देव

Submitted by Asu on 28 June, 2020 - 10:08

देव!
‘देव’ या संकल्पनेबद्दल खूप मतमतांतरे आहेत. कुठलंही मत मान्य नसलं तरी त्याबद्दल परमतसहिष्णुता ठेवून आदर असावा.
मी माझ्या अल्प बुद्धीनुसार काही विचार मांडत आहे. सर्व वाचकांना नम्र विनंती की, हे माझे वैयक्तिक विचार आहेत. कुणाच्याही विचारांचा अनादर करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. माझे विचार कुणाला पटतील किंवा कुणाला पटणारही नाहीत. ते सगळ्यांना पटावे हा माझा आग्रहही नाही. मी स्वतःशीच केलेलं हे विचारमंथन आहे. ते तुमच्यापुढे मांडतो. पटलं तर घ्यावं नाहीतर सोडून द्यावं.

आस्तिकवादी विचार-
माझ्या मते माणूस देवनिर्मित नसून देव मानवनिर्मित आहे. मानवाला सुचलेली सर्वात सुंदर व उपयुक्त कल्पना म्हणजे देव! 'देव' या कल्पनेचा विचार करण्याआधी आपण 'धर्म' या संकल्पनेचा विचार करूया. कारण त्यातूनच पुढे 'देव' या संकल्पनेचा विचार आला असावा.
आदिकाळात सुरुवातीला रानटी अवस्थेत माणूस भटक्या होता. स्वतःचं पोट भरणं आणि स्वसंरक्षण करणं या त्याच्या प्राथमिक गरजा होत्या. हे करत असतांना निसर्गतः वंशसातत्य घडून येत होतं. नंतर शेतीचा शोध लागल्यावर माणसाचा भटकेपणा जाऊन तो एका ठिकाणी स्थिर झाला. एका ठिकाणी स्थिर झाल्यावर समाजाची निर्मिती झाली. कारण त्याच्या लक्षात आलं की, एकट्यानं राहण्यापेक्षा समुदायात म्हणजेच समाजात राहण्यानं पोट भरणं आणि संरक्षण करणं म्हणजेच जिवंत राहणं जास्त सोपं जातं. तसंच कामाची विभागणी करून सर्व कामं एकट्यानंच करण्यापेक्षा विशिष्ट काळात विशिष्ट गटानं केल्यास ते जास्त कुशलतेनं होऊ शकतं. परंतु एकत्र राहिल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले. एकाच ठिकाणी राहिल्यानं वंशशुद्धीच्या हेतूनं कुटुंबव्यवस्था निर्माण झाली. नंतर शेती व स्त्री वरून मालकी हक्काची भावना निर्माण झाली. हक्क व कर्तव्याच्या परस्परविरोधी जाणिवांमुळे समाजात गोंधळ निर्माण झाला. कारण माणसाला हक्क तर हवे असतात पण दुसऱ्यासाठी स्वतःहून काही करण्याची भावना मूलभूत नसते. म्हणून मग समाज धरून ठेवण्यासाठी 'धर्म' या संकल्पनेचा उदय झाला. समाजातील श्रेष्ठ विचारवंतांनी एकत्र येऊन समाजात वागण्याचे नियम तयार केले. तेच म्हणजे धर्म. सगळ्या समाजासाठी चांगलं काम ते धर्म व समाजासाठी वाईट काम ते अधर्म. यालाच आपण धर्म म्हणजे पुण्य किंवा नीती व अधर्म म्हणजे पाप किंवा अनीती असेही म्हणतो. सर्वांनीच पुण्याचं काम करावं असं जरी अपेक्षित असलं तरी व्यक्ती तेवढ्या प्रकृती या न्यायाने समाजात पाप करणारे सुद्धा असतातच. धर्माने जरी नीतीने वागणुकीचे नियम करून दिले असले तरी ते समाजातील सर्व लोक पाळतीलच असे म्हणता येत नाही. त्यांच्यावर वचक असावा म्हणून 'देव' या कल्पनेचा बागुलबुवा निर्माण केला गेला असावा. आपण काय करतो हे देव बघत असतो व आपल्या पापपुण्याची नोंद ठेवत असतो, त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं असं धर्मात सांगितलं गेलं. थोडक्यात माणसानं नीतीने वागावं यासाठी देवाची भीती दाखविली गेली. म्हणून मग तो प्रसन्न व्हावा व आपल्याला चांगलं फळ मिळावं म्हणून त्याची पूजाअर्चा करण्यासाठी कल्पनेतला अमूर्त देव मूर्तीरुपात अवतरला. त्याची मंदिरं झाली. निसर्गातील ज्या ज्या गोष्टी त्यावेळी अगम्य वाटत होत्या त्यांचा आपल्यावर कोप होऊ नये या भीतीपोटी त्यांना देवपण देण्यात आलं असावं. उदा. सूर्यदेव, पावसाचा देव म्हणजे इंद्र वगैरे वगैरे.
वेगवेगळे समाज भौगोलिकदृष्ट्या एकत्र येऊन त्यांच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळे धर्म निर्माण झाले. सर्व धर्मांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्यांच्या नीतिनियमात फरक आढळून येतात. परिस्थितीनुसार व काळानुसार त्यात बदल होत जाणं हे त्या समाजाच्या प्रगतीचे लक्षण असतं. परंतु एका धर्मातील नीतीचे नियम दुसऱ्या धर्मात अनीतीचे ठरु शकतात. किंवा काळानुसार नीती-अनीतीच्या कल्पनाही बदलू शकतात. शेवटी, समाज धारण करतो तो धर्म! मानवसमाज एका ठिकाणी समुदायाने राहायला लागल्यावर वंशसातत्य व वंशवृद्धीसाठी स्त्रियांवरील मालकीवरून वाद निर्माण झाले. रानटी अवस्थेत कदाचित स्त्री आणि पुरुष हेच नातं असावं. आतासारखी नाती नसावीत. त्यामुळे रानटी अवस्थेत स्त्री पुरुष संबंध अनिर्बंध व बळी तो कान पिळी या नियमानुसार असावेत. पण समाजात एकत्र राहायचे ठरवल्यानंतर त्यावर बंधने आलीत. त्याकरिता स्त्री-पुरुष संबंधांचे उदात्तीकरण होऊन लग्न ही संस्था अस्तित्वात आली. पण धर्मानुसार त्यातही फरक आहेत. हिंदू धर्मात चुलत बहीण भावांचे विवाह निषिद्ध आहेत. तर इतर काही धर्मात त्याला मान्यता आहे. अर्थात हा त्या त्या धर्माचा प्रश्न आहे. आपल्या आईवडिलांच्या काळात स्त्री-पुरुषांनी सर्वांच्यासमोर बोलणं देखील अनैतिक समजलं जात होतं. आता स्त्रीपुरुष दोघं खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतात, वावरतात कारण काळाची ती गरज आहे.

आस्तिकवादी विचारांचा चांगुलपणा-
आस्तिकवादाचा पूर्ण डोलारा हा देव या संकल्पनेवर आधारित आहे. देव ही जरी कल्पना असली तरी या काल्पनिक विचारावर जगाचा केवढा मोठा डोलारा उभा आहे. धार्मिक ग्रंथ, वेद पुराणं इतर साहित्य, धर्मसंस्था, प्रार्थनास्थळं त्यांचा कारभार, पूजाअर्चा, तीर्थयात्रा वगैरे वगैरे. देव या कल्पनेवर जगात किती अवाढव्य व्यवहार होतात! कुठल्याही एका मंदिराचे उदाहरण आपण घेतलं तरी ते आपल्या लक्षात येईल. तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा, कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. मध्यंतरी आलेल्या 'देऊळ' या सिनेमात समाजातील लोकांचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध देवळाभोवती कसे गुंतलेले असतात हे खूप सुंदररित्या दाखविलेले आहे.
जगातील लाखो लोकांचं आयुष्य देवाच्या भरोश्यावर चालू असतं. देव आपल्या पाठीशी आहे. तो आपलं भलं करील हा भावनिक आधार संकटाच्या वेळी माणसाला लढायचं बळ देतो. म्हणूनच देव ही जरी कल्पना असली तरी ती अस्तिकवादी माणसाला खूपच उपयुक्त आणि जगण्याला आधार देणारी ठरते. त्यामुळे देव नाही असं म्हणून या अस्तित्ववादी लोकांच्या जीवनाचा भावनिक आधार आपण काढून घेऊ नये असं मला वाटतं. एखादी गोष्ट काल्पनिक असेल, त्यामुळे कुणाचं नुकसान न होता कुणाचा फायदाच होणार असेल, तर ती गोष्ट चांगली समजली पाहिजे. अज्ञानात कोणाला सुख मिळत असेल तर आपण का हिरावून घ्यावं.
देव या कल्पनेचा आणखीन एक फायदा असा की, पापभीरूपणामुळे समाजातील वाईट कृत्यांना थोडाफार का होईना आळा बसतो. आयुष्यातील अनेक वाईट गोष्टींची माणसाच्या मनात भीती उत्पन्न झाली, चांगलं वागण्याची त्याला प्रेरणा मिळाली.

पुनर्जन्म व मरणोत्तर आयुष्य-
पुण्य केल्याने स्वर्ग मिळतो व पाप केल्याने नरकात जावं लागतं ही अस्तिकवादातील कल्पना माणसाला त्याच्या प्राप्त आयुष्यात चांगलं वागण्याची प्रेरणा देते. तसंच मेल्यानंतरही आयुष्य संपत नाही. या विचाराने सुद्धा मरणाची भीती कमी होते. पुनर्जन्माचंही तसंच आहे. मेल्यावर आपलं अस्तित्व संपतं असं नव्हे तर पुन्हा आपला पुनर्जन्म होऊ शकतो, या भावनेनंही मरणाची भीती कमी होते. तसंच चांगलं वागलं तर पुढचा जन्म चांगला मिळतो या आस्तिकवादातील विचाराने चांगलं वागण्याची प्रेरणा मिळते.

आस्तिकवादी विचाराचा चुकीचा अर्थ-
आस्तिकवादात एक विचार आहे की आपलं आयुष्य हे देवाने पूर्वनियोजित केलेलं असतं त्याप्रमाणेच ते घडतं. आपण फक्त कठपुतली आहोत. दोऱ्या मात्र त्याच्या हातात असतात. तसं असेल तर मग आपण जगण्यासाठी काही करायची जरूरीच नाही. असा निष्क्रियतावादी विचार माणसाच्या मनात येऊ शकतो. परंतु अस्तिकवादातील हा विचारच चुकीचा आहे. असं मला वाटतं. परमेश्वर तुमचं आयुष्य घडवत नाही. तुमचं विहित कर्म तुम्ही केलंच पाहिजे. तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्हीच असता. परमेश्वर तुम्हाला कर्म करण्याची संधी निर्माण करून देतो. हातपाय तुम्हीच हलवायचे असतात. चांगल्या मार्गाने जायचं की वाईट हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. हे मात्र परमेश्वर वरून बघत असतो. म्हणजे देव तुमच्याकडून कार्य घडवून आणतो. ते कसं घडवायचं हे तुम्ही ठरवायचं.
काहीजण विचारतात की, धर्मग्रंथ व धर्माचे अनुयायी म्हणतात की ईश्वर सर्वेसर्वा आहे, सर्व चांगल्या वाईट गोष्टींना तोच जबाबदार आहे. तर मग स्त्रियांवर बलात्कार, निष्पाप लोकांच्या हत्या, भूकबळी, दुष्काळ, हिटलर, स्टॅलिन व माओ यांनी केलेले निष्पाप लोकांचे हत्याकांड हे सगळं परमेश्वराच्या संमतीनेच घडतं का?
याबद्दल बोलायचं तर धर्मग्रंथ व धर्माचे अनुयायी यांचे विचार आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे अस्तित्ववादी विचारानुसारच असतात. म्हणूनच ते म्हणतात की देव सर्वेसर्वा असतो. खरं म्हणजे, धर्मश्रेष्ठांनी स्वतःच्या स्वार्थासाठी देवाचे अवास्तव स्तोम माजविलेलं दिसतं. म्हणजे पर्यायाने धर्मश्रेष्ठांनाच महत्त्व येतं. देव तर अशी कोणी व्यक्ती नाही. हे म्हणजेच देव, फारतर देवाचे प्रतिनिधी. ते म्हणतील तेच देव म्हणतो. त्यामुळे देवाशिवाय पानही हलत नाही हे म्हणणं बरोबर नाही. अगदी आस्तिकवादाच्या दृष्टीने विचार केला तरीही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे की, युद्ध करणं हे तुझं विहित कर्तव्य आहे. अर्जुनाऐवजी कृष्णाने युद्ध केलं नाही. ते अर्जुनालाच करावं लागलं. अर्जुनाच्या कृत्याचे फायदे तोटे हे फक्त श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितले व निर्णय त्याच्यावरच सोपवला.
थोडक्यात आयुष्याच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परमेश्वर देतो. उत्तरं तुम्हीच शोधायची असतात. त्यावरून परमेश्वर तुम्हाला पापाचे किंवा पुण्याचे गुण देतो. ते तुमच्या खात्यात जमा होतात.

आस्तिकवादी विचारांचा फोलपणा-
समाजात वावरताना आपण बघतो की, सत्ता आणि मत्तेने धुंद झालेले दुष्ट लोक कितीही दुष्टपणाने वागले तरी त्यांचं वाईट झालेलं दिसत नाही. उलट भरभराटच झालेली दिसते. न्याय सुद्धा सत्तेने दडपता येतो किंवा पैशाने विकत घेता येतो. तसेच सुष्ट लोक कितीही चांगले वागले तरी, त्यांचं वाईट होत नसेल कदाचित, पण फारसं चांगलं झालेलंही दिसत नाही. मग देव कुठे जातो? त्याला हे दिसत नाही का? काही पापभिरू माणसं म्हणतील एखाद्या दुष्टाने गरीबाचा खून केला म्हणून त्याचा तरुण मुलगा मेला. देवाने त्याला शिक्षा केली. परंतु ही तर निसर्गात घडणारी नेहमीची क्रिया आहे. कुणीतरी कधीतरी मरणारच! असा तरुण मुलगा एखाद्या पुण्यवंताचाही मरू शकतो. म्हणजे एखाद्या घटनेचा अर्थ आपण आपल्या वृत्तीनुसार लावू शकतो. अर्धा प्याला भरलेला म्हणायचा की अर्धा प्याला रिकामा, त्याप्रमाणे.
मंदिरात देवाच्या मूर्तीसमोर आठ वर्षाच्या अजाण बालिकेवर पोलिसांसह इतर अनेक जण सतत आठ दिवस बलात्कार करून तिला मारून जंगलात फेकून दिलं तेव्हा का देव झोपलेला होता. खरं म्हणजे आस्तिकवाद्यांच्या दृष्टीने त्या दगडात देवाचा भाव असतो. म्हणून त्यांना असा प्रश्न पडतो. परंतु बलात्काऱ्यांच्या दृष्टीने ती मूर्ती म्हणजे एक दगडच! ते निंदनीय कृत्य करण्यासाठी तो दगडाचा फक्त एक आडोसा! आणि तेच खरं आहे. नाही तर देवाने तिथेच बलात्काऱ्यांचा जीव घेऊन त्या बालिकेला वाचवलं असतं. असं झालं नाही आणि होतही नाही. देव ही आपली भाबडी कल्पना आहे. माणसाच्या भाबडेपणाला मर्यादा नाहीत. देव आपल्याप्रमाणे खातो म्हणून आपल्याला जे जे आवडतं त्याचा त्याला नैवेद्य! म्हणजे अगदी पंचपक्वानांपासून दारु व मटणापर्यंत! त्याला भारी भारी कपडे दागदागिने. देवाचं झोपणं, उठणं, त्याची आंघोळ यावरून हेच दिसतं की हे सर्व काही माणसानंच ठरवलं आहे.
दुसरी गोष्ट नवसाबद्दल. एखादं काम होण्यासाठी नवसाची लाच (मानव स्वभावानुसारच) दाखविली जाते. एखादी गोष्ट होईल किंवा नाही होणार याच्या दोनच शक्यता असतात. म्हणजेच ५०-५० टक्के संधी. काहीही होऊ शकतं. काम नाही झालं तर त्याबद्दल कुणी एका शब्दानेही बोलत नाही. पण झालं तर मात्र देव पावला म्हणून गवगवा. देवाला बक्षीस, लोकांना जेवण आणि काय काय. काम झालं म्हणून तो देव जागृत ठरतो. काम नाही झालं म्हणजे तेव्हा देव झोपला होता? त्याचं उत्तर मात्र कुणीही देत नाही.
असो! देव ही जरी कल्पना असली तरी ती समाजाच्या भल्यासाठी आहे. जनतेच्या देवभोळ्या भक्तीचा गैरफायदा घेऊन तिची लूट करू नये, व्यापार होऊ नये हीच अपेक्षा! देव खोटा असला तरी त्यामुळे मिळणारा मानसिक आधार खरा असतो. हा अधिकार काढून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही.

नास्तिकवादी विचार-
देव आहे की नाही हे मानणं हे ज्याच्या त्याच्या वैचारिक कुवतीवर व भावनांवर अवलंबून असतं. एखाद्या देवभोळ्या माणसाने जर मला विचारलं की देव असतो का? तर मी सांगेन की हो देव असतो. देव ही कल्पना आहे, हे त्याला कितीही प्रकारे समजावून सांगितलं तरी ते त्याला पटणार नाही. आणि पटलं तरी फायद्यापेक्षा त्याचं नुकसानच होण्याची जास्त शक्यता आहे. भावनिकदृष्ट्या तो पांगळा होईल. परंतु हाच प्रश्न मला एखाद्या तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या बुद्धिनिष्ठ माणसाने विचारला तर मी सांगेन, देव नसतो. कारण देव ही एक कल्पना आहे हा विचार त्याला पटू शकतो. तेवढी त्याची वैचारिक कुवत असते. हा विचार पटल्याने त्याचा फायदाच होईल. कारण प्रत्येक गोष्ट मग तो बुद्धीच्या कसोटीवर पारखून घेऊनच स्वीकारील व खोट्या कल्पनांच्या आहारी जाणार नाही.
नास्तिकवादी विचारानुसार देव अस्तित्वात नाही. कारण त्याचं अस्तित्व कुठेच जाणवत नाही. तो पाप्यांना शिक्षा देत नाही किंवा पुण्यवंतांना बक्षीस देत नाही. उघड्या डोळ्यांनी तो अन्याय, अत्याचार बघतो. देव अस्तित्वात असता तर त्यानं हे सहन केलं असतं का?
एखाद्याचं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या नुकसान करणं म्हणजे पाप. आणि त्याच्या उलट म्हणजे पुण्य! अशी पाप-पुण्याची साधी सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. पाप्यांना शासनव्यवस्था व न्यायव्यवस्था शिक्षा करू शकतात. देव शिक्षा करतो असं म्हणणं काही पटणारं नाही.
फार तर आपण म्हणू या की निसर्ग म्हणजेच देव. मनुष्यप्राणी हा निसर्गाचाच एक घटक आहे. आणि म्हणूनच आपण कदाचित म्हणत असू की, प्रत्येक प्राण्यात ईश्वराचा अंश असतो. निसर्गनियमानुसार हे सृष्टीचक्र चालत असतं. निसर्गात माणसासहित प्रत्येक घटकाचं जीवितकार्य हेच आहे की, हे सृष्टीचक्र चालण्यासाठी व ते जास्तीत जास्त उन्नत करण्यासाठी प्रयत्न करणं आणि हे आपलं विहित कार्य झाल्यावर बाजूला होणं. ज्या पंचतत्वातून आपली निर्मिती झाली आहे त्या पंचतत्वातच विलीन होणं. मेल्यावर सजीव संपतो का? तर नाही. आपल्या पुढच्या पिढीच्या रूपानं आपण मेल्यानंतरही अस्तित्वात राहतो. या नाकाम शरीराचा निसर्गाला उपयोग नसतो. ते निसर्गात विलीन होतं.
निसर्गातील प्रत्येक घटनेमागे कार्यकारणसंबंध असतो. म्हणजे प्रत्येक कार्यामागे काहीतरी कारण व उद्देश असतोच. तसंच कार्य होतांना कार्य करणारा व ज्याच्यावर कार्य होतं तो असे दोन घटक असतात. कार्य करणारी एक व्यक्ती किंवा समुदाय असेल. तसंच ज्याच्यावर कार्य घडतं तीही एक व्यक्ती किंवा समुदाय असू शकतो. होणाऱ्या घटनेचे चांगले-वाईट परिणाम मात्र दोघांनाही भोगावे लागतात. थोडक्यात आपणच आपलं भाग्य ठरवत असतो. व चांगल्या-वाईट कृत्याला आपणच जबाबदार असतो. व्यक्ती तेवढ्या प्रकृती या न्यायानं व परिस्थितीमुळे चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक समाजात असतात. आपापल्या वृत्तीनुसार ते चांगलं वा वाईट कार्य करत असतात. उदा. स्त्रियांवर बलात्कार, निष्पाप लोकांच्या हत्या, भूकबळी, दुष्काळ, हिटलर, स्टॅलिन व माओ यांनी केलेले निष्पाप लोकांचे हत्याकांड या सगळ्या गोष्टींमागे निसर्गनियमानुसार कार्यकारणसंबंध आहे व त्या गोष्टी मानवनिर्मितच आहेत. या प्रत्येक घटनांमधील कार्यकारणसंबंधांचा उहापोह करता येईल. पण विस्तारभयास्तव तो टाळला आहे. यातील खून, बलात्कार या घटनांविरुद्ध कायदे आहेत. पण त्यातून न्याय मिळेलच याची खात्री नाही. तसेच भूकबळी, दुष्काळ याला बरीचशी आपली सडलेली व लाचखोर शासन व यंत्रणा जबाबदार आहे. हुकूमशहांचा वैयक्तिक स्वार्थ, अहंपणा युद्ध आणि हत्याकांड यांना जबाबदार आहे. म्हणजे सरतेशेवटी या सगळ्यांना माणूसच जबाबदार आहे ना?

आस्तिक की नास्तिक?-
देवाचं अस्तित्व जरी मी मानत नसलो तरी देव ही कल्पना अस्तित्वात असावी असं मला नक्कीच वाटतं. त्यादृष्टीने नास्तिकवादी असलो तरी मी मंदिरात जावं लागलं तर नाकारणार नाही. देवाच्या मूर्तीलाही मी कधी तरी नमस्कार करीन. तसे देवाचे सणही मी साजरे करतो. कारण तसं केल्यानं माझ्या जवळच्या लोकांना आनंद होणार असेल आणि तसं वागण्यानं माझं काही नुकसान होणार नसेल तर असं वागायला मला वावगं वाटत नाही. शेवटी हा भावनेचा प्रश्न आहे. कुणी मानावा, कुणी मानू नये. आस्तिकवादाचा आणि नास्तिकवादाचा समन्वय साधायचा म्हटला तर मनात देव आणि हातात कर्तृत्व असावं.
समारोप करतांना पुन्हा एकदा सांगतो की हे माझे वैयक्तिक विचार आहेत. पटले तर घ्यावे नाहीतर सोडून द्यावे.
******
©प्रा.अरुण पाटील (असु)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults