नाती जपायला हवीत!

Submitted by पराग र. लोणकर on 20 April, 2020 - 01:13

असलेली कडू गोड नाती
आवर्जून जपायला हवी
झालेल्या नात्यांच्या गुंत्यांची
सोडवणूक करायला हवी...

स्वार्थाच्या या सागरामध्ये
एकेकटे पडलेले सारे
वादळातली आपली बोट
नात्यांच्या मदतीने तरायला हवी...

आई-वडील, भाऊ आणि बहीणी,
रक्ताचे धागे इतर सारे
मित्र, सोबती, सखे सोयरे
घट्ट पकडून ठेवायला हवे...

नात्यांचा आधार मोठा
जुन्या पिढीने अनुभवलेला,
आज घरोघरी एकेक अपत्य
आहे धोका फारच मोठा...

नात्यांची माणसं कमी होणं
हक्काची दारं लुप्त होणं
एकाकी हे जीवन जगणं
प्रयत्नांनी थांबवायला हवं...

लवकर आपण सावरायला हवं,
एकमेकांना भेटायला हवं,
अडीअडचणीला धावायला हवं,
नात्यांना पुन्हा जोडायला हवं...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users