वारी वियोग

Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 June, 2020 - 22:52

वारी वियोग
अष्ठगंध भाळीचा आज जाहला उदास
तुळसीच्या माळेचाही हरवला सुवास
अबिराचा टिळा, झाकोळली भाग्यरेख
गळा दाटोनी गा आले,विठू वियोगाचे दु:ख

गातो अभंग संतांचे परी बोल झाले मुके
उमटेना विठू मनी निनादेना टाळ ठेके
आसावलो पंढरीसी जशी माहेराला लेक
कोण भरविल यंदा मज मायेचे भातुके ?

उपवास आषाढीचा निरंकार मी केला
कुठे स्नान चंद्रभागा, संत मेळा कुठे गेला
नाही नामाची पायरी, ओका ओका गोपाळपुरा
काय आगळीक देवा का मुकावे मी माहेरा

वाट पंढरीची कशी पुढे चालणे विसरली
पायधुळ माऊलीची नाही मस्तकी लागली
नाही गजर हरीचा नाही भक्तांचे मळे
नाही रिंगण सुखाचे, वाटेलाही वारीच्या घेरी आली

वाट अजूनही पाहते गाव,दिंडी येण्याची
चुलीला प्रतिक्षा आहे बेसन भाकरीची
राऊळही सुने सुने, नाही भजन कीर्तन
एकची विनंती देवा
कार्तिकीला तरी मज द्यावे आलिंगन, द्यावे आलिंगन
© दत्तात्रय साळुंके
29-6-2020

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_
अचूक भावना व्यक्त झाल्यात

@ विनिता.झक्कास
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद...
भातुके म्हणजे घास...

__/\__
वारी वारी जन्म मरणाते वारी

द्वैत
अनन्त_यात्री
महाश्वेता

खूप धन्यवाद....