कलिंगडाची गारेगार कुल्फी

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 May, 2020 - 07:03

कलिंगडाची गारेगार कुल्फी

अगदीच मिडलक्लास शीर्षक वाटत असेल तर आपण याला वॉटरमेलन पॉपसिकल्स असेही वाचू शकता.

----------

घरात पहिला फ्रिज किती साली आला आता नेमके आठवत नाही. पण माझे शालेय शिक्षण तेव्हा आटोपले होते एवढे आठवतेय. आमच्या लहानपणी खेळायला मोबाईल नव्हते, असे हल्लीच्या पोरांना आपण बरेचदा कौतुकाने सांगतो. माझे बालपण फ्रिजशिवाय गेले आहे. त्यामुळे थंड पाण्याचेही एक कौतुक होते. नुसता बर्फ चोखण्यातही एक नशा होती. किसलेल्या बर्फाच्या गोळ्यावर सरबत शिंपडले की त्या वयातला जगातला सर्वात भारी पदार्थ तयार व्हायचा. जो जवळपास तितक्याच चवीने रोजच खाल्ला जायचा. त्या गोळ्यावर बाटलीतले सरबत, जे दहापैकी नऊ वेळा कालाखट्टाच असायचे, ते शिंपडताना जेव्हा तो बर्फ संपृक्त अवस्थेत यायचा, तोपर्यंत आपल्या तोंडातले पाणीही त्या अवस्थेला पोहोचले असायचे. आणि मग तो थबथबणारा गोळा हातात घेत आता अजून एकही थेंब गळून वाया जाऊ नये म्हणून पहिलीच जोरदार घेतलेली चुसकी.. आहाहा!.. मित्रांच्या गप्पा त्या चुसकीनंतरच सुरू व्हायच्या.

मग एक तो चम्मच मिळायचा. कुस्करलेला बर्फ ग्लासात टाकून त्यात वरून ओतलेले सरबत. हे गोळ्यासारखे ओठांनी चोखून चोखून खायचे नसून चमचा चमचा तो सरबतमिश्रित बर्फ तोंडात ढकलून चावत चघळत खायचा असतो. म्हणून याचे नाव चम्मच.

पन्नास पैश्याला गोळा मिळायचा. एक रुपयाला चम्मच. एक रुपयाला सरबत देखील मिळायचे. आम्ही आठ आण्याचा गोळा घेऊन एक रुपयाचे सरबत घ्यायचो. आणि तो गोळा त्यात बुडवून बुडवून खायचो. लवकरच हा प्रकार ईतका हिट झाला की त्या भैय्याने स्वत:च गोळासरबत असा स्पेशल आयटम दोन रुपये लाऊन विकायला सुरुवात केली.

असो, विषयावर येऊया... तर कलिंगडाची गारेगार कुल्फी

उन्हाळा सुरु झाला की रोज रात्री बिल्डींगमध्ये कुल्फीवाला यायचा. पोराथोरांना सगळ्यांनाच हि कुल्फी आवडायची. ऐय कुल्फीssssय्य... अशी आरोळी ऐकली की बासरीवाल्याच्या मागे उंदरे जमावीत तसे लोकं घरातून बाहेर पडायचे आणि बघता बघता दादरावर कट्टा जमायचा. दक्षिण मुंबईतील जुन्या बिल्डींगमध्ये राहण्याची हिच मजा होती.

ईतरवेळी गोळ्याच्या नावाने नाक मुरडणारे घरचे मोठे लोक्स, हि कुल्फी दूधाची असते म्हणून स्वत:हून खाऊ घालायचे. हा दूधाचा फंडा पेप्सीकोल्यालाही लागू व्हायचा. पेप्सीकोला हे समजावे म्हणून लिहिले अन्यथा पेप्सीच म्हटले जायचे. हल्ली पेप्सी म्हटले की ते डब्बा बाटलीतले फसफसणारे पेय आठवते. तेव्हा पेप्सी म्हटले की विषय संपला. क्रिकेट खेळून झाल्यावर पेप्सी खाऊनच घरी जायचे हे कंपलसरी होते. तर आपल्या पोराने दूधाची पेप्सीच खावी असे घरच्यांना वाटायचे. पण कुठल्याही पोराला विचाराल तर त्याला त्याच्या निम्म्या किंमतीत मिळणारी सरबताची पेप्सीच चोखायला आवडायची. काल जेव्हा घरी कलिंगडाची कुल्फी बनवली तेव्हा सर्वात पहिले आठवली ती हिच पेप्सी. या पेप्सी आणि पॉपसिकल्स शब्दांचा आपसात काही संबंध असल्यास कल्पना नाही.

असो, विषयावर येऊया... तर कलिंगडाची गारेगार कुल्फी

तर फ्रिज घरात नसला तरी काकामामांकडे होता. सुट्टी पडली की आळीपाळीने एकेकाच्या घरी जाणे व्हायचे. तेव्हा भावंडांना हाताशी धरून रोजचाच हा उपक्रम असायचा. पाण्यात वा दूधात विविध प्रकारचे सरबत, फळांचे रस वा खाऊच्या गोळ्या पाण्यात विरघळवून तो द्रव पदार्थ विविध आकारांच्या पात्रात फ्रिजरमध्ये ठेवायचा आणि सेल्फमेड आईसक्रीमचा लाभ घ्यायचा. रोज आईसक्रीम केले नाही तर फ्रिजचे पैसे वसूलच होणार नाहीत हि माझी तेव्हा ठाम धारणा होती. फ्रिजचे माझ्यामते तेव्हा दोन आणि दोनच उपयोग होते. एक म्हणजे थंड पाणी किंवा बर्फ मिळते आणि दुसरे आईसक्रीम.

पुढे फ्रिज घरी आला तेव्हा मी कॉलेजला जाऊ लागलो होतो. नव्याचे नऊ दिवस म्हणून हे आईसक्रीमचे खेळ केले. पण तेव्हा त्यात मजा घ्यायचे वय उरले नव्हते म्हणा की भावंडांची सोबत नव्हती म्हणा. तितकीशी मजा कधी आलीच नाही.

आता मात्र लॉकडाऊन काळात कुल्फीपात्रांचा खजिना हाती लागला. सोबत तितकीच उत्साही पोरंही होती. त्यामुळे पुन्हा एकदा या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. सुरुवात आपल्या याच शीर्षकातील कलिंगडाच्या गारेगार कुल्फीने ...

पाकृ अगदी सोपी आहे. बहुतेकांना माहीत असेलच. तरीही औपचारीकता पुर्ण करतो -

१) कलिंगड छानपैकी कापायचा. मस्त छोटेमोठे तुकडे करून त्यातील बिया सुरीने अलगद काढून घ्यायच्या.
आमच्याकडे हे काम आईने केले.

२) मग ते तुकडे मिक्सर, ज्युसर आदि मशीनीत टाकून त्यांचा रस काढायचा. तो छानपैकी गाळून घ्यायचा आणि त्यात चवीनुसार मीठ, साखर टाकायचे.
आमच्याकडे हे काम बायकोने केले.

३) मग तो ज्यूस कुल्फीपात्रात भरायचा. संदर्भासाठी खालील फोटो बघू शकता. ते पात्र डीप फ्रिजरमध्ये ठेवायचे. एक बराच मोठा जीवघेणा काळ वाट पाहायची. सारखे फ्रिजचा दरवाजा उघडू नये हे सतत मनाला बजावत राहायचे. तरीही अधूनमधून उघडून चेक करत राहावे. त्याशिवाय मनाचे समाधान होत नाही. अखेर कुल्फी जमली असे वाटले की दांडीला पकडून खचकन खेचून बाहेर काढावी Happy

आमच्याकडे हे काम पोरीने केले.

४) त्याचा छानपैकी फोटो काढून अपलोड करावा. माजघरातील पदार्थ जगभरात पोहोचवावा. आणि कुल्फी खाण्यातील आनंद द्विगुणित करावा.
आमच्याकडे हे काम.... अर्थात, मीच केले Happy

५) मग काय, मस्त पेप्सीकोल्यासारखे चोखत चोखत खायची.

अरे हो,
आमच्याकडे हे काम सर्वांनी केले. पुन्हा पुन्हा केले. करतच आहेत. काय करणार, चव तोंडाला लागली की कंट्रोलच होत नाही Happy

अवांतर - काकांनी काकूला कौतुकाने कवेत कोंडले कारण काकूंनी किचनमध्ये कलिंगड कापून कलिंगडाची कुल्फी केली Happy

कु. ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चवीपेक्षा त्याने स्वतः बनवलेले असल्यामुळे त्याला जास्त अप्रूप.
>>>>
येस्स.

मलाही स्वयंपाक फारसा येत नसल्याने अश्या छोट्या गोष्टी स्वत: बनवण्याचे अप्रूप वाटते. साधे हाफफ्राय असो ब्रेड बटर सॅन्डवीच मॅगी वगैरे. प्रत्येकवेळी मी कौतुकाने फोटोही काढतो. आणि चार घास जास्तही खातो Happy
मात्र काहीतरी पोटात ढकलायला बनवायचेय म्हणून धसमुसळेपणाने काहीही बनवत नाही. आपल्यापरीने उत्तमच बनवायचा प्रयत्न असतो.

भारी.. अदर दॅन मी कोणीतरी टाकले ईथे करून
हे भाच्याने बनवलेय का?

मी नेहमीचे टॅंग बनवतो त्यापेक्षा कमी पाणी घालून दाट चवीचे बनवले होते.

अवांतर आमच्याकडे अशी सेम टू सेम चादर होती

हो भाच्याने बनवले आहे. कुल्फीचे सगळे मोल्ड नाशिकच्या घरी टाकलेत, इथे अलुमिनिमचे छोटे सहा मोल्ड/कप आहेत त्यातच काय प्रयोग करायचे ते.
टँग तोच बनवतो, मला ते अतिप्रचंड गोड वाटतं. माझ्या लहानपणी रसनाच होतं आणि एवढं गोड वाटत नसे तेव्हा. वयाचा परिणाम.
ते लाकडी चमचे आहेत कशा कशा बरोबर मिळालेले. जुगाड केले आहे.

kulfi.jpg

ऐतिहासिक मलाई- आम्बा कुल्फी.

अशी अखंड निघालीच नाही नन्तर Proud
स्टिक बाहेर येतेय आणि कुल्फी साच्यात.. काय चुकले असावे

किल्ली मस्त दिसतेय.. मलाईवाली फिलींग आली बघूनच
रेसिपी तर टाका
काय चुकले माकले ते सुद्धा समजून जाईल त्यातून

कलिंगड आईस कॅन्डी किंवा पॉपसिकल्स म्हणणं योग्य राहील.
>>>>
पण मराठीत काय बोलणार
>>>>>> मराठीत काय 'म्हणणार'!!!!

Barfachi kadi./ Barf kadi
Himkadi Happy

लहापणापासूनच pepsikola म्हणायचो.

हो चंपा
खायलाही मजा आणि बनवायलाही मजा येते.

मस्त .
आवळा कशी केली? घरात आवळा रस आहे म्हणून विचारले.

मस्त दिसतेय. लिंबू, मीठ, साखर घालून बनवले तर उन्हाळ्यात भारी वाटेल.

------
उन्हाळा सुरु झाला की रोज रात्री बिल्डींगमध्ये कुल्फीवाला यायचा. पोराथोरांना सगळ्यांनाच हि कुल्फी आवडायची. ऐय कुल्फीssssय्य... <<<

आमच्या इमारतीत येणारा हा कुल्फीवाला. उन्हाळ्यात रात्रीची जेवणं झाली की खाली इमारतीच्या गेटवर हमखास आरोळी यायची. Happy
kulfi_0.jpg

मी अस्मिता, घरात आवळा सरबत आहे. किंबहुना आवळा आणि कोकम असतेच. त्यात पोरीलाही आवळा सरबत फार्र आवडू लागलेय. म्हणून मग तेच रेडीमेड सरबत, पण नेहमीपेक्षा दाट
बनवून लावले कुल्फी पात्रात.
सरप्राईजिंगली पोरीने खाल्ले गरी आवळा सरबता एवढे आवडले नाही तिला. पण आवळा सरबतला नाक मुरडणारा माझा छोटा पोरगा मात्र मिटक्या मारत ते खात होता.
आणि याचे कारण म्हणजे एकूणच त्याला पॉप्सिकल म्हटले की त्याची उड्या मारायला सुरुवात होते. फ्लेवर वगैरे गौण आहेत त्याच्यासाठी. कदाचित बर्फाचा गोळा चोखण्यातच त्याला मजा वाटत असावी.

आमच्या इमारतीत येणारा हा कुल्फीवाला.
>>>>>

गजाननजी ईण्च का पिंच
डिट्टो सेम स्टाईल कुल्फी आणि कुल्फीवाला. अगदी त्याचा पोशखही..
कुठे राहता तुम्ही? कुठला आहे हा कुल्फीवला?

किल्ली दूधाची असेल तर प्रॉब्लेम येतो. पाण्याच्या सरबताची वा कलिण्गड ज्यूस वगैरेची असेल आणि तरीही असे होत असेल तर कुल्फीपात्रातच प्रॉब्लेम असेल

माझ्या दूध + रोजला प्रॉब्लेम झालेला..
पण नंतर दूध + मिल्क पावडर + मॅंगो पावडर अशी केलेली तेव्हा बरेपैकी निघत होती. थोडे टोक वगैरे तुटत होते.

किल्ली... गरम पाण्यात थोडा वेळ बुडवून बघ, किंवा सोड वरून गरम पाणी.
धन्यवाद ऋ, आवळा रेसिपी साठी.

भारी च tempting !
बाळांची काळजी घे रे. आता वातावरण बदलू लागलयं.

Pages