आरसा

Submitted by बिपिनसांगळे on 29 May, 2020 - 12:03

आरसा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्या आरशात असं काय होतं, कोणास ठाऊक ? पण फिरून अजित त्या आरशाकडे आला होता. ओढला गेल्यासारखा.
तो जुन्या बाजारात दुर्बीण घेण्यासाठी आला होता. मित्राने त्याला सांगितलं होतं की एखादी इम्पोर्टेड दुर्बीण तिथे स्वस्तात मिळून जाईल म्हणून.
जुना बाजार फुलला होता. तिथे जुन्या वस्तू मिळतातच. पण अलीकडे नव्या वस्तूसुद्धा. अगदी ब्रँड न्यू ! फर्स्ट कॉपी वगैरे. आणि तिथे काय मिळत नाही ? एकदा तर रेल्वेचं अख्खं इंजिन आलेलं विकायला. आणि अँटिक्स ! दुर्मिळ वस्तू. संग्राहकांच्या कलेक्शनमधल्या, संग्राहकांच्या कलेक्शनसाठी . कधी अशाच ,तर कधी चोरीच्या सुद्धा.
चप्पल-बूट, कपडे, ट्रंका , मोबाईल्स आणि तऱ्हेतऱ्हेचे स्टॉल्स पार करत तो चालला होता. प्रचंड उकडत होतं . लोकांनी त्यांच्या स्टॉल्सना वर प्लास्टिक टाकल्याने तर आणखीच . तो सारखा घाम पुसत होता . एके ठिकाणी एक बूढा चाचा बसला होता. तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू मांडून. दोनचार खराब दुर्बिणी, खराब होकायंत्र, खडे पडलेल्या बांगड्यांचा सेट, एक गंजका खंजीर, जुन्या काळातल्या भासणाऱ्या पण अलीकडच्या मूर्त्या. त्याला त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता.
त्या वस्तू खालीवर करताना त्याला एक आरसा दिसला . हातात धरण्याचा . काच स्वच्छ नसलेला. धातूच्या नक्षीदार फ्रेममध्ये बसवलेला. लंबगोलाकार .खाली हातात धरायला मूठ. सगळं मेटल काळवंडलेलं. घाणेरडा . त्या आरशाने स्वतःला आरशात पाहिलं असतं तरी त्याला नको झालं असतं !त्याने तो उचलला. त्याला त्याच्या स्पर्शाने एक मंदसा झटका बसला. त्याची नजर त्या आरशात गुंतली. गुंतूनच राहिली.
त्याला वाटलं, आपलं कातिल सौन्दर्य आणखी खुलवण्यासाठी, कुठल्या सुंदरीने तो वापरलेला असेल ? कुठल्या काळातला असेल तो, कोणास ठाऊक ?
सौदा जमला नाही. तो पुढे गेला. पण त्याला हवी तशी दुर्बीण मिळाली नाही. तो फिरता फिरता पुन्हा चाचाकडे आला.मनात कुठलाही विचार नसताना त्याने तो आरसा उचलला. चाचाची किंमत देऊन तो मुकाट घरी निघाला.
दुर्बीण म्हणजे लांबचं दाखवणारी काच आणि आरसा म्हणजे जवळचं दाखवणारी काचच !
पण आरसा फक्त आपलं जवळचं प्रतिबिंबच दाखवतो का ? ...
-----
त्याने आणलेला आरसा पाहून आईने डोक्यालाच हात लावला.
“ आई, कसला भारीये बघ. तुझ्यासाठी आणलाय. “
“ आता माझं आरशात बघून नटण्याचं वय राहिलंय का ?” आई आपल्या तरुण पोराकडे पहात म्हणाली .
त्यावर तो हसला ,”आई, पण आरसा हा फक्त बायकांसाठीच जन्माला आलाय असं मला वाटतं.”
त्यावर ती हसत म्हणाली , " अस्सं ? मग आरशात बघणारी घेऊन ये एखादी आता ! “
त्यावर त्याने विषय टाळला व तो बाथरूममध्ये घुसला.
त्याने तो आरसा लिंबू-मीठ चोळून घासला. त्याची पितळी फ्रेम आणि मूठ चमकायला लागली. त्याने काच ओल्या पेपरने पुसून घेतली. काच भारी होती. नितळ . आरसाच भारी होता ! अजितने त्यामध्ये पाहिलं. स्वतःच्या वाढलेल्या वळणदार केसांमधून हात फिरवला . स्वतःलाच एक डोळा मारून त्याने आरसा ठेवून दिला.
-----
सकाळी त्याने दाढीसाठी तो आरसा घेतला. टेबलवर तो आधाराने कसाबसा बसवला. आई त्याला हसली. पण त्याने लक्ष दिलं नाही तिच्याकडे.
बाबा टीव्हीवर बातम्या पहात होते. चॅनेल्स बदलताना मध्येच एक नवीन गाणं लागलं, पॅटरिनाचं.
त्याच्या मनात तिचा विचार आला आणि -त्याला आरशात पॅटरीना दिसली . खरी ! जिममध्ये वर्क आऊट करणारी .
निळ्या रंगाचा टी आणि टाईट्स घातलेली . विदाउट मेकअप. तरीही सुंदर दिसणारी !
तो चमकला. असं कसं काय ? छे ! आपल्याला फिल्मी दुनियेचं फारच वेड लागलंय , त्याला वाटलं .
आरशातली ती लुप्त झाली होती .
तो नाश्ता करायला बसला. पोह्याची डिश घेऊन त्याने पुन्हा आरसा हातात घेतला .त्याच्या मनात पुन्हा पॅटरीना आली .
अन आरशात ती दिसली की बया - पुन्हा !
ती तिच्या आलिशान बाथरूममध्ये शिरली होती . वर्कआऊटनंतरच्या अंघोळीसाठी .तिने तिच्या अंगातला तो घामेजलेला टी काढला अन -
अजितने पटकन डोळेच मिटले. त्यामुळे मिरचीचा घास त्याच्या तोंडात गेला . त्याच्या डोळ्यात पाणी आलं . ठसका आला .
आणि आरसा धाडकन खाली पडला .जोराचा आवाज करत.
त्याला वाटलं , झालं ! फुटला आता आरसा .
आईने त्याला पाणी दिलं . आरसा उचलला .
नशिब ! तो फुटला नव्हता.
-----
अजित एक चारचौघांसारखा मुलगा होता. मध्यमवर्गीय घरातला. चांगलीशी नोकरी करणारा .सगळ्या पोरांसारखी डोळ्यांत स्वप्नं असलेला .
पण सध्या ती विझलेला !...
रात्री त्याने आरसा घेतला . त्याने त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहिला . मग त्याची मूठ धरत, दोन हातांनी तो त्याला गोलगोल फिरवत राहिला. त्याला पुन्हा पॅटरिनाची आठवण आली .
त्याने आरसा पाहिला . त्यामध्ये पॅटरीना होती . ती तिच्या सुंदर इंटिरिअरने सजवलेल्या हॉलमध्ये बसून, निवांत टीव्ही पाहत होती. एक अघळपघळ पांढरा जम्पसूट घालून . तिचं ज्याच्याशी ब्रेकअप झालं होतं , त्या अभिनेत्याचा सिनेमा पहात . अन तिच्या डोळ्यांत अश्रू होते . खरे . ते ग्लिसरीनचे नव्हते .
म्हणजे आरशात दिसतं ते खरंच असावं .पण पॅटरिनाच की आणखीही कोणी दिसू शकतं ? ... त्याच्या मनात प्रिया कोप्राचा विचार आला . तिनं अमेरिकन पोराशी लग्न केलं होतं आणि आत्ता - रात्रीची वेळ होती ! ... मग ? ....
थोडंसं कुतूहलाने , उत्सुकतेने आणि घाबरत त्याने पाहिलं-
ती तिच्या नवऱ्याबरोबर कुठे तरी नटूनथटून चालली होती . रंगीबेरंगी , विचित्र ड्रेस घालून. सकाळची वेळ होती .मग त्याला लक्षात आलं . आत्ता अमेरिकेत सकाळ आहे म्हणून .
तो स्वतःलाच हसला .
पण एक गोष्ट नक्की होती - आरसा जादूचा होता !
मग त्याने एकेक नटीला आठवायची सुरुवात केली ... त्या एकामागे एक दिसत राहिल्या .
मध्येच त्याला उल्काची आठवण आली ; पण त्याने आरसा त्यावेळी जाणीवपूर्वक बाजूला केला . न पाहण्यासाठी .
यशवंत- तो त्याचा कॉलेजचा मित्र होता ;पण तो त्याला दिसला नाही .
नाही ? ... त्याला आश्चर्य वाटलं .
त्याला दिया - रियाची आठवण आली. त्याच्या जुळ्या मामेबहिणी .
दिया शांत झोपली होती . तिच्या गोड बाळाला कुशीत घेऊन .
रिया दिसली नाही . नाहीतरी त्याचं तिच्याशी पटत नसे . त्याला ती नेहमीच आगाऊ वाटायची .
मग पुन्हा यशवंत ?- तोही दिसला नाही.
आरसा हँग झाला की काय ? असं वाटून त्याने तो बाजूला ठेवला व तो झोपी गेला .
-----
त्याने आरशाची गंमत , त्याची जादू कोणाला सांगितली नव्हती .
रात्री त्याने आरसा घेतला व पहायची सुरुवात केली . त्याला तो आता एक नवा चाळाच लागला . एखादं नवीन ॲप डाउनलोड केल्यासारखं .
ऑफीसमधली पल्लवी दिसली . यशवंत दिसला नाही . ऑफिसमधलाच त्याचं वाकडं असलेला चिडकू दिसला नाही .दिया दिसली .रिया नाही. कॉलेजमधली आखडू असलेली सुनंदा दिसली नाही .
त्याला मध्येच आजीची आठवण आली . आईची आई . ती कधीच देवाघरी गेली होती .तो आजीचा खूप लाडका. ती दिसली नाही .
स्साला ! त्याला आरशाचं गणितच कळेना. आरसा जादूचा आहे ; पण गंमत करतो की काय ? की काही लोकांपर्यंत तो पोचू शकत नाही ? का बेट्याला रेंज नसते ? ...
त्याला उल्का आठवली .
उल्का त्याच्या काळजाचा तुकडा ...
तिचं लग्न झालं होतं .ती बंगलोरला होती. त्याला खूप वाटलं, तिला पहावं, तिचा गोड चेहरा न्याहाळावा. पण त्याने आरसा बाजूलाच ठेवला .
पुन्हा त्याला वाटलं , खूप वाटलं की आरसा हातात आहे , तर का पाहू नये ?- पण का पहावं ? तिचं लग्न झालंय. पैसेवाला स्मार्ट नवरा आहे. ती तिच्या आयुष्यात सुखी असेल.
पण - तिला आपली आठवण येत असेल ? ...
त्याची मनःस्थिती व्दिधा झाली … पहावं की पाहू नये ? त्याने आरसा उलट धरला होता. त्याला वाटलं पाहूनच टाकावं ... पण ... आत्ता रात्रीची वेळ होती ... कदाचित ... ते एकांत एन्जॉय करत असतील ...? त्याने रागाने आरसा सरळ केला ... आणि आठ्या पडलेल्या चेहऱ्याने , रागाने रोखून त्यामध्ये पाहिलं .
त्याला उल्का दिसली . ..
आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. त्याला आधी आश्चर्य वाटलं अन मग दुःख !
उल्का तिच्या आलिशान घरातल्या लॅव्हिश बेडरूममध्ये होती .
नवऱ्याचा मार खात . रडत ...
मग नवरा अपशब्द उच्चारत बाहेर गेला.तिने बेडवर स्वतःचं अंग झोकून दिलं आणि ती ओक्साबोक्शी रडायला लागली . ती बिचारी वाळली होती .
अजितला वाईट वाटलं. पण त्याने ती भावना दूर सारली . त्याचं मन रागाने भरलं . त्याला वाटलं, तिचं आयुष्य आहे , ज्यामध्ये मी नाही. ते जसं आहे तसं तिने ते आता जगावं. त्याच्या मनाला कुठेतरी सुखावलं., तिचं घर पाहून त्याला असूया वाटली होती . पण तिचं दुःख त्यापेक्षा मोठं होतं . तिच्या दुःखामुळे तिच्या घराचं मोठेपण उणावलं होतं .
तरीही, नंतर त्याला लवकर झोप लागली नाही .
मिटलेल्या डोळ्यांसमोर उल्काच्या सहवासातले क्षण एकमेकांचा हात धरून पळत होते .
त्याची अन तिची पहिली भेट झाली होती, तेव्हा तो केस विंचरत होता .कॉलेज कॅम्पसमध्ये एका गाडीच्या आरशात बघून . आणि ती चेष्टेने हसली होती . पण पुढे काय ? त्यांचं जमलं होतं .
पण आरसा खाली पडून त्याचे तुकडे तुकडे व्हावेत , तसे त्याच्या मनाचे तुकडे पडले होते . अन प्रत्येक तुकड्यामध्ये तिची अनेक रूपं दिसत होती .
-----
सकाळी घरातलं वातावरण जरा शांत होतं .
ऑफिसमध्ये असताना यशवंतचा फोन आला . कॉलेजमधली सुनंदा गेली होती . सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती.
त्याला भयंकर शॉक बसला . आणि त्यांच्या सगळ्या क्लासमेट्ससाठी तो एक मोठाच धक्का होता .
रोजच्या वेळेवर तो घरी आला .
रात्र झाली होती .
मन जागेवर नव्हतं... आज मन रमवायला त्याला गंमत पाहण्याची लहर आली . त्याच्या बिल्डिंगमधली गंमत ! ...
त्याने समोरच्या फ्लॅटमधल्या मोहनाकाकू आठवल्या . बाई भलतीच गोडबोली . समोरचा तिच्या बोलण्याला भुलेल अशी . लोकांना अक्कल शिकवणारी .त्या नवऱ्याला चक्क झाडूने मारत होत्या . तो भांडत होता ,पण गप बायकोचा मार खात होता . स्वतःला गल्लीची ब्यूटीक्वीन समजणारी , शायनिंग मारत फिरणारी , पोरांना फुकट येडं करणारी डॉली चक्क मन लावून अभ्यास करत होती . धार्मिक वाटणाऱ्या सोज्वळ जयाकाकू कुठल्या तरी परक्या माणसाशी प्रेमळ चॅटिंग करत होत्या . तर शिवराळ अन आडदांड भीमाबाई मनोभावे देवाची पोथी वाचत होत्या .
व्यक्ती तितक्या प्रकृती ! त्याला जणू एक नवीनच विश्व खुलं झालं होतं. गमतीजमती दाखवणारं . त्याला क्षणभर वाटलं की तो काय काय पाहू शकेल ? कोणाकोणाला पाहू शकेल ? …मनात आणलं तर तो वाट्टेल त्या व्यक्तीला , वाट्टेल त्या वेळी , वाट्टेल त्या अवस्थेत पाहू शकेल . .. आणि दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायला कोणाला आवडत नाही ? ...
पण त्याला ते नकोसं वाटलं .अजून पाहिलं तर अजून काहीतरी नकोसं , भलतंसलतं पहायला मिळालं असतं .
त्याने मनाला सावरलं आणि तो विचार करू लागला.
आणि विचार करता त्याच्या असं लक्षात आलं -
आरशात फक्त स्त्रियाच दिसतात ...
तेवढ्यात किचनमधलं काम संपवून आई त्याच्याकडे आली . यावेळी त्याच्या हातातल्या आरशाकडे तिने लक्ष दिलं नाही अन ती त्याला म्हणाली , “ रिया घरातून निघून गेली आहे .काही तपास लागत नाहीये तिचा . तुला सकाळी घाईच्या वेळी मुद्दामच सांगितलं नाही . “
“ बापरे ! “ त्याच्या तोंडातून काळजीने बाहेर पडलं .
नंतर आई गेली . त्याने पटकन आरसा घेतला . त्यानं रियाला पाहण्याचा प्रयत्न केला . ती दिसली नाही .
त्याने पुन्हा प्रयत्न केला . ती दिसली नाहीच .
मग - त्याने दियाला पाहिलं . ती दिसली, बाळाबरोबर खेळत.
सुनंदा दिसली नाही . आजी - तीही दिसली नाही . मग त्याने पुन्हा रियाची आठवण काढली - आरसा शांतच होता .
यशवंत ? अन चिडकू ? ... तेही दिसले नाहीत .
आता त्याला लक्षात आलं की आरशात फक्त स्त्रियाच दिसतात आणि, आणि –त्याही फक्त जिवंतच !
याचा अर्थ - रियाचं काही बरंवाईट ? ...
तिचं नुकतंच लग्न झालं होतं . तिला गावाकडे दिलं होतं. शेतीवाडी भरपूर असलेली , मालदार पार्टी होती.
त्याने आरसा अगदी जवळ धरला व मनात म्हणाला , रिया- रिया- रिया !
आरसा ढिम्म होता. त्याला कदाचित मृत व्यक्ती दाखवायच्या नव्हत्या का ?...
कदाचित ते वेगळं जग आरशाला दाखवायचं नव्हतं. जे मानवी मनाच्या , अस्तित्वाच्या पलीकडचं आहे. अमानवी, भीतीदायक !...
त्याला रियाची काळजी वाटली. त्याचं तिच्याशी पटत नसून सुद्धा.
त्याने आरशाला विनवणी केली. आरसा तसाच होता ,निर्विकार.
तो मनाशी म्हणाला ,ठीक आहे . गंमत पुष्कळ झाली. आता परत तुला हात लावायला नको. देतो टाकून लॉफ्टवर मागे. धूळ भरल्या, नको असलेल्या वस्तूंमध्ये.
त्याने आरसा उचलला . पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पाहिलं. तो म्हणाला - रिया.
आरशाची काच थरथरल्यासारखी वाटली. काच ओरखडल्यासारखी झाली. चरे चरे . त्याला वाटलं - वाट लागली बेट्याची ! …हातात आलेली जादू गेली !
मग आरसा जणू एखाद्या स्वच्छ सध्या काचेसारखा झाला . तो आरसा नव्हताच. जणू त्याचा पारा उडाला होता.
पण ती काच पुन्हा आरसा झाली. नितळ,स्वच्छ, शांत.
तो त्यामध्ये पाहत राहिला. त्याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. पाण्यात खडा मारल्यावर हळूहळू वर्तुळं तयार होतात आणि लोप पावतात तसं ते लोप पावलं .
मग - आरशात ते दिसलं . चित्र अस्पष्ट होतं. अंधार होता आणि एखादी व्यक्ती झोपल्याचा आकार . पण व्यक्ती कळत नव्हती. त्याने आरशावर हात ठेवला. बोटं फिरवली. चित्रं छोटं-मोठं होऊ शकत होतं . त्याने चित्र छोटं केलं. लाँग व्ह्यू पाहता , एखाद्या शेताचा परिसर वाटत होता. रात्र असल्याने अंधार होता . पण तरी चंद्राचा प्रकाश असल्याने गूढ वातावरण भासत होतं . एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातलं दृश्य पाहिल्यासारखं . तो बराच वेळ चित्र हलवून पाहत होता. बांधावरचं एक झाड काळोख्या पानांनी सळसळत होतं . ते झाड चिंचेचं असावसं त्याला वाटलं .
त्याला कळलं . त्याला जे कळायचं ते कळलं . तो आईकडे गेला. ती झोपली होती. त्याने आईला उठवलं.
“ आई , मला वाटतं रियाला मारलं गेलंय आणि तिला शेतात पुरलंय.”
आई खडबडून जागी झाली. “ काय ? काहीतरी अभद्र बोलू नकोस रात्रीच्या वेळी. तुला स्वप्न पडलं असेल. झोप आता शांतपणे .”
पण त्यालाही रात्रभर झोप आली नाही आणि आईलाही.
------
मामा परत पोलिसांकडे गेला. त्यांनी सासरच्या लोकांची कसून चौकशी केली आणि शेवटी दिराने सांगितलं ,” माहेराहून पैसे आणण्यासाठी आम्ही नेहमीच तिचा छळ करत होतो. मोठ्या भावानेच गळा आवळला तिचा. त्यातच ती गेली. शेतामध्येच तिला खड्डा करून पुरून ठेवलंय .”
अजितला हे कसं कळलं ? हा प्रश्न आईला होताच .पण त्या धक्क्यामध्ये तो बाजूलाच पडला.
-----
मग अजितने दोन दिवस आरशाला हातच लावला नाही. त्याला इच्छाच झाली नाही .
पण मन रहातं का ?
मग त्याने आरसा घेतला. मध्यरात्र झालेली. तो बेडवर . घरात एकटाच जागा.
आरसा जणू झळाळून उठला .
आणि आरशात जणू इतिहासाची पानं फडफडली …
त्याला झाशीची राणी, जिजाबाई , सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई, इंदिरा गांधी, मदर टेरेसा अशी एकेक लाखमोलाची स्त्री रत्नं दिसली , दिसतच राहिली . तो थांबला.
पुन्हा आरशात पाहिलं तर पानं फडफडतच होती. मात्र आता वर्तमानाची.
त्याला मेरी कोम दिसली, लक्ष्मी अगरवाल, तस्लिमा नसरीन, सिंधू-साईना... मलाला , ग्रेटा थनबर्ग … यादी न संपणारी होती...
त्याला भोवंडून आलं.
मग त्याला हुंडाबळी ठरणाऱ्या , घरगुती हिंसाचाराला तोंड देणाऱ्या, बलात्कार, अत्याचार , सामूहिक बलात्कार, नाईलाजाने देहविक्रय करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या, राबणाऱ्या स्त्रिया दिसल्या. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या ,चोरीछिपे बालमजूर म्हणून राबणाऱ्या मुली दिसल्या.
त्यानंतर त्याला गुन्हेगारी विश्वातल्या स्त्रिया दिसल्या. बलात्काराचे , शारीरिक छळाचे, हुंड्याचे , लैंगिक शोषणाचे खोटे-नाटे आरोप करणाऱ्या, व्यसनाधीन, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रियांना छळणाऱ्या ,स्वतःच्या तान्हुल्यांना कचरा पेटीत टाकणाऱ्या, स्वतःच्या मुलांचे जीव घेणाऱ्या स्त्रियाही दिसल्या.
त्याने आरसा ठेवूनच दिला व तो धपापल्या उराने गप बसून राहिला.
-----
दोन दिवस गेले. त्याने आरशाला हात लावला नाही.
मग पुन्हा - त्याने मनाशी काही विचार केला.
रियाला सासरच्यांनी मारलं होतं. सुनंदाने छळामुळे आत्महत्या केली होती. आता अजून एक केस - ती रोखणं , तो छळ थांबवणं त्याच्या हातात होतं .
त्याने आरशात पाहिलं - उल्का !
रात्रीची वेळ . उल्का किचनमध्ये एकटीच टेबलवर भात चिवडत, कसाबसा गिळत होती.
तिचं जेवणाकडे लक्ष नव्हतं .डोळे रडवेले, सुजलेले. डोळ्याभवती काळी वर्तुळं . हातावर वळ दिसत होते. कदाचित, पाठीवरतीही -जे त्याला दिसणं शक्यच नव्हतं. ती फोन उचलायची, ठेवायची. तिचं जेवण अर्धच राहिलं . तिचा फोन - बंद होता .
त्याच्या डोळ्यांतून आरशात पाणी पडलं . त्यामध्ये ते दृश्य विरुन गेलं .
-----
तो उल्काच्या घरी गेला.
तिच्या आई - बाबांना तो आवडत नव्हता . कारण काय तर तो त्यांच्या एवढा पैसेवाला नव्हता .म्हणून त्यांनी त्या दोघांच्या लग्नाला नकार दिला होता.
आणि कौस्तुभशी लग्न लावून दिलं होतं . आयटीमधला पैसेवाला. मोठ्या पदावर असलेला ... पण पौरूषत्वहीन ! म्हणून बायकोला मारून त्याचं पौरुषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारा .
आणि आई - वडिलांना त्रास नको म्हणून ती तिचं दुःख आतल्या आत गिळून टाकत होती . त्यांना तिने अजून काही सांगितलं नव्हतं .
त्याला आलेला पाहून तिच्या आई - वडिलांना आश्चर्य वाटलं .
“ काका ,नमस्कार “, तो म्हणाला
“हूं “, तिचे बाबा म्हणाले .
“उल्का कशी आहे ? “
“तुला काय करायचंय ? “
“ काका , प्लिज ऐकून तर घ्या ... “
त्यावर काकू बोलल्या निश्चिन्तपणे “ ती सुखात आहे आता .”
“ या आपण , “ काका थेट बोलले .
त्यांचे निश्चिन्त चेहरे पाहून अजितच्या लक्षात आलं . सारं लक्षात आलं .
“ काका - काकू ... उल्का ... ती खूप दुःखात आहे . तुम्हाला वाटतं तशी परिस्थिती नाहीये तिची . तिला रोज त्या ... त्या माणसाचा मार खावा लागतो ! कदाचित तुमच्यापर्यंत अजून काही आलेलं नाही. “
ते ऐकल्यावर काकू मटकन खालीच बसल्या .
----
पुढे गोष्टी बदलल्या .
अजितने स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारी संस्था स्थापन केलीये .
आरशामुळे त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली आणि पुढे उल्काही…तीही आलीये, त्याला त्याच्या कामात मदत करायला . कायमस्वरूपी साथ द्यायला . त्यांच्या कामाचा पल्ला लांबचा आहे ; पण पहिलं पाऊल तर पुढे पडलंय .
आरशात पाहताना प्रतिबिंब दिसत असल्याने, आपल्यालाच आपण दोन भासत असतो , खरं तर एकच असतो तरी .
त्या दोघांची जोडी अगदी तशीच आहे आता !
एकदा उल्काने त्या आरशात पाहिलं . तिला तर तो साधाच, नेहमीसारखा एक आरसा भासला . त्यानंतर अजितलाही त्यामध्ये काही दिसलं नाही . तो चमकला .
आणि आजवर त्याला पुन्हा काहीही दिसलेलं नाहीये !
तरी त्याने तो जपून ठेवलाय .
तो - जादूचा आरसा ! काय माहिती तो पुन्हा कधी ऍक्टिव्हेट होईल ? ...
खरं तर, तो स्वतःच स्त्रियांच्या आयुष्याचा आरसा झालाय .

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथेची कल्पना आवडली.. पण शेवट तितका आवडला नाही.. काल्पनिक जगातुन उगाच खऱ्या जगात फेकल्या गेल्याच फिलींग आलं..

कथा चांगली, पण शेवट एवढा खास नाही. ओढून ताणून केल्यासारखा वाटला, अजून थोडा खुलवता आला असता.
पुलेशु!!

कल्पना छान होती .. मन्या म्हणतेय तसंच मलाही वाटलं.. काहीतरी शाॅकींग शेवट होईल असं राहून राहून वाटतं होतं...

शेवट वेगळा होऊ शकला असता -
वाचकांना विनंती
काय - काय वेगळे शेवट होउ शकतील या कथेचे ?
विचार करा न सुचवा .
वाट पाहतो
नम्र आभार

कथेची कल्पना फार सुरेख ! म्हणजे सुरवातीला आरसा जादू म्हणून वापरला असला तरी नंतर तो symbolic आहे असं वाटलं आणि म्हणूनच कथा जास्त आवडली. म्हणजे एखाद्याला त्याची जाणीव करून दिल्यावर, त्या माणसाला स्वतःचा आरसा सापडला, की त्या आरश्याच काम संपलं.

कथेचा वेगळा शेवट होऊ शकतो. खरं म्हणजे लेखकाला जो पहिल्यांदा सुचला तो बरोबरच.
एक शेवट सुचला आहे तो लिहिते. अजितने स्त्रियांसाठी काम सुरु केल्यावर त्याला आरश्याची गरज नाही हे त्याच्या लक्षात यावे. मग तो आरसा नुसताच स्वतःकडे जपून ठेवण्यापेक्षा, कदाचित तो आरसा अजून कोणाला देईल आणि त्या माणसाला त्यात अजून काही वेगळे दिसेल. त्याचे असे काही नव्याने त्या आरश्यात सापडेल. दुसरा कोणी जेव्हा पहिल्यादा आरश्यात पाहिलं, तिथे गोष्ट संपवता येईल.

किंवा जादूच continue करायची असेल तर अजूनही वेगळं काही लिहिता येईल.

तृप्ती
आवर्जून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप आभारी आहे
आपल्यालाही पुलेशु

आसा
आपली प्रतिक्रिया महत्त्वाची
आभार

कथेची कल्पना खूप सुंदर आहे.. जादूचा आरसा ही कल्पनाखरंच भारी आहे Happy
फुलवली छान
मला काहीतरी जादू होईल शेवटी आणि थरार असेल असं वाटलं होतं Happy