फरक पडतो !

Submitted by ध्येयवेडा on 22 May, 2020 - 08:27

मी आपला त्याच एका प्रश्नात अडकलेला - "लग्न करायचं की नाही"?
मग आयुष्यात तू आलीस.
तरीही पूर्वग्रहदूषित ह्या मनाचा प्रश्न कायमच ! पुढे जावं की नाही, जावं तर का जावं? नाही जावं तरी का नाही?

प्रचंड विचार, वाचन आणि चर्चा झाल्यावर निर्णय झाला.
आपलं लग्न झालं.
तूसुद्धा केलाच असशीलच की असा विचार. तुलाही पडले असतील असले प्रश्न.
मला आठवतचं नाही कधी आपण ह्याबद्दल चर्चा केली असेन.

लग्न झाल्यावर सुरुवातीला सगळे किती कौतुक करायचे आपलं. पण सोबत टोमणेही मारायचे. "नवीन लग्न आहे, सुरुवातीला कौतुक होणारच. नंतर आहेच आपलं, सर्वां सारखंच !"

लोकांच हे ऐकल्यावर मला काहीच वाटायचं नाही.
खरं सांगू का, मी फार आधीच ठरवलेलं, की मी माझ्या बायकोमध्ये फार गुंतून राहणारच नाही. नकोच ती dependency.
कशाला उगाच जीव लावायचा. चुकून भांडणं झाली आणि वेगळे व्हायची वेळ आली तर? लग्नाआधी मी काय कमी कांड केलीत? त्यातून बाहेर पडताना आणि स्वतः:ला निस्तरताना काय कमी त्रास झाला ! बराच वेळही वाया गेला माझा.
हे नातं काय वेगळं आहे? फक्त लग्नाची औपचारिकता आणि सर्व नातेवाइकांमध्ये जाहीर मान्यता. इतकच काय ते विशेष!
मनात कुठे काय वेगळं वाटतंय?
मनात तेच की .. पूर्वीसारखं...भीती.. की अडकून पडलो तर पुन्हा मनस्ताप !

लग्नानंतर सुरुवातीच्या दोन अडीच वर्षात काय कमी भांडण झाली आपली?
अनेक वेळेस तर असंच वाटायचं की आता ती वेळ आली आहे. आता हा धागा तुटणार.
"मला फरक पडत नाही" - भांडणात माझं ठरलेलं शेवटचं वाक्य असायचं.
विशेष म्हणजे मला मानसिक त्रास कधी व्हायचाच नाही.
बहुतेक मी निगरगट्ट झालो होतो. किंवा आव आणत होतो. सांगता येणं अवघड आहे.
पण एक समाधान असायचं मनात. आपण ह्या नात्यात फार अडकून न पडायचा निर्णय किती बरोबर आहे असंच वाटायचं.

ह्या करोनाच्या निमित्तानं तू सध्या तिकडे अडकलेली.
कालपर्यंत मी स्वतः:च्या कल्पनेत रमलेला.
"आपण एकत्र नाही, एकमेकांसमोर नाही, एकमेकांसोबत नाही"
एकदम निर्धास्त. निश्चयी. "काही फरक पडत नाही !".
पहिले पंधरा दिवस .. किती मस्त होते.
लोक विचारायचे, "काय रे करमतंय का बायको नाहीये तर?"
येडेच आहेत. कसं सांगू तुम्हाला की मला "फरक पडत नाही !"

गंमत माहितीये, तू तिकडे गेल्यापासून इतक्या दिवसात मी एकदाही ट्रान्स ऐकला नाही !
खरंच !
पण आज मी ठरवलंय..
जरा निवांत पडू. सह्याद्रीच्या आठवणीत.
आज ट्रान्स !
ATB च ऐकणार !
तो एक आहे जो मला घरात बसून सह्याद्री आणि गड किल्ल्यांची सफर करवून आणतो.

बसलोय राजगडाच्या संजीवनीवर सूर्यास्त बघत..
कधी चढतोय धोडप लक्ख उन्हात...
भिजतोय प्रचंड पावसात त्या मढे घाटात.
क्वचित डोलतोय वाऱ्यावर.. त्या बुदानगिरीवर..
आणि अपाचे मारतोय पहाटेच्या अंधारात.

पण..
पण मी एकटा नाहीये !
कुठेच.

तू आहेस.. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी !
माझ्या सोबत !

गेले महिनाभर आपण एकमेकांसमोर नाही आहोत. फोनवर बोलतो आपण.
पण प्रत्यक्ष भेट नाही. प्रत्यक्ष बोलणं नाही.
आज कळतंय..
कळून चुकतंय..
की मी चुकीचा होतो..
तू माझ्यावर जीव लावला असशीलच.
पण माझ्या नकळतच मी ही तुझ्यावर जीव लावलाय.

आज तुझी खूप आठवण येतीये.
क्षणाक्षणाला त्याची तीव्रता वाढत चालली आहे !
कारण?
कारण .. खरंच फरक पडतोय !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>की मी माझ्या बायकोमध्ये फार गुंतून राहणारच नाही. नकोच ती dependency.>>>> मग लग्न कशाला करायचं ??? मला हे रिलेट झाले नाहीच परत अत्यंत परके किंवा वरवरचे लिखाण वाटले.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@समो - अहो हीच तर खरी गम्मत आहे. शंभर जोडप्यांना जाऊन प्रश्न विचारा कि त्यांनी लग्न का केले? ८० जोडप्यांना नीट उत्तर सांगता येणार नाही. पण आता कसं वाटतंय विचारलं तर खूप छान वाटतंय म्हणतील. लग्न करायलाच पाहिजे असा सल्लाही देतील.
त्यांचं जे मतपरिवर्तन झालं, त्याचंच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे कथेत.

बायकोत गुंतून पडणे हे ऐकल्यावर मला लई टेंंशन आलं.
लग्ननाच्या आधी जी आपली मैत्रिण असते तिच्यात कोणीही अतिशय गुंतून जातो.
पण लग्न झाल्यावर त्याच कालच्या मुलीत आपला जीव तेवढाच गुंतून गेलेला असतो का?
की लग्नाच्या रात्री उंबर्‍यात बायको म्हणून आलेल्या मैत्रिणीच नाव बदलल्यावर तो गुंतलेला जीव देखील उंबरा ओलांडल्यावर सोडवला जातो तिच्यामधून?

लिखाण चांगलं आहे दादा!
होप! त्या तुम्हाला लवकरात लवकर भेटतील