दिवस घरी हे काढायचे (विडंबन)

Submitted by Dr Raju Kasambe on 29 March, 2020 - 23:56

दिवस घरी हे काढायचे

फेसबुकात गुंतत जाणे
व्हाट्सऍप वर 'चॅट'त जाणे
कोरोनाचे संदेश धाडायचे
दिवस घरी हे काढायचे

मोजावे तांदळाचे दाणे
मोजावी पंख्याची आवर्तने
खिडकीतुन चांदणे मोजायचे
दिवस घरी हे काढायचे

माझ्या ह्या चाळी पाशी
थांबू नको अजिबात अशी
‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायचे
दिवस घरी हे काढायचे

दिवसभर हाततोंड धुणे
आठवणींना उजाळा देणे
कुटुंबासोबत खिदळायचे
दिवस घरी हे काढायचे

चणचण सुविधांची फार
बंद झाले हॉटेल बार
लिंबू पाणीही गोड मानायचे
दिवस घरी हे काढायचे

सुट्टीसाठी नेहमीचे रडगाणे
भोगता येईना दान आनंदाने
झोपून झोपून किती झोपायचे
दिवस घरी हे काढायचे

दाढीमिशांचे हे वाढणे
'वर्क फ्रॉम होम'चे लोढणे
घरबसल्या पगार मागायचे
दिवस घरी हे काढायचे

कामवालीचा नाही आधार
बायकोच चालवतेय संसार
घरकामात हातभार लावायचे
दिवस घरी हे काढायचे

डॉक्टर नर्सेसचे धडपडणे
कराया सुकर आपुले जगणे
मनातून आभार मानायचे
दिवस घरी हे काढायचे

सोडू नका संधी देशसेवेची
कोरोनाला पराभूत करायची
'सोशल डिस्टन्सिंग' पाळायचे
दिवस घरी हे काढायचे

डॉ. राजू कसंबे,
मुंबई

(टिप: मा. श्री. अरुण दाते यांच्या 'दिवस तुझे हे फुलायचे' हया प्रसिद्ध कवितेचे विडंबन. सरांची माफी मागून).

Group content visibility: 
Use group defaults