विहिर

Submitted by vijaybhoir on 15 May, 2020 - 09:50

कितीशी असते अशी
एखाद्या विहिरीची जागा
एका वर्तुळा भोवती
सारा खोलीचा त्रागा

उन्मादत असते पाणी
खोल खोल डोहात
काढणारा मात्र असतो
आपल्याच उंचीच्या ओघात

मस्त सिमेंट काँक्रीटवर
हात जखडून ठेवतो
मान अर्धी खोलात
विस्कटणारे प्रतिबिंब बघतो

एवढ्या पाषाणी दगडात
ओलावा असेल तरी कसा
पडणारी एक एक भेग
जसा ओलावा देईल तसा

इतके अंदाज सारे
वरूनच कसे बांधायचे
स्पर्शविना इतके सारे
असेच कसे बोलायचे

वरच्या बांधावर बसून
कशी मोजावी खोली
अंदाज लावायला त्यात
एकदा तरी घ्यावी उडी

आधी वाटेल भीती
थरथर पाय कापतीलही
धडधड होईल उरात
डोळे घट्ट मिटून ठेवतीलही

असेच होत राहिले
तर कळणार तरी काय
नुसते खाली बघत राहून
थरथरत राहतील पाय

एकदा नको म्हणता
म्हणता उडी घेऊन तर बघ
एकदा......अरे एकदा
त्या भीतीला कवटाळून बघ

जाशील हळू खोल खोल
जाता जाता वारा हसेल
तळाला होईल स्पर्श ओला
तेव्हा मात्र तो नसेल

आवाज होईल मोठा
सारे शिंतोडे उडतीलही
जीव थांबण्यासाठी
हात पाण्या पकडतीलही

शेवटी येशील किनारी
धाप तुझी शांत होईल
वरच्या कोरड्या बंधाकडे
एकटक फक्त नजर जाईल

तीच खोली तोच ओलावा
तुला हवा हवासा वाटेल
सारेच तर सोप्पे आहे
हे मात्र तेव्हाच पटेल

हेच होते संवादाचे
खोली काही सापडत नाही
नेमक्या वेळी काय बोलायचे
नेमक्यावेळी कळत नाही

असेच अंदाज बांधता
बांधता सारे कसे सुटून जाते
घेईन घेईन म्हणता म्हणता
उडीची वेळ टाळून जाते

-विजय
९२२२२८५३८१
vijaybhoir92222@gmail.com

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर कविता...
प्रतिसाद नाही पाहून मा.बो.कर आळशी झालेत घरात बसून असे वाटते...