"पुनश्च हरिओम".. बाधा - बाधित आकड्यांची... भाग -१

Submitted by गणेश शंकर चव्हाण on 13 July, 2020 - 04:15

आत्ता या क्षणी लगेचच "पुन्हा नव्याने सुरवात" शक्य आहे का ?हो,आहे तर आणि ती व्यवहार्य तर आहेच आणि अपरिहार्य सुध्दा.हीच भावना जनमानसात रुजवण्यासाठी "पुनश्च हरिओम" ही चार भागांची लेखनमाला सादर करत आहे.

कोरोनाला जैविक हल्ला-लढा, यश-अपयश,जीवन-मृत्यू अशी बिरुदे लावण्यात सरकारने आणि आपण चूकच केली.या महामारीत स्वतःच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य असायलाच हवं पण सोबतच "जगण्यातील सुंदरता"टिकवण्याचे प्रयत्न का म्हणून सोडून द्यायचे ?? ते ही "2020 हे फक्त जिवंत राहण्याचं वर्ष आहे" असल्या कसल्यातरी अर्थहीन विधानाला बळी पडून.फक्त जिवंत राहणं म्हणजे काय तर "मरण येत नाही म्हणून जिवंत राहणं" आणि ते तर कोरोनाच्या अगोदरही होतं आणि कोरोनाच्या पश्चातही सुरूच राहील.
जगण्यातील अनिश्चितता,मृत्युचे भय याआधीही होतेच पण सद्यपरिस्थितीत ते आमच्या लक्षात आलेच नाही कारण "जिवाच्या भीतीचा तो जुनाच बागुलबुवा विविध अंगांनी असा काही आमच्या अंगावर आला की आम्ही दिवसेंदिवस बधिरच होत गेलो".ही सार्वत्रिक बधिरतेकडे वेगाने होणारी वाटचाल वेळीच रोखायची असेल तर एकच पर्याय आहे "पुनश्च हरिओम"

भाग १
बाधा-बाधित आकड्यांची आणि कोरोनाच्या कुप्रसिद्धीची

आता या क्षणी लगेचच पुनश्च हरीओम करणं योग्य आहे का ? कारण ज्या कारणासाठी ( कोरोनाला हरवणारच ) लॉकडाउन केला होता ते उद्दिष्ट तर साध्य झालच नाही पण असं असलं तरी सुद्धा उत्तर आहे,हो. आता पुन्हा नव्याने सुरवात ही व्यवहार्य तर आहेच आणि अपरिहार्य सुध्दा...

जवळपास 4 महिने होत आले तरी पण बधितांच्या आकड्यात रोज भरच पडत आहे.संसर्गजन्य आजार असल्याने आणि भारताची भौगोलिक/सामाजिक रचना,जनतेच्या जुन्या सवयी/खोडी असा एकूणच रागरंग पाहता हे होणार होतच.त्यासाठी सरकारला बोल लावण्याचं काही एक कारण नाही आणि वेळीच लॉकडाउन केला नसता तर आज आताच्या पाच ते सहापट बाधित असते यासाठी सरकारची पाठ थोपटण्याचीही गरज नाही.तो आकडा आपण आज ना उद्या गाठूच.लॉकडाउन करून सरकारने आजचा आकडा उद्यावर ढकलला.या काळात शक्य तितक्या बेड्सची व्यवस्था केली,PPE किट्स,मास्क,सॅनिटायझेर,व्हेंटिलेटर्स यांचं उत्पादन वाढवलं.आम्हाला मास्कचा वापर,हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या सवयी लावल्या.आता त्यासाठी सरकारने मुळातच तोळामासा प्रकृती असलेल्या अर्थव्यस्थेला खंक करून आतबट्ट्याचा व्यवहार तर केला नाही ना ? मग आजवर काय केलं ? असले फिजुल प्रश्न विचारायचे नाहीत कारण कुणी विचारेल 6 वर्षे काय केलं आणि ते म्हणतील मागील सरकारने 60 वर्षात जे केलं तेच अजून निस्तरतो आहे.असो.

जे झालं ते झालं पण इथून पुढे आम्ही जनतेने केंद्र वा राज्य सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थनच करत रहावे अशी अपेक्षा आता सरकारनेही आमच्याकडून ठेवू नये.या काळात कोरोनामुक्ती राहू द्यात,ती तशीही दोन चार महिन्यात साध्य होणारी गोष्ट नाही हे आता पुरतं सिद्ध झालं आहे.पण मग निदान सरकारने आमची संशय आणि संभ्रममुक्ती तरी करायला हवी होती.जनतेशी खराखुरा संवाद साधत उत्साह वाढवायला हवा होता,नैराश्याची भावना कमी करायला हवी होती.परंतु सरकार, वृत्तपत्रे,सोशल मीडिया या साऱ्यांचा उत्साह मात्र एकाच गोष्टीसाठी ओसंडून वाहत असतो आणि ती गोष्ट म्हणजे,रोजच्या रोज न चुकता वेळी अवेळी कोरोना बधितांची आकडेवारी घोषित करणे.जे कोरोनाच्या कचाट्यात सापडले त्यांचं वाईट वाटतच पण हे सुध्दा तितकच खरं आहे की त्यानिमित्ताने निरोगी आणि कार्यक्षम जनतेवर सुद्धा निष्कारण वरवंटा फिरतो आहे.त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकळत का होईना पण घालाच घातला जात आहे. याला कारणीभूत आहे रोजची आकडेवारी जाहीर करण्याचा सोस,अतिरेकी वार्तांकना मुळे तयार झालेली कोरोनाची दहशती प्रतिमा आणि सुस्तावलेल्या प्रशासनाच्या त्याच चिरपरिचित संथ आणि संभ्रमित उपाययोजना.
सरकार ते करत असलेल्या उपाययोजनांचे म्हणजे रोजच्या तपासण्या,त्यातून निष्पन्न होणारे बाधित,त्यात लक्षणे असणारे/नसणारे किती,कुणाचे अलगीकरण तर कुणाचे विलगीकरण मग त्या आकड्यांचं देश-राज्य-जिल्हा-तालुका-गाव असं वर्गीकरण,इतकं सखोल विश्लेषण अगदी पहिल्या दिवसापासून ते आजतागायत प्रसिद्ध करत आहे.अलीकडच्या काळात बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी,टक्केवारी असते पण तुलनेत जास्त कल हा बधितांची आकडेवारी प्रकाशित करण्याकडेच असतो.

वृत्तपत्रांमधील रकानेच्या रकाने कोरोनाने सजत असतात, बातम्यांमधुन कोरोनाचा कहर जरा कमी 24 तास बरसत असतो आणि एकूणच कुणाचं ही नियंत्रण नसलेल्या सोशल मीडियावर परस्पर विरोधी पोस्ट्स आणि व्हिडिओज यांचा अखंडित खच पडत राहतो.

इतकं कमी होतं म्हणून की काय सरकारने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कोरोना ट्यून सेट केली आहे,जरा कुठं आम्ही आमच्या हमखास आनंदच देणाऱ्या हरामखोर मित्रांना फोन करावेत तर तिथेही संवाद होण्यापूर्वी "भयंकर त्रासदायक असं कोरोनाष्टक" ऐकणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

बरं आता असं ही ठरलं आहे की आपल्याला कोरोनासोबत जगण्यास शिकलं पाहिजे.म्हणजे या विषाणूचं उपद्रवमुल्य,
उपाययोजनांची एकंदरीत गती आणि सरकारची अगतिकता पाहता असच वाटतं की हे कोरोना महाशय अजून काही महिने किंवा वर्षे नक्कीच मुक्कामी असतील ( कटू पण सत्यच ).जर आमच्यावर तोपर्यंत असाच माहितीचा मारा होणार असेल तर मग या काळात जे कोरोनाबधित म्हणून निष्पन्न होतील ते सुटतील पण इतरांपुढे मात्र हा माहितीचा अतिरिक्त आणि अखंडित मारा चुकवण्याचे खडतर आव्हान असेल.त्या माऱ्यात सध्याचं निरस आणि मरगळीचं वातावरण अजून गडद होत जाईल,यथातथाच कार्यक्षमता असलेली बहुतांश भारतीय जनता जी निष्क्रियतेकडे झुकत चालली आहे ती निष्प्रभतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल,नवीन मनोरुग्णही तयार होतील पण कोरोनाबधित या एकाच आजाराला पंचतारांकित वलय प्राप्त झालं असल्याने त्यांची हेळसांडच होईल.इतर आजारांनी त्रस्त रुग्णांची हेळसांड सुरू आहेच.अभागी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि उपचार घेत असलेले कोरोनाबधित लवकरात लवकर बरे होऊन टाळ्यांच्या गजरात एक मस्त असा बुके घेऊन आपापल्या घरी जावेत यासाठी सदिच्छा.पण फक्त कोरोनामय वातावरण तयार झाल्याने त्याच्या side effect मध्ये जे विनाकोरोना होरपळून निघत आहेत त्यांचं काय ???

आज 7 लाख आहेत,जसजशा चाचण्या वाढत जातील तसतशी ही संख्या 70 लाखांच्या घरातही जाईल पण तो फक्त एक आकडा असेल बाकी काही नाही हे मान्य करण्यास काय अडचण आहे ?? खरं तर तसं मान्य करून ते समाजमनावर ठसठशीतपणे बिंबवायला हवं पण तसं न करता या आकड्यांची थरारक पध्दतीने मांडणी करत, भविष्यातील आकडेवाडीचा ढोबळ अंदाज व्यक्त करत साऱ्या देशाला वेठीस धरलं जात आहे. आमच्या 138 कोटींच्या अस्ताव्यस्त गर्दीच्या देशात रोज काही हजारात कोरोनाबधित हे सापडणारच.त्यात बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे ही आमच्यासाठी जमेची बाजू.वेळीच निदान झालं आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर नेहमीच्या वापरातील काही मामुली गोळ्या औषधांनी किंवा आपोआपही रुग्ण बरे होत आहेत.कोरोना होऊ नये म्हणून काही घरगुती प्रतिबंधात्मक उपचार देखील फायदेशीर ठरत आहेत.इतर आजारांनी त्रस्त सर्व वयोगटातील नागरिक,लहान मुले यांना संसर्गाचा धोका अधिक असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि उर्वरितजण फाजील आत्मविश्वास न बाळगता मास्कचा वापर,हात धुवून सॅनिटायझ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री वापरून आपली दैनंदिन कामे सुरू ठेवू शकतात. तर असा हा कोरोना,की जो झाल्याने तो होणाऱ्यास जितका मनस्ताप आणि नुकसान होते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मनस्ताप आणि नुकसान हे कोरोना न होणाऱ्यांनाच होत असते आणि आमचा मीडिया प्रसिद्धी कुणाला देतो तर फक्त आणि फक्त "कोरोनाबधित आकड्यांना."

ऑलम्पिकमध्ये तीन चार पदके मिळवताना आमच्या देशाच्या नाकी नऊ का येतात ? या लाजिरवण्या गोष्टीची बातमी थेट चार वर्षातून एकदाच पण कोरोनाची आणि बधितांची विजेत्याच्या थाटातील बातमी मात्र रोजच्या रोज.आता देशाला पदक विजेते मिळत नाहीत म्हणून त्याची हौस कोरोनाबधितांच्या मोठमोठ्या आकड्यांवर भागवायची का ? आणि ती ही पहिल्या पानावर,ठळक (सुवर्ण) अक्षरात. जनहितार्थ सर्वेक्षणे,योजना, देशाचा अर्थसंकल्प इत्यादींचं इत्यंभूत संख्यात्मक विश्लेषण होत असेल पण त्याचा कोरोना इतका पाठपुरावा केल्याचं आठवत नाही की ऐकीवात नाही
पण कोरोनाचा पाठपुरावा तो जाईपर्यंत नक्कीच होणार हे निश्चित.एखाद्या विषयाला किती चघळावं त्याला काही प्रमाण ?चावून चोथा झाला असेल,तुमचं रसपान झालं असेल तर आताया विषयात नको तितका "रस" घेऊ नका.

नोकरी, नैतिकता,नीतिमत्ता यांची सांगड कधीच घातली जाऊ शकत नाही का ? निदान आता तरी आणि काही प्रमाणात का होईना तशी सांगड घातली जावी. ज्यावेळी प्लेग ने थैमान घातले होते तेव्हा "सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?" असा लोकमान्य टिळकांचा केसरी गरजला होता.मात्र त्याच लोकमान्यांचा भूमीत,सरकारच्या सदोष हाताळणीचा हातचं राखून तोंडदेखला विरोध व्हावा ? पक्षा पक्षात वृत्तपत्रांचीही वाटणी व्हावी ? वैचारिक धनही असं मातीमोल ठरवुन पायदळी तुडवलं जावं ??? टिळक बघताय ना........
या विषयाचं इतकं अवडंबर माजवलं गेलं की त्यानिमित्ताने देशाने कालबाह्य झालेली अस्पृश्यता पुन्हा एकदा अनुभवली.कोरोनाबधित आणि त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या बाबतीत ठीक होतं पण जे बधितांसाठी दूर दूरचे होते आणि संशयित या संकल्पनेच्या जवळपासही पोहचणारे नव्हते त्यांच्याशीही कुणीच कसलाही संपर्क ठेवण्यात धजावत नव्हतं. त्या काळच्या अस्पृश्यतेला अज्ञानाचं,जातीभेदाचं,अनिष्ठ रूढी परंपरांचं कोंदण होतं पण आज विज्ञान घरोघरी पोहचून सुद्धा बहुतांश जनतेला हा अस्पृश्य अनुभव आलाच.काही अभागी जीवांची तर मरणानंतरही यातून सुटका झाली नाही. स्वकीयांकडूही त्यांच्या मृतदेहांची एक प्रकारे विटंबनाच झाली.

एड्स होऊनही उजळ माथ्याने फिरणारे आमच्या समाजाने पाहिले आहेत पण कोरोनाबधित, त्यांच्या निकटच्या/दुरच्या संपर्कातील व्यक्ती,केवळ अफवेचे शिकार झालेले यांना मात्र महापाप केल्यासारखं तोंड लपवायची वेळ येत होती.हा सगळा जनतेत अवास्तव माहिती पेरण्याचा परिणाम नाही तर मग काय ????
सरकारच्या उपाययोजना सुरू आहेत आणि पुढे बराच काळ सुरुही राहतील.साहजिकच रोजच्या रोज बाधीतही निष्पन्न होतील,उपचार आणि इतर सोपस्कारही होतील,पण आकडेवारी चं काय हा प्रश्न उरतोच.सरकार आकडेवारी किंवा इतर नकारात्मक बातम्या,
प्रसंग प्रकाशित न करण्याचा निर्णय घेऊ शकणार नाही असं वाटतं.पहिलं महत्वाचं कारण इच्छाशक्ती आणि दुसरं म्हणजे,
कशाला उगाच "माध्यमांची गळचेपी" वैगेरे घोषणा देण्यासाठी त्या विरोधकांच्या हातात आयते कोलीत द्या,त्यापेक्षा चाललं आहे ते चालू द्यात असा जनतेला गृहीत धरून केलेला विचार.मीडियानेही दुसरा कोणताच विषय नसल्यासारखे कोरोनालाच लाडाने कुरवाळणे आणि सोशल मीडियावरील स्मार्ट बिनडोक वापरकर्त्यांना काही सांगायची सोयच उरली नसल्याने "बाधित आकड्यांची बाधा" आपल्याला होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी ही स्वतःवरच असणार आहे.तसं ही आम्हाला आकडे कधी चुकले आहेत म्हणा ? शाळा कॉलेजात गुणांचे आकडे होते, नंतर पगाराचे,बचतीचे,कर्जाचे,
त्याच्या हप्त्याचे आले आणि अजूनही बऱ्याच कसल्यातरी आकडेमोडीत आम्ही अगोदर पासूनच अडकून पडलो आहोत,
त्यात ही पॉझिटिव्ह आकड्यांची निगेटिव्ह भर पण कुठं थांबायचं आणि कुठं दुर्लक्ष करायचं हे ठामपणे ठरवलं गेलं आणि त्या दृष्टीने मनापासून ठोस प्रयत्नही केले गेले तर बरेच प्रश्न सुटतील.

क्रमशः

श्री.गणेश शंकर चव्हाण,वाई
gsc3967@gmail.com

( Copyright registered under trade union Act 1926,Registered No.3726 )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users