माझी लाडकी ओम्नी!

Submitted by पराग र. लोणकर on 14 April, 2020 - 08:39

(साधारण चौदाएक वर्षांपूर्वी (२००५-०६च्या सुमारास) लिहिलेला हा लेख आहे.)

`आपल्याला मुलगी असती, तर तिच्या लग्नप्रसंगी तिला निरोप देताना, ती सासरी गेल्यावर तुमचं काय झालं असतं?` माझ्या पत्नीचं मला हे असं डिवचणं हल्ली सतत चालूच असतं.

हे असं चालू झालंय साधारण वर्षांपूर्वीपासून!

मी माझी मारुती Van विकल्यापासून...

मी माझी लाडकी मारुती व्हॅन विकल्यापासून...

ही माझी मारुती Van / ओम्नी माझी पहिली चारचाकी गाडी. आपली पहिली गाडी मारुती Vanच असणार हा माझ्या मनाचा अगदी लहानपणापासूनचा निश्चय! माझ्या लहानपणी बहुतेक ट्रॅव्हल्सच्या गाड्या ओम्नीच! माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरल्यावर आणि लग्न झाल्यावर तिच्या सासरच्यांचं येणं कायम ओम्नीतूनच! तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो असलो पाहिजे.

पुढे पुस्तकाच्या व्यवसायाच्या दृष्टीनेही ओम्नी बेस्ट! या दृष्टीने पहिले चारचाकी वाहन घेताना दुसऱ्या कुठल्या गाडीचा प्रश्नच नव्हता. प्रश्न होता की ही ओमनी घ्यायची कुठनं?

सासरे ऑटोमोबाईल इंजिनिअर असल्यामुळे त्यांना पुण्यातल्या अनेक ठिकाणच्या अनेक ओम्नी दाखवल्या व त्यांच्या पसंतीने साई सर्विसमधली एक ओमनी पसंत केली. निळ्या रंगाची, बरीच जुनी असूनही चकाचक केलेली, अगदी नव्यासारखी आणि माझ्या दृष्टीने तर अतिशय देखण्या रूपाची ओमनी - माझ्या एका गाडी चालवू शकणाऱ्या स्नेह्यामार्फत माझ्या दारात आली. लवकरच एका स्कूलमध्ये गाडी शिकून मित्राच्या मदतीने या ओमनीवर प्रॅक्टिस करून मीही आता गाडी चालवू लागलो होतो. पहिला जरा दूरचा प्रवास म्हणजे तळेगावला सासुरवाडीला जाऊन माझ्या दीड-दोन महिन्यांच्या बाळाला घरी- पुण्यात घेऊन येण्याचा.

त्यानंतर कमीत कमी पाच-सहा वेळा मुंबईला, तीन-चार वेळा महाबळेश्वरला असा जरा दूरचा प्रवास ओमनीच्या साथीने, सहकार्याने केला. अगदी विनातक्रार! जवळ जवळ पाच-सहा वर्ष! छोटे-मोठे प्रवास तर अगणित!

अशी पाच-सहा वर्ष गेल्यानंतर ओमनीबाबतीत माझी एक तक्रार, कुरकूर चालू झाली. एकच; पण माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची वाटणारी! ओम्नीला ए.सी. नव्हता. आपली गाडी ए.सी. असावी अशी इच्छा आता वारंवार होत होती. शेवटी आता ए.सी. गाडी घ्यावी, ती वापरावी व व्यवसायाच्या कामासाठी मात्र ओम्नी वापरावी अशा निष्कर्षाला येऊन एक (पुन्हा जुनीच) Santro गाडी खरेदी केली. दोन दोन गाड्या बाळगणे सर्वच दृष्टीने गैरसोयीचे असा अनेकांचा सल्ला दुर्लक्षून दोन्ही गाड्या काही दिवस जवळ बाळगल्या. मात्र लवकरच हा सल्ला योग्य असल्याचे लक्षात आले.

घरात दोन गाड्या लावण्यास जागा अगदीच कट्टाकट्टी! त्यात पुढे Santro लावली की ओमनी काढता येत नव्हती. हळूहळू ओमनी पडून राहू लागली. माझी इतक्या वर्षात कधीच त्रास न देणारी ओमनी चालू होताना (करताना) त्रास देऊ लागली. तिच्या बॅटरीने दगा दिला होता. आपला दोन दोन गाड्या ठेवण्याचा अट्टाहास या आपल्या लाडक्या ओम्नीच्या मुळावर उठणार, पडून पडून तिचे नुकसान होणार ही गोष्ट माझ्या लक्षात येताच नाईलाजाने मी तिला विकायचं ठरवलं.

माझी ओमनी चांगल्या घरात जावी अशी माझी इच्छा फलद्रुप झाली. माझ्याच एका परिचितांच्या घरात तिची पाठवणी करायचं निश्चित झालं. या माझ्या परिचीतासही गाडी चालवता येत नसल्यामुळे ही पाठवणी मलाच घरपोच करायची होती. निर्णय झाला आणि बाकी गोष्टींची पूर्तता होताच तो दिवस उजाडला.

मी ओम्नी बाहेर काढली. वॉशिंग सेंटरमध्ये नेऊन तिची संपूर्ण स्वच्छता केली आणि माझ्या अगदी जवळच्या एका मित्राकडे नेऊन `मी आज ही गाडी एकास विकत आहे,` अशी वार्ता त्याला दिली. खरंतर माझी लाडकी ओमनी माझ्यापासून दूर जात आहे या विचाराने पोटात उठलेला गोळा, मनात दाटलेलं दुःख व्यक्त करण्यासाठीच मी त्या मित्राकडे गेलो होतो.

त्याच्याकडून घरी आलो आणि काही वेळानं ओम्नीच्या नवीन मालकाला बरोबर घेऊन ओम्नी तिच्या नवीन घरी पोहोचती केली.

तिथे मिळालेला पेढा घशातून उतरेना तेव्हाची मनाची जी स्थिती होती ती येथे शब्दातून व्यक्त करणे अशक्य!

घरी आल्यानंतर घरातल्यांपासून भावना लपवणं अवघड काम होऊन बसलं. पुढील दोन-तीन दिवस तर जेवणखाण सुचेना.

आज जवळजवळ दीड वर्ष होऊन गेलं असलं तरी त्या ओमनीबरोबर साजऱ्या केलेल्या सुखाच्या क्षणांची आठवण अजूनही मन बेचैन करतं.

महाबळेश्वरमधील प्रत्येक प्रवासातील छायाचित्रे पाहताना आमच्या मागे उभी असलेली माझी लाडकी ओम्नी माझ्या डोळ्यात अश्रू उभे करते. प्रवासाच्या दरम्यान केव्हाही त्रास न देणाऱ्या ओम्नीने विलक्षण जादू दाखवलेली आहे. या चार-पाच वर्षांच्या कालावधीत ओमनीच्या टायरनं पंक्चरचा त्रास तीन-चार वेळा दिलेलाही आहे. मात्र यातील तीन वेळा लांबचा, दोन्ही वेळचा प्रवास व्यवस्थित करून आल्यानंतर घरी येईपर्यंत त्रास न देता अंगणात गाडी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी टायर भुईला टेकलेले मी पाहिले आहेत. या चमत्काराला काय म्हणावे? (त्यावेळी tubeless वगैरेही प्रकार नव्हते.)omni1.jpg

धो धो, मुसळधार पावसात, पौड रोडच्या एका खोलगट भागात, बसचे संपूर्ण टायर पाण्यात बुडलेले इतक्या पाण्यात, संध्याकाळी उशिराच्या; जवळ-जवळ अंधाराच्या वेळेत, पुढेमागे इतर गाड्यांच्या लांबच लांब रांगा असताना, सोबत पत्नी व छोटेसे बाळ असताना ओमनीच्या काही महत्त्वाच्या भागात पाणी शिरल्याने ती बंद पडली. आजूबाजूला दुचाक्या, चारचाक्या एकमेकांना चिकटून उभ्या. अंधारलेला भाग व मदतीला कोणीच नाही अशा परिस्थितीत केवळ देवाची आणि ओमनीची प्रार्थना करून गाडी चालू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आणि माझी प्रार्थना मान्य होऊन ओम्नी चालू झाली. अशा रितीने चालू झालेल्या ओम्नीनं आम्हाला त्या गर्दीतून संपूर्ण बाहेर आणून अगदी निलायम टॉकीजच्या रिकाम्या रस्त्यापर्यंत आणलं आणि शेवटी ती (त्या दिवशी) पुन्हा चालू न होण्यासाठी बंद पडली. पौड रस्त्यावरच्या त्या भीषण परिस्थितीत जर ओम्नीनं सहकार्य केलं नसतं तर आमचं काय झालं असतं या विचाराने अजूनही अंगावर काटा उभा राहतो. पुढे, पाणी शिरून नादुरुस्त झालेला तो महत्त्वाचा पण छोटासा भाग बदलल्यावर (फारसा खर्चही न करता) ओमनी पुन्हा पहिल्यासारखी सज्ज झाली.

या चार-पाच वर्षांच्या कालावधीत मला त्रास द्यायचाच नाही असा ओम्नीचा निश्चय असावा असं मला वाटतं. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रवासात तर तिनं कधी दगा दिलाच नाही, परंतु माझ्या खिशालाही अतिरिक्त बोजा कधी पडू दिला नाही. मी दुसऱ्या गाडीस खरेदी करून तिचा वापर जास्त करायला लागल्यावर मात्र अचानक चालू होण्यास असहकार्य करून तिनं एक प्रकारची तिची नाराजीच व्यक्त केली असं मला कायम वाटतं.

जवळच्याच एका परीचीताकडे या माझ्या लेकीची मी पाठवणी केल्यामुळे तिचे बरेच वेळा दर्शन घडत असते. (अनेकदा तर मीच वाट वाकडी करून असे दर्शन घडवून आणत असतो.) मात्र ती कधी अचानक दिसली की पुढचा साधारण तासभराचा काळ मला खूप कठीण जातो. तिच्या सहवासातील आठवणींनी मन भरून येतं.

ओमनीची डिकी पूर्ण भरून पुस्तकं त्यात ठेवून त्यातून केलेला प्रवास मला आठवतो. डिकीत दोन व्यक्तींना बसवून अशा सात व्यक्तींसह मुंबईपर्यंत मारलेली मजल मला आठवते. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी केलेल्या छोट्या-मोठ्या प्रवासातील अनेक क्षण स्मरणात येऊ लागतात. माझ्या मुलानं प्रवास चालू असताना मागील सीटवरून डिकीत मारलेल्या उड्या व `मी डिकीत ठेवलेल्या पेटीवरच बसणार!` असा केलेला हट्ट मला आठवतो. प्रवास चालू असताना ओमनीच्या मध्यभागातून डिकीत व डिकीतून पुन्हा मधल्या भागात असा त्याने केलेला खेळ मला आठवत राहतो. कधी दुपारच्या अथवा संध्याकाळच्या वेळी शांतपणा हवा असल्यास अंगणात लावलेल्या ओम्नीत मधल्या सीटवर बसून सर्व दरवाजे लावून केलेले एखाद्या पुस्तकाचे वाचन मला आठवते.

इतक्या थोड्या वर्षांच्या कालावधीत माझ्या ओमनीबरोबरच्या अशा असंख्य आठवणी मनातून डोळ्यात कधी उतरू लागतात तेच कळत नाही...

(अंदाजे २००५-०६ या वर्षात कधीतरी लिहिलेला लेख.)
***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Chan lekha. Tumchi omni kharach lucky hoti jila tumchya sarkha sanvedanshil malak milala. Arthat je swatachya kashtane hya sarv goshti ghetat tyanach tya goshtincha mol kalata.

एकदम पोहचला लेख.खास करून गाडी विकताना चांगल्या घरात जावी असं वाटतंच.साधारण पणे मुलीला सासरी पाठवताना जसं वाटेल तसाच क्षण.

लेख चांगला आहे.

पण प्रोफाईल पिक नवीन काढा हो. तो खांद्यावर हात कुणाचा आहे? Lol

फारच छान लेखन. भावना पोहोचल्या.
-----
गाडी नाही पण जेव्हा इतर गाड्यांशी तुलना करतो तेव्हा ओम्नीचं वेगळेपण जाणवतं. दरवाजे जागच्या जागी सरकून उघडतात. डिकीचे दार वर उघडते. लोणावळा लायन पॉईंटला पाहिले आहे याचा उपयोग. डिकीत खाण्याचे जिन्नस, चहा आणलेला असतो. पावसात ते दार उघडून पुढे उभे राहून खात असतात. छोट्या पिकनिकसाठी छान. खूप वेगात जाण्यासाठी ही गाडी बनवलेली नाहीच. घरापासून शंभरेक किमी सावकाश जाऊन परत येण्यासाठी. ओके.

खूपच छान लिहिलंय.

ओम्नी पण तुमच्यासारखा प्रेम करणारा मालक मिळाला म्हणून खूप नशीबवान म्हटली पाहिजे.