उलट तपासणी (भाग १)

Submitted by हर्षल वैद्य on 24 March, 2020 - 05:03

प्रा. पार्थसारथी त्यांच्या खोलीमध्ये चिंताक्रांत मुद्रेने बसले होते. रात्रीचे दहा वाजत आले तरी आज त्यांना घरी जावेसे वाटत नव्हते. त्यांचा प्रयोगशाळा मदतनीस सुहास गेले दोन दिवस आजारी होता आणि रुग्णालयात भरती होता. रोगाचे निदान काही होत नव्हते. तशी लक्षणे साधीच होती. सुरुवातीस खोकला व छातीत भरलेला कफ म्हणून त्याला रुग्णालयात आणला. दोन दिवसांपासून तापही होताच. घरच्या डॉक्टरांचे औषध झाले दोन-तीन दिवस आणि मग आराम पडेना म्हणून भरती केला. लगेच त्याला एक प्रतिजैविकांचा डोसही सुरू केला. पण प्रकृतीस उतार पडायची काही चिन्हे नव्हती. डॉक्टरांनाही कोड्यात पडल्यासारखे झाले होते. सुहासची छाती कफाने भरून गेली होती आणि त्यास दमही लागत होता. प्रकृती अशीच बिघडत राहिली तर ताप डोक्यात जाऊन जिवासही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. सुहासच्या घरची मंडळी पार हवालदिल झाली होती. पार्थसारथींच्या प्रयोगशाळेतला हा बहुधा तिसरा बळी ठरणार होता.

प्रा. पार्थसारथी हे भारतात जैवभौतिकी या शास्त्रातले एक मोठे नाव होते. बीएससीनंतर थेट बंगलोरच्या एन. सी. बी. एस. संस्थेत त्यांनी पीएचडीसाठी प्रवेश मिळवला होता. 'भौतिक परिस्थितीतील बदलाचा सजीवांच्या विविध कार्यांवर होणारा परिणाम' या सहसा कुणी वाटेस न जाणाऱ्या विषयावर संशोधन करून त्यांनी अवघ्या साडेचार वर्षात पीएचडी पूर्ण केली होती. त्यानंतर ते सुमारे दहाएक वर्षे परदेशातल्या विविध विद्यापीठांमधून आणि प्रयोगशाळांमधून संशोधन करत राहिले आणि अवघ्या चौतीसाव्या वर्षी ते त्यांच्या एन. सी. बी. एस. याच संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. भारतात परतल्यानंतरही त्यांच्या संशोधनाचा आलेख चढताच राहिला होता. काही वर्षांतच पार्थसारथींचे नाव जैवभौतिकी क्षेत्रातले जागतिक तज्ज्ञ म्हणून घेतले जाऊ लागले. त्यांच्या प्रयोगशाळेत काम करणे हे नवीन रुजू होणाऱ्या पीएचडीच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असे. पार्थसारथींचे किमान पंधरा-एक विद्यार्थी परदेशातील नामांकित प्रयोगशाळांमध्ये होते.

गेली काही वर्षे पार्थसारथींचे संशोधन हे 'भौतिकशास्त्रीय बदलांचा विषाणूंच्या पुनरुत्पादनावर होणारा परिणाम' या दिशेने चालले होते. या प्रकल्पासाठी संस्थेमध्ये एक नवी सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात आली होती. कित्येक प्रयोगशाळा मदतनीस आणि पीएचडीचे विद्यार्थी या प्रयोगशाळेत तासन् तास नवीन प्रयोग करण्यात गढलेले असत. सुरुवातीस या प्रयोगशाळेत तापमानबदल आणि माध्यमाच्या रासायनिक संरचनेतील बदल अशा घटकांचा विषाणूंच्या पुनरुत्पादन क्षमतेवरील परिणाम असे विषय हाताळल्यानंतर पार्थसारथींचे लक्ष आता चुंबकीय बलाकडे वळले होते. अनेक जैवीय रेणू हे चुंबकीय गुणधर्माचे असल्याने बाह्य चुंबकीय क्षेत्रातील बदल हा विशिष्ट प्रजातींच्या पुनरुत्पादनास सहायक तर इतर काही प्रजातींसाठी घातक ठरेल असे अनुमान होते. या संशोधनामार्फत पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उगमाबद्दलही काही अधिक माहिती मिळेल असे वाटत होते. या नवीन प्रयोगासाठी म्हणूनच नवीन सहायकांची भरती सुरू होती. प्राथमिक चाचणीमधून प्रथमेशचे नाव पार्थसारथींच्या सहकाऱ्यांनी नक्की केले होते. अंतिम मुलाखत मात्र पार्थसारथी स्वतः घेणार होते.

नीलकंठन् प्रथमेश किंवा एन. प्रथमेश हा कोणावरही छाप पाडेल असाच होता. बंगलोरजवळच्या एका छोट्याशा शहरात बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर तो बीएससीसाठी बंगलोरात आला होता. तिथूनच त्याने सूक्ष्मजीवशास्त्रात बीएससी आणि नंतर जैवतंत्रज्ञान आणि जैवअभियांत्रिकी ह्या विषयातून एमएससी केले होते. एक वर्ष थांबून त्यास पीएचडीच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करायची होती आणि या एका वर्षात कामाचा चांगला अनुभव मिळावा म्हणून त्याने या जागेसाठी अर्ज केला होता. मनातून अशी आशा होतीच की जर पार्थसारथींना काम आवडले तर ते इथेच पीएचडीसाठी रुजू करून घेतील.

प्रथमेशच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील एका स्थानिक कारखान्यात तंत्रज्ञ म्हणून होते आणि आई गृहिणी. प्रथमेश दोन बहिणींच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा. इतर बाबतीत जरी तो लाडाचा असला तरी वडिलांनी अभ्यासाच्या बाबत लाड चालू दिले नव्हते. प्रथमेश जात्याच हुशार असल्याने त्यांना फार कडकपणे वागण्याची कधी गरजही पडली नव्हती. बीएससीसाठी बंगलोरात शिकायला पाठवणे आणि वसतिगृहाचा खर्च करणे हे प्रथमेशच्या वडिलांसाठी जरासे जडच होते, पण मुलाच्या भविष्यासाठी म्हणून त्यांनी पदराला खार लावून का होईना पण त्यास पाठवले होते. प्रथमेशनेसुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत आतापर्यंत उत्तम गुणांनी एमएससीचा टप्पा गाठला होता. त्याच्या एमएससीच्या शिक्षकांचाही तो अत्यंत आवडता होता आणि तसे त्यांनी लिहिलेल्या शिफारसपत्रात स्पष्ट होत होते. या सर्व पूर्वपीठिकेचा फायदा म्हणजे त्यास हे मुलाखतीचे निमंत्रण आले होते.

पार्थसारथींबरोबरची प्रथमेशची मुलाखत जवळजवळ दीड तास चालली. जीवशास्त्र तसेच भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पनांच्या त्याच्या ज्ञानाची सखोल तपासणी पार्थसारथींनी केली. जैवअभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचा प्रथमेशला या जागेसाठी निवडताना खूप उपयोग झाला. भौतिकशास्त्रातील संकल्पनांची विशेष माहिती नसल्याकारणाने त्याच्यापेक्षा चांगल्या उमेदवारांचे अर्ज नाकारले गेले होते, कारण पार्थसारथींचे पार्थसारथींचे संशोधन तर जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या सीमारेषेवर होते. त्यामुळेच पार्थसारथींचे नुसत्या मुलाखतीवर समाधान झाले नव्हते. जरी प्रथमेश त्यांना प्राथमिक चाचणीत योग्य वाटला तरी त्यांना अधिक चाचण्यांची गरज वाटत होती. त्यामुळे त्याचे प्रयोगशाळेतील कौशल्य तपासण्याचे त्यांनी ठरवले आणि त्यानुसार प्रथमेश प्रयोगशाळेत रुजू झाला. एक आठवड्याच्या चाचणीनंतर मात्र पार्थसारथींची खात्री पटली आणि प्रथमेशला सहायकाच्या जागेवर नेमण्यात आले.

चुंबकीय क्षेत्राचा परिणाम अभ्यासता यावा म्हणून प्रयोगशाळेत एक प्रचंड विद्युतचुंबकीय प्रणाली उभारण्यात आली होती. या चुंबकाच्या केंद्रस्थानी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या एक सहस्रांश पट ते एक सहस्रपट इतक्या मर्यादेच्या चुंबकीय क्षेत्राच्या निर्मितीची क्षमता होती. प्रथमेशचे मुख्य काम या प्रचंड यंत्राची देखभाल हे होते. देखभालीबरोबरच चुंबकाच्या केंद्रात नमुने ठेवणे, त्यापूर्वी नमुन्यांची काही प्राथमिक चाचणी करणे आणि ठरवलेल्या कालावधीसाठी विषाणूंचे नमुने चुंबकीय क्षेत्रात ठेवले की बाहेर काढल्यावर पुन्हा काही प्राथमिक चाचण्या करून नमुने नामांकन करून शीतगृहात ठेवून देणे हे ही प्रथमेशच्या अखत्यारीत येत असे. या साठवलेल्या नमुन्यांवर मग पार्थसारथींचे इतर सहायक आणि विद्यार्थी विविध प्रयोग करीत.

प्रथमेश कामावर रुजू होऊन दोन महिने झाले होते. त्याचे काम उत्तम तऱ्हेने चालले होते आणि पार्थसारथीसुद्धा एकंदरीत कामाच्या प्रगतीवर समाधानी होते. एक दिवस उशीरापर्यंत काम करून प्रथमेश घरी गेला. तो संस्थेजवळच एक छोटेसे घर भाड्याने घेऊन राहत असे. दुसऱ्या दिवशी उठला तो त्याचे डोके प्रचंड दुखत होते व छातीत कफ भरून आल्यासारखा वाटत होता. त्याने सरळ रजेचा अर्ज पाठवला आणि दवाखाना गाठला. डॉक्टरांनी अतिश्रम तसेच हवामानातील बदलांमुळे खोकला व कफ झाल्याचे निदान केले आणि औषधे चालू केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आराम पडेना म्हणून मग त्यास डॉक्टरांनी नजिकच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. विकृतिविज्ञान चाचण्यांमधून विषाणूसंसर्ग झाल्याचे कळत होते. पण, अशा आजारांवर सामान्यपणे लागू पडणारी औषधे आणि प्रतिजैविके प्रथमेशवर का लागू पडत नाहीत हे उमगत नव्हते. प्रथमेशच्या आईवडिलांना बोलावण्यात आले, तोपर्यंत प्रथमेशची तब्येत पुष्कळच खालावली होती. त्याला जेमतेम दोन वाक्ये बोलल्यावर दम लागत होता. जर प्रथमेशचे शरीर असेच औषधांना प्रतिसाद देणे नाकारत राहिले तर ज्वर मेंदूत शिरून हे दुखणे प्राणघातक ठरेल अशी भीती डॉक्टरांना वाटत होती. शेवटी दोन दिवसांनी डॉक्टरांची भीती खरी ठरली आणि प्रथमेशने या अनाकलनीय रोगापुढे शरणागती पत्करली. त्याच्या आईवडिलांसाठी हा फार मोठा धक्का होता. ज्या मुलाच्या आधाराने वृद्धत्वास सामोरे जायचे त्याचा असा अकाली मृत्यू त्यांच्यासाठी क्लेशकारक असणे स्वाभाविकच होते. पार्थसारथी स्वतः त्या दोघांना भेटून त्यांचे सांत्वन करून आले. प्रथमेशच्या मृत्यूने त्यांच्या मनात एका अनामिक अपराधी भावनेने घर केले होते. प्रथमेशला प्रयोगशाळेतल्या विषाणूंचाच संसर्ग झाल्याचे त्यांना माहीत होते. कारण तसा संसर्ग त्याआधी अनेकांना झाला होता. एक-दोन दिवस खोकला, कफ आणि प्रचंड डोकेदुखी हीच लक्षणे होती. फार काय प्रथमेश स्वतःसुद्धा साधारण तीनएक आठवड्यांपूर्वी याच कारणाने एक दिवस रजेवर होता. त्यांना कळत हे नव्हते की इतर वेळी सर्व जण या दुखण्यातून एक-दोन दिवसात बरे होतात तर प्रथमेशसाठी आज हे दुखणे एकदम जीवघेणे कसे ठरले.

=====

(पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २०१२)

पुढील कथासूत्र
https://www.maayboli.com/node/73851

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विज्ञानकथा किचकट असल्याने जास्त वाचायला आवडत नाहीत. पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर इंट्रेस्टींग वाटतीये.. पुभाप्र!

COVID-19?

गोष्ट जुनीच आहे. २०१२ साली मनोगताच्या दिवाळी अंकासाठी लिहिली होती. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इथे पुन्हा टाकली.