बिथोवन(आणि मोझार्ट-३)

Submitted by बिथोवन on 8 July, 2020 - 08:53

बिथोवन(आणि मोझार्ट-३)

सहा वर्षाचा असताना मोझार्टने केलेला तो कार्यक्रम अभूतपूर्व ठरला होता. लोकांनी असे  कौतुक केले की एका रात्रीत मोझार्टचे नाव युरोपभर पसरले. त्यानंतर मोझार्टची कीर्ती अशी पसरली की त्याला चमत्कार असेच लोकांनी म्हंटले. हा कार्यक्रम झाल्यावर त्याला व्हिएन्ना, मग प्राग, पॅरिस, लंडन, म्युनिक, फ्रँकफर्ट, झुरीक आणि रोम इथे बोलावले गेले आणि तो आणि नॅनल आपल्या वडिलांबरोबर सांगीतिक दौरा करू लागले.

मी पण मोझार्टच्या पावलावर पाऊल टाकून सहा वर्षाचा असताना  कार्यक्रम केला होताच की. कुणी फारशी दखलही घेतली नाही. माझ्या पियानोच्या घट्ट झालेल्या पट्ट्यानी घात केला होता, आणि जे झालं ते लोकांना सांगता ही येणार नव्हतं. नाचता येईना अंगण वाकडे म्हंटलं असतं ना लोकांनी.

व्हिएन्नामध्ये शोनबर्नला मोझार्टने जो कार्यक्रम सादर केला त्याची चर्चा तर फार दिवस होत राहिली. खुद्द सम्राट फ्रांझ जोसेफ याने मोझार्टला दरबारात वाजवण्याचे आमंत्रण दिले. दरबारात सर्व सरदार, अमीर, उमराव जमले आणि दरबार तुडुंब भरला. सम्राटाने  विचारले की त्याला कुठला पियानो वाजवायला हवाय. मोझार्टने अनेक पियानो मधून एकाची निवड केली. सम्राटाने आपल्या एका सेवकाला जवळ बोलावून घेतले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर त्या सेवकाने पांढरे शुभ्र कापड आणले आणि मोझार्टने निवडलेल्या पियानोंच्या पट्ट्यांवर टाकले जेणेकरून मोझार्टला काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या दिसू नयेत. मोझार्टला हसू आवरत नव्हते. सम्राज्ञी मारिया थरेसाने मोझार्टला हसताना पाहिले आणि त्याला जवळ बोलावले. त्याचे गालगुच्चे घेतले आणि त्याला सांगितले की आता तुला फक्त एका हातानेच वाजवायचे आहे आणि आम्ही जे वाजवायला सांगू ते! मोझार्ट परत हसू लागला. उत्तरादाखल राणीच्या गालावर त्याने  ओठ टेकवले आणि कमरेत वाकत अभिवादन केले. नंतर तो पळतच गॅलरीत चढला आणि पियानो समोर जाऊन उभा राहिला. लिओपोल्डला तर घाम फुटला होता कारण एका हाताने वाजवणे मोझार्ट ला शिकवणे तर दूरच पण त्याला स्वतःलाही तसे येत नव्हते. त्याची छाती धडधडत होती आणि आता काही खरे नाही, मोझार्टला एका हाताने आणि तेही पियानोच्या काळ्या पांढऱ्या पट्टया दिसत नसताना लहानग्या जीवाला वाजवायला सांगणे म्हणजे क्रूरपणाचा कळसच असे त्याला वाटले. संपले सारे. वूफीला हे वाजवायला जमले नाही तर सर्वांच्या देखत मान खाली घालावी लागणार. अशी परीक्षा शत्रुचीही घेऊ नये. लिओपोल्ड ला असे वाटले की तिथून निघून जावे पण सम्राटाच्या समोरून कसे जायचे? तो त्यांचा अवमान ठरला असता. परंतु त्यानंतर दोन तासात जे काही घडले त्याने संपूर्ण राजघराणे, सरदार, दरकदार, अमीर, उमराव, आणि इतर उच्चभ्रू वर्गातील लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले, कसे शक्य आहे, हा जादूटोणा तर करत नाही ना असेही लोक म्हणू लागले. राजाने अनेक अवघड रचना मोझार्टला वाजवायला सांगितल्या आणि मोझार्टने ते आव्हान लीलया पेलले. अशी एकही संगीत रचना बाकी राहिली नाही की ती मोझार्टने एका हाताने किंवा दोन्हीं हाताने वाजवली नाही. आता काय सांगावे हा प्रश्न पडल्यावर राणीने त्याला त्याची स्वतःचीच एक रचना वाजवण्यास सांगितले. मोझार्ट उभा राहिला आणि म्हणाला," हर हायनेस, आता मी जी संगीत रचना वाजवणार आहे ती मी खास तुमच्यासाठीच रचली आहे. पाचच मिनिटांपूर्वी मी ती रचली  आणि आता ती तुमच्या पुढे सादर करतो." असे म्हणून त्याने पियानोच्या बाजूला  हार्पसीकॉर्ड आणून ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर त्याने ती अप्रतिम रचना सादर केली आणि सारा दरबार मंत्रमुग्ध होऊन गेला. राणी उभी राहिली आणि तिने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मग सारा दरबार उभा राहिला आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाटाने मोझार्टचे कौतुक केले. नॅनल आणि मोझार्टला भेट वस्तू देण्यासाठी आणि मोझार्टला जवळून पाहण्यासाठी मोठी रांगच लागली. लिओपोल्डला आधीच उमगलं होतं की मोझार्ट हा काहीतरी चमत्कार आहे. त्याला जे काही घडले होते ते खरे होते की भ्रम याचा पत्ताच लागेना. त्याला सारे स्वप्नवत वाटत होते. आज जो चमत्कार घडला होता त्यामुळे लिओपोल्डला खात्री झाली की मोझार्ट हा आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे आणि त्याला जपायला हवे.   त्यानंतर मेजवानीला सुरुवात झाली. राजा आणि राणीच्या शेजारीच नॅनल, मोझार्ट आणि लिओपोल्ड बसल होते. राणीची छोटी मुलगी मेरी अँतवानेत आणि नॅनल  व मोझार्ट लगेच एकमेकांचे जिगरी दोस्त बनले. मेजवानी संपली तशी सम्राट जोसेफ उभा राहिला. त्या प्रचंड मोठ्या दिवाणखान्यात शांतता पसरली. " आय, जोसेफ बेनेडिक्ट अँटन मायकेल ॲडम,  द एम्परर ऑफ ऑस्ट्रिया, फ्रॉम द रॉयल हाऊस ऑफ होप्सबर्ग-लॉरेन...." मी योहानस ख्रीसोस्टोमस वूल्फगॅंग थिओफिल्स अमाडियास गोटलीब सिगीमाँड्स मोत्झार्ट याला ' बाल जादूगार' ही पदवी बहाल करत आहे......" प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मोझार्टने सम्राट जोसेफला कमरेत वाकून अभिनंदन केले. त्याला आणि नॅनलला हिऱ्याच्या आंगठ्या देण्यात आल्या, वस्त्रप्रावरणे देण्यात आली. दरबारी चित्रकाराला बोलावण्यात आले आणि तिथेच मोझार्टचे जांभळ्या रंगाच्या पोषाखातले मोठे चित्र रंगवण्यात आले. मग दुसऱ्या दिवशी सम्राटाला अभिवादन करून तिघे फ्रँकफर्टच्या दिशेने निघाले.

" अरे,तुम्ही अजून काही खाल्लं नाही?" खानसामा आत येत म्हणाला तशी माझ्या विचारांची साखळी तुटली. त्याने टीपोय वरती पेय आणून ठेवले.

" कार्यक्रम किती वेळ चालणार आहे अजून?" मी प्रश्न केला.

" अरे खूप वेळ आहे अजून," मोझार्टच आत मध्ये येत म्हणाला, "हे बघ, आर्चबिशप मॅक्समिलियन फ्रान्सिस यांचा निरोप मला मिळालाय. आता आपण दोघं मिळून नवीन ऑपेरा वरती काम करूया. तुला शिकायचं आहे ना माझ्याकडे? काळजी करू नकोस. मी सगळं शिकवणार आहे तुला. बघ मी तुला संगीततज्ञ करून पाठवतो की नाही परत बॉनला!"तो म्हणाला.

" माडीवरची मोठी खोली तू वापर. आता खाऊन घे. संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम आहे, तोपर्यंत ताजातवाना व्हायला हवास तू. मी जातो आता परत बाहेर". असं सांगून मोझार्ट बाहेर दिवाणखान्यात गेला.

(क्रमशः)

( सुखी१४, फेरफटका, महाश्वेता, हायझेनबर्ग अर्थात ब्रेकिंग बॅड, हर्पेन, झेलम यांच्या विनंतीला मान देऊन ही कथामाला पुढे लिहीत आहे. तुमच्या सर्वांचे तसेच आसा, अज्ञातवासी, लंपन आणि अभिरूप यांचे आभार. सुखी१४ यांनी मदत करीन असेही सांगितले होते. त्यांचे विशेष आभार.)

Group content visibility: 
Use group defaults

इतकं म्हणजे इतकं सुरेख लिहिताय ना!

प्लीज पूर्ण करा आणि (हावरटपणासाठी क्षमस्व) पुढचे भाग लवकर लवकर टाका!

धन्यवाद बिथोवन
लिखाण पुन्हा सुरु केलंत म्हणून
वाचतोय, आवडतंय

पुढचे भाग लिहायला घेतलेत ....अगदी योग्य निर्णय.
फार छान लिहीत आहात, दंतकथांच्या पुढे जाऊन मोझार्ट बद्दल अजून जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
थोडे पियानो आणि हार्पसिकॉर्ड मधल्या फरकांबद्दल सांगितले तर बाल मोझार्टच्या प्रचंड गुणवत्तेबद्दल अजूनच आदर वाढेल. दोन्ही प्रकार वर वर दिसायला सारखे असले तरी आतले फिजिक्स दोघांचे अगदीच भिन्न आहे, त्यामुळे ते वाजवण्यासाठी लागणारे स्कील सुद्धा वेगळे .

<<पुढचे भाग लिहायला घेतलेत ....अगदी योग्य निर्णय.>>
अगदी हेच म्हणतो , जरी सगळे रीप्लाय देत नसतील तरी वाचताहेत, सो कंटीन्यु प्लीज!

अरे वाह क्या बात है.
नक्की पूर्ण करा. खूप उत्सुकता लागली आहे.
मना पासून धन्यवाद आणि शुभेच्छा.

छान.. कथा आवडली. पु.भा.प्र.

एखादा लेखक कमी प्रतीसादामुळे कथा डिसकंटीन्यू करतो असं सांगितल्यावर सगळे कसे येतात प्रतिसाद द्यायला? आधी कथा चालू असते तेव्हा प्रतिसाद द्यायला पैसे पडतात का? जे लोक वाचनमात्र असतात.. फुकट कथा वाचयला मिळते तरी केवळ आळसामुळे प्रतिसाद देत नाही अशा लोकांचा मलातरी खुप राग येतो. कशाला वाचता मग? उपकार करतात का लेखकावर? नंतर वर तोंड वर करून सांगायला येतात. आम्ही वाचनमात्र आहोत वैगेरे..

मायबोली काय लेखकाला लिहायचे पैसे देत नाही. केवळ चांगल्या प्रतिसादासाठी इथे कथा तो टाकत असतो. चांगल्या प्रतिसादामूळे त्याला उमेद मिळते ते तरी वाचनाच्या बदल्यात देऊ शकतात ना.
पण काहीना ते ही द्यायला जड जात..

कमी प्रतिसादामूळे चांगले चांगले लोक इथून गेले आहेत आणि काही होतकरू लेखक नाउमेद होऊन प्रयत्नच सोडून देतात.

हा ही भाग छान झालाय...
Symphonies ऐकल्या आहेत, पण अशी माहिती याआधी मिळाली नव्हती