काटकसर

Submitted by पराग र. लोणकर on 26 April, 2020 - 01:02

काटकसर

महाबळेश्वरच्या त्या जराश्या आडवाटेवरच्या खोल दरीच्या वरच्या उंच कड्यावरील जराशा सपाट जागेवर आम्ही दोघं बसलो होतो. सगळीकडे तशी भयाण शांतताच होती. त्या शांततेचा भंग करत सुधा मला म्हणाली,

`हा जो सगळा खर्च तुम्ही चालवला आहे...`

`सुधा... मी तुला काय म्हटलंय, अजिबात पैशाचा विषय काढायचा नाही.` मी तिला मध्येच थांबवत म्हणालो.

`नाही मधुकर, मला आता बोलू द्या. माझं मन मला मोकळं करू द्या. आज आपला पस्तीस वर्षांचा संसार झालाय. मुंबईतल्या त्या चाळीत अगदी काटकसरीनं केलेला असला तरी आपला संसार समाधानाचा झालाय. श्री आता परदेशात स्थिरावलाय. त्याचं कुटुंबही तिथे बहरलंय. आपण दोघं आता साठीच्या जवळपास आलो आहे. तुम्ही आयुष्यभर खूप कष्ट केलेत. दुर्दैवानं त्याला फारसं यश आलं नाही. आयुष्यभर आपण कसलीच मौजमजा केली नाही. अर्थात त्याबाबत माझी काही तक्रार नाही. श्रीच्या शिक्षणासाठी मात्र कसा माहीत नाही; पण तुम्ही अगदी सढळ हाताने खर्च केलात. त्याला उच्च शिक्षण दिलं. तो परदेशात गेला आणि तिथलाच झाला. श्रीची आपल्याला फारशी मदत नाही. थोडेफार पैसे तो पाठवत होता, तेही गेल्या काही महिन्यांपासून येत नाहीयेत. गेल्या पस्तीस वर्षात आपण देवदर्शनाला म्हणून मुंबईबाहेर पडलो असू तर तेवढेच! आज इतक्या वर्षांनी तीन-चार दिवसांपूर्वी आपण मुंबईहून थेट भाड्याची गाडी करून महाबळेश्वरला आलो, चांगल्या हॉटेलमध्ये राहिलो आणि खाण्यापिण्याची जी मौजमजा केली तेवढी आपण संपूर्ण आयुष्यात केली नव्हती. या चार दिवसात मी जेव्हा जेव्हा तुम्हाला खर्चासाठी हटकलं तेव्हा तेव्हा तुम्ही मला गप्प बसवलंत. कमीत कमी वीस एक हजार रुपये तरी तुम्ही खर्च केलेले मला दिसताहेत.`

`अगं हे सगळं काय बोलत बसली आहेस? कशासाठी?` मी परत तिला मध्येच टोकलं.

`हे बघा... आता मला बोलू द्या. हे सगळं काय चाललंय ते माझ्या लक्षात आलंय. मगाशी त्या रस्त्यावर; त्या टॅक्सीतून उतरून पुढे आल्यानंतर तुम्ही परत त्या टॅक्सीवाल्यापाशी जाऊन काहीतरी बोललात आणि तो निघून गेला. आता आपल्याला हॉटेलवर परत कोण नेणार आहे? हे बघा, आता माझ्यापासून काही लपवू नका. माझ्या सगळं लक्षात आलंय. चाळमालक जागा सोडण्यासाठी जे पन्नास हजार रुपये देत होता, ते तुम्ही घेतलेत ना? त्याच पैशाचा हा सगळा खर्च चाललाय ना? काळजी करू नका. आयुष्यभर मी तुम्हाला जशी साथ दिली आहे तशीच आत्ताही देणार आहे. आयुष्यभरात काटकसरीने केलेल्या संसारात जशी मी समाधानी होते, तशीच या चार दिवसात आपण केलेल्या मौजमजेने मी तृप्त आहे. मी तुमच्याबरोबर इथून उडी टाकून जीवन संपवायला तयार आहे.`

सुधाचं बोलणं संपलं. तिच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. मी तिचा हात घट्ट धरून उभा राहिलो. बसलेल्या सुधाला म्हणालो, `चल...`

सुधा सुद्धा ठाम निश्चयाने ताडकन उभी राहिली. तिनं स्वतःचे डोळे घट्ट मिटून घेतले.

इतक्यात माझा मोबाईल वाजला.

`हो हो येतो...` असे म्हणून मी माझा मोबाईल बंद केला आणि सुधाचा हात पकडून रस्त्याच्या दिशेने चालू लागलो.

`हे काय?` सुधानं डोळे उघडून आश्चर्यानं मला विचारलं.

`सुधा... आता माझं ऐक. गेली पस्तीस वर्ष मी तुला काहीच सुख दिलं नाही. कष्ट करत होतो, ओव्हरटाइमही करत होतो, पण तरी आपण कसलीच मौजमजा केली नाही. तू म्हणतेस तसं श्रीच्या शिक्षणात मात्र मी कोणतीच काटकसर केली नाही. हं, पण मी एक करत होतो. मी गुपचुपपणे नियमित पैसे बाजूला टाकत होतो. आमच्या साहेबांच्या सल्ल्यानं त्याची गुंतवणूक करत होतो. श्री परदेशात स्थिरावूनही आपल्याला अगदी तुटपुंजी रक्कम पाठवत होता. ती तशी कमी पाठवण्यामागची कारणं तो प्रत्येक पत्रात लिहित होता. गेल्या काही महिन्यांपासून मी त्याला तीही रक्कम पाठवू नकोस असं कळवलंय. शेवटी त्यालाही त्याच्या निवृत्तीनंतरची रक्कम बाजूला ठेवणं भाग आहे. निवृत्त झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत एका रुपयासाठीसुद्धा मुलावर अवलंबून राहायचं नाही हा माझा पहिल्यापासून निश्चय होता आणि त्यामुळेच मी ठराविक रक्कम चिकाटीने बाजूला गुंतवत होतो. पण हे मी तुम्हाला कोणाला सांगितलं नाही, कारण तसं सांगितलं असतं तर त्या पैशाला वाटा फुटल्या असत्या. त्या काळात आपल्या चाळीतली माझी मित्रमंडळी माझी अति काटकसरी, चिंगूस वगैरे म्हणून अगदी यथेच्छ थट्टामस्करी करत होती. आमच्या कट्ट्यावरच्या गप्पांत मी त्यांना बचतीचे महत्व वगैरे सांगायला गेलो की माझीच टर उडवत होती. आज मुलांवर संपूर्णपणे अवलंबून राहताना त्यांची काय अवस्था आहे तू पाहते आहेसच! गेल्या पस्तीस वर्षात मी बचत करून गुंतवलेली रक्कम चांगलीच मोठी झालेली आहे. आपण दोघंही कष्टांत आयुष्य काढलेली काटक माणसं आहोत. अजून दहा-पंधरा वर्ष तरी आपण आपलं आयुष्य अगदी मनमुराद जगू शकणार आहोत. महाबळेश्वरची ट्रीप ही फक्त सुरुवात आहे. आयुष्यात तुला न दिलेली सगळी सुखं मला आता द्यायची आहेत. दु:खात, कष्टात तू मला जशी साथ दिलीस, तशीच आता या सुखाच्या दिवसातही मला हवी आहे. देशील ना मला ही साथ? चल, टॅक्सीवाला आला आहे आपल्याला घ्यायला. मी त्याला `तासाभरात कुठे जाऊन यायचं असेल तर जाऊन ये,' असं म्हणायला मगाशी मागे गेलो होतो.'

माझं हे बोलणं ऐकून सुधाच्या डोळ्यातून अश्रूंच्या अखंड धारा लागल्या होत्या. मात्र मघासारखे हे दु:खांचे अश्रू नव्हते; ते आनंदाश्रू होते...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे..

पण मुळातच आयुष्य काटकसरीत काढायचे आणि निवृत्त झाल्यावर मौजमजा करायची हे पटत नाही. दोन्हीक्डे सेम मौजमजा कराल असा सेव्हिंगचा बॅलन्स साधता आला पाहिजे.

छान आहे..

पण मुळातच आयुष्य काटकसरीत काढायचे आणि निवृत्त झाल्यावर मौजमजा करायची हे पटत नाही. दोन्हीक्डे सेम मौजमजा कराल असा सेव्हिंगचा बॅलन्स साधता आला पाहिजे. >>> +१११

छानेय कथा!
पण रुन्मेषच बोलणही पटलं. थोडा बॅलन्स साधायला हवा होता

कथा पूर्वीच्या गोग्गोड कादंबऱ्यामध्ये असायची तशी आहे.

आता तुम्हाला रोजच्या जगण्याची शाश्वती नाही. मुंबईत लोकलने प्रवास करणारा माणूस सकाळी गेलेला संध्याकाळी सुखरूप परत येतील याची खात्री वाटावे असे दिवस नाहीत.

जोडीदारापासून लपवून इन्व्हेस्टमेंट केल्या की नंतर क्लेमच न केल्याने कैक पैसे वाया गेल्याची उदाहरणे आपल्या आसपास आहेत.

खेरीज, तरुणपणी इच्छा आणि उपभोग घेण्याची शारीरिक मानसिक क्षमता असताना मन मारायचे आणि म्हातारपणी ती क्षमता गेली की मग त्या पैश्यांचे करायचे काय? कधीकधी काही इच्छा आकांक्षा त्या-त्या वयातच पूर्ण झालेल्या बऱ्या असतात. म्हातारपणी तुम्ही कितीही घेऊ म्हटलं तरी तो अनुभव आणि मनाची उमेद परत आणता येत नाही.

या दोघांपैकी एकही जण अंथरुणावर असते (फक्त बेडरीडन पण फार खर्चिक कोणताही आजार नाही अश्या अवस्थेत) तर काय उपयोग त्या संपत्तीचा?

याचा अर्थ जे आहे ते उधळून टाका असे नाही. पण ऋ म्हणाला तसा जर समतोल साधता आला तर उत्तम.