होस्कोटे रोड, बेंगळूर.

Submitted by एविता on 16 July, 2020 - 01:26

होस्कोटे रोड

(१) ऋषींनची कार पोर्च मध्ये आल्याचा आवाज आला तसं मी दार उघडून ठेवलं आणि सोफ्यावर बसले. पोर्चमध्ये आला की तो दोनदा हॉर्न वाजवतो.

" ऋषि आला का गं ?" माईनी त्यांच्या  बेडरूम मधूनच आवाज दिला.

" हो माई," मी त्यांच्या बेडरूम कडे जात उत्तर दिलं, " आताच आलाय, तुम्ही झोपा माई आता शांतपणें." मी त्यांच्या बेडरुमचं दार लावून घेतलं.

" माई झोपली?" ऋषीन् ने आत येत विचारलं.

" होय. हळू बोल."

" आज बॉस म्हणवून घेणाऱ्या वेणुगोपाल नामक राक्षसाने घरी निघतानाच काम सांगितलं. दहापर्यंत काम संपेल असं मला वाटलं पण मी तुला मुद्दाम अकरा सांगितलं." ऋषिन् म्हणाला. " तू ओरडणार मला ठाऊक होतं. अगं शेवटी बारा वाजलेच. तिप्पण्णा म्हणालाच 'होगरी साहेबरं इन्न मनिगे'. पार्किंगमध्ये  आलो आणि तुला फोन करावा म्हणून मी फोन बघितला तर बॅटरी अगदी लो... आणि तुझं टेंपर इकडे हाय असणार याची खात्री होती. बॅटरीचं चार्जिंग आणि तुझं टेंपर नेहमी व्यस्त प्रमाणात असतं ते मला माहित..." ऋषिन् दार लावत हसत म्हणाला.

"तू खाल्लंयस का काही?" मी विचारलं.

" येस, दहा वाजता तिप्पण्णा टिफीन घेऊन आला होता."

" बरं, पुढे..?"

  " मी गाडी सुरू करून चार्जर लावला आणि पार्किंग मधून बाहेर पडून, घरी लवकर यावं म्हणून होस्कोटे रोड पकडला." ऋषिन् बुटाची लेस काढत सांगत होता.

"काय? होस्कोटे रोड?" मी प्रश्न केला.

"होय. गाडी इतकी थंड झाली होती, मी हीटर चालू केला आणि गरम हवेची झुळूक आल्यावर मस्त वाटलं बघ.." तो सॉक्स काढत बोलला.

"रस्ता सुनसान आणि गर्दी पण कमी होती. बरं झालं म्हटलं होस्कोटे रोड कडे गाडी वळवली. रस्त्याचे लाईट बंद होते. फक्त माझ्याच गाडीचे हेड लाईट काळयाकुट्ट रस्त्यावर. समोरून एक गाडी येत असेल तर शपथ. दोन तीन  किलोमीटर आलो आणि मग बॅटरी जराशी चार्ज झाली असेल तर तुला फोन करावा म्हणून गाडी बाजूला घेतली आणि बघितलं तर चार्जरची वायर सॉकेट मध्ये बसलीच नव्हती. मग वायर सॉकेट मध्ये बसवली आणि परत गाडी सुरू करून समोर पाहिलं तर एक आकृती उभी असलेली दिसली. मी  स्टिअरिंग व्हील वर हात ठेवला तशी ती व्यक्ती हळू हळू चालत गाडीजवळ आली आणि समोर उभी राहिली." ऋषिंन् माझ्याजवळ येऊन शेजारी बसला.

" पुढे?"

" ती एक म्हातारी होती. पांढर्‍या मळकट साडीमध्ये आणि काळ्या जुन्या फाटलेल्या चादरीने तिने तिचे अंग लपेटून घेतले होते . मुरडलेला, सुरकुतलेला चेहरा, खोलगट डोळे पाठीत वाकलेली, सैलसर राखाडी केस, आणि थंडीने थरथर कापणारी ती म्हातारी काचे जवळ आली आणि तिने टकटक केले. मी काच खाली केली. " होस्कोटे सनेक मनी अदा अण्णा, बिडतिया..?" असं घोगऱ्या आवाजात म्हणाली. होस्कोटे जवळ तिचं घर आहे तर आपण तिला सोडूया म्हणून मी तिला "बारम्मा, कुतगोळव्वा" असं म्हणत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच थंड वाऱ्याची झुळूक आत शिरली आणि जरासा कुबट वास पण आल्यासारखं वाटलं. मी शहारलो.

"तू मला टरकवायचा विचार करत असशील तर सॉरी" मी म्हणाले.

"मी.. आणि तुला टरकवणार? मीच टरकतो तुला..." ऋषीन् बोलला. 

मी हसले. "बरं बरं.. पुढे सांग काय झालं ते" मी म्हणाले.  

"मुला, तुझे नाव काय आहे?" तिने सीटवर बसत विचारले.

“ऋषिन् अद अव्वा” मी गाडी सुरू करत उत्तर दिले.

"दुर्वास ऋषी?" तिने प्रश्न केला.

“इल्ल अव्वा,” मी हसलो, "नुसताच साधा ऋषी. लेडी दुर्वास आमच्या घरी आहे."

मी त्याच्याकडे बघितलं. "हो का? आणि कधी कधी तुझ्या अंगात जमदग्नी संचारतात त्याचं काय? ते नाही सांगितलस त्या म्हातारीला?"

" अगं ते कधी कधी, वर्षातून एकदा... किंवा फारफार तर दोनदा...तू तुझे केस वरती बांधतेस बघ रविवारी केस धुतल्यावर, त्यावेळी मी तुला लांब दाढी आणि मिशा उगवल्या आहेत आणि तू एखाद्या ऋषिसारखी दिसतेस असं मी इमॅजिन करतो आणि न्हाल्यावर चार दोन केस गळालेले असतात तुझे म्हणून तू चिडचिड करत असतेस तेंव्हा तर दुर्वास...."

मी कपाळावर आठया आणत त्याच्याकडे बघितलं.

" सॉरी सॉरी, अगं मला म्हणायचं होतं की तेंव्हा तर तुझ्या धुतलेल्या केसांचा सुवास...."

" थांब, तुला बघते आता.." मी म्हणाले, आणि त्याच्या अंगावर बाजूला असलेली उशी फेकली. तो  लांब सरकला आणि म्हणाला, "तू चिडल्यावर इतकी छान दिसतेस ना एवी.... की दिल चाहता है के..."

"इनफ... माई उठतील. पुढे सांग काय झालं ते." मी म्हणाले.

चार पाच किलोमीटर गेल्यावर  मी म्हातारीला,“ तुला कुठे सोडू?” असं विचारलं. तिने उत्तर न देता माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्याच्या ठिकाणी खोबणीच दिसली. अजून दोन तीन किलोमीटर पुढे आल्यावर मी परत म्हणालो, 'तू मला कुठे जायचेस ते मला दाखव म्हणजे मी तुला तिथेच जवळ सोडतो घराजवळ.”

" इथेच उतरव. मला त्या गल्लीत जायचयं" ती म्हणाली.

"इथे?" मी विचारलं. दोन चार कुत्र्यांचा रडका आवाज येत होता. एक दोन वटवाघळे घिरक्या घालत होती.  नेमका त्याच वेळी चंद्र ढगामागे लपला आणि अंधारलं.

" होय, इथेच." म्हातारी म्हणाली.

"अगं त्या गल्लीत तर स्मशान घाट आहे," मी तिला सांगितलं."

"म्हातारीने तिची मान वळवली आणि....."

" बस्.." मी ऋषीनला सांगितलं. "नको सांगू पुढचं..."

" ऐक तर खरं, मला उशीर का झाला ते.." तो बोलला.

तुला सांगायचं असेल  तर इथे माझ्याजवळ येऊन बस आणि सांग." मी म्हणाले.

ऋषिन् माझ्या जवळ येऊन बसला. मी त्याला चिकटून बसले.

"मग म्हातारीने तिची मान..." तो घोगऱ्या आवाजात म्हणाला.

"मला काही ऐकायचं नाही." मी उठत म्हणाले, तू आलायास ना आता.. चल आता झोपायला जाऊया. अगोदरच उशीर झालाय."

"ऋ," दुसऱ्या दिवशी ऋषिन् ऑफिसला निघते वेळी सॉक्स चढवत होता तेंव्हा मी त्याला म्हणाले," हे बघ, यायला उशीर होत असेल तर हॉस्कोटे रोड वरून येऊ नकोस. नेहमीचा रस्ताच घे. उशीर झाला तरी चालेल."

"ओके डिअर,"आपका हुकुम सर आंखों पर," तो हसत म्हणाला, " पण एवी, का येऊ नकोस त्या रोडने? इज एनिथिंग रोंग विथ दॅट रोड?"

"दॅट रोड इज हाँटेड." मी सांगितलं.

ऋषि ने डोळे विस्फारले.. " ओ गॉड.. ओ गॉड." तो उद्गारला.. "ओहक्के.. अच्छा, म्हणून तू काल टरकली होतीस तर..! मला चिकटून झोपलीस ते... टरकेश्वरी...!"

" ही कुठली रे नवीन देवी?...टरकेश्वरी..? आणि कुठे आहे रे हे मंदिर, टरकेश्वरीचं?" माई बाहेर येत बोलल्या.

" अगं तारकेश्वरी.. मंदिर बांधतायत इकडे मागे.. देवी अगदी जवळच आहे.." ऋषिन् ने माझ्याकडे बघत डोळे मिचकावले आणि माईना 'येतो आई' असे म्हणत दाराबाहेर पडला. मीही त्याच्या मागे पोर्च मध्ये जाऊन उभी राहिले. त्याने गॅरेज मधून गाडी बाहेर काढली आणि माझ्या जवळ थांबवली.

" तू कालच्या रोडने येवू नकोस," मी म्हणाले, " काल आलास तेवढं बास्स. कळलं का?"

" मी काल त्या रोडने आलोच नव्हतो," तो मिस्किल हसत म्हणाला.

मी स्तिमित झाले.  "काय म्हणालास? तू होस्कोटे रोडवरून नाही आलास?"

"नाही.. " तो अजूनही हसतच होता. "मला माहिती आहे तो रोड हाँटेड आहे ते.."

"मग ते काल रात्री सगळं सांगत होतास ते त्या म्हातारीबद्दल ते?"

"ते मी तुला थापा मारल्या..  हा हा हा.."

"का थापा मारल्यास...?"

"तू मला चिकटून झोपावीस म्हणून... हाहाहा...!  बाय..."

त्याने गाडी सुरू केली. "यू लायर.." मी ओरडले पण तोपर्यंत तो गेटच्या बाहेर पडला देखील. मला हसूच आलं. मेन लाय मोअर दॅन विमेन हे मात्र खरं.

.........

(२) मी गेट बंद केलं आणि बघितलं तर पोर्चमध्ये माई उभ्या होत्या. "काय ओरडलीस गं एविता..?  कुठले लॉयर?" त्यांनी विचारलं.

" काही नाही माई," मी उत्तर दिलं, "ये  लवकर" म्हणून सांगितलं.

माई फुलं तोडायला बागेत थांबल्या आणि मी घरात परत शिरले. सकाळचा चहा गरम करायला गॅस पेटवला. चहाचा दुसरा राऊंड घेतो आम्ही दोघी ऋषी बाहेर पडला की. चहात दूध ओतून मी  पातेले चिमटीत पकडले आणि चहा दोन्ही कपात ओतला आणि कप डायनिंग टेबलवर ठेऊन माईना हाक मारली.

"एविता," माई टेबलावर बसल्या आणि हसत म्हणाल्या, " का ग आज आईची आठवण येते वाटतं तुला..?"

"नाही हो माई.." मी म्हणाले, "का हो माई, असं का वाटलं तुम्हाला..?" मी पुढे प्रश्न केला.

"मी बागेत असताना तू मला आई अशी हाक मारलीय असं वाटलं गं .." त्या म्हणाल्या.

मी गप्प बसले. "हो माई, बहुतेक म्हणाले असेन तसं.." मी बोलले.

"एविता, अगं ते आपले कानाचे  डॉक्टर आहेत बघ.. व्हाईटफील्ड वाले, काय ग त्यांचं नाव..? माईनीं विचारलं, " त्यांची अपॉईंटमेंट घे बाई..."

"डॉ उप्पल. का हो माई? काय झालंय कानाला?" मी विचारलं.

"काहीतरी वेगळंच ऐकू येतंय बघ.." त्या म्हणाल्या, " सकाळी ऋषीन् तारकेश्वरी म्हणाला तर मला टरकेश्वरी ऐकू आलं, नंतर तू, ये लवकर म्हणालीस त्याला, तर मला यू लायर ऐकू आलं. मला आई म्हणालीस की माई म्हणून हाक मारलीस ते ही नीट कळलं नाही." माई कप घेऊन बेसिनकडे जाता जाता म्हणाल्या.

"माई तुम्ही ठेवा तो कप, मी विसळते." मी म्हणाले आणि माझा कप घेऊन बेसिनकडे वळले.

"मग.. घेतीस ना अपॉइंटमेंट.?"

"हो माई, दहा वाजता क्लिनिक उघडतं तेंव्हा फोन करते."मी म्हणाले.

माई त्यांच्या खोलीत गेल्या. मी कप विसळू लागले. डॉक्टर काय म्हणतील ते मला आताच माहित होतं. ऑडिओमेट्री करा म्हणतील आणि त्याची भरमसाठ फी घेतल्यावर म्हणतील, " मिसेस रंगाचारी, तुमचे कान उत्तम आहेत. वयाच्या मानाने तुम्हाला जरा जास्तच चांगलं ऐकू येतंय!"

पण नंतर मला फार मोठा गहन प्रश्न पडला.  जास्त खोटं कोण बोलतं? मेन ऑर विमेन?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूपच छान,
तुमच्या कथा खऱ्या असतात म्हणून वाटलं एखादा खरोखरचा अमानवीय किस्सा वाचायला मिळेल बहुतेक,पण नै मिळाला Lol

मस्त Happy

आवडली.
अमानवीय कथा आहे असं वाटलेलं पहिल्यांदा .

Reading this was fun !

BTW, generally speaking, Men lie less often but are better liars Wink

Pages