेय इथे मुंबईतच."

"सनसिटी नायगाव असच काही म्हणाली ना ती फोनवर?"

"हो बहूतेक. तर ती सांगत होती. फार उपयोग होतो म्हणे इथे कार्डचा. आणि दुसरं काम म्हणजे नर्सरीत जायचय. जवळच आहे बहुतेक."

"जवळ म्हणजे किती जवळ?"

"अग हे बघ ना जाई" मी तिला फोनवर गुगल मॅप डिरेक्शन दाखवत म्हंटल. हे इथे आपलं 'जास्पर अपार्टमेंट' आणि इथून चालत २० २५ मिनिटावर 'कॉर्नर बंगलो' आहे तिथेच आसपास आहे ही नर्सरी. ऑटो मिळाली तर अग पाच दहा मिनिटात पोहोचू. म्हणजे आपल्या सुयोग नगर भागातच आहे नर्सरी.

"ठिक आहे मॅडम जाऊया आपण, पण आधी तयार तर व्हा" जाईने मला जवळजवळ बाथरुममधे ढकलतच म्हंटल.

आम्ही बाहेर पडतच होतो तर 'मा' ने कॉल केला. जेवलात का?, दमलात का?, रुळलात का? सगळे 'का' संपवून आम्ही खाली उतरलो. स्मार्ट कार्डचं काम तर पटकन झालं. भाजी वगैरे डिपार्टमेंटपण एकदम झट कि पट पार पडलं आणि गूगल मॅपचा आधार घेत आम्ही 'गार्डेनिया फ्लोरेरिया' नावाची नर्सरी कम फ्लोरल शॉप शोधायच्या कामी लागलो. जाईतर आधीच वैतागली होती पण घरी गेल्यावर आजची 'तिची कामं' पण मी करेन अस प्रॉमिस केल्यामुळे ती तयार झाली शोधायला.

गुगल मॅप आणि आजूबाजूचे दुकानदार असा दुहेरी आधार घेत एकदाचे आम्ही कॉर्नर बंगलो पर्यंत पोहोचलो. आजूबाजूला सगळा रेसिडेन्शियल एरिया दिसत होता.

"बंगलो स्ट्रीट नाव या बंगल्यांवरुनच पडल असणार" इती जाई.

सगळेच बंगले होते तिथे. कमर्शियल गाळे नाहीतच एकही. पण पत्ता बरोबर होता. जरा पुढे गेल्यावर एका बंगल्याच्या गेटवरच 'Gardenia Floreria' अशी पाटी दिसली. लाकडी पाटीवर नावाच्या बाजूलाच गार्डेनियाच्या पांढऱ्या फुलांच चित्र पेन्ट केलं होतं.
"ओह! स्पॅनिश प्रेमी", मी पटकन बोलून गेले.

"ऑ! जिथे तिथे स्पॅनिश?" माझ्या ऑनलाईन ॲप्सवरुन स्पॅनिश शिकण्याच्या प्रयोगाने त्रस्त झालेल्या जाईने ऐकवलं. "हे नाव स्पॅनिश आहे", मी दुर्लक्ष करत ऐकवलं आणि गेट उघडलं.

गेट उघडून आत गेल्यावर स्वागताला चक्क गार्डेनियाच बहरलेल छोटेखानी झाडच समोर आलं.

"अरे वा! स्वागताला चक्क गार्डेनियाच", मी समोर दिसणाऱ्या झाडाकडे बघत म्हंटलं.

"हे गार्डेनिया? मोगऱ्यासारखी दिसतायत ना ती अर्धवट फांदीमागे लपलेली फुलं." जाईने विचारलं

अगं जाई गार्डेनिया म्हणजे आपला अनंत. आठवत नाही का आपल्या बागेतला अनंत? मोगऱ्याच्या कुटुंबातलीच पण थोडी वेगळी आणि थोडा गोडसर सुगंध असलेली फुल आहेत ही. हिंदीत यांना गंधराज म्हणतात ते उगाच नाही. मी जाईला अपडेट दिले.

हो का? बरं बरं. पण प्रत्येक झाडाची स्टोरी असते ना? आणि काहीतरी प्रतिक का काही असत म्हणे प्रत्येकामागे. मग हे कशाच प्रतिक आहे, सांग बघू? जाईने सनग्लास काढून बॅगेत ठेवत विचारलं

"Its symbol of trust, luck & purity" समोरुन हस्की आवाजात उत्तर आलं

आवाजाच्या दिशेने आम्ही दोघींनी एकाचवेळी बघितलं. ब्लॅक टिशर्ट डेनिम शॉर्ट्स गालावरची खळी आणि उन डोळ्यावर येऊ नये म्हणून कपाळावर घेतलेला तिरपा हात आणि मिश्किल हसू एकादमात स्कॅन होऊन प्रिंटही झालं.

"ओह! ओके" सगळ्यात आधी सावरुन जाईने वाक्य फेकलं आणि माझ्या दंडाला धरुन "हिला नर्सरी बघायची होती" म्हणत पुढे ढकललं.

"Ya sure. This way please" त्याने अत्यंत प्रोफेशनल आवाजात माहिती देत आम्हाला नर्सरीकडे नेलं.

समोर लिटरली खजिना होता. मी एक क्षण खळीवाल्या मॉडेललाही विसरले. हे घेऊ की ते घेऊ अस झालं होतं पण सोसायटी रुल्स अस दरवेळी म्हणत जाईने मला जमिनीवर आणलं. शेवटी ३ झाडांवर मांडवली झाली आमची. मदनबाण, रातराणी आणि तूळस घेऊन माळीदादांना ते सेल्फ वॉटरिंग पॉटमधे रिपॉटिंग करायला सांगून आम्ही इतर भाग बघायला सुरुवात केली.

या निवडलेल्या झाडांची काय स्टोरी? खळीवाल्याने मधेच आम्हाला विचारल. जाईने माझ्याकडे बोट दाखवत 'हे या मॅडमच डिपार्टमेंट आहे' सांगत माझ्यावर सोपवून दिलं.

"आजी आजोबांच्या आठवणी आहेत खूप. बाकी सिंबॉल नाही माहिती" मी त्याच्या नजरेकडे न बघताच उत्तर दिलं

रातराणी शृंगाररसाचे प्रतिक आहे म्हणतात. आणि त्याबरोबरच ते प्रेमाचे आणि purity चे प्रतिकही आहे.

"हे असं खरच असतं सिंबॉल प्रतिक वगैरे? मला वाटायच बाबा आणि सायु उगाच भंकस करतात" इती जाई दुसरं कोण बोलणार असं

खरच असतं की नसतं ते ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. पण मला ही सूचक पद्धत फार गोड वाटते. त्याने खांदे उडवत उत्तर दिलं.

म्हणजे जसं एखाद्या सुंदर मुलीला तू सुंदर आहेस अस न सांगता तिला गुलाबाच फूल देणं कॅटेगरी… जाईने मधेच त्याची फिरकी घेत विचारलं

ह्म्म किंवा सुंदर मुलीने गुलाब देण्याची सूचक आठवण करुन देणे टाईप

त्याच्या वाक्याने जाई क्लिन बोल्ड आणि मला मात्र फिसकन हसू आलं

तिची ऑकवर्ड पोझिशन ओळखून त्यानेच म्हंटल जस्ट किडिंग. But anyways thank you. तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात ज्यांना या शॉपच्या नावामागे काही मेसेज असेल अस वाटल. nice to meet you miss…?

सायु सायली. आणि मी जाई तिची बहिण" जाईने परस्पर उत्तर देऊन टाकलं

Nice to meet you both. मी प्रणव. ही माझी छोटीशी नर्सरी आणि इथे बाजूलाच माझा फ्लोरिस्टचा व्यवसाय आहे. इथे वरच्या मजल्यावर घर.

ग्रेट. पण रेसिडिंशिअल एरियात व्यवसाय करायला परवानगी मिळाली?" जाईमधला वकील जागा झाला

हो. फार काही अडचणी नाही आल्या. ही फार जुनी कॉलनी आहे. सगळे बरीच वर्ष ओळखतात एकमेकांना. आणि बाकी लिगल डॉक्युमेंट्स ही झाली लवकर. May be I am blessed.

"ह्म्म it seems so. By the way स्पॅनिश नाव देण्यामागे काही खास कारण? प्रतिक वगैरे?" जाईने माझ्याही मनातला प्रश्न विचारुन घेतला.

"हाss हाss! नाही नाही, त्यात काही प्रतिक नाही. बस स्पॅनिश भाषेची आवड. प्रतिक फक्तं त्याच झाडाचं नाव निवडण्यात आहे, भाषेत नाही.", त्याने हसत रिप्लाय केला.

"ओह! ओके. सायुच्या कॅटेगरीवाले म्हणजे. ती पण स्पॅनिश शिकून वापरत बसते माझ्यावर" जाईला हे पचकायची गरज नव्हती तरी बोललीच.

"ग्रेट!" तो म्हणाला त्यावर पुढे काही बोलू न देता मी बाय म्हणत जाईला तिथून बाहेर काढायचा प्रयत्न केला.

"ओके बाय" तो जाईकडे बघून म्हणाला. "Adios", माझं लक्ष जाताच माझ्याकडे बघत म्हणाला. मी पण अगदी ओठातल्या ओठात पुटपुटले "Hasta la vista" अर्थात जाईलाही ऐकू जाणार नाही इतक्या हळू पुटपुटले आणि जाईच्या दंडाला धरुन आम्ही गेटच्या दिशेने निघालो.

तेव्हढ्यात प्रणवनी आम्हाला हाक मारली. पाठी वळून बघितल तर एक peace Lily च झाड घेऊन तो अमच्या दिशेने येत होता.

हे तुम्हाला माझ्यातर्फे गिफ्ट अस म्हणत त्याने कुंडी माझ्याकडे दिली. गुलाब ओव्हर रेटेड आहे उगाचच. त्याहून जास्त अर्थ इतर फुलांना आहे, तो म्हणाला.

ओह! thank you. मग या झाडात काय अर्थ दडलाय? जाईच्या प्रश्नावर आम्ही दोघे एकदमच बोललो "good luck & fortune" दोघांनाही एकदमच हसू आलं. माझं आपल साधच हसू त्याच मात्र खळीत बुडायला लावणारं

"Hasta la vista", तो गेट लावून घेत म्हणाला. मी चमकून बघितल्यावर जाईकडे बघत "भेटू पुन्हा" म्हणत त्याने गेट लावून घेतले.
आम्ही मानेनेच हो म्हणून ऑटोला हात केला आणि घरी जायला निघालो.

"कसला हॉट आहे तो, खल्लास आहे खळी त्याची" ऑटो सुरु होताच मी जाईच्या कानात कुजबुजले

होल्ड ऑन बेब्ज म्हणत तिने मला टपली मारली.

"फार लांब नाहीये आपल्या घरापासून तसं. ऑफीसमधून येताना जरा वळसा घालून आलीस तर लागेलच वाटेत हे" तिने माझी फिरकी घेत म्हंटल पण मी ठरवून टाकलं काही हरकत नाहीये अस करायला आठवड्यातून एकदोनदा. तसही चालण्याचा व्यायाम चांगला असतो की.

आज पहिल्यांदा आजोबा आणि बाबानंतर घराबाहेरच कोणी माझ्यासारखच वेडं विचार करणारं भेटल होतं मला.

क्रमशः

भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त सुरवात, मला एकत्र वाचायला आवडतात, म्हणून बऱ्याचदा क्रमशः गोष्ट पूर्ण झाली की वाचते. आता पुढच्या भागाची हुरहूर सुरू..

सुरूवात मस्तच.

एक सुचवणी - 'म्हंटल' आहे ते 'म्हटलं' करणार का? इतक्या छान गोष्टीत ते उगाच खटकलं.

धन्यवाद सुहृद आणि प्रज्ञा

@प्रज्ञा - हो बदल करते तसा. पटापट टाईप करण्याच्या नादात काही गोष्टी सुटून जातात. नंतर बदल करतानाही काही निसटतात. अस व्हायला नको खरतर. पण झालय खरं तसं. बदल करते त्यात.

खूपच मस्त.
>>>गुलाब ओव्हर रेटेड आहे उगाचच. त्याहून जास्त अर्थ इतर फुलांना आहे, तो म्हणाला.>>> करेक्ट!!

फर्नला नेचा म्हणतात वाटतं. त्याच्या बिया पानाखालच्या कोषांत दडलेल्या असतात.

मस्त लिहिलंय.
झाडांची नावं, फुलं, अर्थ काही माहित नव्हतं!

बरोबर सामो. Fern ला नेचे म्हणतात.

मस्त सुरुवात.

एक काम कर ना, ज्या ज्या झाडांचे उल्लेख येतील त्यांचे फोटो देखिल देता आले तर बघ ना प्लीज. रच्याकने, गार्डेनिया म्हणजे अनंत.

धन्यवाद जाई, सामो, चिन्नू आणि मामी

शब्दखुणा>> मामी तूच ग तूच. बरोबर लक्ष गेलं तुझं Lol

फोटो मधे मधे टाकणं जरा अवघड होईल. आणि तसही फोटो कॉपीराईट फ्री मिळायला जरा जास्तच शोधाशोध करावी लागेल. मिळाले कॉपीराईट फ्री फोटो तर कथा समाप्तचा बोर्ड लावल्यावर एक प्रचिची पुष्टी जोडेन कथेला.

@All
तुम्हाला कोणाला कॉपीराईट फ्री इमेजेस मिळाल्या किंवा तुमचे स्वत: काढलेले फोटो असतील या झाडा फुलांचे तर प्रतिसादात जरुर द्या. मलाही आवडतील बघायला.

कुठल्यातरी भागात एक रिप्लाय होता की नंतर काय बदल केला कळत नाही. त्याकरता जस्ट नोंदवते - एखाद दोन स्पॅनिश शब्द टाकायचे राहील्याची चुटपूट लागली होती. तेच फक्तं ॲड केले आहेत.