दीप पेटवा मनातले

Submitted by Asu on 5 April, 2020 - 01:58

आज दि.५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे प्रज्वलित करण्याच्या संबंधात-
दीप पेटवा मनातले

दीप लावून अंधारात, प्रकाश पडेल चोहीकडे
अज्ञानाच्या अंधारा पण, घालील कोण साकडे

अंधार हटवा दीप पेटवा, नाही फक्त हातातले
मनातही प्रकाश पडू द्या, दीप पेटवा मनातले

'बोले तैसा चाले त्याची, म्हणे वंदावी पाऊले'
संत तुकाराम सांगून गेले, खरेच कोण वागले!

कानी कपाळी ओरडून, उलट्या कळशी पाणी
घरात बसा गर्दी आवरा, सांगून थकली वाणी

चीन इटली स्पेन भयंकर, भविष्य आपले दावी
शेकडो-हजारो क्षणात धाडले, मरणाच्या गावी

'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' अर्थ याचा जाणू
शिकून यातून शहाणे होऊ नियम शिस्तीचे बाणू

का ना वाटे भीती मरणाची, स्वस्त झाले मरणे!
कोरोना ना भेद करी, असेल म्हातारे वा तरणे

दीन भिकारी असो वा कुणी, श्रीमंत राजघराणे
लुळापांगळा वा आंधळा, चालेना तिथे बहाणे

पैसा-अडका अस्त्र-शस्त्र, प्रार्थना ना चाले मंत्र
घरात बसा अन् जीव वाचवा, एकच असे तंत्र

धर्म पंथ जात पात विसरून, हात मदतीचा देऊ
वसुधैव कुटुंबकम् बळ एकीचे, दीप लावून दाऊ

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults