मारवा!

Submitted by kulu on 31 March, 2020 - 05:18

स्वित्झर्लंडमध्ये तो माझा एक अत्यंत आनंदाचा दिवस होता. दिवसभर युंग्फ्रौ च्या कुशीत मनमुराद फिरलो होतो. स्वच्छ उन्हात वारा थंडीला वाट मोकळी करून देत होता. हिमकण खूळ लागल्यासारखे वाऱ्यावर नाचत होते आणि आणि एखादा हलकेच येऊन माझ्या तोंडावर तंबू ठोकत होता. समोर प्रचंड मोठी हिमनदी होती, आणि युगानुयुगे ती वाहत होती, त्यातुन येणारे हे हिमकण मला आपलं मानत होते हे केवढं मोठं सुख! अनादी काळापासून सुरु असलेल्या जलचक्रातून वाहून आलेले ते कण आणि २४ वर्षांचा मी, तरी सानथोरपणा न मानता ते माझ्याकडे आले हे निसर्गाचं औदार्य! असे विचार नकळत मनात येत होते आजूबाजूच्या शुभ्र-धवलामुळे आणि शहारायला होत होतं. बर्फ काही मी पहिल्यांदा पाहत नव्हतो आयुष्यात पण आल्प्सच्या बाहुपाशात निवांत पहुडलेली ती हिमनदी पाहताना सगळं अलौकिक वाटतंच! कधीही तृप्त होणार नाही अशी तहान त्या हिमांगीने लावली आणि ती हवीहवीशी अतृप्तता मनात घेऊन मी युंगफ्रौ वरून खाली येणाऱ्या छोटुल्या ट्रेन मध्ये बसलो. आकाश एव्हाना नारिंगी झाले होते, सगळा एकंदर नजारा म्हणजे मूर्तिमंत सुख! घरी जायला अडीच तीन तास लागणार होते. म्हटलं संध्याकाळचा राग ऐकावा. एरव्हीचे पुरियाधनाश्री, पूर्वी, श्री, धानी भरपूर ऐकले होते, यांपेक्षा वेगळा राग ऐकावा म्हणून शोधत असताना निखिलदांचा मारवा सापडला, लावला!

पहिल्या दोन-तीन मिनिटांत सगळं बदललं! काय केलं मी हे....का नेहमीचे राग लावले नाहीत?? आता तर सगळं आनंदी होतं कि, मग हे बदललं कसं, काय चुकलं, नेमकं कुठं?.... मी दुःखी झालो का? नक्कीच नाही, पण मी आनंदी आहे का... नाही.. कदाचित! माझी आनंदाची भावना अशी डळमळली ते का? काही समजेना! बरं ते रेकॉर्ड थांबवता पण येईना... कसलं हे ओढावुन घेतलेलं हळवेपण! मारवा तासभर चालू होता पण डोक्यात कितीतरी दिवस! हि माझी आणि मारव्याची पहिली ओळख- तशीच्या तशी लक्ष्यात आहे. त्यानंतर बरेच दिवस मी मारव्याला बेदखलच केलं आयुष्यातून. म्हणजे डिलीट नाही केलं पण ज्यावर बोलायला लागलो तर आपलं काही खरं नाही असं वाटतं त्याविषयी आपण बोलत तर नाहीच पण चक्क डोळेझाक करतो त्याकडे तसंच काहीस झालं मारव्याच्या बाबतीत!

पण मारवा एवढ्याने गप्प बसणार नव्हताच! अशी काही दुखणी गप्प बसत नाहीतच, सलत राहतात... ती पूर्णतः जावीत असंही आपल्याला वाटत नाही पण त्यांचा पूर्ण सामना करण्याची ताकदसुद्धा आपल्यात नसते! त्या दुखण्यांविषयी आपल्याला काय वाटते हे आपल्यालाच माहीत नसतं! मारव्याची ओढ लागली! मारव्यात पंचम नाहीच आणि षड्ज खूपच कमी! दोन्ही स्थिर स्वरांनी आपली अशी पाठ फिरवल्यामुळे मारवा हळवा असं म्हणतात खरं! पण हीच स्केल वापरून पुरिया आणि सोहनी सुद्धा फुलतात आणि तरीही त्यांचं सांगणं मारव्याएवढं अफाट दुखरं नाही, असं का? मला स्वतःला असं वाटतं कि या हळवेपणाचं कारण म्हणजे मारव्यातला षड्ज अल्प तर आहेच पण तो जेव्हा येतो तेव्हा सुद्धा सिद्ध, स्थिर, खडा असा नेहमीसारखा येत नाही तर कोमल रिषभाची काठी किंवा भार वाहून थकलेल्या धैवताच्या खांद्यांचा आधार घेत येतो... किंबहुना त्याला तसंच यावं लागतं कारण त्याची स्वतःहून उभं राहण्याची ताकद कुठेतरी हरवलेली असते! हेच दुःख खूप मोठं आहे! खरं असहाय्य वाटणं हे आजूबाजूच्या परिस्थितीपेक्षाही मनाची उभारी संपल्यावरच असतं, जागोजागी ठेचला गेलेला षड्जाचा स्वाभिमान ठसठसतो, पण तो अकांडतांडव करत नाही! डोळ्यातून ते दाखवतो आणि म्हणून त्याची केहन गहिरी होऊन जाते! सर्वसामान्यपणे घरी आई सगळ्याच दुःखात रडते, मन मोकळं करते आणि त्याची आपल्याला सवय असते, आपल्याला वाईट पण वाटतं...पण..उद्या बाबाच वाकला आणि त्याच्या डोळ्यात आसवं आली कि आपल्या पायाखालची जमीन सरकते! आईचं सांत्वन करायची सवय असते, बाबाचं कसं करायचं, कधी केलंच नाही, किंबहुना दुःखात मनसोक्त रडायचा अधिकार ज्या बाबाला आपण दिलेलाच नाही तो बाबा हळवा झाल्यावर काय करायचं??? जीव तुटतो नुसता, मदत कुणाकडे मागायची कळत नाही! मारवा असा आहे! षड्जाला सिद्ध, स्थिर, सगळ्या स्वरांचा जन्मदाता आदिस्वर वगैरे विशेषणं लावून त्याला गौरवलं असलं तरी त्याला हळवेपणाचा अधिकार दिला नाही, पण मारव्यात तो हळवा झाला!

आणि या दुःखाचा आवाका तरी केवढा मोठा! उस्ताद अमीर खानांचा तासाभराचा मारवा आहे... संथ लयीत गायलेला, हळवं हळवं करून सोडणारा! हे दुःख वेगळं आहे, सोसलेल्याचं दुःख आहे ते, सोसताना तोंडातून बाहेर न पडलेल्या वेदना लहरींसारख्या स्रवत आहेत आत! त्यात खांसाहेबांचा आवाज खडा, खर्जाचा आणि तो असं भावविश्व उभा करायला लागला कि तो वाकलेला, थकलेला बाबा अजूनच आठवत राहतो! पण याहून एक वेगळं दुःख दाखवलं वसंतरावांनी. वसंतरावांच्या मारव्याला पुलंच्या हार्मोनियम ची साथ आहे! तो पाऊणेक तासाचा मारवा म्हणजे उध्वस्त झाल्याची संहत भावना आणि त्या उध्वस्त होण्याने डोळ्यात पेटलेले अंगार! हे संथ लहरींचं दुःख नव्हेच........ इथे त्सुनामी आहे, त्याचं केंद्र खोल मनात आहे, कुणीतरी घाव घातलाय तिथे, तिथल्या लाटा खूप मोठ्या आहेत, तिथली घालमेल खूप मोठी आहे पण आपल्याला दिसताहेत त्या किनाऱ्यावर येऊन माथा फोडणाऱ्या त्सुनामी! सगळं सगळं हरवलंय! वसंतरावांनी हे कसलं दुःख भोगलं कि स्वर एवढा हेलावला हे त्यांनाच माहित! आणि पुलं.. वसंतरावांचे तीन तपांचे मित्र, कितीतरी दुखणी एकमेकांची एकमेकांबरोबर काढली असणार म्हणून ते दुःख पुलंना समजलं आणि मग तेच त्यांच्या पेटीतून बरसलं असेल का? मैत्री जेवढी गाढ तेवढी न बोलता समजणारी दुःखं मोठी? असलंच कुठलं दुःख त्यांनी व्यक्त केलं का मिळून?

आणि यानंतर एक मारवा ऐकला तो रवी शंकरांचा, पावणेदोन तासांचा! हो, एवढा वेळ नुसतं सतार धरून बसायला सुद्धा आम्हाला होत नाही तिथे पंडितजींनी पावणे दोन तास सलग राग वाजवला आणि तो पण कुठला? तर मारवा! किती आणि काय काय सांगितलं त्यांनी? प्रत्येक स्वर अश्रूत भिजून मऊ पडलेला! खर्जात तर हृदय अक्षरश: पिळवटून निघतंय, का एवढा छळ करताय पंडितजी, का एवढं वेठीला धरताय, कसली ती सोसलेली, न सोसलेली दुःखं, वरून भरलेल्या आणि आतून सलणाऱ्या जखमा आठवून देताय, नको, नको, नको !!! पण हे खरंच नको वाटतंय का? मग रेकॉर्ड थांबवता का येत नाही! काय कारण असेल स्वतःचा असा स्वतःच छळ करून घेण्यामागे? मला वाटतं रागाची भावावस्था! मारवा कुठलं एकच दुखणं घेऊन समोर येत नाही, तर त्यात दुखरेपणाची भावना सलग स्रवते आणि कुठलाही भाव त्याच्या शुद्ध स्वरूपात, आठवणींची, समजा-गैरसमजांची वस्त्रे त्यजून आपल्या समोर येतो तेव्हा त्याचं सौंदर्य हे अवर्णनीय असतं! त्या शुद्ध स्वच्छ सौंदर्याची लागलेली आस, त्याचं असं समोरासमोर झालेलं पावन दर्शन आपल्याला मारवा तोडू देत नाही! मारव्यात सगळी दुःखं आहेत पण कुठल्याही एकाच दुःखाची तो जहागीर नाही म्हणून तो असा सगळयांना सारखाच छळतो!

आज माझंही असंच झालंय! का? मला तरी कुठं माहितीय! कारण? एकही नाही नजरेत! शिपसमोर सूर्य अस्ताला चाललंय, त्याची आणि समुद्राची दिवसभराच्या घडामोडींची देवाणघेवाण सुरूय, जमिनीवर काय झालं हे सूर्य सांगतोय त्याला, आकाश स्वच्छ, अगदी थोडेच पांढुरके ढग आमच्याबरोबर प्रवास करत आहेत, सकाळपासून दोन पक्षी शिपबरोबर आहेत ते घिरट्या घालत आहेत आणि हे सगळं मी बघतोय स्टारबोर्ड साईडच्या माझ्या हक्काच्या डेकवर बसून! सकाळी घरी बोललो आईबरोबर, जिच्याबरोबर गुजगोष्टी करायच्या तिच्याबरोबर भरपूर केल्या, अनपेक्षितपणे पोस्टडॉकची एक मोठी ऑफर मिळाली, सगळं मस्तच सुरु आहे पण मनाचा मारवा झालाय! कशामुळे या प्रश्नाला अर्थच नाही कारण ही असली दुःखे आपण कधीही स्वतःशी कबुल करत नाही! ह्या मारव्याचं रूपांतर थोड्या वेळाने गोरख कल्याणात व्हावं एवढीच प्रार्थना आहे माझी आता!

पंडित निखिल बॅनर्जी: https://www.youtube.com/watch?v=4cVK-8OxHuY
उस्ताद अमीर खानः https://www.youtube.com/watch?v=vlUvz333vUc
पंडित वसंतराव देशपांडे: https://www.youtube.com/watch?v=jXtr3dqCQlc
पंडित रवी शंकर: https://www.youtube.com/watch?v=2keuhykuEms

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार आतून आलंय हे लिखाण, अतिशय आवडलं.
मीही मागे वसंतरावांच्या मारव्याबद्दल लिहिलं होतं.
ऐकवतही नाही आणि थांबवतही नाही हे अगदी अगदी!

अनादी काळापासून सुरु असलेल्या जलचक्रातून वाहून आलेले ते कण आणि २४ वर्षांचा मी, तरी सानथोरपणा न मानता ते माझ्याकडे आले हे निसर्गाचं औदार्य! >>
जियो!!

फारच म्हणजे फारच सुरेख लिहिलंय...स्वरदर्शी लिखाणातून वसंतरावांचा मारवा आणि रविशंकरांची सतार आम्हा वाचकांनाही ऐकू आली..

मारवा म्हणजे संधीप्रकाश राग आणि त्यात तो षड्जाचा लपंडाव..त्यामुळे संध्याकाळची हुरहुर, कातरता मनात भरुन राहते.

भा.रा. तांबेंची 'मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा'ही कविता आठवली. मारव्याचे भाव त्यात उमटले आहेत. उगवत्या सूर्याला अर्घ्य सगळेच देतात पण मावळत्या दिनकराला अर्घ्य देणारा कोणी एकटाच.. लताबाईंनी गायलेल्या या गीतात मारव्याच्या उदासीसोबत थोडी मनाची उभारीही जोडीला येते. त्याचं कारण एकतर लताबाईंचा तो दैवी आवाज आणि दुसरं म्हणजे हृदयनाथांनी यात मारव्यासोबत इतरही संधिप्रकाश राग वापरले आहेत हे असावं.

अगदी अगदी हाच अनुभव... नाहीच झेपत मारवा मला... अगदी हीच अवस्था बंदही करवत नाही आणि ऐकवतही नाही..पुन्हा वाटेला जायचं नाही असं ठरवलं तरी परत वाट वाकडी करून पाय मारव्याकडे वळतात... आणि पुन्हा सगळं ते... हे गाऱ्हाणं इतक्या सहजी मांडलंयस त्याबद्दल किती आभार मानू तुझे...? सहज सुंदर आणि सखोल...

काय लिहितोस रे एकदम आत जातं हृदयात. संगीतातले काहीही समजत नाही तरीही, दंडवत तुला. ऐकेन सर्व सवडीने.

तुझे तिन्ही लेख सध्याच्या वातावरणात आनंद देऊन गेले, जियो कुलुभाय.

खरंय ! मारवा ऐकताना हळहळतो आपण. पण तुमचे लेख नेहमीच वेड लावतात. किती सुंदर भाषा ! आणि आता तर मला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. माझा दादा सुध्धा २४ चाच आहे. पण त्याची मराठी म्हणजे हे भगवान ! Happy मी फार आतुरतेने वाट पाहते तुमच्या लेखांची. मला ते आवडतात , कारण मी पण रुद्रवीणा शिकते . तंतू वाद्यच. Happy

डी मृणालिनी... रुद्रवीणा...वाह! काय सुंदर वाद्य शिकताय तुम्ही. रुद्रवीणेचा खर्ज सगळं व्यापुन टाकतो. मी सतार डॉ. हेमन्त देसाई यांच्याकडे शिकतोय.