जपानी वामन

Submitted by Theurbannomad on 3 May, 2020 - 16:17

" मॅन, वॉन्ट तवू काम फो फीशींग?" आपल्या जपानी हेल असलेल्या इंग्रजीत हिराकू मला आग्रह करत होता. माझ्या दुबईतल्या सुरुवातीच्या ' स्ट्रगल ' च्या दिवसात एका खोलीत तीन डोकी अशा पद्धतीने राहत असल्यामुळे अनेकदा तऱ्हेतऱ्हेचे लोक माझे रूममेट म्हणून माझ्याबरोबर राहिले आहेत, त्यातला हिराकू हा एक विक्षिप्त प्राणी. समुद्र, मासे, वाळू, जहाज आणि भटकंती या विश्वात सतत रममाण असणारा आणि दुबईला दर शनिवारी विशेष परवाना घेऊन खोल समुद्रात मासेमारी करायला जाणारा हा माझा 'रूममेट' लाघवी स्वभावाचा असला, तरी पंचेचाळीस डिग्रीच्या उष्णतेत मासेमारीला जायच्या जीवघेण्या साहसाची मला तरी भीती वाटत होती. कसाबसा त्याला त्याच्या मार्गावर पिटाळून मी घरात परतलो आणि पंख्याच्या समोर बसून घाम टिपला.

हा हिराकू म्हणजे एक वल्ली होता. एका संध्याकाळी मी रूमवर परतलो, तेव्हा मला एक भली मोठी 'बॅगसॅक ' बाजूच्या बेडवर पडलेली दिसली. बेडच्या खाली सपाता, दुर्बीण, व्यावसायिक छायाचित्रण करायला वापरतात तसा कॅमेरा आणि लेन्सेस,रेखाटन करायचं साहित्य अशा एक ना अनेक गोष्टी ठेवलेल्या दिसल्या. हा कोण नवा प्राणी आपल्या नशिबात आलाय, असा विचार करताच होतो, तेव्हा बाथरूममधून ही स्वारी अवतरली. पांढऱ्या शुभ्र 'बाथरोब' मध्ये लपेटलेला तो पाच फुटी काटकुळा देह बघून अंतराळातून एखादा परग्रहवासी आल्याचा मला भास झाला. पांढराफटक गोल चेहरा, पुढे आलेलं कपाळ, डोक्यावर काटेरी केस, काळ्या काड्यांचा गोल चष्मा, मिचमिचे डोळे आणि छोटीशी जीवनी अशा थाटातल्या त्या वामनमूर्तीकडे बघून खरं तर मला हसूच फुटलं.त्याच्या जपानी वळणाच्या इंग्रजीतून पाच मिनिटात त्याने मला बराच काय काय सांगितलं.त्यातल्या मला कळलेल्या वीस-पंचवीस सेकंदाच्या संवादातून त्याचं नाव, देश आणि शहर इतकी माहिती मला मिळाली. ओसाका नावाच्या जपानच्या एका माध्यम आकाराच्या शहराचा हा रहिवासी तिथल्या एका 'कोळी' कुटुंबातून आलेला होता,हेही समजलं .पूर्वजांच्या व्यवसायापेक्षा पूर्वजांच्या दर्यावर्दी गुणांशी जास्त सलगी करून या पाच फुटी देहाने समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन जपानचा मैलोन्मैल लांबीचा किनारा आपल्या चिमुकल्या शिडाच्या जहाजाने पादाक्रांत केला होता. त्याचं दुबईला दोनच महिने वास्तव्य असणार होतं, कारण तो जगभ्रमंतीवर निघालेला होता. तब्बल तीन वर्षाचा भटकंतीचा आराखडा त्याने तयार करून घेतलेला होता आणि वयाच्या बाविसाव्या वर्षांपासून तिसाव्या वर्षापर्यंत जपानमध्ये राबून जमवलेले सगळे पैसे तो या भटकंतीवर खर्च करणार होता. या विलक्षण मनस्वी माणसाशी दोन महिने मनसोक्त गप्पा मारायच्या, या विचाराने मी अर्थात सुखावलो आणि अपेक्षेप्रमाणे त्या दोन महिन्यात मला या माणसामुळे आयुष्यभर जपता येतील अश्या आठवणींचा खजिना मिळाला.

विष्णूच्या मत्स्यावतारावर त्याच्या आधीच्या अनेक पिढ्या जगल्या होत्या, त्यामुळे घरात विष्णूचा हा जपानी वामनावतार जन्माला आल्यावर त्यांना त्याच्या लीला पचवणं जडच गेलं. आपल्या चिमुकल्या पावलाने पृथ्वी पादाक्रांत करायचं ठरवल्यावर अपेक्षेप्रमाणे त्याच्या घरचे चक्रावले. मासे, बर्फ, मीठ, मासेमारीची जाळी आणि बोटी यापलीकडे त्याच्या घरचांची झेप नव्हती. फार फार तर आपलं पोरगं एखादं 'सी फूड' रेस्टॉरंट टाकेल किंवा मत्स्यतळी तयार करून 'मत्स्यव्यावसायिक' होईल इथपर्यंत त्याच्या घरच्यांनी विचार केला असेलही, पण हे पृथ्वीप्रदक्षिणेचं खूळ मात्र त्यांच्यासाठी अकल्पित होतं. अर्थात घरातून एक छदाम मदत नं मिळाल्यामुळे हिराकू जो घराबाहेर पडला, तो परत गेला नाही. मुळात जपानी असल्यामुळे कामसू, त्यात स्वप्नांच्या पूर्ततेचा ध्यास घेतलेला. सहा-सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर शेवटी गाठीला आवश्यक तितकी पुंजी जमा करून हिराकूची भ्रमंती एकदाची सुरु झाली.

" मी शिक्षण माहित्ये कशाचं घेतलंय?" एके दिवशी हिराकूबरोबर कॉफी पीत असताना त्याने मला प्रश्न केला.

" फिशिंग इंडस्ट्री संबंधित काही ? जहाजबांधणी? " मी अंदाज लावत गेलो.

" मी 'सीफूड शेफ' आहे. आमच्या जपानला जो शेफ 'फुगू' माशाचे पदार्थ यशस्वीरीत्या बनवू शकतो, त्यांना सर्वोत्कृष्ट शेफ समजलं जातं. हा मासा विषारी असतो. त्याच्या विषाचं प्रमाण अतिशय नियोजनपूर्वक नियंत्रणात आणायला लागतं, जे जमणं खूप कठीण असतं. तितका एक प्रकार सोडला तर मी सीफूड प्रकारातले कोणतेही आशियाई पदार्थ तयार करू शकतो. "

" पण असा मासा मुळात खायचाच का? बाकी मासे आहेत नं..." अर्थात माझ्यासारख्या शाकाहारी माणसाला असा प्रश्न विचारणं सोपं होतं.

" मित्रा, जपानचे लोक समुद्रातले मासेच काय, पण समुद्रातील प्रवाळ, शेवाळं आणि अगदी वनस्पतीसुद्धा खातात. फार अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाहीये, पण आमच्याकडे लुप्त होत जाणारी प्रजाती असूनही डॉल्फिन्स खाण्यावर बंदी नाही." माशाचा एक मोठा तुकडा चॉपस्टिकने कुठल्याशा सॉसमध्ये बुचकळून टपकन त्याने तोंडात टाकला आणि खाता खाता मिचमिचे डोळे मिचकावत त्याने खुलासा केला. " समुद्रात चुकून खरोखरची मरमेड मिळाली ना, तर आम्ही जपानी माणसं तिच्याही अर्ध्या भागाचा फडशा पाडू..." या त्याच्या वाक्यावर माझ्या पोटात कालवाकालव झाली.

त्याच्यामुळे दुबईतली जपानी रेस्टॉरंट्स मीसुद्धा पालथी घातली. अर्थात 'फ्यूजन' च्या नावाखाली पनीरसारखे देशी पदार्थ वापरून केलेली सुशी किंवा मासे न घालता बांबूमध्ये बांधून शिजवलेला भात असे पदार्थ माझ्या वाट्याला येत असल्यामुळे मला ते फार काही आवडत नव्हतं. त्या अन्नाला 'जेवण' म्हणणं म्हणजे बर्फाच्या गोळ्याला थेट 'पुणेरी मस्तानी' म्हणण्यासारखं होतं, पण या माणसाशी बोलायच्या ओढीपायी माझी जीभ ते सगळे अत्याचार सहन करत होती.

जपानबद्दल एकंदरीत भारतीयांना अतिशय आदर आहे. मी त्याला अपवाद असं शक्यच नव्हतं. आमच्या बोलण्यात अनेकदा आझाद हिंद सेना, सुभाष चंद्र बोस ( हिराकूच्या भाषेत 'चांद्रा बूस' ), हिरोशिमा-नागासाकी असे विषय येत. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या देशाबद्दल मला जितका आदर होता, त्यापेक्षा अंमळ कमीच आदर त्याला होता. जपानने दुसऱ्या महायुद्धाच्या आधी चीन, कोरिया, फिलिपिन्स, सिंगापूर अशा देशांमध्ये सामान्य नागरिकांवर केलेले अनन्वित अत्याचार जगासमोर तितक्या उघडपणे नं आल्यामुळे लोकांचा जपानबद्दलचा दृष्टीकोन सकारात्मक राहिलेला आहे हे त्याचं परखड मत माझ्यासाठी अनपेक्षित असलं तरी माझ्या इतिहासाबद्दलच्या आत्तापर्यंतच्या दृष्टिकोनाला छेद देणारं नक्कीच होतं. भीडभाड नं ठेवता सोदाहरण आणि मुद्देसूद बोलायच्या त्याच्या संभाषणशैलीमुळे त्या दोन महिन्यांच्या वास्तव्यात जपान देशाबद्दलच्या माझ्या ज्ञानात भरपूर नव्या गोष्टींची भर पडली.

आमच्या रूममधल्या तिसऱ्या महाभागाला - नावेदला - हिराकू विशेष आवडलेला नसल्यामुळे तो तसा त्याच्याशी फटकूनच वागत होता. पावणेसहा फुटाच्या आणि रोज प्रोटीन पावडर खाऊन दंडाच्या बेटकुळ्या कमवायचे व्यायाम करणाऱ्या त्या अजस्त्र देशापुढे हिराकू कस्पटासमानच वाटायचा , पण एके दिवशी दोघांमध्ये थोडीशी बाचाबाची झाल्यावर याची देही याची डोळा माझ्यासमोर जे घडलं, ते 'डेविड आणि गोलाईथ ' च्या कथेचा नमुना असल्यासारखं होतं. हिराकूच्या हातून त्याच्या कोणत्याशा 'फिश सॉस' चे थेम्ब चुकून नावेदच्या पांढऱ्या बुटांवर पडले. प्रकरण हातघाईवर आलं. हिराकूने आपल्या परीने नावेदला समजावायचा प्रयत्न केला, पण बहुधा स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर नको इतका विश्वास असलेल्या नावेदने हिराकूला ढकलून देऊन अरेरावी करायला सुरुवात केली. पुढच्या दोन मिनिटात हिराकूने एखाद्या प्रशिक्षित सैनिकाच्या चपळाईने नावेदच्या हाताला आणि मानेला अशी काही 'कात्री' लावली, की मी हबकलो. नावेदच्या मनगटाला उलट्या दिशेने पिळत त्याने नावेदला शब्दशः धराशायी केलं आणि त्याच्या तोंडून माफी वदवून घेतल्यावर त्याला सोडलं.

" वयाच्या बाराव्या वर्षांपासून मार्शल आर्टस् शिकलोय...दिसण्यावर जाऊ नकोस..." हसत हसत मला त्याने त्याच्या त्या झटापटीचं रहस्य सांगितलं. नावेदने त्या दिवसापासून हिराकू जाईपर्यंत झोपायची वेळ सोडली तर रूमवर पाय ठेवला नाही. पाककला शिकलेल्या या माणसाने नावेदला 'धाक'कलेचे आयुष्यभर पुरतील असे धडे दिले होते.

हा माणूस आधुनिक जगातला लिओनार्डो द विंची असावा, अशी शंका मला सतत येत असे. चित्रकला, छायाचित्रण, इकेबाना ( जपानची फुलांची सजावट करण्याची कला ) ,ओरिगामी, युद्धकला, घोडेस्वारी, दर्यारोहण असे अनेक प्रकार लीलया हाताळणारा आणि तरीही स्वतःबद्दल जराही अहंकार नसणारा हा विलक्षण वल्ली कोणत्याही विषयावर सहजतेने संभाषण करू शकायचा.माझ्याकडून त्याने अनेक भारतीय पद्धतीच्या पदार्थांची तपशीलवार माहिती काढून आपल्या टिपणवहीत जपानी भाषेत लिहून घेतली आणि एके दिवशी संध्याकाळी मला चक्क राजमा खायला घालून थक्क केलं. अर्थात इतका फिका राजमा खाताना माझ्या तोंडाची चव मेली असली तरी त्याच्या उत्साहामुळे मी तो अत्याचार आनंदाने सहन केला.

" तुमची भाषा मात्र खूप कठीण आहे...तुम्ही लोक काय लिहिता याचा अंदाजसुद्धा आमच्यासारख्यांना लावणं कठीण..." एकदा जपानी भाषा आणि लिपीबद्दल आमच्यात संवाद सुरु झाला.

" अरे आमच्यासाठी तुमच्या लिपीची अक्षरं सुद्धा तशीच असतात...मला इंग्लिश वाचता कुठे येतं? त्यात तुम्ही डावीकडून उजवीकडे वाचता, हे अरबी लोक उजवीकडून डावीकडे, आम्ही जपानी लोक वरून खाली वाचतो...आता नवीन पिढी डावीकडून उजवीकडे लिहिते आणि वाचते...आमच्या पद्धतीच्या भाषेत सुद्धा चिनी किंवा कोरियन लिपीत लिहावाचायच्या दिशा वेगवेगळ्या आहेत..." हे सगळं ऐकून माझ्या डोळ्यासमोर भाषांतरं करणारे लोक उभे राहिले. या जपानी लिपीच्या कुळातल्या मजकूराची भाषांतरं इंग्रजी व देवनागरीत करणारे लोक मानेला कंपवात झाल्यासारखेच वाटत असतील, अशी माझी खात्री पटली. तशात त्या जपानी भाषेत हजारो ' कांजी' ( आपल्याकडच्या मुळाक्षरांसारखे जपानी भाषेतले 'कॅरेक्टर्स' ) आहेत आणि त्यातला सगळ्यात कठीण 'कांजी' कॅरेक्टर तेवीस रेषांचं आहे हे समजल्यावर माझ्या छातीत धडकी भरली. अशा अचाट लिपीसाठी तिथले शिक्षक कोणत्या पुस्त्या वापरात असतील आणि तिथले विद्यार्थी ती लिपी शिकायचं दिव्य कसं पार पडत असतील, याचा मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.

" आमच्याकडे एखाद्या प्रश्नाचं चुकलेलं उत्तर १०० वेळा लिहा अशी शिक्षा मिळायची...तुमच्याकडे असं काही झालं तर तो विद्यार्थी शाळा सोडेल..." माझ्या या बोलण्यावर हिराकू त्याचे छोटे छोटे दात दाखवत खुदुखुदू हसला. कदाचित तशी शिक्षा त्याने भोगली नसावी,कारण माझं ते वाक्य म्हणजे माझे 'अनुभवाचे बोल' असल्यामुळे मला मात्र हसू येतं नव्हतं.

जपानच्या 'गेईशा' प्रथेबद्दल सुद्धा आमच्यात खूप संभाषण झालं. " मेमॉयर्स ऑफ अ गेईशा' या नितांतसुंदर चित्रपटाची मी पारायणं केली होती. सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटांच्या यादीत पहिल्या पाचात सहज ऐसपैस बसू शकेल असा हा चित्रपट बघण्यापेक्षा 'अनुभवावा' च्या जास्त जवळ जाणारा असल्यामुळे माझं त्यावर विशेष प्रेम. त्यात समोर खुद्द जपानचा नागरिक बसलेला, त्यामुळे पाच-सहा दिवस त्याचं विषयावर आमचा संभाषण रंगलं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात खुद्द हिराकूच्या गावात आणि कुटुंबात सुद्धा काही 'गेईशा' झालेल्या मुली होत्या. आपल्याकडे उत्तर भारतात 'तवायफच्या कोठ्या' जशा गाण्याबजावण्याच्या मूळ उद्देशापासून भरकटत वेश्याव्यवसायाच्या दिशेला गेल्या आणि नामशेष झाल्या, तीच गत जपानच्या 'गेईशांची' झाली. त्या मुलींना केवळ त्यांनी पळून जाऊ नये म्हणून उंच टाचांचे निमुळते होतं जाणारे जड लाकडी बूट घालायला लावून त्यांचे पाय कायमचे विद्रूप करायची घाणेरडी प्रथा जपानच्या अमीर-उमरावांच्या विकृत मानसिकतेची प्रचिती करून द्यायला पुरेशी होती. तोंडाला पांढरं रोगण थापून त्यांना सतत पायघोळ जड 'किमोनो'मध्ये वावरायला लावणं हेही त्या प्रथेत अपरिहार्य असल्यामुळे त्या बिचाऱ्या कोवळ्या मुलींची काय अवस्था होतं असेल, याची कल्पना करूनही माझ्या अंगावर शहारे आले.

" म्हणून मी सांगतो नं, जपान काही वाटतो तितका सुसंस्कृत, सभ्य आणि आदर्श समाजव्यवस्थेचा देश नाही. आजही गेईशा प्रथा नामशेष झाली असली, तरी आधुनिक जपानमध्ये अल्पवयीन मुलामुलींशी शरीरसंबंध ठेवायची नवी डोकेदुखी आमच्या समाजाला आता अधोगतीकडे घेऊन चालली आहे. तुमच्या देशासारखी सुदृढ लग्नसंस्था आमच्याकडे उरलेली नाहीये आता...माझ्या दोन्ही सक्ख्या बहिणी 'लिव्ह इन' नातेसंबंधात आहेत..." हिराकू खिन्न होऊन सांगत होता. देश वेगळा असला तरी समस्या त्याच आहेत, याची मला जाणीव होतं होती.

हिराकूबरोबर मी दुबईच्या अनेक जागांना भेट दिली. त्याला अरबी पद्धतीचे खाद्यपदार्थ खाऊ घातले. शेफच्या आपल्या व्यवसायाला अनुसरून त्याने अरबी पद्धतीच्या माशांच्या पदार्थांची ओळख जरा जास्त चिकित्सकपणे करून घेतली आणि एके दिवशी आमच्या रूमवर अरबी थाटाचा 'फ्राईड फिश' करून आजूबाजूच्यांना खिलवला. त्याला आपल्या आनंदात जो असेल त्याला सामील करून घ्यायची सवय असल्यामुळे आणि त्याचा उत्साह अक्षरशः वातावरण भारून टाकत असल्यामुळे आजूबाजूचे अनेक जण त्याला आपणहून घरी बोलवत असत.

उत्साहाचा खळखळत झरा असलेल्या या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात कोणी पडली कशी नाही, याचं मला आश्चर्य वाटत राहायचं. एकदा मी त्याला आडून आडून विचारायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने मला त्याच्या त्याचं गोड गुपित उलगडून सांगितलं. कॉलेजमधली त्याची प्रेयसी जपानहून दोन वर्षांपूर्वी युरोपमध्ये कामानिमित्त गेली होती. त्याच्या दुबईनंतरच्या दोन महिन्याच्या युरोप दौऱ्यात तो तिच्याबरोबर फिरणार होता. तिने स्वतःची रजा साठवून त्या दोन महिन्यांची बेगमी केली होती. तिचा फोटो दाखवताना हिराकू चक्क लाजत होता.पाच फुटी हिराकूची पावणेपाच फुटी 'सध्याची मैत्रीण आणि भविष्यातली सहचारिणी' त्याच्यासारखीच गोरीगोमटी आणि नाजुकशी होती. दोन वर्षाच्या जगभ्रमंतीनंतर त्यांनी अजून एक-दोन वर्ष पैसा कमवून हिरोकूच्या ओसाका शहरात सगळ्या कुटुंबीयांसमक्ष जपानी पद्धतीने साग्रसंगीत लग्न करायचं बेत आखला होता.

" तू ये माझ्या लग्नात...बघ आमच्या पद्धतीचं लग्न कसं असतं. आमच्या टी हाऊसमध्ये बस आणि चहापान कर आमच्या वर्हाडी मंडळींबरोबर. " त्याने आग्रहाचा निमंत्रण दिलं. " तुमच्या लग्नात मी येईन...मी व्हिडिओमध्ये बघितलंय, तुमच्यात रंगीबेरंगी तांदूळ उडवतात नं? " मला खळखळून हसू आलं. मग आमच्यात आपापल्या लग्नाच्या पद्धतींच्या आणि रितीरिवाजांच्या विषयावर तास-दीड तास गप्पांचा फड रंगला.

जपानसारख्या ' उगवत्या सूर्याच्या ' देशातून आलेल्या या विलक्षण माणसामुळे दोन महिन्यात मी अनुभवाने अतिशय समृद्ध झालो. आयुष्याचा एक एक क्षण रसरशीतपणे कसा जगायचा, याचं प्रात्यक्षिक मला समोर बघायला मिळालं. ओळखपाळख, जात, धर्म, देश अशा सगळ्या सीमा ओलांडून आजूबाजूच्या माणसांना कशा प्रकारे जोडून घ्यायचं, हेही मी त्याच्या प्रत्येक कृतीतून अनुभवलं. मला या प्राण्याची इतकी सवय झाली होती, की ऑफिसचा वेळ सोडला तर आम्ही साधं किराणासमान घ्यायला सुद्धा एकत्र जायचो. दुबईच्या 'कॉर्निश' वर तासंतास भटकायचो. माझे काही मित्र आमच्या भटकंतीत सामील झाले, की तासंतास चहाच्या असंख्य कपांबरोबर आमच्या मैफिली जमायच्या. जपान, भारत, पाकिस्तान, फिलिपिन्स अशा अनेक देशांमधल्या आमच्यासारख्या लोकांची एकत्र जमलेली आमची टाळकी तिथे नियमितपणे येणाऱ्या लोकांना परिचयाची झाली होती.

हिराकूला सोडायला आम्ही दहा-बारा लोक विमानतळावर गेलो होतो. त्याला आम्ही सामानाच्या ट्रॉलीवर बसवून इथे तिथे फिरवलं, त्याच्या बॅगांवर आमची नाव लिहिली आणि त्याच्या हातात जवळ जवळ तीन-चार किलो चॉकलेट्स ठेवली. आमच्यातल्या एका इराकी महाभागाने त्याला मासे, खेकडे, कोलंब्या अशा समुद्री 'खाद्य-जीवांचा' फोटो आणि त्यात एका शिंपल्यातून डोकावणारा हिराकू असा स्वतः काढलेलं त्याचं अर्कचित्र दिलं. हिराकूने जायची वेळ आल्यावर सगळ्यांना मिठ्या मारल्या आणि फोटो काढायला नकार दिला.फोटो काढल्यावर पुन्हा भेटायची इच्छा तितकीशी उत्कट राहात नाही असं त्याच्यासारखंच जगावेगळं पण तर्काला अनुसरून 'परफेक्ट' कारण देऊन त्याने सगळ्यांचा निरोप घेतला.

पुढच्या चार वर्षात एक-दोन इ-मेल आणि एखाद-दुसरा फोन कॉल सोडला, तर हिराकू कुठेतरी हरवलाच. अचानक एके दिवशी त्याच्या जपानी आणि इंग्रजी भाषेत खास तयार केलेली लग्नाची आमंत्रणपत्रिका मेलबॉक्समध्ये दिसली आणि मी उडालो. त्याला येऊ शकणार नसल्याचं उत्तर पाठवलं तेव्हा त्याच्याकडून एक विनंतीवजा धमकी, तीन-चार मराठी शिव्या ( माझ्याकडूनच शिकलेल्या) आणि शेवटी आत्ता शक्यच नसेल तर ' पुढे जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा महिनाभर आधी येण्याची वर्दी दे ' अशी सामोपचाराची भाषा असं मजकूर असलेला मेल आला.अर्थात त्याबरोबर एकही फोटो नव्हता. मला पुन्हा भेटायची त्याची आणि त्याला पुन्हा भेटायची माझी इच्छा अधिक उत्कट करण्यापलीकडे त्या इ-मेलच्या उत्तरातून मला काहीही हाती लागलं नाही!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहलय.. तुमचं लेखन खुप छान असतं...

मी आधी जपान बेस कंपनीत काम करायचो..त्या कंपनीतले काही सिलेक्टेड जपानी empoyees इथलं काम शिकण्यासाठी यायचे..

असचा वाकासुबारू का असचं काही नावाचा employee आला होता.. त्याचं नाव उच्चारायला कठीण जायचं म्हणून लोकांनी त्याला विकास हे नावं ठेवलं होतं ..जवळ जवळ सहा महिने तो आमच्याबरोबर होता..

जपानी लोक खुप मेहनती, नम्र आणि शिस्तबद्ध असतात..आम्ही 8:30 तास काम करून घरी जायचो तर त्याला आश्चर्य वाटायचं..तो म्हणायचा आमच्या इथे लोक 12 12 तास काम करतात..

कधी कधी दुपारी साहेब मस्त डुलक्या पण घ्यायचे... डुलक्या घेताना पकडल्यावर साहेब म्हणायचे.. जपानमध्ये ऑफिसमध्ये झोपणं अलाऊड आहे.. त्याचीच सवय आहे...

जाता जाता विकासने सगळ्यांना खास जपानी फिकट हिरव्या रंगाची चाॅकलेट दिली होती.
मी काहीतरी खास असेल म्हणून पटकन तोंडात टाकलं आणि दुसर्याच क्षणाला थुंकलो..चाॅकलेट चक्क थोडं लसणासारखं उग्र लागतं होतं.. Sad

खूप छान व्यक्तिचित्र रेखाटलेय. वाचून वाटले, खरेच अवलिया आहे हा माणूस... आणि किती तटस्थपणा. इतरांसमोर आपण आपल्यातले नसलेले गुणसुद्धा रंगवून सांगतो आणि हा पठ्ठ्या सगळेजण ज्यांचे कौतुक करतात त्या जपानचे दुर्गुण तटस्थतेने सांगतो.

खरेच अवलिया आहे हा माणूस... आणि किती तटस्थपणा. इतरांसमोर आपण आपल्यातले नसलेले गुणसुद्धा रंगवून सांगतो आणि हा पठ्ठ्या सगळेजण ज्यांचे कौतुक करतात त्या जपानचे दुर्गुण तटस्थतेने सांगतो. >>>>

इतकं काय कौतुक त्याचे, आपल्याकडे काय कमी आहेत का असे अवलिये आणि तटस्थ Proud

सुंदर व्यक्तीचित्रण! मस्त लिहिले आहे. आवडले.

चाॅकलेट चक्क थोडं लसणासारखं उग्र लागतं होतं.. >>> वासबीचे चॉकलेट असेल नक्किच. Proud

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/

@Theurbannomad तुम्ही सारखं काय संपादन करत असता? मला दर वेळेला " बदलून" असं दिसतं.

कामानिमित्त थोडाफार जपान्यांशी संबंध आल्यानी अगदीच रिलेट झाल.
लेखन्शैलीपण आवडली!

माफ करा
तुम्ही आपला लेख वर राहावा म्हणून सतत एडिट करताय का?तसं करण्याची गरज नाही.रसिक वाचक मागची मागची पानं खणून लेख वाचतातच.

Nahi mulich nahi...mala koni lekhaatla typo error jaree dakhavla taree Mee edit karto...mhanoon asa hota.