तो बाप आहे !

Submitted by पुरंदरे शशांक on 26 June, 2020 - 03:03

तो बाप आहे !

तो बाप आहे — तुमचा, माझा... आपल्या सार्‍यांचाच !
आधी देहूग्रामी होता काही काळ, पण आता मात्र पार विश्वात्मक झालाय !

काही जण त्याला लांबूनच "बाप" म्हणून नमस्कार करुन सटकतात.
बाप गालात हसत असतो.

काही जण वाचायला जातात त्याचे अभंग — काय सांगून गेलाय हा, बघूया तरी !
अभंग वाचता वाचता आपल्या मनातील सोयिस्कर लेबले त्याला लावतात... रुढींवर घणाघाती घाव घालणारा समाजसुधारक कवि, तर कोणी म्हणे विद्रोही कवि, तर कोणी काय, कोणी काय.
बाप गालात हसत असतो !

त्याचे अभंग वाचताना काहींना मात्र त्याचे आर्त आकळते थोडे बहुत,
आता मात्र बाप लांब न रहाता त्यांना जवळ घेतो.

काही जण तर त्याचे अभंग वाचताना कळवळून त्यालाच विचारतात ,
आता तो बाप न रहाता आई होतो, तो लेकराला जवळ घेतो.

लेकरु झाल्यावर बापाला, नाही नाही, आईला रहावतच नाही... तो लेकरावर अशी माया करतो की त्या लेकराच्या जन्मदात्रीनेही केली नसेल..
लेकरु धडपडायला लागलं तर तो आधार देतो, धीर देतो..
लेकराची सगळी काळजी आता तो घेत रहातो, जोपर्यंत लेकरु त्याच्याकडेच आई.. बाप म्हणून धाव घेतं तोपर्यंतच !

लेकरुपण सुटायचा अवकाश, तो बाप त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही, तो मुळातच निःसंग आहे !
केवळ लेकुरभावाला प्रतिसाद म्हणून तो माय बाप झालाय एवढंच !

तो बाप आहे पण निःसंगच आहे.

तो कोणाकडेही तितक्याच निःसंगतेने पहातो, जितका त्याचा बाप जगाकडे पहातो.
अपवाद फक्त लेकराचा !

लेकराकरता मात्र तो दोन्ही बाहू पसरुन सदैवच उभा आहे.

तो मायबाप आहे.. तुमचा, माझा, आपल्या सर्वांचाच !

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
समोऽहं सर्व भूतेषु, न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय:।
ये भजन्ति तु मां भक्त्या,मयि ते तेषु चाप्यहम्।।
अध्याय ९/ श्लोक २९, श्रीमद्भगवद्गीता

सम मी सर्व भूतांस प्रियाप्रिय नसे मज
परी प्रेमबळे राहे भक्त माझ्यात त्यात मी ।। गीताई ।।

जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल

जय जय तुकोबा माऊली

.....................................................................

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे उत्कट.
आता मात्र बाप लांब न रहाता त्यांना जवळ घेतो.}} त्यानं असं जवळ घेणं हेच साधायचं. गाडगेबाबा म्हणत तसं "त्याचं होऊन जावं नि मग मजेत जगावं".