शिक्षा?

Submitted by पराग र. लोणकर on 3 April, 2020 - 02:21

सकाळी उठल्या उठल्या माझी धावपळ चालू होते. फिल्मसिटीला वेळेत पोहोचणं माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. मी वेळेचा एकदम पक्का असणारा एक अतिशय यशस्वी चित्रपट कलाकार आहे... असा जर तुमचा समज झाला असेल तर तो साफ चुकीचा आहे. मी आहे एक स्ट्रगलींग अॅक्टर. शिक्षण आणि पुणं सोडून चित्रपटात नाव कमवायचं अशा महान(?) ध्येयाने प्रेरित होऊन मी घरच्यांना काहीही न सांगता मुंबईला पळून आलो त्याला आता दहा-एक वर्ष होऊन गेली. आता खरं तर ते ध्येय पार धुळीला मिळालंय. उरलीय ती फक्त आजच्या जेवणाची चिंता. उद्याचाही फारसा विचार करणं आता बाजूला ठेवलंय. अर्थात अचानक कुठल्यातरी मोठ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळेल आणि एका रात्रीत स्टार झालेल्या अनेकांसारखं माझंही जीवन बदलून जाईल ही आशा अजूनही मनाच्या एका, नव्हे; अनेक कोपऱ्यात आपली जागा धरून आहे हे मला मान्य करावंच लागेल.

नेहमीसारखाच आजही लवकर आटपून मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो. स्टेशनवर आलो आणि लोकल पकडली. बघूया आज एखाद्या चित्रपटात एखादा `गर्दीतला माणूस` म्हणून तरी रोल मिळतोय का!

खरंतर आता मी थोडीशी त्या पुढची पायरी गाठलीये. पण होतंय काय, की त्यामुळे माझ्यापुढची अडचण कमी व्हायच्या ऐवजी वाढलीये. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात मला बऱ्याच वेळ पडद्यावर वावरण्याची संधी मिळालीये. काही निवडक वाक्यंही माझ्या तोंडी होती. पण त्यामुळे आता अगदी गर्दीतला माणूस असं काम मला शोभणार नव्हतं, आणि त्या एका चित्रपटाएवढं काम प्रत्येक वेळी कुठून मिळणार?

तासभरच्या त्या लोकल प्रवासात आजूबाजूच्या एखाद्या प्रवाशाचं वर्तमानपत्र घेऊन वाचणं हे माझं रोजचं काम होतं. रोजचाच प्रवास असल्यानं अनेक प्रवासी तसे चेहऱ्याने ओळखीचे होते. माझ्या जवळच्या एका प्रवाशाला रोजची माझी सवय माहीत असल्यानं स्वतःहूनच त्याचं वाचून झालेलं वर्तमानपत्राचं एक पान माझ्या हातात दिलं. त्याच्याकडे हसून पाहत मी हातात आलेलं ते पान सरळ करून वाचायला सुरुवात केली.

माझी नजर थेट एका बातमीकडे गेली. खरंतर त्या बातमीसोबत असलेल्या छायाचित्रामुळे माझी त्या बातमीकडे नजर गेली होती. ते छायाचित्र होतं बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेल्या खलनायक राजीव खन्नांचे; आणि बातमी होती-
`हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक श्री. राजीव खन्ना यांची हत्या!`

आदल्या दिवशीच ती हत्या झाल्याने बातमी तशी थोडक्यातच होती. पण मला बसलेला धक्का फार मोठा होता. मी मघाशी ज्या चित्रपटाच्या भूमिकेबद्दल बोलत होतो त्यात मुख्य खलनायकाची भूमिका बजावणारे राजीव खन्नाच होते. शूटिंगच्या वेळी एकमेकांशी वैयक्तिक ओळख नसतानाही कलाकारांचा कायम एकमेकांशी संवाद होतो, बोलणं होतं. त्यामुळे त्यांच्यातलं टायमिंग जुळून येत असतं. मी चित्रपटसृष्टीत नवखा, स्ट्रगलर असलो, तरी चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खन्नाजी व माझ्या बऱ्याच वेळा गप्पा झाल्या होत्या. त्यामुळे साहजिकच मला त्या बातमीने खूप वाईट वाटलं.

पण स्टुडिओत पोचलो आणि तेथील संबंधित लोकांना भेटणं, कामासाठी विनंत्या करणं इत्यादी कामात हा विचार थोडासा बाजूला पडला. इतर माझ्यासारख्याच रिकामटेकड्या कलाकारांशी रिकाम्या वेळात झालेल्या गप्पांमध्ये राजीव खन्नाजींचा जो विषय झाला तो तेवढाच.

दुसरा दिवस उजाडला. माझ्यासाठी नवीन असं काहीच नव्हतं. पुन्हा लोकलचा प्रवास चालू झाला. पुन्हा शेजारच्यानं वर्तमानपत्र माझ्या हातात ठेवलं आणि नेहमीप्रमाणे मी त्यावरून नजर टाकायला सुरुवात केली. हातातलं समोरचं पान वाचून झालं आणि मी पान उलटलं. कालच्यासारखीच एक धक्कादायक बातमी माझ्यासमोर उभी राहिली.

`चित्रपट अभिनेते श्री. देबोशीश ठाकूर यांची हत्या!`

आज मात्र माझ्या छातीत एकदम कळ येऊन गेली. हा माझ्यासाठी दोन दिवसात बसलेला दुसरा धक्का होता. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येईल एवढा मोठा धक्का होता. का? अहो... ज्या एका चित्रपटात मला आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा रोल मिळाला होता, त्या चित्रपटात माझ्याबरोबर काम केलेल्या राजीव खन्नांबरोबर देबोशीश ठाकूर हेही होते.

अचानक माझ्या डोक्यात एक भयानक कल्पना येऊन गेली. काल राजीव खन्नांची हत्या. आज देबोशीश ठाकूर यांची हत्या. काय चाललंय हे? हा योगायोग आहे की आणखी काही?

मला हे प्रश्न पडायचं कारण आता मला तुम्हाला सांगायलाच लागेल.

मी मघापासून माझ्या ज्या चित्रपटाविषयी सांगत आहे, या चित्रपटात मुख्य तीन अभिनेते खलनायकाचे काम करीत होते. त्यातील एक होते राजीव खन्ना. दुसरे होते देबोशीश ठाकूर आणि तिसरा होता महेश पाटील. आणि हा महेश पाटील म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून स्वतः मी!

या चित्रपटात खन्नाजी आणि ठाकूरजी हे दोन श्रीमंत मित्र दाखवले होते. यातील खन्ना यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराची माझी भूमिका होती आणि आम्ही तिघे मिळून एका गरीब मुलीवर अत्याचार करतो, तिचा खूनही करतो आणि पुढे चाललेल्या खटल्यात आमची तिघांची- त्या दोघांच्या पैशाच्या जोरावर- साक्षीदार फितूर करून- पुरावे नष्ट करून- निर्दोष मुक्तता होते असे त्या खटल्यात दाखवले होते. आम्हा तिघांना शिक्षा होते वगैरे शेवट या चित्रपटात न दाखवता दिग्दर्शकाने आमचा काय निर्णय करावा हे प्रेक्षकांवर सोपवल्यासारखे केले होते.

या दोन दिवसात वाचलेल्या दोन बातम्या वाचून मला बसलेला धक्का हा यामुळेच होता.

माझ्या डोक्यात आलेला विचार मला घाबरवून गेला. नक्कीच हा चित्रपट अशा एखाद्या मनोरुग्णानं पाहिला होता जो चित्रपटात आम्ही त्या मुलीवर केलेल्या अत्याचारानं व पुढे आमची निर्दोष सुटका झाल्याने आमच्या तिघांवर प्रचंड चिडलेला असावा. आपण पाहत असलेला चित्रपट हा चित्रपट होता, त्यातील खलनायक खरेच दुष्ट प्रवृत्तीचे नाहीत असा विचार करण्याची त्याच्या बुद्धीची क्षमता नसावी. त्यानं सलग दोन दिवसात या दोघांची हत्या केली होती. म्हणजे आता नंबर माझा?

मला दरदरून घाम फुटला. माझं अंग थरथरायला लागलं. माझी परिस्थिती आजूबाजूच्या काही मंडळींच्या लक्षात आली. त्यांनी मला पाणी देण्याचा प्रयत्न केला पण मला आता माझ्या आजूबाजूचा प्रत्येकजणच संशयित वाटू लागला होता. लोकल थांबताच मी कसाबसा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उतरलो. भीतीनं गलितगात्र झालेला असतानाही माझी सर्व शक्ती एकवटून मी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. आलेली पहिली लोकल पकडली आणि माझ्या खोलीवर परतलो. खोलीच्या दोनही कड्या लावून बिछान्यावर झोकून दिलं तरी माझ्या छातीची धडधड मलाच ऐकू येत होती.

पण पडून रहाणंही शक्य होईना. जीव वर वर यायला लागला होता. घराबाहेर पडायची प्रचंड भीती वाटत होती; पण पडण्याशिवाय पर्याय नव्हता. मी बाहेर पडलो आणि जवळ जवळ धावतच जवळची पोलिस चौकी गाठली.

मी राहात असलेला भाग तसा फारसा गर्दीचा नव्हता. त्यामुळे पोलीस चौकीतही फारसं कोणीच नव्हतं. इन्स्पेक्टर साहेबांना माझा चेहरा पाहूनच काहीतरी भयानक घडलं असावं असा अंदाज आला. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि त्यांच्या जवळचा पाण्याचा ग्लास माझ्यापुढे ठेवला. मी आधीच घरी भरपूर पाणी प्यायलो होतो, त्यामुळे तो नाकारून मी भराभर दोन दिवसातल्या घडलेल्या त्या घटना आणि माझा मी जोडलेला त्याच्याशी संबंध इन्स्पेक्टर साहेबांना सांगितला. इन्स्पेक्टर साहेबांनी मला शांत करण्याचा प्रयत्न केला. माझी तक्रार नोंदवून घ्यायला हवालदार साहेबांना सांगितलं आणि मला घरी जायला सांगितलं. मी अर्थातच त्याला नकार दिला. मला तिथेच बसू देण्याची मी विनंती केली किंवा मला पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली. पण मी कोणीही मोठा माणूस नव्हतो. त्यामुळे मला तशी काही स्पेशल ट्रीटमेंट लगेच देणे त्यांना शक्य नव्हते. तरीही त्यांनी माझ्याबरोबर ताबडतोब एक पोलीस शिपाई पाठवला आणि त्यास माझ्या घरापर्यंत मला सोबत करायला सांगितले. मी उद्या सकाळपर्यंत माझ्याच खोलीत दरवाजा भक्कमपणे बंद करून राहावे व दुसऱ्या दिवशी आपण याबाबत नक्की काहीतरी ठामपणे करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

मी त्या पोलिसाबरोबर माझ्या घरापर्यंत आलो खरा; पण तो पोलीस सोबत असल्याने माझी भीती आणखीनंच वाढली. एक तर माझ्या परिसरातले मला ओळखणारे अनेक लोक माझ्याबरोबर एक पोलिस पाहून अधिकच रोखून माझ्याकडे पाहू लागले. आणि माझी परिस्थिती अशी होती की त्यातील कोणाशीच काही बोलायची माझी मन:स्थिती नव्हती.

मला अगदी घराच्या आत सोडून तो हवालदार निघून गेला. या साऱ्या गोष्टी झाल्यावरही माझी भीती किंचितही कमी झाली नव्हती; किंबहुना ती वाढलीच होती. सलग दोन दिवसात त्या दोघांच्या हत्या झाल्या; म्हणजे आज नक्कीच माझा नंबर होता. उद्याच्या वर्तमानपत्रात माझी बातमी? मी चित्रपटसृष्टीत अजिबात प्रसिद्ध नसलो तरी हत्या झाली म्हणजे बातमी येणारच!

आज कोणाला तरी बरोबर झोपायला बोलवावे का? मी खूप नावे डोळ्यापुढे आली पण कुणालाच बोलवावे वाटेना. शिवाय त्या कोणाला आत घेण्यासाठी दार उघडलं आणि त्याच्याबरोबर तो खूनीच आत शिरला तर?

प्रत्येक क्षणासह मनावरचा ताण वाढतच होता. अंगाला सुटणारा घाम काही थांबत नव्हता. तहान भूक लागणं तर अशक्यच होतं. मी तसंच बिछान्यावर अंग टाकलं. बहुदा रात्रभर मी जागाच होतो. काही क्षण झोप लागली असेल तर माझं मलाच कळलं नाही.

सकाळ झाली. अजूनही मी जिवंत होतो. म्हणजे आजच्या पेपरमध्ये माझी बातमी येणं शक्यच नव्हतं. या विचारानं मला जरा हायसं वाटलं. मी खिडकीतून बाहेर नजर टाकली. संपूर्ण पॅसेजमध्ये कोणीही उभं नव्हतं. शेजारच्या चव्हाणांच्या घराबाहेर पेपर पडला होता. अजून सहा-साडेसहाच वाजले होते. म्हणजे अजून अर्धा-एक तास तरी तो पेपर त्यांच्या घरात जाणार नव्हता. पॅसेजमध्ये नक्की कोणी नाही याची पुन्हा खातरजमा करून मी हळूच माझं दार उघडलं आणि अगदी चटकन चव्हाणांच्या दारात असलेला पेपर उचलून पुन्हा माझ्या खोलीत येऊन दाराची कडी लावून टाकली.

मी अधाशासारखा त्या पेपरमधल्या बातम्यांवरून नजर टाकू लागलो. मला अपेक्षित बातमी मला काही क्षणातच दिसली.

`चित्रपट अभिनेते राजीव खन्ना व देबोशीश ठाकूर यांची खंडणीसाठी हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा!`
`चित्रपट अभिनेते राजीव खन्ना व देबोशीश ठाकूर यांच्या हत्येचा पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करून मिळालेल्या पुराव्यावरून नामचीन गुंड पक्या याने ही हत्या केली असावी असा अंदाज बांधला आहे. पक्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खन्ना व ठाकूर यांचा अभिनयाव्यतिरिक्त भागीदारीमध्ये कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून पक्यानं त्यांच्याकडे खंडणी मागितली होती. ती देण्यास नकार दिल्यामुळे या दोघांची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.`

गेल्या जवळ जवळ वीस-बावीस तास माझ्या मनावर असलेला सारा ताण, माझ्या छातीचे सतत जोरदार पडणारे ठोके हे सारं ही बातमी वाचत असतानाच अगदी वेगानं सामान्य स्थितीत आलं. मला खूपच बरं वाटू लागलं. उत्साहाच्या भरात मी दार उघडून पेपर उघडलेल्या स्थितीतच चव्हाणांच्या दारासमोर टाकून घराबाहेर पडलो. मला लगेचच ही बातमी इन्स्पेक्टर साहेबांना द्यायची होती. मला त्यांनी तसं फारच सहकार्य केलं होतं. काल त्यांचे आभार मानण्याचीही माझी मन:स्थिती नव्हती. आज मात्र मला त्यांचे आभार मानायचे होते.

मी आमच्या चाळीच्या बाहेर पडलो. शेजारच्या गल्लीच्या शेवटी पोलीस चौकी होती. त्या गल्लीत मी शिरलो. समोरच्या बाजूने एक माणूस माझ्या दिशेनं येत होता. माझं त्याच्याकडं फारसं लक्षही नव्हतं. पण मी त्याच्या शेजारून पुढे जाणार एवढ्यात त्याच्या मागे लपवलेल्या हातातील चाकू मला दिसला. मी घाबरून काही प्रतिक्रिया देणार एवढ्यात त्यानं तो तीक्ष्ण आणि धारदार चाकू माझ्या पोटात खुपसला, बाहेर काढून पुन्हा खुपसला आणि विक्षिप्तपणे हसत तो तिथून पळून गेला.

वेदनेने प्रचंड कळवळत मी खाली कोसळलो. माझा मृत्यू मला समोर दिसत होता.

पण हे सारं काय झालं आणि का झालं हेच मला कळत नव्हतं. पोलीस तर म्हणताहेत की त्या दोघांचा खून खंडणीसाठी झाला आहे.

की माझाच अंदाज खरा होता?

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी शेवटच्या एकदोन वाक्यात अनपेक्षित कलाटणी असे कथानक सुचणे हेच खूप कठीण असते. बरेचदा "साधारण अपेक्षित होते" असे वाचकाला वाटत राहते. पण इथे ते झालेले नाही. धक्कातंत्र अगदी योग्य प्रकारे साधले गेलंय. शेवटचे वाक्य पण परिणामकारक. लिखाणशैली उत्तम. एकंदर खूप छान कथा!