नरभक्षकाच्या मागावर ! - भाग ३

Submitted by रश्मिनतेज on 25 April, 2020 - 14:55

भाग ३
-----------------------------------------------------------------------------------
tigress approaching nullah bw.jpg

हळूहळू सर्व कॉल्स विरत गेले. ह्याचा अर्थ अलार्म कॉल्स देणाऱ्या प्राण्यांच्या परिसरातून निघून ती वाघीण आता जवळपास पोहोचली होती. मी डोळे ताणून झऱ्याच्या उजवीकडे २० यार्ड अंतरावर असणाऱ्या वळणाकडे पाहत होतो आणि नरभक्षक कुठल्याही क्षणी तिथे अवतरणार होता. पण काहीच घडले नाही. ३० मिनिटे गेली , पाऊण तास होत आला.. मी चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसणाऱ्या माझ्या घड्याळात बघत होतो. विचित्र ! वाघीण ह्याआधीच येऊन पोहोचायला हवी होती कारण, अर्धा मैल अंतर कापायला तिला पाऊण तास निश्चितपणे लागणार नव्हता.

आणि अचानक माझ्या निकट असणाऱ्या धोक्याची भयानक जाणीव मला झाली. आपल्या सर्वांकडे एक विशिष्ट "सिक्स्थ सेन्स" असतो मात्र काही जणांनाच त्याला जागृत करण्यात यश येते , आधीही बऱ्याचदा मला माझ्या भारतातल्या, बर्मा मधल्या आणि अगदी आफ्रिकेच्या जंगल भटकंतीतही ह्या गोष्टीचा अनुभव आला होता. आता माझ्या मनात जराही शंका नव्हती की सर्व प्रकारची काळजी घेऊन, हालचाल न करता भोवतालची पूर्ण छाननी करूनही वाघिणीला माझा शोध लागला होता आणि कदाचित माझ्यावर झेपावण्याची त्या क्षणी ती तयारी करत होती.

अशा धोक्याच्या प्रसंगी , ज्यांना जंगलांची जाण असते ते जलद विचार करू शकतात. मात्र ते काही त्यांच्या शौर्यामुळे नव्हे, कारण मी कबुल करतो कि त्या क्षणी मी प्रचंड भ्यालो होतो आणि कपाळावर जमलेले घर्मबिंदू आता माझ्या चेहऱ्यावर निथळत होते. मला कळले होते की वाघीण आता झऱ्यावर किंवा माझ्या खालच्या खडकावर नव्हती, असे असते तर मला ह्याआधीच ती दिसली असती. ती कदाचित पलीकडच्या किनाऱ्यावरच्या दाट गचपणात माझ्या हालचालीचा अंदाज घेत लपून बसली होती पण मग वाघीण तिकडे असती तर मला होणाऱ्या त्या धोक्याची जाणीव इतक्या प्रकर्षाने झाली नसती आणि सतत वाढणाऱ्या ह्या जाणीवेमुळे मी अस्वस्थ झालो होतो. ती केवळ माझ्या वर आणि मागे असू शकणार होती. अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला की माझ्या मागे असणाऱ्या खडकाच्या ४ फुटी भिंतीमुळे अर्ध्या गुडघ्यावर वाकून ओणवं झाल्याशिवाय मला मागे वळून बघता येणार नव्हतं. ज्यामुळे मला स्थिर नेम साधता येणार नव्हता आणि माझी जागा समोरच्या काठावर किंवा झऱ्यावर असलेल्या कुणालाही सहज कळून येणार होती. आधीच हा विचार न केल्याने माझा घात होण्याची शक्यता होती म्हणून त्याक्षणी मी स्वतःला दूषणं देत होतो. पुढचा सेकंदभर ह्यात घालवताच वरून वाळूची बारीक धार लागली, कदाचित वाघिणीच्या पायामुळे ! निःसंशयपणे ती माझ्या अगदी वर होती आणि शेवटच्या झेपेच्या तयारीत होती.

मी अजिबात वेळ न दवडता माझ्या सुन्न झालेल्या पायांवर जोर देऊन चवड्यांवर दबा धरून माझी रायफल गर्रकन फिरवून बसलो , रायफलच्या नळीचे टोक माझ्या चेहऱ्याच्या सरळ रेषेत होते, नंतर थोडेसे उंचावून माझी नजर आणि रायफल घळीच्या वरच्या दिशेने रोखली .
भयंकर दृश्य नजरेस पडले. फक्त ८ फूट अंतरावर वाघीण तिच्या पोटाचा आधार घेत खडकाच्या उतारावरून माझ्या दिशेने सरकत होती. अवाक होऊन, आमची नजर भिडताच कडाडणारी डरकाळी फोडून वाघीण झेपावली आणि मी पुन्हा खाली वाकलो आणि त्याच क्षणी रायफलचा ट्रिगर ओढला.
कानापासून काही अंतरच झालेल्या रायफलीचा धमाका आणि त्यासह राक्षसी डरकाळी फोडलेला आवाज अजूनही माझ्या स्वप्नात येतो आणि अपरात्री दचकून, भीतीने थरथरत मी जागा होतो.
त्या हिंस्त्र जनावराला खडकाखाली असलेल्या घळीत मी आसरा घेतला असेल अशी अपेक्षा नव्हती, त्याचबरोबर रायफलीच्या धमाक्याने आणि दिपवून टाकणाऱ्या आगीच्या लोळाने हादरून गेलेल्या वाघिणीला माझी शिकार करण्याचा हेतू बदलून पळ काढण्यास भाग पडले. माझ्या डोक्यावरून झेपावताना तिच्या मागच्या पायाचा धक्का माझ्या रायफल ला लागून रायफल माझ्या पकडीतून निसटून गडगडत खाली गेली. खडकाच्या उतारावर पहिले दस्ता आपटला आणि मग खालच्या मऊ वाळूवर अर्धवट खाल्लेल्या शवाच्या बाजूला सावकाशपणे जाऊन रायफल विसावली. रायफल पेक्षा जलद गतीने वाघीण झऱ्याच्या पात्रात पोहोचली आणि डरकाळी फोडून दोन झेपेतच पलीकडच्या काठावर असलेल्या दाटीत गुडूप झाली.

जे काही घडलय ते उमजायच्या आतच जबर धक्का बसलेल्या मला जाणीव झाली कि आपण नि:शस्त्र आणि असहाय्य आहोत आणि वाघीण जर परत त्या मार्गावर आली तर मला काहीही करणे शक्य नव्हते. त्याच वेळी खाली उतरून रायफल घेणे निःसंदेहपणे , विरुद्ध काठावरच्या झुडपात बसलेल्या जखमी जनावराच्या हल्ल्याला आमंत्रण देण्याजोगे होते. मात्र तसेच अगतिकपणे निर्णय न घेता बसून राहण्यापेक्षा रायफल घेऊन चटकन परत येण्याला प्राधान्य दिले आणि हल्लेखोर जनावराच्या घृणास्पद डरकाळी चा आवाज ऐकण्याच्या तयारीत खाली उतरलो. तुम्हाला हे सर्व सांगण्याच्याआतच, काहीही अघटित न घडता मी घळी मध्ये परतलो.

चटकन परीक्षण केल्यावर मला असे दिसून आले की रायफलीला कुठलीही इजा झाली नव्हती आणि दस्त्याने तो जोराचा धक्का सहन केला होता. खर्च झालेले काडतूस बदलताना मला आश्चर्य वाटत होते, वाघिणीला गोळी नक्की लागली होती की इतक्या जवळूनही मूर्खपणें मी माझा नेम चुकवला होता ! तेवढ्यात मला माझ्या मागे फक्त २ फूट अंतरावर काहीतरी काळे-पांढरे पडलेले आढळले. ते उचलताच मला कळले की इतक्या जवळून गोळी झाडल्याने वाघिणीच्या कानाचा मोठा तुकडा तुटून पडला होता. स्पर्श केल्यावर तो अजूनही हाताला गरम लागत होता आणि त्वचा व केसांचा मोठा पुंजका असल्याने त्याच्या तुटक्या काठाला थोडेसेच रक्त होते.

माझा मोठ्ठा हिरमोड झाला होता आणि मी नाराज होतो असे म्हणणे माझ्या त्या भावनांना एक दशांशानेही न्याय देणे ठरणार नाही. मी एका नरभक्षकाला "पॉईंट ब्लँक" टप्प्यात असूनही उडवू शकलो नव्हतो ना जबर जखमी करू शकलो. केवळ एक कान तुटल्याने तिला त्या जागी थोडे दिवस दुखल्याशिवाय काहीएक फरक पडणार नव्हता. दुसऱ्या बाजूला मात्र माझ्या ह्या मुर्खासारख्या चुकीमुळे वाघिणीला दुसऱ्यांदा भक्ष्यावर परतायचे नाही हा धडा मिळणार होता. ह्यामुळे ती अजून जास्त धूर्त , जास्त धोकादायक आणि जास्त संहारक होणार होती कारण ती शिकार करताच खाणार होती आणि भूक लागल्यावर परत शिकार करणार होती यामुळे तिच्या बळींची संख्या आधीपेक्षा जास्त असणार होती. ती कदाचित तिचं कार्यक्षेत्र बदलणार होती आणि ज्या भागात लोकांना नरभक्षकाचं अस्तित्व असल्याची कल्पना नाही तिथे जाऊ शकली असती आणि अशा भागातील लोक सहज भक्ष्य होणार होते. वाघीण परत येईल अशा दूरवर शक्यता नसलेल्या आशेवर स्वतःला शिव्या घालत मी रात्र जागून काढली, मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. हाडे गोठवणाऱ्या थंडीत काकडलेला, शब्दापलीकडे उदास आणि निराश झालेल्या अवस्थेत मला सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं. त्यांनी आणलेल्या गरमागरम चहा, सँडविच मुळे काल दुपारपासून मला घडलेल्या उपासानंतर जीवात जीव आला, कडक तंबाखूचा पाईप भरून मनात विचार आला की जे घडले त्याहून वाईट घडू शकले असते आणि स्वतःला इतका दोष देण्याची गरज नाही. माझ्या अंतर्मनाने मला कौल दिला नसता तर निश्चितच त्या मढ्याशेजारी माझं मढं पडलं असतं आणि तेही अर्ध खाल्लेलं ! त्यामुळे मी माझ्या "सिक्स्थ सेन्स" ला मनापासून दाद दिली !

वाघीण जिथे उडी घेऊन पसार झाली तिथे रक्ताचं थारोळं आहे का हे बघायला आम्ही गेलो असता तिथे माझ्या अपेक्षेनुसार काहीही नव्हतं, शिवाय तिच्या तुटक्या कानाला झालेली जखम झुडपांना चाटून गेल्यानं रक्ताचा क्वचित दिसणारा डाग ! काही अंतर गेल्यावर हे डाग हि विरत गेले आणि मग आमची नाराज माणसांची टोळी पहिले पाड्यावर, मग अनशेट्टी करत सर्वात शेवटी गुंडलमला, आमच्या संपूर्ण अपयशाची नोंद करण्यासाठी पोहोचली.

पुढचे दहा दिवस मी गुंडलमलाच मुक्काम केला. मी प्रत्येक दिवशी आमिषांना बांधत राहिलो तरीही मला यश मिळण्याची खूपच कमी आशा होती. संपूर्ण सकाळ आणि दुपार मी जंगलवाटा धुंडाळत होतो आणि रात्री पाणवठ्यावर,जनावरांच्या पायवाटांवर आणि गुंडलम नदीपात्रात वाघीण येईल अशी अशा बाळगून बसत होतो. पण काही उपयोग झाला नाही. गावकऱ्यांचे वेगवेगळे चमू दिवसभरात वेगवेगळ्या दिशेने नवीन बळींची खबर मिळवायला जाऊन आले, मात्र काहीही घडले नव्हते. वरवर पाहता वाघिणीने तिचा नेहमीच प्रदेश सोडून इतर ठिकाणी आपला मोर्चा वळवला होता.
अकराव्या दिवशी गुंडलम सोडून मी दरमजल करत अनशेट्टी आणि तिथून देकनीकोट्याला येऊन पोहोचलो. पुढे होसूर ला जाऊन माझ्या उपजिल्हाधिकारी मित्राला मी सगळी हकीकत सांगितली आणि त्याच्याकडून वचन घेतले की आणखी बळी गेले तर तो मला लगेच कळवेल कारण त्या भागातल्या जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आता माझी होती. होसूर सोडून मी माझ्या बंगलोर मुक्कामी परतलो.

पाच महिने गेले आणि तेवढ्या काळात मला उपजिल्हाधिकाऱ्याची तीन पत्रे येऊन गेली होती ज्यात वेगवेगळ्या जागांवर वाघाने नरबळी घेतल्याच्या घटनांचा, पण त्यास ठोस पुरावा नसल्याचा उल्लेख होता. बळींमध्ये दोन कावेरी नदीपलीकडच्या कोईम्बतूर जिल्ह्यात , एक म्हैसूर राज्यात तर आणखीन एक अजून लांबवरच्या क्षेत्रात होता. तेवढ्यात मला ज्याची भीती होती पण ती खरी ठरणार नाही अशी आशा होती, ती वाईट बातमी आली. वाघाने पुन्हा गुंडलमवर वार केला होता आणि तिथला आठवा बळी घेऊन पुढच्याच संध्याकाळी, सुळेकुंटाच्या छोट्याशा देवळाच्या दारासमोरूनच, तिथे चाळीस वर्षांपासून सेवा करणाऱ्या वृद्ध पुजाऱ्याला खेचून नेले होते. ह्या पत्राचा शेवट लगोलग निघून येण्याची विनंतीने करण्यात आला होता.
खरे तर तातडीच्या निमंत्रणाची गरजच नव्हती कारण मी अशा अघटिताची तयारी करूनच बसलो होतो आणि दोन तासाच्या आतच मी जवळागिरी कडे कूच केले.

तिथे पोहोचताच माझ्या सुदैवाने मी त्या वृद्ध पुजाऱ्याचा मृत्यू डोळ्यांदेखत पाहिलेल्या भाविकांच्या जथ्याशी बोलू शकलो. भाविकगण देवळापाशी पोहोचत असतानाच त्यांना वाघाची मंद गुरगुर ऐकू आली आणि सुमारे तीस यार्ड अंतरावर असणाऱ्या डेरेदार पिंपळवृक्षाच्या मुळापासुन, वाघाला जंगलात उडी मारून नाहीसा झालेलं पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली होती. देवळातच आसरा घेऊन ते थांबले असता तिथे कोणाचा वावर नसल्याचे बघून त्यांना आश्चर्य वाटलं आणि बाहेर शोध घेताच त्यांना समोरच पिंपळाच्या वेटोळे घातलेल्या मुळांपाशी वृद्ध पुजाऱ्याचं शव दिसलं.
काही वेळाने घाबरत एकत्र येऊन त्यांनी बाहेर पाहिलं आणि त्यांना कळालं की वृद्धावर देवळात असतानाच किंवा जरा बाहेर असतानाच हल्ला झाला होता आणि त्या पिंपळाशी त्याचा फन्ना उडवायला म्हणून ओढून आणलं होतं. वाघाने फडशा पाडायला सुरुवात केली होती आणि हडकुळ्या छातीचा अर्धा भाग संपवला होता पण तेवढ्यात भाविकांच्या येण्याने त्यात खंड पडला होता.
मी माझ्या माहितगाराला आणि त्याच्या सोबत्यांना ठासून वाघाच्या विद्रुप कानांविषयी विचारलं मात्र साहजिकच भ्याल्यामुळे त्यापैकी कोणी इतकं निरीक्षण केलं नव्हतं.
मी घाईने माझ्या तीन जणांच्या चमूला घेऊन सुळेकुंटा गाठेपर्यंत तिन्हीसांज झाली होती. मला कबुल केलं पाहिजे कि प्रवासाचे शेवटचे दोन मैल प्रचंड अस्वस्थ करणारे होते, बांबूंच्या घनदाट झाडीचे वस्त्र ल्यालेल्या दोन टेकड्यांच्या तीव्र उतारामध्ये वसलेल्या दरीमधून आम्ही निघालो होतो. पण आम्हाला काही ऐकू आलं नाही वा काही दिसलंही नाही, एकांड्या हत्तीच्या चित्काराशिवाय .. हा हत्ती या भागात काही काळापासून राहत होता आणि भाविकांच्या त्रासाचे मोठे कारण झाला होता, जत्था छोटा असेल तर तो विशेष करून त्यांचा पाठलाग करत असे. ती एक वेगळीच कथा आहे.

tusker bw.jpg

व्यवस्थित तळ उभारायला वेळ नसल्या कारणाने आम्ही देवळासमोरच्या मोकळ्या जागेत झोपायचे ठरवले, सामान्य परिस्थितीमध्ये असं धाडस मी आणि माझ्याहून अधिक माझ्या साथीदारांपैकी कोणीच केलं नसतं. पण रात्रीची वेळ आणि नरभक्षकाच सान्निध्य ह्या दोन गोष्टी आमच्या तत्वांना मुरड घालायला पुरेशा होत्या. मी माझी रायफल ताणून पहाऱ्याला सज्ज झालो, तोवर माझी तीन माणसे घाईत काटक्या आणि इतस्त: पडलेले कुजके ओंडके गोळा करून उबेसाठी आणि सुरक्षा म्हणून शेकोटी पेटवायच्या मागे लागले. कारण यावेळी चंद्रप्रकाश नव्हता आणि लगेच सर्व अंधारून आलं होतं. अशा परिस्थितीमध्ये नरभक्षक देवळापाशी येण्याची आशा करत त्यासाठी उभं ठाकणं हे अत्यंत धोकादायक आणि तितकंच व्यर्थ देखील होतं.

लगेच शेकोटीच्या धगधगत्या ज्वाळा पेटल्या आणि त्याच्या आतल्या बाजूला आम्ही घनगर्द जंगलाकडे तोंड करून बसलो ज्याच्या अंधारात आम्हाला न समजता तो मारेकरी आमच्या पासून दोन फुटांवर आश्रय घेऊ शकत होता. लक्षपूर्वक ऐकत असता, अधूनमधून आम्हाला सांबराचे "ढोंक" आणि हरणाचे तीव्र स्वरातले ओरडणे ऐकू येत होते पण त्यात सातत्य नव्हते, याचा अर्थ प्राण्यांना त्यांचा सर्वात मोठा वैरी असलेला भारताच्या जंगलांचा राजा इतका धोका जाणवला नव्हता मध्यरात्रीनंतर आम्ही एकावेळी दोघांनी असे तीन तीन तास आळीपाळीने पहारा देण्याचे ठरवले. आणि पहिली पाळी घेऊन मी माझ्यासोबत एका जोडीदाराला निवडले. बाकीचे दोघे लगेच झोपी गेले. काही अघटित घडले नाही फक्त एकदा त्या एकांड्या सुळेवाल्या हत्तीने आमच्या दिशेने येण्याचा प्रयत्न केला पण आग दिसताच चीत्कारून तो निघून गेला.
दोन वाजेच्या सुमाराला एक भेकर जोरात किंचाळलं पण पुढे काहीआवाज न आल्याने बिबट्याच्या चाहुलीने ते भेदरलं असणार ह्याची खूणगाठ मी बांधली. तीन वाजले, मी बाकी दोघांना उठवले आणि सावध झोप घेतली. उगवणाऱ्या सूर्याला सलामी देणाऱ्या रानकोंबड्याच्या उत्फुल्ल आवाजाने मी पहाटे उठलो.
jungle dawn bw.jpgक्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मूळ इंग्रजीत ही कथा अनेकदा वाचली आहे, पण इथे एकदम चपखल फोटोमुळे अधिक अंगावर आली.
हत्तीचा आणि खालचा अरण्याचा अप्रतिम फोटो

बापरे काय थरारक!

पुढचा सेकंदभर ह्यात घालवताच वरून वाळूची बारीक धार लागली, कदाचित वाघिणीच्या पायामुळे ! >>>> हे वाक्य एकदम भितीदायक वाटलं.

छान भाषांतर चालू आहे, अगदी खिळवून ठेवलंय.
फोटो, जरी दुसरे असतील तरी संपूर्ण परिणाम साधला जातो आहे...

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे खूप खूप आभार !
@आशुचँप, तुमची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे , आणि आवर्जून वाट बघत होतो Happy
तुमच्या केनेथ आणि जिमच्या लेखाचा खूप मोठा पंखा आहे मी ! धन्यवाद !

जिम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसनच्या नरभक्षक शिकारीच्या कथा अनेकवेळा वाचल्या आहेत...प्रत्यक्ष शिकार होईपर्यंतच्या घटनांचा थरार वाचतानांचे रोमांच अनुभवले आहे.
तुमच्या वर्णन आणि चित्रांमुळे तो थरार पुन्हा अनुभवला... लिहित रहा.