युद्ध आमुचे सुरू ...

Submitted by tilakshree on 24 March, 2020 - 05:22
ठिकाण/पत्ता: 
भारतीय इतिहासातील किंवा काव्यातील कौरव पांडवांच्या धर्मयुद्धाची आज आम्हाला प्रकर्षाने आठवण येत होती. कौरव आणि पांडवांची आपापली विराट सेना, त्यापैकी कुणाच्या तरी बाजूने आणि कुणाच्या तरी विरोधात उभे असलेल्या भारतवर्षातील सर्व राजा- महाराजांच्या सेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या असूनही हे महाविध्वंसक युद्ध केवळ अठरा दिवसात निर्णायकरित्या संपुष्टात कसे आले असावे? एक गोष्ट मात्र निश्चित की कोसो दूर पसरलेल्या कुरुक्षेत्राच्या विस्तीर्ण रणात समोरासमोर आक्रमण- प्रत्याक्रमण झाल्यानेच विशेष कालापव्यय न होता भीषण संहार होऊन या युद्धाची समाप्ती झाली. मात्र शत्रू जर दुर्गम प्रदेशाचा आश्रय घेऊन छापमारीचे हल्ले करीत राहिला तर त्याला तोंड देऊन शत्रूचा निःपात करणे दुष्कर होऊन जाते. यात एक तर शत्रूच्या युद्धासज्जतेचा नेमका अंदाज येणे अवघड आणि त्यांच्या संख्याबळाचा अदमास घेणे त्याहूनही अवघड! मुळात दीर्घकाळ संघर्ष करण्यासाठी युद्धाचा सराव आवश्यक असतो. शारीरिक आणि त्याहूनही अधिक मानसिक! भौतिक समृध्दी आणि त्या योगाने आलेली मानसिक शांती सामरिक साहसापासून परावृत्त करते. या समृद्धीमुळेच विष्यासक्ती, कलासक्ती इतकेच काय, ईश्वराबद्दलची आसक्ती वृद्धिंगत होते. एकदा यापैकी कोणत्याही मार्गाची कास धरली की संघर्षाची वृत्ती क्षीण होते आणि शक्तीही! मात्र या जगात धनलोभाने कोणतेही कृत्य करण्यास तयार असणाऱ्यांची वानवा नाही. धन वेचून धर्मकृत्य करवून घेता येतात तशी भाडोत्री सैन्यामार्फत युद्धही लढता येतात. मात्र बहुतेकदा अनुभव असा येतो की भाडोत्री सैन्याद्वारे मिळवलेला विजय अल्पकालीन ठरतो. सैन्य आपले निर्धारित द्रव्य घेऊन आपल्या वाटेला लागले की शत्रू पुन्हा डोके वर काढतो. अखेर इच्छा असो वा नसो, आपला संघर्ष आपणच लढावा लागतो याची जाणीव होते. मात्र त्यावेळची संभ्रमावस्था बिकट असते. शत्रू दशानन रावण असतो पण आपण राम नसतो. शत्रू महिषासुर असतो पण आपण ' मर्दिनी' नसतो. शत्रू भस्मासुर असतो पण आपण मोहिनी नसतो. शत्रू कालिया असतो पण आपण कन्हैया नसतो. आपण भ्रमचित्त अर्जुन असतो पण आपल्याकडे श्रीकृष्ण नसतो. मग या संगराला निर्णायक पूर्णत्व द्यायचे कसे? एका वाक्यात: ढेकणांचा कायमस्वरूपी नायनाट कसा करता येईल?
माहितीचा स्रोत: 
विषय: 
तारीख/वेळ: 
Tuesday, March 24, 2020 - 05:18
Group content visibility: 
Use group defaults