मराठी चित्रपट - नाळ २ - एक नितांतसुंदर अनुभव

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 November, 2023 - 08:55

naal 2.jpg

मी परीक्षण लिहीत नाही. कारण मला ते लिहीता येत नाही. कारण माझी चित्रपटांची समज फार तोकडी आहे.

मी फक्त अनुभव शेअर करतो. कारण मी एक सामान्य चित्रपटप्रेमी आहे. जी कलाकृती आनंद देते ती आवडते. तिच्याबद्दल लिहितो.

मग ती वाळवी सारखी डार्क कॉमेडी असो किंवा झिम्मा सारखा हलकाफुलका एंटरटेनर, आत्मपॅम्फ्लेट सारखा हटके शैलीत बनवलेला चित्रपट असो किंवा जवानसारखा सौथेंडियन मसालापट..

हे सारे चित्रपट त्या त्या जॉनरमध्ये जमलेले आहेत म्हणून मला आवडले असतात. त्यातील अचाट किंवा अतर्क्य घटनांसह मी ते स्विकारले असतात. कारण त्यात जे काही अचाट आणि अतर्क्य दाखवलेले असते, आणि जे मला उघड्या डोळ्यांनी देखील दिसलेले असते, ते करोडो रुपये खर्चून चित्रपट बनवणार्‍यांना देखील नक्कीच समजत असावे. पण मुळात तेच दाखवणे आणि त्या जॉनरचे चित्रपट आवडणार्‍या माझ्यासारख्या चित्रपटप्रेमींचे मनोरंजन करणे हाच त्यांचा हेतू असतो. जर ते मनोरंजन झाले तर पैसा वसूल, मग तेल लावत गेले लॉजिक. कारण चित्रपट बनवणारा दिग्दर्शक-निर्माता आणि बघणारा मी चित्रपटप्रेमी, आम्हा दोघांचा हेतू यात साध्य झाला असतो. ईतके सिंपल असते हे.

असो,
हा ज्ञानाचा घडा रिकामा करायचे कारण हेच की पठाण-जवान नाही तर नाळ सारख्या जातकुळीचे चित्रपट देखील मी आवडीने बघतो ज्यात मानवी भावभावनांचे चित्रण केले जाते. जर ते मनाला स्पर्शून गेले तर चित्रपट चांगला, नाही भिडले तर चित्रपट फसला. ईतके सिंपल असते हे.

नाळ (भाग पहिला) आजवर बघितला नाहीये. चित्रपट संथ आहे असे तेव्हा कानावर आल्याने चटकन ऊठून चित्रपटगृहात जाणे झाले नाही. आणि मग छोट्या पडद्यावर माझे फारसे चित्रपट बघणे होत नसल्याने राहिला तो राहिलाच.

त्यामुळे नाळ-२ बद्दल चांगले ऐकूनही आधी भाग एक बघून घ्यावा का या विचारात होतो.
पण जर का भाग-१ आवडला नाही, तर भाग-२ त्याहून चांगला असूनही जाणे झाले नाही, असे व्हायला नको म्हणून तो विचार टाळला.
आणि आता चित्रपट बघून आल्यावर तो निर्णय योग्यच होता असे म्हणू शकतो.

नाळ-१ ची कथा अगदीच एका ओळीत माहीत असूनही तो न बघितल्याने माझे काही अडले नाही. एक स्वतंत्र चित्रपट म्हणून देखील नाळ-२ आवडलाच.
किंबहुना आता नाळ-१ आवर्जून बघेन. चित्रपटाबद्दल संथ वगैरे जे काही पुर्वग्रहदूषित मत होते, तो चष्मा उतरवून आता बघता येईल. कारण भाग २ फार आवडला आहे.

कथा अगदी साधी सरळ आहे. त्यात स्पॉईलर असे काही नाही आणि चित्रपटाच्या पहिल्या पंधरा मिनिटातच समजते की ही कथा तीन भावंडांची आहे. ज्यातील एकाला दुसर्‍या घरी दत्तक दिले असते. पण त्याचे आपल्या सख्या बहिणीशी मनाने बंध जुळलेले असतात. पण तिला मात्र याचे काही सोयरसुतक नसते. आणि का असावे? तिची सारी ओढ आपल्या त्या सख्या भावाकडेच असते जो तिच्यासोबत राहत असतो. आणि ती वीण ईतकी घट्ट असते की तिथे आणखी कोणाला शिरकाव करायला जागा नसते. आपल्या लांबच्या सख्या भावालाही नाही.

तर याच तीन भावंडांमध्ये उमलणार्‍या आणि बहरणार्‍या नात्याचा प्रवास आहे हा नाळ चित्रपट.

जर माझे सामान्यज्ञान दगा देत नसेल तर नाळ १ चित्रपटातील नायक श्रीनिवास पोकळे याने बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. या वेळी हा पुरस्कार तिघांना विभागून द्यावा असे पोरांचे काम झाले आहे. केवळ चुणचुणीतपणा आणि लहान मुलांच्या चेहर्‍यावर नैसर्गिकरीत्या असलेले निरागस भाव ईतके या भुमिकेसाठी पुरेसे नव्हते. किबहुना या चित्रपटात मोठ्यांना आपला अभिनय दाखवण्यास फार वाव नव्हता. कारण त्या सर्व जागा या तिघांसाठीच राखून ठेवल्या होत्या.

चित्रपटातील गाणे कुठले तितके लक्षात राहत नाही हे खरेय, पण पार्श्वसंगीत मात्र कुठे ट्रॅक सोडून जात नाही. पण बॅकग्राऊंड म्युजिकपेक्षाही बॅकग्राऊंडला दिसणारे सुंदर, अप्रतिम आणि शब्दांत वर्णन करावे तितके कमी असे निसर्गसौंदर्य हा चित्रपट थिएटरातच बघायला हवा हा निर्णय सार्थ ठरवते. हे सारे शूटींग कुठे कुठे झाले आहे हे कोणाला माहीत असल्यास प्रतिसादात जरूर लिहा. यातील काही द्रुष्ये डोळ्यात भरून घेण्यासाठी म्हणून हा चित्रपट पुन्हा एकदा बघावा म्हणतो..

चित्रपटातील आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे यातील सारीच पात्रे वास्तवातली असली तरी फार सकारात्मक आहेत. ग्रे शेडमध्ये रंगवलेली पात्रे सुद्धा कृष्ण नाही तर श्वेतवर्णाकडे झुकणारी आहेत. जेव्हा या चिमुकल्या भावंडांची कथा चालू असते तेव्हा यासोबत एक समांतर कथा मोठ्यांच्या भावकीत देखील चालू राहते. त्या कथेचा शेवट स्पष्टपणे दाखवला नाही, पण तो न दाखवून देखील समजून जातो.

चित्रपटाचा शेवट तसाच होतो जो आपल्याला बघायला आवडला असता. पण मजा केवळ शेवटात नसते, तर त्याकडे जाणार्‍या प्रवासात असते. हे वाक्य क्लिशे आहे, आणि चित्रपटात देखील एका ट्रेकर ग्रूपच्या तोंडी वापरले आहे. पण चित्रपट देखील असाच आहे. शेवटी जेव्हा बसमधून बाहेर आलेल्या हातावर ती वस्तू दिसते, जिच्यासाठीच केला होता अट्टाहास, तेव्हा त्या दोनचार क्षणात चित्रपटाचा सारा प्रवास आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातो. आणि हेच या चित्रपटाचे यश आहे!

----

गेल्या महिन्यात लेकीसोबत जवान चित्रपट बघायला गेलो होतो. तो तिने शिट्ट्या आणि टाळ्यांसोबत एंजॉय केला होता. पण हा वेगळ्या धाटणीचा, गावखेड्यात चित्रीकरण असलेला, अस्सल मातीतील म्हणावा असा, बालकलाकार असूनही मुद्दाम मुलांसाठी बनवला आहे असे म्हणता न येणारा चित्रपट तिला आवडेल का याची शंकाच होती. त्यात दिवाळीरात्रीच्या जागरणीनंतर सकाळच्या साखरझोपेतून उठवून नेल्याने अर्ध्यातच झोपेल याचीही भिती होती. त्यामुळे अध्येमध्ये तिच्याकडे बघणे होत होते. तिला आवडतो की कंटाळून झोपते हे चाचपणे होत होते. पण तिने डोळ्यांची पापणीही न लवता अख्खा चित्रपट आवडीने पाहिला. चित्रपटातील शेवटच्या द्रुश्यानंतर जेव्हा मी भानावर आलो तेव्हाच ती देखील आली आणि मी काही विचारायच्या आधीच स्वत:हून उत्स्फुर्तपणे ईतकेच म्हणाली, खूप छान होता मूवी.. यापेक्षा प्रामाणिक रिव्यू दुसरा कुठला नसतो Happy

धन्यवाद,
तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो नक्की बघा.
आजचा भाउबीजेचा मुहूर्त चांगला आहे हा पिक्चर बघायला..

ऋन्मेष, नाळ १ नक्कीच बघ, तोही छान आहे. आवडेल तुला. मी बघितलाय Happy

नाळ २ मधील ती मुलगी कित्ती क्यूट आहे!

ऋन्मेष, नाळ १ नक्कीच बघ
>>>
हो, झी5 वर आहे तो. सबस्क्रिप्शन संपले आहे. घ्यायचे ठरले की बघेन नक्की.

नाळ २ मधील ती मुलगी कित्ती क्यूट आहे!
+७८६
अगदीच!
त्यामुळे चैतूबद्दल आणखी जास्त वाईट वाटते Happy

छान परिक्षण!
इथे वाचून नाळ१ बघितला झी५ वर. आवडला.

निवांत झाल्यावर सिनेमे पहायला सुरूवात करीन तेव्हां नाळ चा क्रम सर्वात वर असेल.

उत्सुकतेने वाचायला सुरूवात केली. मात्र लेखकाने स्वमहिमा गायला सुरूवात केलीये ती संपेचना. पुढे नाळ बद्दल एखादी ओळ आहे का म्हणून शेवटचा परीच्छेद पाहिला तर ७०:३० गुणोत्तर आढळले. म्हणजे ३०% चित्रपटाबाबत पण लिहीले आहे याबद्दल खूप खूप आभार. __/\__

जे मला उघड्या डोळ्यांनी देखील दिसलेले असते, ते करोडो रुपये खर्चून चित्रपट बनवणार्‍यांना देखील नक्कीच समजत असावे. >> किक पाहिला का ? सध्या याने सुरूवात करावी असे सुचवेन. करोडो रूपये खर्चून बनवलेल्या चित्रपटांची यादी हवी तर देऊ शकेन.

धन्यवाद स्वाती, रघू आचार्य

आचार्य किक नाही बघितला. काही पिक्चर ट्रेलर बघूनच आपल्या टाईपचे नाही असे वाटतात. मग त्यात वेळ नाही घालवत..

पिक्चर ट्रेलर बघूनच आपल्या टाईपचे नाही असे वाटतात >> निर्मात्याने करोडो रूपये खर्च केले म्हणजे त्याला काही तरी समजत असेल ना? बघितलाच नाही हे काय एक्सक्यूज आहे का?

हे इतरांच्या बाबतीत पण शक्य असेल ना?
जवान च्या धाग्यावर लोकांनी केलेल्या धुलाई साठी नाळशी संबंध नसलेली 3/4 प्रस्तावना तरी तेच सांगते. लोकांना पण जवान. पठाण आपल्या टाईपचे नाही वाटले. तिथे करोडोंचे लॉजिक कशाला?
समजले तर ठीक. अगं अगं म्हशी करायचं तर चालू दे.

पुन्हा तेच
लेख पुन्हा वाचा
हे मा शे पो
धन्यवाद Happy

ओके, एकदा वाचले त्याबद्दल धन्यवाद Happy

नाळ १ मध्ये चैत्याही क्यूट होता. अभिनयही छान आणि नैसर्गिक होता. वाटल की हा पुढे जाउन मराठी चित्रपटाचा सुपरस्टार होऊ शकेल.

विकेंडला बघितला नाळ२. आधीचा पाहिला नाहीये पण काही अडलं नाही.

हा बघितला आणि एक इतका नितांतसुंदर सिनेमा बघितल्याचं समाधान वाटलं. खूप दिवसांनी कोणतातरी मुव्ही असा मनात रेंगाळला, घर करून राहिला. सुरवातीची एक एक निसर्गफ्रेम काय दाखवलीये... क मा ल!!!!.. अक्षरशः स्वित्झर्लंडमधल्या वाटाव्या. बहुधा जुन्नरचा परिसर आहे.
नंतरचं टिपीकल गावातलं वातावरणही सुरेख!
निसर्ग फार महत्वाचा रोल करून राहतो मंजूळेच्या पिक्चरमधे.
अगदी यातली गाणी पण पुढे ढकलली नाहीत मी. कुठेही बोर नाही झाला.
सगळेच जणं इतके अस्सल वाटले आहेत. मंजुळे खरंच लोकल कास्टींग घेतो काय? तो भाषेचा लहेजा, देहबोली सगळे कसं परफेक्ट उचलतात?
चैतू तर आहेच मस्त पण मणी, त्याचे सोबती, चिमी फार कमाल करतात. ती लहानी काही काही सिन्स मधे फार आगाऊ वाटली. चैतूसाठी मनापासून वाईट वाटत राहिलं. बर्‍याच सीनला डोळ्यात पाणी आणलं पोट्ट्याने. त्याची वैदर्भीय भाषा तर फार गोड वाटली...

मला फार रिलेट झालं हे भावा बहिणींचं नातं. मी एकुलती असल्याने मलाही लहानपणी एक हक्काचा भाऊ च असावा असं फार वाटायचं. त्यामुळे चैतूची ओढ पटली. या लहान मुलांच्या बॅकग्राऊंडला मोठ्या भावा बहिणींची पण एक समांतर स्टोरी चालते ज्याचा शेवट अ‍ॅज सच असा नाही दाखवलाय पण या मुलांच्या स्टोरीतून रिलेट करता येतो. फार सुंदर विरोधाभास !

अंजली छान पोस्ट आणि +७८६ पूर्ण पोस्टला अनुमोदन..
बहुधा माझ्या मूळ परीक्षणात सुद्धा थोड्याफार फरकाने हेच म्हटले आहे..

बाकी आता कुठे पाहिला नाळ?
ओटीटी वर आला का?
पुन्हा बघायला आवडेल..

आज बघितला नाळ २ प्राईम वर . फार सुंदर झालीत सर्वांची कामे. निसर्गाचे चित्रण ही मस्त !! शेवटी नागराज मंजुळे चैत्या ला मारायला लागतो तेव्हा जितेंद्र जोशी चे चेहऱ्यावरील भाव बघण्याजोगे आहेत. चित्रपट बघताना नकळत डोळ्यांत पाणी येते बऱ्याच वेळा !!
मी पहिला भाग पाहिला नाहीये . पण हा आवडला.