सडपातळ देखणा बूच

Submitted by मंगलाताई on 28 June, 2020 - 11:30

buch.jpg

देशी फुलझाडांच्या मालिकेतील चौथे फुल बूच
बूच हे नाव ऐकल्याबरोबर थोडा संभ्रम निर्माण होतो . असे काही फुल झाडाचे नाव असू शकते का ? पण हो देशी फुलझाडातील बूच हे एक सूंदर फुलझाड आहे .
बूचाचे झाड उंच उंच गगनात गेल्यागत वाढतं .बुचाची पांढरी फुलं अगदी नाजूक असतात . फुलांचा देठही पांढरा बारीक नळीसारखा आणि साधारणपणे दोन ते अडीच इंच लांब असतो. फुलाला पाच पाकळ्या असतात त्यापैकी दोन पाकळ्या जुळ्या सारख्या एकमेकींना चिकटून असतात . वरवर बघितले तर चार पाकळ्यांचे फुल आहे असे वाटते, पण बुचाच्या अंतरंगात शिरलं की तो हसत हसत देतो स्वतःची ओळख करून . बुचाकडे बघायला लावणार ती बुचाची फुलचं कारण झाडाखाली रांगोळी घातल्यागत फुलांचा सडा पडलेला असतो . त्यातली दोन चार फुल फुल जर वेचली तर सुवासाने वेड लागल्याशिवाय राहत नाही . मग मन भरेस्तोवर ओच्यात फुलं वेचावि . फुलं वेचायला गेलो तर एकापेक्षा एक ताजी फूलं टपटप करीत इतस्ततः पसरलेली असताना दिसते . मग पुढ्यात असलेले एक वेचू की पलिकडचे वेचू असे सैरभैर मन होते आणि वेळ काळाचे भान हरपून आपण ओचाभर फुलं वेचून घेतो. भरभरून सुवास घेतल्यावर झाडाकडे वर नजर जाते . प्रत्येक हिरव्याकंच फांदीवर गुच्छ ,फुलं आणि कळ्या लोंबकळत असतात . अर्धी उमललेली फुलं आणि काही बंद कळ्या. असा मोहक दिसतो बुचाचा गुच्छ . बूच आपली ओळख कधीच लपवू शकत नाही सूवास तर एवढ्या लांबून येतो की साधारणपणे अर्धा किलोमीटर पासूनच आपल्याला कळतं की कुठेतरी जवळपास बूच उभा आहे वाट बघतो आहे.
आम्ही लहानपणी सहामाही परीक्षा देऊन घरी निघालो की बूचाला ओलांडून जाणे फार अवघड होते . मग एका कोपर्‍यात सर्व साहित्य टाकून द्यायचं , अन् ओचाभर फुलं घेऊन घरी जायचं तर आई दारातच स्वागताला तय्यार . "अगं परीक्षेच्या वेळी कोणी फुलांच्या मागे लागतो का "आईच्या हातचे दोन रट्टे खायचे तरीही फुलं घेतल्याशिवाय मन भरतच नसे . अगदी रोज मार खावा लागला तरी. बूचाच्या आणि परीक्षेच्या स्मृती आहेत, परीक्षा आणि बूचहे एक समीकरणच होतं , कारण बूचाला एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर अशा दोन वेळा झाडाला बहर येतो. परीक्षेच्या वेळा नेमक्या याच असायचा .याच काळात बूच बहरायचा आणि झाडाखाली फुलांचा गालिचा पसरलेला दिसायचा .बूचाची झाडे हारीने उभी असतात स्वागताला एकामागून एक शाळेतल्या मुलांच्या रांगांप्रमाणे .आम्ही ओचाभर फूलं वेचल्यावर त्याच्या तीन पदरी वेणी गुंफायचो आणि ती गोल वेणी केसात माळायचो. बूचाला दुसरे नाव आकाशनिम असेही आहे .हिंदीत त्याला आकाशनिम असे ओळखतात .हिरवी उंच झाडे असतात बूचाची .सरळ उंच वाढत जातो कधी कधी ऐंशी फुटांपर्यंत उंची गाठू शकतो .बूच हा.मूळचा ब्रह्मदेश आणि मलेशियातील पण आता भारतात सर्वत्र आढळून येणारा शोभिवंत व्रुक्ष आहे .याला भारतातील हवामान चांगले मानवते आणि त्यामुळे त्यांची वाढ अगदि सुदृढ मुलांसारखी होते. बूचाची साल खरबरीत असते , किंचित जाड रेषा आणि पिवळसर तपकिरी रंग असतो सालीचा, हाताने खरडून काढले तर साल सहज निघते आणि त्याचे छोटे-छोटे ढलपे ही निघतात. त्यापासून बाटल्यांची बूचं तयार करतात म्हणून त्याचे पाळण्यातले नाव बूच असे ठेवले. बूचाची पाने संयुक्त असतात . पानाच्या मध्ये शिर्‍याच्या दोन्ही बाजूला जोडीजोडीने पर्णिका असतात तर टोकाला शेवटी एकच पर्णिका उरते. पानांचा आकार एक ते तीन इंच लांब असतो आणि रंग गडद हिरवा .जानेवारी ते मार्चमध्ये बूचाची पानगळ होऊन नवीन पाने येत असतात . बूच सदा हसतमुख आणि हिरवा कारण तो निष्पर्ण नसतोच कधी. वनराईला हिरवी समृद्धी देणार्‍यात बूचाचा सिंहाचा वाटा आहे . सदाहरित वनक्षेत्रात बूचाचे वास्तव्य असते .
बूचाला बारीक चपट्या आणि टोकदार अशा आठ ते दहा इंच लांबीच्या शेंगा लागतात .शेंगात बिया तयार होतात . प्रत्येक बी भोवती नाजूक पापूद्रयाचे आवरण असते . शेंगा पिकल्या की त्या उकलुन पक्षांना बोलवतो बूच मेजवानीला. यथेच्छ ताव मारून किलबिलाट करीत पक्षी एकच गलका करतात . लग्न मांडवा सारखा दणाणून जातो बूच .अंगाखांद्यावर उड्या घेऊन खेळून दमले की पक्षी चोचीत बिया घेऊन दुसरीकडे बूचाच्या बाळाचे बारसे करतात आणि बाळ गोंजारून वाढवतात . अशा रीतीने आपोआप त्याचा प्रसार होतो . बूचाला मुद्दाम क्वचितच लावतात , बाकी तो आज्ञाधारक शाळकरी मुलासारखा स्वतः जातो आपल्या कुटुंबकबिल्यासह कुठेतरी आणि तिथेच मुक्काम करतो . बूचाचे झाड असतील त्या भागात बूचाची लावणी करावी लागत नाही कारण त्याची पिलावळ आपोआप जमिनीतून डोकं वर काढते .मोठ्या बूच आजोबांकाठी आई, बाबा ,काका ,काकू आणि छोटी नातवंडासारखी बूचाची रोपटी असा असतो बूचाचा संसार . त्याला तसा फार मानपान नाही. एखादे उघडे दिसणारे झाडाभोवतीचे मूळ लावले तरी हा निमूटपणे नेतील तिथे जातो आणि निवांत आपला विस्तार वाढवतो . मला का नेले म्हणून रूसणे बिसणे नाही यांच्या स्वभावात . कोठेही न्या हा आपला हसराच. या झाडाची मुळे खूप खोलवर जात नाही तर वरवरच पसरतात .त्यामुळे बूचाच्या झाडाखाली इतर झाडे झुडपे वाढू शकत नाही . जोरदार वाऱ्यात हे झाड उन्मळून पडण्याची शक्यता फार असते .
उंच उंच वाढणारा बूच आणि त्यावरची हिरवी पर्णस्रुष्टी त्यातून मध्येमध्ये डोकावणारे शुभ्र पांढरे डोकावणारे शुभ्र पांढरे फुलांचे घोस सौंदर्याचा बहारदार ठेवा आहे बूच.
IMG-20200616-WA0013.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय. मी लहानपणी हे झाड नव्हतं कधी बघितलं. पुण्यात आहेत पण कधी लक्ष गेलं नाही. इथे आमच्या बाल्कनीच्या अगदी समोर पण कंपाउंडबाहेर एक बुचाचं झाड होतं. मग त्याची हळूहळू ओळख झाली. ते बहरलं की एक छान मंद सुगंध घरात पसरायचा. पक्षी तर कितीतरी यायचे त्याच्यावर! In fact त्या झाडावर येणाऱ्या पक्ष्यांमुळेच मला पक्षी बघायची आवड निर्माण झाली. असं हे झाड दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी तोडलं. तिथे आता प्लॉट्स पाडून बंगले बांधत आहेत.

मस्त लेख!
गावाला आमच्या अंगणातच मोठे बूचाचे झाड होते. अजूनही आहे. बूचाचा सडा, ओचे भरून घेणे, फुलांच्या वेण्या-माळा करणे आणि त्याचा सुवास. सगळेच आठवले.
फुलांचा देठही पांढरा बारीक नळीसारखा आणि साधारणपणे दोन ते अडीच इंच लांब असतो. >> हो. त्याचा उपयोग आम्ही साबणाचे फुगे करायला करत असू. तसेच तो देठ मधून तोडून त्यातून जोरात फूंकल्यावर पिपाणी सारखा पण नाजूक आवाज यायचा. मग आश्या ३-४ पिपाण्या करून एकदम वाजवायच्या. मजा यायची. Happy

छान माहिती दिलीयं तुम्ही बुचाच्या झाडाची आणि फुलांची. आमच्या कॉलनी मध्ये हि फुलझाडे मोठ्या प्रमाणात आहेत पण खरतरं मला त्यांचं नाव आज समजलं. हि नाजूक आणि सुवासिक फुले खरचं मनमोहक असतात.

साबणाचे फुगे उडवणे व पिपाणी करणे,

आमच्या इथे चौकात होते , ते पावसात वार्याने पडले , त्याचे कारण लेखात समजले

हे झाड अवचित भेटले.नाही म्हणजे ते तिथेच होते,माझ्या लक्षात खूप उशिरा आले.फुलांच्या घोसांनी डवरलेले झाड इतकी वर्षे नजरेआड राहिले.

छान माहिती देताहात एकेका झाडांची! सकाळी फिरायला गेले की येताना गोळा करून आणते काचेच्या वाटीत ठेवते मंद सुगंध घरात दरवळत राहतो.... परवाच बहिणीशी बोलताना ह्या फुलांची आठवण आली होती..... हायवेच्या कामात झाडं तोडलं ... फार वाईट वाटलं..

आमच्या शाळेबाहेर खूप झाडे होती बूचाची. तेव्हा त्याचे नाव पण माहीत नव्हते.
खूप आवडायची तेव्हापासूनच!

शीर्षक वाचून थोडी कन्फ्यूज झाले. कोणीतरी व्यक्ति वाटलेली. Happy

मस्त माहिती
आमच्या बस स्टॉप पासून घराच्या वाटेवर एक झाड होते.रोज फुलं गोळा करायचो.याचे लांब देठ केसांच्या वेणी सारखे एकमेकांत रांगेत गुंतवून बिन दोऱ्याचा गजरा बनतो(पण देठाची मोडतोड होते)

हे एक माझ्या आवडिच्या फुलातिल फुल. याचा सुगंध खुप छान वाटतो. याच्या वेण्या गुंफुन केसांत माळायला फार आवडायचे. घराच्या जवळच ओळिने चार पाच झाडे होती. रस्त्यात मस्त पायघड्या पडायच्या.

छान माहिती. लेख आवडला.

आमच्याकडे कामला येणाऱ्या मावशींची मुलगी माझ्याच वयाची होती. ती रोज परकाराची ओटी भरून फुलं आणायची आणि त्याचा विणून गजरा करायची. जाताना तो गजरा माळून खुश होऊन घरी जायची. तेव्हापासूनची या झाडा-फुलांशी ओळख आणि सतत भेट. ऑफिसमध्ये लेडीज पार्किंगजवळ याचं एक झाड आहे. मी गाडी पार्क करून जाताना थोडी फुलं बरोबर नेऊन डेस्क वर ठेवते. संध्याकाळी गाडीच्या टपावर पडलेली फुलं गोळा करून गाडीत ठेवते. त्यामुळे याचा मंद सुगन्ध सतत जाणवत रहातो. कधी कधी घरी असताना नुसत्या आठवणीने सुद्धा.

मुंबईत हा जास्त दिसला नाही; रॅदर नाहीच. ह्याला मी एस्सेलवर्ल्डमधे पहिल्यांदा बघितले. त्यानंतर नाशिकमधून सापूताराला जाताना मधेच कुठेतरी.
गगनजाई छान नाव आहे.

कसं दिसेल बूच मुंबईत?
ते पुण्यातलं म्हणजे खडकी कँटोनमेंटमधून आलं. तिथे होता एक इंग्लीश अधिकारी ,त्याचं नाव बूच. त्याने ब्रम्हदेश -म्यानमारमधून इथे येताना आणून लावलं आणि त्याला पुतं फार आवडलं. पुणेकरणींनाही फार आवडलं. मग त्या झाडाचं नावच बूच पडलं. बूच'चं झाड. बूचाचं झाड, बूच.
माझ्या काकांनी सांगितलेली गोष्ट आहे. लहानपण तिकडे गेलं. इकडे तिकडे सुटीत मुलं हिंडत तेव्हा हे सापडलं.

अशी झाडं जंगलातच किंवा वन क्षेत्रातच वाढतील का मग लावली नाही गेली तर... आमच्या इथे रस्त्याच्या कडेला दोन वृक्ष आहेत पण बाजूने डांबरी रस्ता. बरेच वर्षात नवीन रोप नाही आले.

माझ्या पहिल्या वाहिल्या क्रश ला खूप आवडायची
तिच्यासाठी म्हणून कितीतरी वेळा ओंजळ ओंजळ नेली आहेत ही फुले
आता कधी ही फुले दिसली की ते सुगंधी दिवस आठवतात