सारं काही आलबेल आहे..

Submitted by aksharivalay 02 on 10 June, 2020 - 07:02
ठिकाण/पत्ता: 
पुणे

आजकाल मुखात माझ्या
मी चा थोडा अतिरेक आहे
आरश्यातले सत्य टाळेन मी जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

माझ्या श्रेष्ठत्वाच्या काल्पनिक कथांवर
अनेकांशी माझी जवळीक आहे
विस्मरणशक्ती त्यांची अबाधीत जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

संवेदनशील व्यक्तिमत्व माझे
सेवेचा चढता आलेख आहे
खोट्या आसवांचा हिशोब द्यावा लागत नाही जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

अलोट गर्दी माझ्या मागे
उजेडात माझी प्रतिमा नेक आहे
अंधाराची भीती त्यांच्या हृदयात जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

भीतीयुक्त आदर, सन्मानाचा माझ्या
आसपास उत्तम समतोल आहे
मुखवट्यांची शिवण उसवणार नाही जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

बदनाम मी बिलकुल नाही
थोडासा बेईमान आहे
बेईमानी मनाच्या पिंजऱ्यात बंदिस्त जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

ढोंगी सत्कर्माचे साक्षीदार अनेक
कुकर्माचा साक्षिदार फक्त एक आहे
जोवर तो इमानी
तोवर सारं काही आलबेल आहे

वैभवाचा सडा अंगणी
उपभोग्य वस्तूंची रेलचेल आहे
संतुष्टी नाहीशी झालीये बाकी
सारं काही आलबेल आहे

माहितीचा स्रोत: 
स्वलिखित
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Wednesday, June 10, 2020 - 06:57
Group content visibility: 
Use group defaults

अलोट गर्दी माझ्या मागे
उजेडात माझी प्रतिमा नेक आहे
अंधाराची भीती त्यांच्या हृदयात जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

आहाहा! अप्रतिम!

Kamal....
अलोट गर्दी माझ्या मागे
उजेडात माझी प्रतिमा नेक आहे
अंधाराची भीती त्यांच्या हृदयात जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे..
Wah kya bat hai....