इथे पॅसिफीक नॉर्थवेस्टात इस्टर संडेचा बझ जरा जास्त आहे असं जाणवलं. इस्टर स्पेशल बेकींगचे बरेच प्रकार ऐकले होते आणि त्यामुळे ह्या वर्षी हॉट क्रॉस बन्स करायचे असं जानेवारीतच ठरवलं होतं. ह्या हॉट क्रॉस बन्सचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यावर असलेला क्रॉस. मला आधी वाटायचं की त्या बन्सच्या आत काहीतरी क्रीम भरलेलं असतं आणि तो क्रॉस त्याचा असतो. पण तो क्रॉस पीठाचा असतो आणि ते पीठ फक्त वरून लावलेलं असतं! ब्रिटीश बेकींग शोचा जज पॉलची रेसिपी आधीच शोधून ठेवली होती. पण अगदी तंतोतंत तशीच करूनही खुद्द इस्टरच्या दिवशी केलेल बन्स सपशेल बिघडले. अवन मधून काढल्या काढल्या गरम खायला बरे वाटले पण गार झाल्यावर अगदी मैद्याचे दगड झाले. मग त्या रेसिपीत थोडे फेरफार करून अखेर ते जमले!.
१. ५०० ग्रॅम मैदा
२. ७ ग्रॅम यीस्ट
३. १ टीस्पून मीठ
४. ५० ग्रॅम अनसॉल्टेड बटर
५. ७५ ग्रॅम साखर
६. १ अंड
७. ३०० मिली दुध
८. १५० ग्रॅम बेदाणे
९. १०० ग्रॅम सफरचंदाचे बारीक तुकडे
१०. ८० ग्रॅम टुटीफ्रुटी / मिक्स पील्स
११. २ संत्र्याचे झेस्ट
१२. २ टीस्पून दालचिनी पावडर ( ऐच्छिक. मी घातली नाही)
१. १ चमचा साखर कोमट दुधात घालून त्यात यीस्ट घालून ५ मिनिटे ठेवा. यीस्ट अॅक्टीवेट होऊन त्याचा फेस व्हायला लागेल. (पॉलच्या रेसिपीत ही स्टेप नव्हतीच!)
२. पीठ, मीठ आणि साखर ह्यात दिलेल्या प्रमाणाच्या अर्ध दुध घालून एकत्र करा. सगळं दुध एकदम घालायचं नाही. हळूहळू एकत्र करून लागेल तसं घालत रहायचं.
३. आता त्यात यीस्ट आणि अंड घालून मळून घ्या. पीठाचा चिकट गोळा तयार व्हायला लागतो.
४. मग बटर आणि झेस्ट घालून मळत रहा.
५. सगळ्यात शेवटी फळं घाला. आता पीठाचा बर्यापैकी चिकट गोळा तयार झालेला असेल.
६. परातीत किंवा ओट्यावर भरपूर पीठ घालून तो गोळा ठेवा आणि मळत रहा. आता एकदम जोर लाऊन सुमारे १० ते १५ मिनिटे मळायचं आहे. (पॉलने ५ मिनीटेच सांगितलं होतं. पण मी जवळ जवळ १५ मिनीटे मळल्यावर ते पीठ मऊ आणि इलॅस्टीक झालं)
७. आता एकदम गुळगुळीत आणि ताणता येण्याजोगं पीठ तयार होईल. ते झाकून उबदार जागी प्रुव्हींग साठी २ तास ठेऊन द्या. २ तासांनी ते जवळ जवळ दुप्पट फुगलेलं असेल.
८. फुगलेल्या गोळ्यावर मुठीने पंच मारून त्यातली हवा काढा आणि पुन्हा कोरडं पीठ भुरभुरवून त्यावर ठेऊन मळा. आता ह्या पीठाला लांबुळका आकार द्या. ते खूप ताणलं जाऊन सुमारे दोन फुटांचा पाईप सारखा आकार (पोकळ नाही. भरीवच) होईल.
९. आता त्याचे १२ तुकडे कापून घेऊन त्याला पोळी लाटण्याआधी घेतो तसा कणकेच्या गोळ्याचा आकार द्या.
१०. हे गोळे बेकींग ट्रेवर ठेऊन (मधे थोडी जागा सोडून), पुन्हा अर्धा तास प्रुव्हिंग साठी ठेऊन द्या.
११. एकिकडे ७५ ग्रॅम मैद्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आईसिंग बॅग मध्ये भरून घ्या. आमच्याकडे आईंसिंग बॅग नव्हती त्यामुळे मी मागे आणलेल्या व्हिप्ड क्रीमच्या बाटलीचं नॉझल वापरलं.
१२. फुगलेल्या बन्स वर मैद्याचे क्रॉस काढून घ्या.
१३. २२० डिसे वर २५ मिनीटे बेक करून घ्या.
१४. पॉलच्या रेसिपीमध्ये गरम बन्सवर अॅप्रिकॉट जॅम लावायला सांगितला होता. पण मला तेव्हडं गोड नको होतं त्यामुळे मी चमक येण्यासाठी आधी बटर आणि मग थोडसं साखर पाणी लावलं.
१. ह्यामध्ये सफरचंदाचे तुकडे छान करकरीत लागतात.
२. ऑरेंज झेस्टचा स्वाद एकदम मस्त लागतो! अगदी सटल गोड असल्याने चहा कॉफी बरोबर खायला मस्त लागतात. आम्ही एकदा मधे कापून थोडासा स्ट्रॉबेरी जॅमपण लावला होता.
३. दालचिनी पावडरमुळे झेस्ट आणि फळांचा स्वाद मारला जाईल असं वाटलं त्यामुळे मी घातली नाही पण पुढच्यावेळी जायफळाची पावडर घालून बघणार आहे.
रेसिपी छान आहे. कमी प्रमाणात
रेसिपी छान आहे. कमी प्रमाणात करून बघता येईल.
फळांचे तुकडे घालून नंतर 10 मिनिटे पीठ मळले तर फळे मॅश नाही का होणार?
नाही. सफरचंदाच्या अगदी लहान
नाही. सफरचंदाच्या अगदी लहान फोडी असल्या की त्या आणि टुटीफ्रुटी वगैरे क्रश नाही होत.
अगदीच शंका असली (किंवा सफरचंद मऊ असतील) तर मळून अगदी शेवटी फळ घाला. फक्त ती नीट मिक्स झाली पाहीजेत.