(चिनी) विजनवास

Submitted by प्राचीन on 7 April, 2020 - 00:25

विजनवास
सकारात्मक विचार करणे हे नेहमीच आवश्यक असले तरी नेमकी त्याची सर्वाधिक आवश्यकता असते, तेव्हा बुद्धीच्या त्या धडपडीला मनाच्या आशंकारज्जूने बांधून घ्यावे लागते, हेही खरेच. गेल्या काही काळात माझे नवरोजी आणि मी अशाच काहीशा अवस्थेतून जात होतो. त्यातही नवरोजी अधिक प्रमाणात.. आता एक टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर त्याबद्दल लिहिण्याचं बळ आलंय.
१५ मार्च रोजी 'ह्यांनी' चीनमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय, येथून या सगळ्याची सुरुवात झाली. काही अत्यावश्यक कार्यालयीन काम पूर्ण करण्यासाठी (आधीच जायचं होतं पण बरेच दिवस चीनमध्ये विमानसेवा बंद होती, त्यामुळे ती सुरू झाल्यानंतर व तिथे कोरोना बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आल्याचं तिथल्या परिचित अधिकाऱ्यांकडून खात्रीशीररीत्या कळल्यामुळे) ह्यांनी तिथे जायचं ठरवलं खरं, पण तोवर चीनमधल्या कोरोनाविषयक भयंकर बातम्या इथे भारतात इतक्या प्रसृत झाल्या होत्या की आमच्या (मला चीनमध्ये जाण्याविषयी विचारल्यावर मी ह्यांना होकार दिला म्हणून)निर्णयास वारंवार प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष विरोध होऊ लागला. विशेषतः "एवढं काय अडलंय आत्ता जायचं?" हे उद्गार प्रत्यक्ष वा हावभावांतून उमटू लागले. क्षणभर मलाही चलबिचल वाटून गेलं.. खरं तर आजवरचा अनुभव असा होता की सपोर्ट वा पाठिंब्याची तशीच निकडीची गरज असल्याखेरीज नवरोबा कधीच निर्णयासाठी माझ्यावर अवलंबून नसत. ह्यावेळी त्यांनी जे ठरवलं होतं, त्याकरिता म्हणुनच माझा पाठिंबा होता. कर्तव्याला,कामाच्या जबाबदारीला अत्यंत प्राधान्य देणारी जी काही मोजकी माणसे मी पाहिली आहेत, त्यांत नवरोबांची गणना करणं अवश्य आहे.
ते भारतात असताना १४ तारखेला ताजी खबरबात घेण्याच्या दृष्टीने चीनमधील ग्वांगझौमध्ये राहणाऱ्या व्यावसायिक परिचितांस फोन केला. ह्यांनी मुद्दाम फोन स्पीकरवर ठेवला (बहुतेक पत्निवर्गाप्रमाणे माझंही नेहमीचं ठाम मत असतं, की हे मला गाळीव माहिती देतात.माझ्यासारखे इत्थंभूत सगळं सांगत नाहीत. आणि आत्ता तरी ह्यांना माझी भुणभुण नकोच होती) तर त्या गृहस्थाने पहिलाच प्रश्न विचारला "बोलिए साहब, किस होटलमें रहना पसंद करोगे?"... आम्ही सर्दच झालेलो... तोच मग पुढे जे बोलला, त्याने जे शंकानिरसन केलं, त्याचा सारांश : विशिष्ट देशांतून आलेल्या वा विमानात विशिष्ट देशांच्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेताहेत, तेही कोरोना निगेटिव्ह असलात तर;नपेक्षा अर्थातच सरळ हॉस्पिटलमध्ये (?) रवानगी. हॉटेलमध्येदेखील बाहेरच्या कुणालाही १४ दिवस भेटता येत नाही. पहिल्या दिवशी काय त्या जरुरीच्या वस्तू वा कागदपत्रे मागवायचे. मग सक्तीची नजरकैद... "
त्या माणसाने हे सहजपणे सांगितलं खरं, पण आम्ही जरा हबकलोच. त्याला पार्श्वभूमी अशी होती, की चीनमधील परदेशी लोकांविषयीचं धोरण तितकंसं आश्वासक नव्हतं; तोवर भारतात कोरोनाबाबत मोठी वा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर परिणाम होईल अशी पावलं (lock down, self-quarantine, curfew, etc.) उचलली नव्हती. इथली जनताही चर्चा करण्यापलीकडे फार गांभीर्याने कोरोनाबाबत विचार करत नव्हती... जरी चीनमधील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह नसेल, तरीही चीनसारख्या देशात - भाषेच्या समस्येमुळे - तिथल्या लोकांशी असो, वा सरकारी अधिकाऱ्यांशी, संवाद साधणं अत्यंत कठीण असतं, याचा मीही अनुभव घेतलेला.. तरीही आम्ही निर्णयावर ठाम राहण्याचं ठरलं. नजरकैदेत पंधरा दिवस उपयोगी पडेल असा खाद्यपदार्थांचा साठा सामानात भरला. कारण पतिदेव शाकाहारी असल्यामुळे तिथे सुरक्षिततेनंतरचा प्रश्न जेवणाचाच आला असता..
१५ तारखेला रात्रीचं विमान व्हाया क्वालालंपूर (मलेशिया). कारण दोन दिवस पूर्वीपर्यंत हॉंगकाँग विमानतळ बंद केलेला होता. घरी वातावरण असं झालेलं की जणु हे युद्धासाठी चाललेत.. (ते खरंही होतं. सैनिकांशी तुलना करणं हा हेतूही नाही व तेवढी योग्यताही नाही. परंतु आता विविध माध्यमांतून 'कोरोनाशी युद्ध' हाच विचार मांडला जात आहे.) कर्तव्यदक्षता व त्याकरिता धोका पत्करणं हे निकष खरोखरच लागू होत होते. भारतातील आरोग्यविषयक चाचण्या झाल्या. त्यांतून पार पडून क्वालालंपूर येथे चाचणी व मग ग्वांगझौ.. भारतीय वेळेनुसार दुपारी दीडच्या सुमारास ह्यांचा फोन आला. ह्यावेळेपर्यंत, वाईटात वाईट होईल ते स्वीकारण्याची मानसिक तयारी आम्ही करत होतो. इंटरनेट न मिळणं, फोन सेवा बंद असणं, इ. पण ह्यांचा थेट फोन आल्यावर मला ते अनपेक्षित वाटलं. ते ग्वांगझौमध्ये टॅक्सीतून 'घरी' निघाले होते. चक्क 'घरी'!
तरीही माझा विश्वास बसेना. (बायकोचा चष्मा किंवा कान). त्यामुळे त्यांना बजावलं की 'रीगल कोर्ट'मध्ये गेल्यावर व्हिडिओ कॉल करा. नवल म्हणजे हे नेहमीसारखे वैतागले नाहीत. खरोखर घरून व्हिडिओ कॉल केला त्यांनी. चीनमधील हे घरकुल मला नेहमीच आवडतं (तसं यापूर्वी 'चिनई' मध्ये लिहिलंही आहे बहुतेक) आणि आता तर ते अगदीच मोददायी, दिलासादायक वाटलं. १४ दिवस Home Quarantine निश्चित झालं होतं !
आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला होता. आता हॉटेलमध्ये वा चिन्यांच्या लहरीनुसार राहायचं नव्हतं.. पण जसा सध्या Lock down चा पहिलाच अनुभव, तसा तिथे Home Quarantine चा ही ! त्यातून चीनमध्ये.. यापूर्वीही चिनी प्रशासनाची शिस्त (काहीवेळा काहीजणांना दडपशाही वाटू शकते) अनुभवली होतीच.. आताही ताबडतोब एक app दिलं गेलं. १२ मास्क (फुकट) दिले गेले. दररोज दिवसातून ठरावीक वेळा body temperature etc. record करून त्यावर पाठवणंही आवश्यकच ! याखेरीज on the way to home, दर काही अंतरावर शरीराचं तापमान मोजणार.. घराबाहेर पडणं अगदी वर्ज्यच. इ.इ. तसं गुपचुप (इथल्या लोकांसारखं) बाहेर पडणंही अशक्य. कारण तुमचा Record आता ग्वांगझौ प्रशासनाकडे पोहोचलेला आहे. ऑफिसचं काम लॅपटॉपने जरूर करा. पण तिथे प्रत्यक्ष जाण्याचा प्रयत्न केलात, तर गम् – गच्छ्न्ति थेट तुरुंगात ! हे सगळं अनपेक्षित नसलं, तरी अनैच्छिक नि अपरिहार्य होतं.
तसं दुःखात सुखही होतंच.. घरात नेट, टी.व्ही. मिळणार होते. एका परिचिताचा डबेवाला जेवण द्यायला तयार झाला. तो डबा घेऊन आला,तेव्हा सहज ह्यांचं दारासमोर लक्ष गेलं, तर तिथे CCTV camera होता ! फक्त त्याच दारासमोर ! ही खरी नजरकैद होती !
झालं.. डबेवाला घाबरला. म्हणाला, “ मी नाही येणार उद्यापासून .”
ठीक आहे. खिचडीचा विजय असो !
बाकी जरूरी सामान,दूध वगैरे घरपोच मिळावे, यासाठी प्रशासनाने एक फोन नंबर दिला होता. पैसे online भरावयाचे असत. ते दाराच्या बाहेर सामान ठेवत.
दुसर्‍या दिवशी डबेवाल्याने माणुसकी व हिंमत दोन्ही दाखवून कळवलं की "तो बिल्डिंगच्या खाली वॉचमनजवळ डबा ठेवून जाईल." मग वॉचमन त्याच्या सवडीने डबा वरती आणून देणार. असे रोज काहीतरी वेगळे, आनंद- औदासिन्याच्या छटेचे अपडेट्स मला फोनवरून मिळत. मीही इथल्या वेगवान घडामोडींचा आढावा फोनवरून देत असे. (तिथे काही न्यूज चॅनल्स दिसत असूनही. एकतर बातम्यांमध्ये आमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही असायला आम्ही शिलिब्रेटी नाही; दुसरं व अधिक आवश्यक कारण म्हणजे संपूर्ण एकांतवासात, परक्या भूमीवर, सुटकेसाठी दिवस मोजत असणाऱ्या नवरोबांना माणसांत असल्याचा फील यावा !)
तसा आमच्या नवरोबांचा स्वभाव अतिशय खंबीर आहे. मला एरव्ही कधीही त्यांना depressed बघण्याची वा किंचितही डगमगलेलं पाहण्याची वेळ आलेली नव्हती... इथे भारतातही निराशाजनक बातम्या येत होत्या. Corona spread, जनता कर्फ्यू, लॉक डाऊन... नवरोबांना इथली काळजीही अस्वस्थ करीत होती. खरे म्हणजे इथे आम्ही गैरसोयीच्या वातावरणात व कोरोनाबाबत जागरुक राहून जगत असलो तरी आपल्याच देशात, जवळच्या माणसांमधे होतो. एकाकी किंवा भीतीच्या सावटाखाली नव्हतो. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे असते, ती आम्ही घेत होतोच.
परंतु तिथे ह्यांना मात्र, “१४ दिवसांनंतर काय”, - हेही Chinese अधिकाऱ्यांना विचारणं सोपं नव्हतं. दिवसभर घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या, इवल्याशा आकाशाचा निळा आधार घेत दिवस काढत होते.
२३ तारखेला सकाळी जरा उशिराने ह्यांचा फोन आला. कारण तिथे Home Quarantine ला सात दिवस पूर्ण झाले, म्हणून मेडिकल स्टाफ आला होता घरी. पुन्हा तपासणी केली गेली. पुढील २४ तास एक अनामिक ताण.. संपर्कात नसताना टेस्ट निगेटिव्ह येणारच. पण.. खात्री वाटत नव्हती. दोघेही परस्परांना या ताणापासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत होतो. (आणि हे दोघांनाही माहीत होते).
दुसर्‍या दिवशीची सकाळ. ह्यांना गोड (आवाजात) फोन आला. "Your health is good" पक्षी, चिन्यांच्या बोलीप्रमाणे "युअल हेल्थ इज गुद्"... आणखी एक परीक्षा उत्तीर्ण. माझीही सकाळ नेहमीपेक्षा ताजीतवानी होऊन गेली. आणखी सात दिवसच राहिले होते, पण नवरोबांना ते फार दीर्घ कालावधीचे वाटत होते.हे नैसर्गिक होतं. विशेष त्रासदायक गोष्ट म्हणजे अत्यंत उद्योगप्रिय, कार्यमग्न अशा या माणसाची सगळीच कामं काही ऑनलाइन होणं शक्य नव्हतं. प्रत्यक्ष कार्यस्थळी जाणं निकडीचं झालं होतं. इथे भारतात त्यांच्या Home Quarantine चं समजताच लोकांची पहिली प्रतिक्रिया हीच "काय उपयोग झाला जाण्याची घाई करून?"
अर्थात प्रत्येकाला उत्तर देण्याच्या भानगडीत मी पडले नाही. ते शक्यही नव्हतं. कारण कधीही गेले असते, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Quarantine झालंच असतं. काहींनी तर माझ्याकडे शंकेने बघत ( 'हिला नवऱ्याची काही चिंता आहे का बघा... इ.' भाव) " नोकरीपेक्षा जीव महत्वाचा नाही का?" हा बिनतोड सवालही केला. तसं बरोबरच होतं ते. पण अस्थानी होतं. त्यापाठची कळकळ समजून घेऊन मी बऱ्यापैकी उत्तरं दिलीही... पण मग कधीतरी मलाही थोडं अपराधी वाटायचं की आपण 'नका जाऊ' असं म्हटलं असतं तर..
अशा 'इथल्या' आणि 'तिथल्या' कोरोनाग्रस्त बातम्यांची सतत संगत असताना १४ दिवस पूर्ण झाले एकदाचे. नवरोबा कामावर रुजू व्हायला इतके उत्सुक होते की सकाळी (आपली सकाळ, तिथे अडीच तास पुढे) सात वाजता मला फोन केला. ते तयार होऊन बसले होते. आदल्या दिवशी टेस्ट झाली होती. म्हणाले की "मीच फोन करेन त्या मेडिकल ऑफिसरला थोडा वेळ वाट बघून" .
आदल्या दिवशी म्हणजे २९ तारखेला सकाळी असेच आम्ही फोनवर बोलत होतो, तेव्हा मला एकदम म्हणाले, "लिफ्टचं दार उघडलंय. पण खालचे वर येताहेत की वरचे खाली जाताहेत, कुणास ठाऊक."
त्यांना उत्कंठा होती,की ती टेस्ट आज होणार की नाही, कधी होईल, तीच माणसं आली असतील का?" मला जरा मौज वाटली. कैदेचे दिवस पूर्ण केलेल्या माणसागत हे वागणं होतं... परंतु खरोखरच लगेच दारावरची बेल वाजल्याचा आवाज मला फोनवर ऐकू आला. खरंच मेडिकल स्टाफ आला होता. एवढ्या तत्परतेने काम करणाऱ्या लोकांचं जरा (चिनी असल्यामुळे त्यात चिनी कम) कौतुकच वाटलं... तसंही माणसाला जग आपल्या संदर्भात जोखण्याची सवयच असते …
तर आज दिनांक तीस मार्च २०२० रोजी कालच्याच वेळी हेल्थ रिपोर्ट व ओके सर्टिफिकेट ह्यांना मिळालं. नवरोबा निघाले लगेच कर्मभूमीवर. अर्थात मास्क लावून. आता - १४ दिवसांनी मला त्यांचं पूर्वीचं तरतरीत, आत्मविश्वासपूर्ण रूप दिसत होतं ! हो. फोनवरुनही दिसू शकत होतं ! "व्हिडिओ कॉल करा" असं बजावण्याची आत्ता गरज उरली नव्हती !

प्राची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डबेवाला चिनी होता का भारतीय?सहज शँका म्हणून."कारण तुम्ही लिहीलं आहे की मिस्टर पूर्ण शाकाहारी आहेत म्हणून.

छान लिहिलंय.
आमच्या सोसायटीत राहणारा एकजण कामानिमित्त ६ महिन्यांंसाठी स्पेनला गेला आहे. करोना प्रकरण सुरू होण्यापूर्वीच. आता तिकडे बिचारा होम क्वारंटाईनमध्ये आहे. बायको आणि मुलगी मुलीची परीक्षा संपल्यावर स्पेन फिरायला जाणार होत्या. आता सगळंच रद्द आणि फक्त काळजी करणं हातात.

अगदी प्रत्ययकारी वर्णन. ते चौदा दिवस तुम्ही कसे घालवले असतील त्याची कल्पना करवत नाही.
वैयक्तिक अनुभवांबरोबर चीनच्या कार्यक्षम शासनयंत्रणेचेही दर्शन घडले. पराकोटीचे कार्यक्षम.
एक जिवंत अनुभव आमच्या पदरी पडला.

बापरे! शारीरीक धाड्सापेक्षा इथे मानसीक धाडसाचीच परीक्षा घेतली गेली की. पण हे एक बरे झाले की तब्येत चांगली राहिली.

>> " नोकरीपेक्षा जीव महत्वाचा नाही का?" हा बिनतोड सवालही केला. तसं बरोबरच होतं ते.>>>
वाचताना आणि वाचून झाल्यावरही माझीही हीच प्रतिक्रिया आहे. परंतु आता ते तिथे पोहोचले आहेत आणि १४ दिवस ओलांडल्यावर आता ते तिथे इथल्यापेक्षा जास्त सुरक्षित आहेत.
दोघेही आपपल्या ठिकाणी राहुन सुरक्षित रहा. शुभेच्छा!

प्राचीन तुमची मनस्थिती काय झाली असेल, कल्पना करवत नाही.
पण तरीही मोठ्या धैर्याने बाहेर पडलात. अभिनंदन!

कसला भारी लिहीलाय अनुभव. कौतुक आहे तुम्हा दोघांच्या खंबीरतेचे, मानसिक बळाचे. दोघांना शुभेच्छा.

सुनिधी, आदिश्री, रश्मी.., vt220, मन्या §, स्वाती २,बोकलत, अज्ञातवासी, सामो आणि शशांक जी, आपल्या आपुलकीच्या प्रतिसादांमुळे बरं वाटलं.
रश्मी.., खरंच तब्येत चांगली राहणं ही परमेश्वरकृपाच आहे.
मायबोलीमुळेदेखील बराच सुसह्य झाला ताण.

कंपनीच्या कामाला इतके प्राधान्य देणारी व्यक्ती बघून थक्क झालो.
Nobody on their deathbed has ever said "I wish I had spent more time at the office".
-- Heard from Rabbi Harold Kushner; Attributed by some to Senator Paul Tsongas.

बापरे! तुमच्या मानसिक त्रासाची कल्पना पण करु शकत नाही. वेगळाच अनुभव.
पण मी पण इतर काही लोकांसारखंच म्हणेन की ऑफिसच्या कामासाठी खरंच इतकी गरज होती का जायची? कारण ह्याची कल्पना दोन्हीकडच्या ऑफिसेसना असणारच ना.

निलाक्षी, निरु, उ. बो., सस्मित, धनुडी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
साहसी वगैरे काही नाही हो. तशीच वेळ आली त्यामुळे थोडे खंबीर बनायला लागले.
आणि सध्या तर आपण सगळेच भारतातदेखील सकारात्मक विचार ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

आज वाचलं हे
प्रांजळपणे लिहिलंय, आवडलं लिखाण
धैर्यवान आहात.

बापरे
वेगळा अनुभव.
सर्व सुरक्षित झालं हे चांगलं
ज्या कामासाठी गेले होते ते अपेक्षेप्रमाणे झालं ना?
अजूनही तिथे आहेत का?

Pages