शालेय जीवनात साधारण तेरा-चौदा वर्षांचा असताना मी एक बालकविता लिहिली. ती दै. सकाळमध्ये पाठवली. आश्चर्य म्हणजे ती छापूनही आली. त्यावेळी मला झालेला आनंद मला अजूनही आठवतोय. मी दै. सकाळचे ते पान घेऊन मोठ्या उत्साहाने शेजारच्या घरांत दाखवत सुटलो होतो.
अशा प्रकारे सकाळमध्ये छापून आल्यामुळे अतिशय उत्साहात येऊन मी त्या काळात अजून कविता करण्याचा प्रयत्न केला परंतु मला त्या जमल्या नाहीत.
बालपणी लिहिलेल्या या कवितेला अर्थातच साहित्यमूल्य नसणारच. शेवटच्या दोन ओळी तर तेव्हाही मला जमल्या नव्हत्या, अजूनही दुरुस्त करणे मला जमत नाहीये. अजूनही `आपल्याला कविता करता यायला हव्यात` ही इच्छा मनात आहेच. काही प्रयत्नांनी, अभ्यासानं कविता करता येऊ शकते का? यावर मार्गदर्शन मिळाल्यास मला आवडेल.
`लाल परी`
लाल परी आली एकदा मला भेटाया
विश्वासच उडाला माझा, माझ्या डोळ्यांवरचा!
म्हणाली चल आपण खेळू
झाडावरचे खाऊ पेरू
फुलं, पाखरांशी खेळू
त्यांच्या सर्व गोष्टी ऐकू
मी म्हणालो घरी आई
रडेल माझ्यासाठी ताई
लालपरी एकदम रुसली
तेथून ती अदुष्य झाली
मला रस्ता समजेना
काय करावे उमजेना
मी जोरात ओरडलो
आई म्हणाली बाळा झोप...
***