घरी तूप कढवणे म्हणजे एक छोटीशी फॅक्टरी चालवण्यासारखेच आहे. परत दुधापासून ते लोण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर असतो. पण जे लोक म्हशीचं दूध घेतात, जसं आम्ही घेतो, त्यांना सायीचं काहीतरी करावंच लागतं. नाहीतर आपण वजन वाढतं म्हणून भात सोडतो, आणि वजन न वाढणाऱ्या घरातील "काही व्यक्ती" आपल्यापुढे बसून रोज साय भात खाऊ लागतात. ते रोज पाहण्यापेक्षा तूप कढवलेलं परवडतं. म्हशीच्या दुधात कमीत कमी 8 % एवढे फॅट असावेच लागतं. आपल्या घरातील फॅक्ट्रीमधल्या "प्रोसेस स्ट्रीम"चा हा चांगला 8% हिस्सा असतो. तो संपूर्णपणे वापरण्यात गृहकौशल्य आहे असे वाटणे जर थोडे मागास वाटत असेल, तर त्यात अभियांत्रिकी कौशल्य आहे असेही समजता येईल. कारण सायीचे तूप करून आपण एका प्रकारे आपल्या घरातील दूध व्ययस्थापनाचा मास बॅलन्स क्लोज करतो असेही म्हणता येईल!
पहिला टप्पा म्हणजे दुधाची साय काढणे. हे काम घनतेच्या फरकामुळे होतं.फॅटची घनता दुधातील सॉलिड नॉट फॅट (SNF) पेक्षा कमी असते. त्यामुळे टँकरमधून येताना सुध्दा दूध आणि साय वेगळे होतात. ते पॅकिंगच्या वेळी पुन्हा एकत्र करून पॅक करावे लागतात नाहीतर दूध उत्पादकांना दंड होऊ शकतो.कारण दुधातील फॅटसाठी असलेले नियम "not less than" असे असतात. सॉलिड नॉट फॅट, म्हणजेच SNF मध्ये दुधातली प्रथिनं जसं की केसीन,लॅकटोज म्हणजे दुधातली साखर, आणि व्हे यांचा समावेश असतो. यांना मिल्क सॉलिड्स असं म्हणतात आणि जिममध्ये जाणारे बरेच लोक जी व्हे पावडर घेतात ती या मिल्क सॉलिड्स पासूनच बनते.
आपण साय जमा करून ठेवतो. पण ती खराब होऊ नये, तिला वास येऊ नये म्हणून अधून मधून आपण त्यात थोडे थोडे दही घालतो. आपण याला विरजण लावणे असं म्हणतो. हे विरजण म्हणजे, दुधातले लॅकटोज खाऊन त्याचे लॅक्टिक ऍसिडमध्ये रूपांतर करणारे लॅकटोबॅसिलस सूक्ष्मजंतू. हे दही घरी तयार राहावं यासाठी आपण सतत दुधाचा एक भाग विरजत राहतो. त्याला आपण दही लावणे असं म्हणतो. घरी लावलेलं दही आणि पॅकबंद दही यातही फरक आहे. आपण विरजण लावतो तेव्हा बॅक्टेरियांचं एखादं गावच आपण चमच्यातून दुधात टाकत असतो. त्याआधी, दुधाचं तापमान त्यांची नवीन गावं तयार व्हायला मदत व्हावी असे करून ठेवतो, म्हणजेच 30-40 डिग्री सेल्सिअस. या बॅक्टेरियांच्या समूहाला कल्चर असे म्हणतात. आपण घरी दही लावतो तेव्हा आपण आधीच्या दह्यातून किंवा घराजवळ एखादी छोटी डेअरी असेल तिथून दही आणून विरजण लावतो. पॅकबंद दह्याचे विरजण लागत नाही हे एव्हाना अनेकांच्या लक्षात आलं असेल. याचे कारण पॅकबंद दही बनवताना तापमान आणि हवामान अतिशय काटेकोरपणे नियंत्रित करतात. आणि ज्या बॅक्टेरियांमुळे दही चांगलं लागतं तेवढ्याच बॅक्टेरियांची वेगळी केलेली कल्चर, तीही अगदी लागतील तेवढीच, वापरली जातात. त्यामुळेच पॅकबंद दही नंतर आंबट होत नाही आणि त्याचे शेल्फ लाईफ चांगले असते. पण मोजून मापून कल्चर वापरल्याने त्याच्या पुढे पिढ्या तयार होत नाहीत. आणि परिणामी लोक अजून पॅकबंद दही आणतात!
आपण घरी दही लावतो तेव्हा दही लावताना असलेले तापमान तेवढे आपल्या हातात असते. त्यापुढे घरात हवामान जसं असेल तसंच आपलं दही लागतं. त्यामुळे थंडीत दही लागायला वेळ लागतो आणि उन्हाळ्यात दही पटकन आंबट होतं. तसंच आपण दह्यातली कल्चर वेगळी करू शकत नाही. त्यामुळे एखादं दही अती आंबट झालं असेल, आणि त्याचं विरजण जर आपण नेहमीच्या प्रमाणातच वापरलं, तर पुढचं दहीसुध्दा लगेच आंबट होतं.
गावाहून परत आलो किंवा बरेच दिवस दही लावलं नसेल तर अनेकवेळा आपण शेजाऱ्यांकडे विरजण मागायला जातो. हे विरजण मागणे म्हणजेचं आपला "कल्चर स्टार्टर पॅक" मागणे. गेले अनेक दिवस याबाबत एक प्रयोग करून बघायची माझी इच्छा होती. असं म्हणतात की लाल मिरचीच्या देठात लॅकटोबॅसिलसच्या कॉलनी असतात. त्यामुळे जेव्हा विरजण नसेल तेव्हा आपण कोमट दुधात अशी लाल मिरची टाकूनही दही सुरु करू शकतो. असा प्रयोग मी करून पाहिला आणि चक्क हलकं आंबट, घट्ट असं दही तयार झालं! आता त्या कल्चरची पुढची पिढी कशी होते ते पाहणार. पण वाचकांमध्ये यातील कुणी तज्ज्ञ असतील तर त्यांनी याबद्दल अधिक माहिती द्यावी.
एकीकडे आपण काही दिवस जमा केलेली साय विरजत राहतो. तशा सायीला औद्योगिक भाषेत "कल्चर्ड क्रीम" असं म्हणतात. आपल्याला जे पॅकबंद लोणी मिळतं, ज्याला आपण बटर म्हणतो, ते बहुतांशी न विरजलेल्या सायीचे असते. विरजलेल्या सायीचे बटर युरोपमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. अमेरिकेत, आणि इतर देशामध्ये "स्वीट क्रीम बटर" तयार होते. त्यामुळे आपले घरचे थोडे आंबट लोणी आणि विकत आणलेले बटर यांच्या चवीत फरक असतो.
पुढली प्रक्रिया म्हंणजे लोणी काढणे. आपण साय वेगळी न करता रोज संबंध दुधाचे दही लावून लोणी काढू शकतो. पण साय वेगळी करून विरजली तर आपण SNFचे प्रमाण कमी कमी करत जातो. आणि अशी साय थोडी घुसळली तरी भरपूर लोणी मिळते. खाली जे ताक उरते त्यात आपला SNF चा काही भाग निघून जातो. पुढे आपण जी प्रक्रिया करतो त्याला "क्लॅरीफिकेशन" असे म्हणतात. आपण लोण्याचे तूप का बनवतो? हा प्रश्न निरर्थक वाटेल कारण घरचं रवाळ तूप कुणाला आवडत नाही? पण लोण्यामध्ये फॅट असले तरी लोणी जर तव्यावर टाकले तर पटकन जळते. अमूल बटरसारखे बटरही तव्यावर पटकन जळून काळे होते. पण तुपाचे तसे होत नाही. कराण आपण लोण्याचे तूप करून त्याचा स्मोक पॉईंट वाढवतो. लोण्यापेक्षा तुपाचे जळायचे तापमान अधिक असते. त्यामुळे आपण त्यात रवा, बेसन वगैरे आरामात परतू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, तूप तयार करताना खाली जी बेरी बसते, त्यात सगळा SNF चा भाग जळून जातो. त्यामुळे आपल्या हाती येणारे फॅट लोण्यापेक्षा अधिक शुद्ध आणि टिकाऊ असते.
लोण्याचे क्लॅरिफिकेशन आपण उष्णता वापरून करतो. लोणी विस्तवावर ठेवले की काही वेळाने त्यातील जे फॅट नाहीत असे घटक जळून खाली बसतात आणि वरती सोनेरी तूप राहते. साखर कारखान्यांमध्ये असेच क्लॅरिफिकेशन करायला उकळत्या उसाच्या रसात लाईम आणि सल्फर घालतात. जेणेकरून त्यातला सगळा नको असलेला कचरा एकत्र होऊन खाली बसतो. गुऱ्हाळांमध्ये फॉस्फोरिक ऍसिड आणि भेंडीचा पाला वापरून रसावरची मळी बाजूला केली जाते.
कुठल्याही वनस्पतीचा किंवा अन्नपदार्थाचा पचायला सोपा आणि चवीला सर्वोत्तम असा भाग कसा वेगळा करायचा हे माणसाच्या उद्यमशीलतेने आपल्याला दाखवून दिले आहे. त्यामुळेच गव्हापासून मैदा, सालं काढलेल्या डाळी, उसापासून साखर आणि गूळ, आणि दुधापासून तूप हे सगळं वेगळं करायचे कारखानेच आपण उभे केले आहेत. आपण जेव्हा रवा-मैद्याच्या, हरबर्याच्या डाळीच्या, गूळ किंवा साखर वापरून केलेल्या खुसखुशीत पुरणपोळीवर चांगले 2 मोठाले तुपाचे चमचे ओततो, तेव्हा खरंतर आपण अशा अनेक फॅक्टर्यांचा अर्क एकत्र करून खात असतो. आपल्या तब्येतींवर विपरीत परिणाम करत असले तरी आवडणारी गोष्ट, न आवडणाऱ्या गोष्टींमधून कशी काढायची याचे युक्ती माणसाला नक्कीच सापडली आहे. आता फक्त असं क्लॅरिफिकेशन विचारांचंही करायला शिकलो तर कठीण परिस्थितीतून मार्गही सापडेल!
ता.क. यात एक गोष्ट लिहायची राहून गेली. घरचं दही मातीच्या भांड्यात घट्ट लागतं कारण त्या भांड्याची सच्छिद्रता (porosity)अतिरिक्त पाणी शोषून घेते.
>>>>हेवी विपिंगक्रिमला आयपीत
>>>>हेवी विपिंगक्रिमला आयपीत विरजण लावून त्याचे देशी स्टाईल आंबट चवीचे लोणी आणि ते कढवून साजूक तूप.
वाव!! Exactly हेच मला सांगायचं होतं. की इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये जे बटर बनवतात ते स्वीट क्रीम बटर असतं. अमेरिकेत सगळं स्वीट क्रीम असतं. आपण जे लोणी करतो ते कल्चर्ड बटर असतं. तसं फक्त युरोपमध्ये बनवतात. पण तेही आता बरंच फ्लेवर घालून करतात. त्यामुळे कुठल्याही ब्रँडचं तूप घेतलं तरी काहीतरी मिसिंग वाटतं. ते मिसिंग विरजण असतं.
मी मुलासाठी बरेच पदार्थ तुपात करते. पण मग मी घरी अशी विभागणी केली की शिरा, लाडू वगैरे करण्यासाठी मी विकतचं तूप वापरते. आणि भातावर वगैरे घरचं.
पण ही हेवी व्हीपिंग क्रीमची कल्पना भारी आहे.
पण मग मी घरी अशी विभागणी केली
पण मग मी घरी अशी विभागणी केली की शिरा, लाडू वगैरे करण्यासाठी मी विकतचं तूप वापरते. आणि भातावर वगैरे घरचं.>>> ++१११ मी पण असंच करते, पुपो गुळाची पोळी किंवा मोदकावरही फक्त आणि फक्त घरचं साजूक तूप
शिरा, लाडू वगैरे करण्यासाठी
शिरा, लाडू वगैरे करण्यासाठी मी विकतचं तूप वापरते. आणि भातावर वगैरे घरचं. >> सेम मीही करते.
छान लेख.
छान लेख.
शिरा, लाडू वगैरे करण्यासाठी मी विकतचं तूप वापरते. आणि भातावर वगैरे घरचं. >> सेम मीही करते. >>>+1
मुलाला कणकीचा शिरा आवडतो, तूपाचा काळ आहे हा शिरा !
मी बटर आणून ते राईस कुकर मध्ये कढवते.
स्वाती२ प्लीज इंस्टंट pot चे लोणी तूप कसे करायचे डिटेलवार सांगा. माझे इंपा पडून आहे .
धन्यवाद
सई, लेख आवडला. बाकीचे सवडीने
सई, लेख आवडला. बाकीचे सवडीने वाचेनच.
माझ्या सा बा शिरा, लाडूसाठी विकतचे तूप वापरीत असत. पण ते थेट न वापरता एखाद्या भांड्यात ओतून एकदा उकळून घेत असत. कारण काय असावं ते आठवत नाही आता.
मी मात्र सगळ्या गोड पदार्थांसाठी unsalted butter पासून केलेले घरगुती (!)तूप वापरते.
मी मुलासाठी बरेच पदार्थ तुपात
मी मुलासाठी बरेच पदार्थ तुपात करते. पण मग मी घरी अशी विभागणी केली की शिरा, लाडू वगैरे करण्यासाठी मी विकतचं तूप वापरते. आणि भातावर वगैरे घरचं. >>>> आमच्याकडे त्यातही उपविभागणी आहे. शिरा घरचे तुप व लाडू विकतचे तुप
धन्यवाद हे इथे (ही)
धन्यवाद हे इथे (ही) लिहिल्याबद्दल.
सगळेच लिखाण चांगले आहे.
दूध विकत घेतल्यानंतर एका
दूध विकत घेतल्यानंतर एका दिवसांत संपणार नसेल तर दोन वेळा तापवून ठेवते मी. सकाळ संध्याकाळ असे <<<<< ह्याचं काही विशेष कारण ? मी एकदा तापवून गार झाल्यावर फ़्रिजमध्ये टाकते मग लागेल तसे गरम करुन घेते.
हे बरोबर आहे का ?
धनश्री, नासत नाही ना दूध तर
धनश्री, नासत नाही ना दूध तर मग बरोबरच आहे....
मीही लोकडाऊनमध्ये दूध एकदा
मीही लोकडाऊनमध्ये दूध एकदा गरम केले आणि थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवले. आता जसे लागेल तसे 2-3 चमचे चहापुरते घेते काढून. 1 लिटर दुध साधारण तीन आठवडे चालले. आधी मात्र दरवेळी बाहेर काढून गरम करायचे. पण नासले नाही सहसा. बाहेर काढून तसेच चार पाच तास न तापवता ठेवले तर मात्र नासणार.
स्वाती२, हेवी विपिंगक्रिमच्या
स्वाती२, हेवी विपिंगक्रिमच्या लोण्याची कृती मिळेल का? कल्पना आवडली.
1 लिटर दुध साधारण तीन आठवडे
1 लिटर दुध साधारण तीन आठवडे चालले <<< पण दुधाला सुद्धा एक्सपायरी असते ना ? तीही साधारण 1/2 दिवसांची.
मी दुसर्या दिवशी संपवतेच. नाही संपले तर पनीर करुन टाकते.
अहो एसआरडी, मला चहाची रेसिपी
अहो एसआरडी, मला चहाची रेसिपी नको होती.तुम्ही दुधाच्या बॅगला छिद्र पाडून ठेवता म्हंणून फक्त असं का विचारले होते.हुश्श!
शिरा, लाडू वगैरे करण्यासाठी मी विकतचं तूप वापरते. आणि भातावर वगैरे घरचं.>>>>> +१.
चंद्रा,
खूप वर्षांपूर्वी,ग्राहक संघाच्या एका माणसानेही मला विकतचे तूप परत कढवून ठेवायला सांगितेले होते.
2-3 चमचे चहापुरते घेते काढून. 1 लिटर दुध साधारण तीन आठवडे चालले. >>>>> फ्रीझची उघडझाप कमी असेल.कारण एकदाच तापवलेले दूध ३ आठवडे चांगले रहात नाही.
आमच्याकडेही दूध एकदाच तापवून थंड झाल्यावर फ्रीझमधे ठेवले जाते.वापरायच्यावेळी जरूरीपुरते काढून गरम केले जाते.इतर १ किंवा २ बॅग्ज न तापवता तश्याच फ्रीजमधे ठेवल्या जातात.
तापवल्यामुळे दुध नासवणारे
तापवल्यामुळे दुध नासवणारे बॅक्टेरिया मरतात. कधी कधी फ्रिज मध्ये ठेवलेल्या सायीला सुध्दा गुलाबीसर बुरशी येते. फ्रिजमध्ये ठेवले म्हणजे नसणार नाही/खराब होणार नाही असं नाही. म्हणून ज्या गोष्टी तापवता येतात पुन्हा पुन्हा त्या तापवून ठेऊन द्यायच्या.
Lactobacillus acidophilus is
Lactobacillus acidophilus is commonly used lactic acid bacteria for producing fermented milk products. In general household practice, curdling is known to occur faster in the presence of red chili. Herein we analyzed the enhanced effect of red chili (Capsicum annuum) and its major component, capsaicin, on Lactobacillus acidophilus (ATCC 4356) in the production of l-lactate in de Man, Rogosa, and Sharpe medium at various temperatures (15, 20, 25, 30, and 37°C). The addition of red chili showed significant increase in the amount of l-lactate produced by L. acidophilus compared with the control at all temperatures. Similar results were observed with addition of capsaicin alone. This was accompanied by an increase in the consumption of d-glucose. Capsazepine, a known antagonist of capsaicin, inhibited the production of l-lactate by L. acidophilus in the presence of both capsaicin and red chili. Because no increase occurred in the growth of L. acidophilus in the presence of red chili, our results show that the enhanced production of l-lactate in the presence of red chili or capsaicin is due to increased metabolic activity.
माझ्याकडे फ्रीज सतत उघडझाप
माझ्याकडे फ्रीज सतत उघडझाप नाही होत कारण मी हवे ते काढून घेऊन बाकीचे तेव्हाच परत आत टाकते. दूध सुद्धा 2 चमचे काढून घेऊन परत आत टाकते. पण असे एकदा तापवून नंतर कायम थंड राहिलेले दूध टिकलेले आहे माझ्याकडे. आधी मांजर घरी होते तेव्हा 2 लिटर दुध तापवून फ्रिजमध्ये ठेवून गावी जायचे, बाई रोज थोडे थोडे दूध मांजराला काढून द्यायची
मी दूध पित नाही आणि काही वैद्यकीय कारणांमुळे आंबट टाळायला सांगितले आहे. त्यामुळे चहात दूध घालावे लागते, नाहीतर लिंबू चालले असते.
फ्रीजमध्ये साय जास्त दिवस राहिली तर बुरशी धरते हे बघितले आहे. मी साठवलेल्या सायीत नवी साय टाकली की ढवळून ठेवते. न ढवळता ठेवली तर खराब होण्याची शक्यता. आता साय जमतच नाही म्हणा.
माझी आई रोजच्या सायीचं रोज
माझी आई रोजच्या सायीचं रोज विरजण लावून दुसऱ्या दिवशी लोण्याचं ताक करते. म्हशीच्या दुधाची साय चांगली निघते आणि सायीबरोबर त्यातच पुरेसं दूध असल्यामुळे लहान तांब्या भरून ताक त्यांना दोघांना दोन्ही वेळच्या ताकभाताला पुरतं. अर्थात लहान असताना आम्ही पण ताकभात जेवायचो आणि विरजणाचं हे चक्र असंच चालू आहे.
बरोबर देवकी, कढवणं हा शब्द
बरोबर देवकी, कढवणं हा शब्द अधिक योग्य आहे. धन्यवाद
छान लेख.
छान लेख.
एक प्रश्न. आम्ही कायम घरीच तूप करतो. रोज साय जमा करून भांडं भरल्या वर, आदल्या दिवशी त्यात दही घालून ठेवते. आणि फ्रीज मधून बाहेर काढून ठेवते रात्र भर. दुसर्या दिवशी तूप करते. पण कधी कमी तर कधी कधी खूप जास्त बेरी निघते. याचं काय कारण असावं? लोण्यातून पूर्ण ताक निघालं नाही तर तूप कमी आणि बेरी जास्त असं आहे का?
करण्याची पद्धत तर नेहमी सारखीच असते.
आदिश्री आणि सुनिधी,
आदिश्री आणि सुनिधी,
इंस्टंट पॉटमधे मी पॉट इन पॉट मेथडने हेवी विपिंग क्रिम आधी हाय प्रेशरवर दोन मिनिटे तापवून घेते आणि ते कोमट झाले की त्याला विरजण लावून नेहमी प्रमाणे योगर्ट मोडवर ठेवते. ( मॅन्युअलमधे पॉट इन पॉट वापरुन लहान लहान जारमधे योगर्ट कसे करायचे ते दिले आहे तिच पद्धत वापरायची) . विरजण लागलेले क्रिम गार होवू द्यायचे. मी रात्रभर फ्रीजमधे ठेवते. दुसर्या दिवशी मोठ्या गंजात (उभ्या भांड्यात) दोन बॅचमधे हँड मिक्सरने (वायर व्हिस्क ) घुसळते. स्टिफ पिक्स आली तरी घुसळत रहायचे. हळू हळू लोणी आणि बटरमिल्क वेगळे व्हायला लागते आणि छान देशी चवीचे लोणी निघते. पहिल्यांदा केले तेव्हा या फेजला बटरमिल्क बाहेर उडून जरा पसारा झाला म्हणून आता दोन बॅचेसमधे घुसळते. २ मिनीटे हाय स्पीड, ३० सेकंद मिक्सरला विश्रांती असे करत एका बॅचला साधारण १५-२० मिनीटे लागतात. उभे भांडे नसल्यास मोठा बोल वापरा. तुमच्याकडे स्टँड मिक्सर असेल तर त्यात घुसळा, तो सलग जास्तवेळ चालतो. घुसळताना पाणी अजिबात घालायचे नाही. घट्ट लोणी दुसर्या बोलमधे काढून फ्रिजमधे ठेवा. गार झालेले लोणी एकदा गार पाणी घालून धुवून घ्या आणि मंद आचेवर कढवा.
धन्यवाद स्वाती, उद्याच्या
धन्यवाद स्वाती, उद्याच्या कर्ब पिक अप मध्ये टाकलय व्हिपींग क्रिम...नक्की करून बघणार.
तुमचे खूप खूप आभार.
धन्यवाद सई .
स्वाती२, मस्त. करुन पहाते आता
स्वाती२, मस्त. करुन पहाते आता. नेहमीचे दही मी गॅसवर अथवा मायक्रोवेव्हमधे दूध उकळवुन, कोमट करुन मगच आयपीमधे योगर्ट सेटिंगवर ठेवते. तर हे क्रीमपण मायक्रोवेव्ह मधे गरम करता येऊ शकेल का? कधी केले आहे का असे? पॉट ईन पॉट अजुन तरी कधीच केलं नाही त्यामुळे मायक्रोवेव्हमधे काम होत असेल तर उत्तम.
अफलातून लिहीताय. मी तुमचे
अफलातून लिहीताय. मी तुमचे बाकीचे पण सगळे लेख वाचले आज.
सुनिधी,
सुनिधी,
मी मावेत नाही केले कधी क्रिम गरम परंतू
https://oureverydaylife.com/make-scalded-cream-30753.html इथे तिसरा पर्याय बघ. मावेत कसे करायचे ते सांगितले आहे.
पॉट इन पॉट एकदम सोपे आणि सेफ आहे. आयपीच्या भांड्यात त्यांनी दिलेल्या कपाने २ कप पाणी घालायचे आणि ज्या भांड्यात दही लावायचे आहे त्यात क्रिम घालून ते भांडे पाण्यात ठेवायचे. आपण नॉर्मल कुकरला करतो तसेच. झाकण लावून सील करायचे आणि हाय प्रेशर , स्टीम ऑप्शन दोन मिनीटांसाठी लावायचा. ऑफ करुन नॉर्मल रिलीझ होवू द्यायचे. मग बाहेर काढून कोमट झाले की विरजण लावून पुन्हा भांडे आयपीत ठेव योगर्ट सेटिंगला.
अहो एसआरडी, मला चहाची रेसिपी
अहो एसआरडी, मला चहाची रेसिपी नको होती.तुम्ही दुधाच्या बॅगला छिद्र पाडून ठेवता म्हंणून फक्त असं का विचारले होते.हुश्श!>>>>> देवकी, एसआरडींनी नाही मी दिली होती. दूध नासण्याची प्रक्रिया ही चहाच्या वेळी व्हायची म्हणून न नासता चहा करण्याची पद्धत सापडली म्हणुन दिली होती दुधाचा पिशवीचा कोपरा कट करुन ती पिशवी पातेल्यात फ्रिज मधे ठेवणे हा फक्त सोयीचा भाग. त्यामागे काही विशेष हेतु नाही..आपुलकीपोटी आवश्यकते पेक्षा जास्त माहिती दिल्याचा मानसिक त्रास झाला नसावा अशी अपेक्षा करतो. पण झाला असल्यास क्षमस्व!
ओके स्वाती२.... करुन पहाते
ओके स्वाती२.... करुन पहाते (आता पहिले त्यांनी दिलेला कप शोधते
)
छान माहिती.
छान माहिती.
एसआरडींनी नाही मी दिली होती>>
एसआरडींनी नाही मी दिली होती>>>> अर्र एस आरडी, सो सॉरी!
प्रघा,ते पिशवीला छिद्र पाडण्यावरून शंका व्यक्त केल्यावर चहाची रेसिपी वाचून चक्रावले होते हो!
आपुलकीपोटी आवश्यकते पेक्षा जास्त माहिती दिल्याचा मानसिक त्रास झाला नसावा अशी अपेक्षा>>>> आता मात्र ट्डोपा.
आता मात्र ट्डोपा>>>>म्हणजे
आता मात्र ट्डोपा>>>>म्हणजे काय?
काही लोक विचारलय तेवढच सांगा उगीच फापटपसारा नको अस सुचवत असतात.अनुभव आला आहे
टचकन डोळ्यात पाणी
टचकन डोळ्यात पाणी
Pages