शब्दसामर्थ्य

Submitted by मंगलाताई on 20 June, 2020 - 07:12

WhatsApp Image 2020-06-20 at 3.23.46 PM_0.jpeg

'अहो शब्दाला किंमत असते की नाही ' खरे आहे ,शब्दाला किंमत असते.
शब्दाला जागला, शब्द जपले ,शब्दाने शब्द वाढणे ,शाब्दिक खडाजंगी, शब्द दिला होता, इत्यादी वाक्प्रचार आपल्या कानावर पडतात . बोलता-बोलता वाक्प्रचार वापरणे आणि शब्द सौंदर्य वाढविणे हे नकळत होऊन जाते. शब्द सौंदर्य वाढवतात, भाषेतील अलंकार आहेत ते. भाषेला नटवने, सजवने, शब्दांचे काम आहे .शब्दांच्या मागच्या पुढच्या स्थानावर सारे काही अवलंबून आहे.
गेला का तो बागेत ?
का, गेला तो बागेत ?
का ? तो बागेत गेला.
यात शब्दाचे स्थान बदलले अर्थ बदलला. शब्दांच्या स्थान बदलल्याने जसा अर्थ बदलतो तसा शब्द आपल्या जागी चपखल बसल्याने ही वाक्याला किंवा बोलण्याला फार अर्थ प्राप्त होतों .
' ही गौरवास्पद बाब आहे ' या वाक्यात ' 'गौरवास्पद ' ऐवजी 'अभिमानास्पद 'वापरून वाक्य तयार होते ,पण एखाद्या गोष्टीचा गौरव वाटणे आणि अभिमान वाटणे यात फरक आहे. म्हणून त्याठिकाणी तोच शब्द चपखल बसला असे म्हटले जाते.
शब्दांची उलटापालट केली तर होणारे अनर्थ होतात बघा . 'च' लावल्याने बदलणारे अर्थ .
" हा आहे तो मानवी अवतार "
" हाच आहे तो मानवी अवतार "
" हा आहेच तो मानवी अवतार "
" हा आहे तोच मानवी अवतार "
" हा आहे तो मानवीच अवतार "
'असे ' लावल्याने होणारे अर्थ बद्दल पाहूया ,
" असे या जवळ इकडे बसा "
" या जवळ असे, इकडे बसा "
" इकडे या ,असे जवळ बसा "
प्रत्येक वाक्यातला ' असे ' लावल्यामुळे भाव बदलला .
नको चे स्थान बदलल्याने अर्थ बदलतो.
" नको नको ,हा नवरामुलगा नको मला "
" हा नवरामुलगा मला नको " पहिल्यात थोडा लाडिक नकार आणि दुसऱ्यात स्पष्ट नकार . ' नको मला ' आणि ' मला नको ' दोन शब्दांचे अर्थपूर्ण वाक्य मोठ्या वाक्यांचे काम करून जातात. ' नको मला ' म्हणजे सहज नकार पण ' मला नको ' म्हणजे स्पष्ट नकार. ' जेवून आलात '? याचा अर्थ जेवून आलात का ? जेवून आलात तर बरे झाले . जेवून आलात तर आता काही करायची गरज नाही.
जेवून आलात सुटलो आम्ही.
अशाप्रकारे शब्दांवर जसा भर दिल्या जाईल तसा जाईल तसा अर्थ निघेल . शब्दांच्या उच्चारणां वर भाव लपलेला असतो .तेच शब्द पण वेगवेगळ्या खाक्यात उच्चारले तर अर्थ वेगळा निघतो.
" हो फार हुशार आहे तो "- खरी खरी तारीफ . " हो फारच हुशार आहे तो "-अती शहाणा हुशार "हो ! फार हुशार आहे तो "? त्याच्या हुशारीचा प्रश्न . " हो फार हुशार आहे तो " साधारण वाक्य.
शब्दांची गंमत शब्दांशी खेळल्यावर कळते. शब्दखेळ, शब्दसिद्धी, शब्दांच्या भेंड्या शब्दकोडी ,चित्रांवरून शब्दरचना इत्यादी अनेक प्रकार आहेत. विरामचिन्हे तर फार मोलाची आहे शब्दांच्या प्रयोजनात . शब्दांच्या अफरातफरी मुळे फार मनोरंजन होते कधी- कधी अनर्थ होतो . एकदा मराठी तिसरीच्या पेपरला अर्धी म्हण पूर्ण करायला दिली होती.
'------------------- गुळाची चव काय '
रिकाम्या जागेत गाढवाला लिहिण्या ऐवजी आईला ,बाबांना ,वाघाला ,हत्तीला ,मुंगीला, मधमाशीला असे लिहिले होते. तुम्ही प्रत्येक शब्द ठेवून वाचून बघा हसायला येईल .काहिंनी वाक्यातील शब्दक्रम बदलला जसे ' गुळाची चव काय ? गाढवाला ' गुळाची' चव काय'
चव काय ? गुळाची '
खालच्या दोन्ही वाक्यात गाढवाला न लिहिल्यामुळे वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. एकाने तर ' गाढवाला काय ? 'एवढेच लिहिले होते .कधीकधी शब्दलेखन डावीकडून उजवीकडे करत गेले आणि उजवीकडून डावीकडे करत आणले तरी त्याचा अर्थ सारखाच मिळतो .उदाहरणार्थ
चिमा काय कामाची.
तो कवी डालडा विकतो.
शब्द बोलण्याची रंगत वाढवतात ,शब्दाला धार येते मग शब्द शस्त्रही बनतात. शब्द अनपेक्षितपणे वापरले तर हास्यविनोद निर्माण होतो यातूनच जोक तयार होतात . कधी मनात येतं शब्द निर्मिती कशी झाली असेल. पहिला शब्द कसा तयार झाला असेल .आपण शब्द किती सहज वापरतो शब्द निर्मिती मात्र कधीच करीत नाही .कधी कधी एखादा इकडचा तिकडे फिरवून वापरतो . वस्तूंना पदार्थांना नामे दिलेली आहे ती योग्य की अयोग्य असा विचार कधी मनात येत नाही. पूर्वापार शिकत आलेले शब्द आपण तसेच्या तसे वापरतो. झाडाला झाड म्हणतो आणि सूर्याला सूर्यच म्हणतो. तत्सम आणि तद्भव एवढ्यावरच आपण थांबतो. आपल्या पूर्वजांचे फार उपकार आहेत आपल्या वर . आपल्याला भाषा आणि लिपी दिल्यामुळे मानवाची प्रगती एवढी झाली . नाही तर आज आपण कुठेतरी मागेच राहिलो असतो.
बरे आपल्या मराठी भाषेत तर बारा कोसावर बोली बदलते, लहेजा बदलतो ,शब्द फेकण्याची ढब बदलते तरीही प्रत्येक भाषेचा गोडवा कायम आहेच. शब्द निर्मितीप्रक्रिया किती समृद्ध असेल पूर्वजांची . शब्दांचे सामर्थ्य इतके आहे प्रत्येक शब्दात की ज्याचे काम तेच करतात.
शब्द मालिका, शब्द वेळ, शब्द शलाका ,शब्द मंजिरी ,शब्द बहार ,शाब्दीक मार,शब्दसुमनांनी स्वागत आणि शब्दच शब्द .किती शब्द अगणित शब्द . मनुष्य आपल्या आयुष्यभरात एवढे शब्द शिकतो त्यातले 50% तीन ते सहा वर्षेपर्यंत शिकतो आहे की नाही गंमत .म्हणून मुलांना शब्दसंपत्ती द्या, भरपूर बोलू द्या त्यांना ,खर्च करू द्या शब्द .आपल्या भूमीत काही कमी नाही शब्दांची ,बोलीभाषांची लोकभाषेची आणि राज्य भाषेची.
ज्या शब्दांचा काही अर्थ नसतो ते शब्द वापरताना त्रास होतो लक्षात राहत नाही. उदाहरणार्थ ,कचकपले, तपरतत, नसकदन, रतनफ यांना काही अर्थ नाही . असे शब्द ऐकून हसू येतं. मुलं भाषा शिकतांना वस्तू बघतो मग शब्द उच्चारतो .लहान मुलं बोलू लागले की कोण कौतुक असते आपल्याला, पुढे तोच मुलगा बोलू लागला तर अभ्यासात हुशार आहे असे म्हणतो ,आपण आणखी पुढे बोलत असला तर प्रभावी बोलतो असं म्हणतो आपण आणखी पुढे बोलू लागला तर वक्ता आहे असं म्हणतो आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन बोलू लागला तर प्रभावी वक्ता आहे असं म्हणतो. एकूण काय सगळा शब्दांचा खेळ आहे.
शब्द भल्या भल्यांची वाट लावतात , जिव्हारी लागतात , जन्मात त्याच्या खुणा विसरणार नाही एवढे मनावर घट्ट बसतात . हळुवार शब्द सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. शब्द विकत घ्यावे लागत नाही मग आम्ही चांगले शब्द घेण्याची, वापरण्याची कंजूषी का करावी ? आपल्या शब्द भांडारात साठा वाढवून त्यातून हळूहळू एकेक शब्द अलंकार याप्रमाणे काढावे आणि योग्य तिथे द्यावे उधळून . मितभाषी सर्वांना प्रिय होतो . कटू शब्दाने केलेले घाव विसरल्या जात नाही . मृदू शब्दांचा वापर नवे मित्र जोडतो आप्त जोडतो
शब्दांची चोरी होते ,शब्दांनी भांडण होते, शब्दाने शब्द वाढतात पण त्याचा फायदा नाही कारण व्याजही नाही आणि मुद्दलही नाही. शब्दांची रणकंदन माजते, शेवटी महाभारता सारखी गत होते .कोणी उरत नाही. शब्दांचा सडा पडतो तर सगळे नाहुन निघतात. शब्दांच्या राशी समृद्ध वक्तव्य घडवून आणतात. शब्दांच्या पावसात चिंब भिजावे ,शब्दांचा नादमधुरपणे ऐकावा ,शब्दांची जादू पेरीत जावी, शब्द शर्करा उधळीत जावी .शब्द सूरांचे संगीत ऐकावे. शब्दांनी मान वाढवावा इतरांचा. शब्दांनी समृद्ध करावे भाषेला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वालाही शब्दांचा साज चढवावा .शब्दांना शस्त्र म्हणतात पण आपल्याला शस्त्रांची गरज नाही .शब्दांना धन म्हणतात मग आपल्याला ते वाढवावे लागेल .शब्दधन कोण चोरणार आहे कोणीच नाही. शब्दांची तयार करू पेढी चला घडवू आपली पिढी.
शब्द अर्थपूर्ण आहे
अर्थ शब्दरुप आहे
रुप शब्दबद्ध आहे
शब्द रंगहीन आहे
शब्द गंधहीन आहे
पण शब्द अर्थपूर्ण आहे .
शब्द सामर्थ्य आहे
शब्द शस्त्रची भासे
शब्द वापराची खासे
शब्द जोडताती नाती
शब्द नको अवडंबर
शब्द बोला हळूवार .
शब्द चावीसारखे असतात , कधी कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान Happy

माझ्या बहिणीचे व्याकरण कच्चे होते.
मराठीचा पेपर घरी आला की आमचे हसणे सुरु व्हायचे, म्हणी तर दिव्य लिहायची
'साखरेचे खाणार......' आमच्या बाईसाहेबांनी पुढे लिहीले.. 'मीठाचे गिळणार' Biggrin
'तळे राखील ...तो गुराखी' असे बरेच....