एकटीच @ North-East India दिवस - २४

Submitted by सुप्रिया राज जोशी on 4 May, 2020 - 10:34

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

1st मार्च 2019

प्रिय कक्का,

मला हे ही माहीत नव्हतं की जो अनोळखी मनुष्य मला त्याच्या घरी घेऊन चाललाय त्याच्या घरी त्याची फॅमिली तरी आहे की नाही? सकाळी मार्को ‘अप्पू अप्पू’ असे जसे हाका देऊ लागला तशी मला जाग आली. पिवळ्या सोनप्रकाशाने झोपडीत कधीच प्रवेश केला होता म्हणजे उठायला थोडा उशीरच झाला.

उठून बाहेर आले तेव्हा तुमची भेट झाली. तेव्हाच मला समजलं की आदल्या रात्री फोन सायलेंट वर ठेउन तुझा नवरा झोपूनही गेला होता. हे भगवान ... मी रात्रभर फोन करत बसले असते तरी त्याला पत्ता लागला नसता. पण कोणी पाहुणी आपल्या घरी येणार म्हणाली नि आली नाही, तशी तुला शांत झोप लागेना. रात्री एक दिड च्या दरम्यान कसा तो बस चा आवाज नेमका तुझ्या कानी पडला आणि तू नवऱ्याला उठवून मला शोधून आणायला पाठवलेस...त्याला योजना म्हणावी की योगायोग?

अजूनही कित्येक प्रश्नांची उत्तर सापडलीच नाहीयेत मला... फक्त कुकीडोलोंग ला उतरायचं एवढचं माहित होत तरी नेमकी मी तुमच्या घराच्या समोरच कशी उतरले? निर्जन हाय वे वर भर पावसात एकटीला मला भीतीच कशी वाटली नाही? कुठच्या विश्वासापोटी मला रात्रभर निर्धास्त झोप लागली? कोणकुठची अनोळखी स्त्री अचानक घरी यायचं म्हणते तरी कुठच्या प्रेमापोटी तू मला आसरा द्यायला तयार झालीस? ... मागच्या पत्रात फाटकी झोपडी असं तुझ्या घराचं वर्णन मी केलं पण आजवरच्या प्रवासातली सर्वात गाढ झोप मला त्याच घरात लागली. भिंतीच्या आत दारे खिडक्या पडदे बंद करून झोपायची सवय जडली. चटई च्या भिंतीतून चंद्रकिरण आत येतात ते सुख काय असते ते फक्त कवितेत वाचले होते. पण आज मी ती कविता जगले.
जाता तया महाला मज्जाव शब्द आला |
भीती न यावयाला या झोपडीत माझ्या |

मला कसं कळणार होत की सकाळी सकाळी तुम्ही सारे ज्या शेकोटी भोवती बसला आहात त्या शेकोटीवर माझ्यासाठी आंघोळीचे पाणी तापत आहे? मी तर माझी आंघोळ आटपूनही घेतली. एकदा मनात आले होते की ज्या दाराला कडीच नाही त्याच्या पलीकडे आंघोळ कशी करायची?
पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या l
दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या l

जिथे घराच्या दाराला कडी नाही तिथे बाथरुमच्या दाराला कडी लावून काय वाचवायचे आहे? ही अशी बिनकडीची दारे अप्रत्यक्षपणे सुरक्षिततेचा हवाला देत असतात. म्हणून बिनदिक्कत आंघोळ करायची ठरवली. पण एकीकडे आंघोळ करताना लक्ष मात्र लाकडी फळ्यांच्या बाहेरचीच चाहुल घेत होते. शिवाय पाणी सुद्धा गारठवून टाकेल इतपत थंड होते म्हणून आंघोळ कशी, झटपट आटपली.

मला खरच फक्त रात्रीपुरता आसरा हवा होता. कुठेतरी हाय वे च्या साईडला मांडलेल्या एखाद्या घराकडून माझी आणखी काय अपेक्षा असू शकते ? सकाळ होता होताच इथून निघून उलटे दिमापुरला जायचे आणि परमिट घ्यायचे. पण तू तुझ्या नवऱ्याला चांगलीच ओळखतेस ना? तो मला सोडे ना. आधी चहा बिस्कीट दिले. मग ब्रेकफास्ट झाला. ते ठीक आहे, मग म्हणाला, मीच तुला दिमापूरला घेऊन जातो. मग आपण सारेच निघालो. मी माझे सामान घेउन निघत होते तर त्याने मला ते घेउ दिले नाही. तरीही माझा असेच वाटत होते की परमिट मिळताच इथे परत येउन समान घेउन निघता येईल.

आपल्या देशाच्या नागरिकांना नागालँडमध्ये दिमापुरपलीकडे कुठच्याही डीस्ट्रीक्ट मध्ये प्रवास करायला इनर लाईन परमिट घ्यावे लागते. गोहाटीला तेच तर मिळवायला मी गेले होते, तेव्हा नेमकी शनिवार रविवारची सुटी आड आली. त्यामुळे इथे दिमापुरला हे काम करायला यावे लागले. एरव्ही दिमापुर अगदीच रटाळ आणि धुळकट शहर आहे आणि प्रवाशाला रस वाटेल असे इथे काही एक नाही. फार म्हटलं तर दिमापुर मार्केटला गेले की इथल्या नवलाईची चांगलीच झलक अनुभवायला मिळते. नागालँड स्पेशल भले मोठे चाकू सुरे विकायला ठेवलेले पहाता असतात, इथच्या जंगलात सापडणारे ज्यांची नावे ही ऐकली नाहीत असे एकेक मसाले विकत घेता येतात आणि बघायचे असले-नसले तरी कबुतरे, ससे, बेडूक, किडे, कुत्रे वगैरे नजरेस पडतात. हे सारे पाळीव प्राणी म्हणून नाही तर जेवणात मांस खाण्यासाठी विकायला ठेवले असते हे सुज्ञास सांगणे न लगे! असो.

54729148_10156947360762778_2034839729706369024_n.jpg

माझा माझ्या परमिट च्या कामाशीच फक्त मतलब होता. पण मोन्थंग कडून मात्र मला VIP ट्रीटमेंट मिळाली. गाडीने मला थेट DC office मध्ये घेऊन गेला, सारी कारवाई होईपर्यंत स्वत: माझ्याबरोबर फिरत होता. आपला फोटो आणि ओळखपत्राच्या कॉपी सहित एक फोर्म आणि काय ती फी भरली की पुढचे सारे त्या गव्हरर्मेंट कर्मचाऱ्याची मर्जी आणि मनस्थिती यावर अवलंबून असते. फॉर्म वर पंधरा वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांचे नाव लिहायचे होते आणि हेच माझे वडील होते हे सिद्धही करायचे होते. आधार कार्डवर तर वडिलांच्या नावाची तरतूद नाही, त्यामुळे या परिस्थितीत त्याचा ही काही आधार नव्हता. मग राज ने मुंबईहून पासपोर्ट वगैरे अशी डिजिटल कागदपत्र पाठवली त्यात आणखी थोडा वेळ गेला. तरीही तुम्ही सारे बिनतक्रार गाडीमध्ये बसून माझी वाट पहात राहिलात. मी गाडीत बसताच गाडी निघाली. तोपर्यंत आपण परत घरी चाललो नव्हतो हे मला माहीतच नव्हते.

आधी आपण तुझ्या माहेरी गेलो! तिथे त्यांच्याकडे कोणी पाहुणी आहे असे वातावरण दिसेना. घर माझेच आहे आणि मला काय सुचेल, वाटेल, पटेल ते मी खुशाल करावे अशी सोय होती. पण असा घरगुती पाहुणचार माझ्या ध्यानी मनी नव्हता तसा माझ्या आजच्या प्लान मधेही बसत नव्हता. परमिट मिळेपर्यंत दुपार झाली होती. आणि आत्ताच्या आत्ता कुक्डीलोंग ला प्रायव्हेट गाडीभाडे ठरवून लगबगीने सामान घेऊन परत यायचे तरी दोन अडीज तास सहज जातील. मला सामान पाठी ठेवले त्याचा पश्चाताप झाला. तरीही कश्शीबश्शी ओढाताण करत साडेचारच्या गाडीने मी मोन च्या प्रवासासाठी बस पकडू शकत होतेच, कोहिमा ला जायला तर अगदी पाच पर्यंत वहान मिळाले असते. पण तेव्हाही तुझा नवरा मला सोडायला तयारच नाही.

“तू आजच कुठेच निघालीस? आता घरी दोन-चार दिवस रहा मगच पुढच्या प्रवासाला निघ. जास्तीचे सामान इथेच ठेव नि नागालँड फिरून पुन्हा एखादा दिवस घरी ये. गरज पडली तर विमानाच्या परतीच्या तिकीटाची तारीख बदलून घेऊया म्हणे.” याच्या साऱ्या आयडिया त्याच्या घरचे वास्तव्य इथवरच आटपायचे नाहीये, हेच सूचित करत होत्या. पाऊसही असा काय पडत होता की एकेका रस्त्यावरची रहदारी ठप्प झाली होती. दिमापूरहून २२ किलोमीटर दूर तुझ्या घरी जाऊन सामान घेऊन पुन्हा साडेचार ची बस पकडायला वापस येणे अशक्य आहे हे फायनल झाले. तुझे बाबा मला सांगत होते की काउच सर्फिंग मधून तुमच्याकडे येणारी मंडळी इथेही येउन जातात असा रिवाज आहे. कोणी मंडळी तर इथे येऊन किचन चा सुद्धा ताबा घेतात. जापनीज, चायनीज अशा त्याच्या डिशेस बनवून मग सारे एकत्र मेजवानी करतात. मी पहिलीच पाहुणी असेन की जिला त्यांच्या किचन मध्ये जाउन काही बनवायची हौस वाटली नाही. जेव्हा आपण तिथून निघालो मोन्थोंग दिमापूरच्या त्याच्या सर्वात आवडत्या रेस्तोरंत मध्ये मला घेउन गेला. तिथली त्याची सर्वात आवडती डिश त्याने माझ्यासाठी ऑर्डर केली. मी पोट फुटेलसे वाटेपर्यंत जेवले. आपल्या पाहुणीला आपण सर्वात खास पाहुणचार देत आहोत या भावनेने मोन्थंग खूप खूप खूप खुश होता.
54521325_10156947357427778_5905602138196672512_o.jpg

आपण सारे घरी परतत होतो तेव्हा माझ्या अंगात हुडहुडी भरली. एकीकडे तुमच्याशी काहीबाही बोलताना दुसरीकडे मी अक्षरश: पेंगू लागले. एकदा घरी जाऊन तुझ्या झोपडीतल्या चंद्रप्रकाशाच्या कुशीत चार चार ब्लंकेट अंगावर ओढून निजून जावे, एवढेच तेव्हा सुचत होते. पण घरी गेलो, मोन्थोंग ने शेकोटी पेटवली नि पुढचे दोन तास गप्पा रंगल्या.

मोन्थोंग म्हणतो की, “मी स्वत: प्रवासाला जाऊ शकत नाही पण तुझ्यासारखे कोणी प्रवासी माझ्याकडे येतात त्यांच्या कडून जे ऐकायला मिळते त्या निमित्तानेच मला ही प्रवास केल्यागत वाटते.” तुला वाटते की, “घरी स्वत:चीच रहायची धड सोय नाही आणि अशात कुठे कोणा पाहुण्याला घरी घेऊन येऊन त्यांना गैरसोय करायची?” मला हे सांगायचे आहे की, “मला तुमच्या झोपडीत माझे घर सापडले, तुमच्या रुपात माझे कुटुंब मला भेटले.”
54463144_10156947357662778_7145791300879515648_o.jpg

पाहूनि सौख्य माझे देवेंद्र तो ही लाजे l
शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या l

या प्रवासात मला जी सर्वात श्रीमंत माणसं भेटली त्यापैकी तुम्ही एक आहात. तुमची फॅमिली बघून तर माझा परकेपणा पार पळून गेला. तुमची दोन्ही बाळ सुपर क्युट आहेत. जॉर्डनशी कोणाची गट्टी जमायला वेळ लागत नाही. पण मार्को बराच वेळ जवळ यायला बघतच नव्हता. रागारागाने स्वत:च्या भाषेत मला दम द्यायचा. पण वेळ गेला तसा त्याने त्याच्या भाषेत, मी माझ्या भाषेत अशा आमच्या ज्या गप्पा रंगल्या, तो प्रकार मजेदार होता. गाडीत संध्याकाळी त्याला कुशीत घेऊन बसले होते नि तो गाढ झोपूनही गेला, तेव्हा केवढे सुख वाटत होते.
55512201_10156947357597778_5936505626187268096_o.jpg

दुसऱ्या दिवशी पहाटे उठले, कुठे जायचे काही ठरवले नव्हते पण एवढे कळत होते की सकाळी सकाळी नाही निघाले तर मोन्थोंग मला आज ही सोडायचा नाही. पण त्याने माझ्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट बनवायची जय्यत तयारी केली होती. स्वत:ची परिस्थिती कठीण असतानाही, मार्केट मधून माझ्यासाठी पोर्क आणि कलेजी विकत घेउन आला. ते सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडत होता. स्वत:च्या हाताने माझ्यासाठी काय काय बनवले. मला खाऊ घातले. आणि मला बजावून गेला की मी थोडा कामानिमित्त जाउन परत येतो तोपर्यंत कुठेच हलू नकोस.
55450502_10156946602977778_2974209735164690432_o.jpg

तो जसा बाहेर पडला तशी मी सटकले. नाहीतर करू काय? दोन मार्च चा दिवस उजाडला होता. राजला आठ मार्च चे परतीचे तिकीट काढायला सांगितले होते. एकेक दिवस रेशनिंग करून वापरायचा अशी परिस्थिती माझ्यावर ओढवली होती. तसे करायला खूप जड जाणार आहे याची मला पुरेपूर कल्पना होती. हेच बघ ना, तुझ्या घरात माझे मन असे काय अडकले होते की तिथुन पाय निघता निघत नव्हता. अगदी निघायच्या क्षणापर्यंत आपल्या दोघींच्या काहीबाही गप्पा सुरूच राहिल्या. हसण्या खिदळण्याला ऊत आला होता. निघता निघता बांबू शूटचे एक पुडके तू माझ्या हातात दिलेस. ते वापरून काही बनवले तरी त्याला तुझ्या घरच्या स्वयंपाकाचा स्वाद येईल का?

आदल्याच रात्री शेकोटी भोवती गप्पा चालू होत्या तेव्हा तू मला म्हणाली होतीस की ‘मी तिथे येताना तुमच्यासाठी ब्लेसिंग घेऊन आले आहे.” त्याचे कारण की मी गावात शिरल्या शिरल्या पावसाला सुरवात झाली होती. तुला भोळा विश्वासच माझ्यासाठी दिलासा होता. एरव्ही तुम्हाला परत काही द्यावे म्हणून जीलागलीकिती तगमग लागली, तरी मी काय देणार होते? ज्याचा हिशोब कागदावर मांडता येईल अशा शुल्लक आहेत माझ्या जवळच्या गोष्ठी आणि तुमच्याजवळ जे आहे ते वाटून संपणार नाही, एवढे मुबलक, शाश्वत आहे. त्यातलेच थोडे माझ्या झोळीत लुटून घेउन, मनोमन आशीर्वाद शुभेछ्या तेवढ्या देउन मी निघाले.

येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा |
कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या |

दोन दिवस सतत पडत असलेला पाउस मी दिमापूरला निघाले तेव्हा अचानक ओसरला. पुढे कुठे जायचे हे तोवर ठरले नव्हते. उजवीकडे कोहिमा ला जायचे की आधी डावीकडे दिमापुर बस स्टँडला जायचे? वहान कसे शोधायचे?
दिमापूरला जाण्यासाठी कुक्डीलोंग – चुमुकेडीमा – दिमापुर असा टप्याटप्या नेच प्रवास करावा लागतो, होय ना? पण मी हाताचा इशारा न करताच माझ्यासमोर एक शेअरटॅकसी येउन उभी राहिली, ती थेट दिमापुरला चालली होती. पुन्हा एकवार मला कळून चुकले, की कुठची वाट चालायची, ती कुठवर घेउन जाणार, हे सारे विधिलिखित आहे. या क्षणी मी काय करायचे? फक्त एवढी जाणीव असली तरी संपूर्ण प्रवास निभावून न्यायला ती पुरेशी आहे. मी सामान सावरत टॅकसीत बसले आणि आपले घर मागे टाकून पुढे निघाले.
अगदी निघता निघता मला बहिण मानलेस. तेव्हा तुला सांगायचे राहूनच गेले की आमच्या भाषेत मोठ्या बहिणीला ताई म्हणतात!

तुझी ताई
सुप्रिया
53703424_10156946603062778_4464432231460372480_o.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडीत संध्याकाळी त्याला कुशीत घेऊन बसले होते नि तो गाढ झोपूनही गेला, तेव्हा केवढे सुख वाटत होते.
>>> हा अनुभव शब्दात वर्णन करणे खरंच कठीण आहे ....

छान चालला आहे प्रवास...

खूप दिवसानंतर पुन्हा लिहायला घेतलं. आता हातात थोडा वेळ आहे तर पूर्ण करून टाकीनच आणि कोणी वाचत असेल की ती जबाबदारी ही वाटते. सर्वांना धन्यवाद.

मी असाच अधूनमधून कुठलाही भाग वाचतो आहे. पण आतापर्यंत वाचलेल्या भागांमध्ये हा फारच आवडला. किती सुंदर ललित लिहिलं आहे. वाचताना असं वाटतं की, जणू मीच कक्का आहे आणि तुम्ही माझ्याशी बोलत आहात. मला तुमच्या धाडसाचं थोडंसं कौतुक वाटतं आणि बरीचशी असूया! ह्याचं पुस्तक येईल तेव्हा कळवा. आनंदानं विकत घेऊन सलग सगळं वाचीन...

सुप्रिया राज जोशी - हो... अगदी गंभीरपणे सांगतो आहे. अशी पुस्तकं प्रसिद्ध व्हायलाच हवीत, असं मनापासून वाटतं. पुस्तक तयार व्हायला आलं की सांगा. मुद्रितशोधनासाठीही मदत करीन. आणि विकत घ्यायचं प्रॉमिस तर पक्कं!