मला मिळेलेली पहिली ट्रॉफी - जी माझी नव्हतीच !!

Submitted by Dr Raju Kasambe on 24 March, 2020 - 01:54

मला मिळेलेली पहिली ट्रॉफी

टीव्ही वर ‘हवा येऊ द्या’ मध्ये डॉ. नीलेश साबळे नेहमी एक प्रश्न विचारतो.

‘आयुष्यातले तुम्ही मिळविलेले पहिली ट्रॉफी, पहिले बक्षीस कुठले? कधी मिळाले होते? आठवते का? आम्हाला ऐकायला आवडेल’!

अर्थात आपल्या सारख्या सामान्य माणसाला कुणी असले प्रश्न विचारीत नाहीत. ते फक्त सेलेब्रिटीज ना विचारले जातात. पण म्हणून काय आपण आपल्या आयुष्यातील स्मृति अशाच गाडून टाकायच्या का?

मला पण एक बक्षीस, एक ट्रॉफी मिळाली होती. खरं ती ट्रॉफी माझ्यासाठी नव्हतीच. पण तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय होता.

मी राहत असे त्याठिकाणी खूप सारे तरुण मूर्तिकार राहत असत (मु. दारव्हा, जि. यवतमाळ). माझा मोठा भाऊ आनंद सुद्धा इतर मूर्तिकारांसोबत मातीच्या मुर्त्या बनवायचा. पण मूर्तिकलेपेक्षा त्याला चित्रकला जास्त आवडत असे. त्यामुळे घरी त्याचे चित्र काढणे चालू असायचे. ब्रश, पेन्सिली, रंग, कुठल्या रंगात कुठला रंग मिसळला की कुठला रंग वा शेड तयार होतो इत्यादि माहिती प्रत्यक्ष मिळत असे. त्यामुळे मीसुद्धा स्केचेस काढायला लागलो. चित्र रंगवायला लागलो. मी हे बर्‍यापैकी काढत असे असे मला आठवते.

माझे नववी दहावी होईपर्यंत आनंद अमरावतीला जाऊन ‘आर्ट टिचर डिप्लोमा’ (एटीडी) पास करून आला होता.

मला दहावीला प्रथम श्रेणी मिळाली आणि मी सायन्स घेतले. तेव्हा माझ्या भावाने मला व्यावहारिक सल्ला दिला.

‘हे बघ एका घरात दोनदोन पेंटर काय कामाचे? तू मस्त अभ्यास कर आणि शिक्षण घे. पेंटिंग सोडून दे. आता ब्रश रंग वगैरे विसरून जा.’

मीही त्यावेळेस भावाचे ऐकले. तेव्हापासून मी रंग जवळपास सोडूनच दिले. अकरावीला सायन्स घेतले. विज्ञान शिकत असताना प्राण्यांच्या बर्‍याच आकृत्या, स्केचेस काढावे लागतात. त्यावेळेस ही कला कमी आली. कारण माझ्या आकृत्या इतरांपेक्षा बर्‍यापैकी प्रमाणबद्ध असायच्या. तसेच मी पटापट आकृती काढायचो.

तर मी अकरावीला असताना शिवाजी संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त खूप सार्‍या स्पर्धा घेतल्या जात होत्या. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा सुद्धा होती. मला त्यात सहभागी व्हायचे होते. तोपर्यंत आनंद भाऊ अमरावती वरून शिवाजी चित्रकला महाविद्यालयातून डिप्लोमा करून परत आलेला होता.

चित्रकला स्पर्धेत विविध विषय दिलेले होते. त्यात ‘भारतीय शेतकरी’ हा सुद्धा एक विषय होता. अर्थात हा विषय सांगितला तर हिरव्या शेतात नांगरनी, पेरणी, भात लागवण, काढणी, धान्य काढताना, मळ्यावर उभा शेतकरी पाखरांना पळवतोय, बैलबंडी इत्यादि दृश्येच साधारणतः आपल्या नजरे समोर तरळतात. अर्थात सर्वजण असलीच चित्रे काढतात.

आनंदशी बोललो तर अर्थात त्यानेही असेच चित्र सुचविले. पण त्याने मला चित्र काढायला मनाई केली. बोलला
‘तुला सांगितलं होतं ना. घरात एकच चित्रकार, बास्स. इथे मलाच नोकरी लागेल की नाही माहिती नाही. (ती आयुष्यभर लागली नाहीच)’

मी म्हणालो

‘ठीक आहे. मी सांगतो तसे चित्र काढून दे. सर्वात कठीण माध्यम कुठले असते? जे साधारणतः दूसरा विद्यार्थी काढणार नाही? आपले चित्र हटके (मला ‘क्रिएटिव्ह’ म्हणायचे असेल) असले पाहिजे’.

अर्थात त्याने तयारी दाखविली. सर्वात कठीण माध्यम म्हणजे ब्रश न वापरता केवळ ब्लेडनी रंगविलेले चित्र (ब्लेड वर्क) असते असे त्याने सांगितले.
मी म्हणालो,

‘शेतकर्‍याच्या घरातला अंधार, त्याच्या घरातलं दरिद्रय दाखवता येईल का तुला चित्रात?’

आनंद माझ्याकडे बघत राहिला. ‘आणखी काय पाहिजे तुला त्यात?’.

हे उत्तर उपहासात्मक होते का आता आठवत नाही.

‘मला दिसतेय शेतकर्‍याचे एका खोलीचे घर, घरात इलेक्ट्रिसिटी नाहीये. अंधारच पसरलाय म्हण हवं तर. घरात चूल धगधगतेय आणि कास्तकारिणबाई भाकर्‍या थापतेय. तिचा चेहरा पेटत्या चुलीच्या प्रकाशात उजळलाय. त्याच प्रकाशात पलीकडे बांधलेल्या बैलजोडीचे डोळे पाचुप्रमाणे चमकतायत. खोलीच्या दुसर्‍या कोपर्‍यात कंदील पेटलाय आणि त्याच्या लुकलुकणार्‍या प्रकाशात पोलकं नेसलेली मुलगी अभ्यास करतेय. गरीबी आहे, दारिद्र्य आहे पण आशेचा किरण दिसतोय! दाखवशील का एका छोट्याशा चित्रात हे सर्व?’

दुसर्‍या दिवशी त्याने पेन्सिलने एक स्केच काढून दाखवले. त्यात ह्या सर्व गोष्टी घातल्या होत्या. मला चित्रात अंधाराचे साम्राज्य हवे होते. स्केच मध्ये फक्त आकृत्या होत्या.

‘बरं रंगव आता. पाहू कसे दिसते’.

त्या दिवशी माझा भाऊ एक खूप चांगला चित्रकार आहे ह्याची मला अनुभूति झाली. त्याने माझ्या कल्पनेतले चित्र हुबेहूब काढले होते. दुरून बघितले तर अंधार असलेले गडद रंगाचे चित्र. डोळे किलकिले करून बघितले की सगळे कसे स्पष्ट दिसायला लागले. कास्तकारीणबाई, बैलाचे डोळे, कंदील, अभ्यास करणारी मुलगी, अगदी धमाल. आता मला प्रश्न पडला तो हा की, गावातील सर्वांना हे चित्र कळेल काय?

सुदैवाने चित्र कॉलेज तर्फे अमरावतीला पाठविण्यात आले. तेथे परीक्षक म्हणून शिवाजी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक होते. त्यांच्या एवढी चित्रकलेतील जाण कुणाला असणार? त्यांना त्यांचा माझ्या आडनावाचा (आनंद कसंबे) विद्यार्थी आठवत होता. पण त्यांना आश्चर्य वाटले ते ह्याचे की (अपेक्षेप्रमाणे) चित्र आनंदच्या नावावर नव्हते. अकरावीच्या ह्या विद्यार्थ्याने (राजू कसंबे) एवढे सुंदर चित्र काढले होते की त्यांच्या चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक मिळू शकला नाही!

हे नंतर आम्हाला कळले. आनंद अमरावतीला गेल्यानंतर प्राचार्यांना भेटला तेव्हा त्यांनी संगितले. खरे तर प्रथम क्रमांक त्यांच्याच विद्यार्थ्याला मिळाला होता. पण सुख असं असतं. कधीकधी जिंकूनहि ते मिळत नाही. ‘माझ्या’ एंट्रीला प्रथम क्रमांक मिळाला.

काही दिवसांनी माझ्या कॉलेज प्राचार्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले व अभिनंदन केले (हे सुद्धा माझ्या आयष्यात प्रथमच घडले होते!). त्यांची छाती अमरावतीला झालेल्या समारंभात अभिमानाने फुगली होती. त्यांनी माझ्यातर्फे ट्रॉफी स्वीकारली होती.

माझ्या कॉलेजमध्ये नंतर मोठा स्नेह संमेलन कार्यक्रम झाला. त्यावेळेस शिवाजी शिक्षण संथेचे अध्यक्ष दादासाहेब काळमेघ (नक्की आठवत नाही) ह्यांच्या हस्ते मला मोठी ट्रॉफी मिळाली. तो प्रसंग अविस्मरणीय आहे. मी ती ट्रॉफी आनंद भाऊला देऊन टाकली. ती ट्रॉफी त्याने त्याच्या स्टुडिओत ठेवली आहे. मला कधीच त्या ट्रॉफीचा गर्व वाटला नाही, की मी कुणाला त्याची फुशारकी मारू शकलो नाही. माझे गुपित माझ्याजवळ होते. ट्रॉफी त्याच्या खर्‍या विजेत्या चित्रकाराजवळ आहे. अजूनही चकाकते आहे.

ता.क.
१.दुर्दैवाने ते चित्र आता उपलब्ध नाही.
२. तुम्ही पण तुम्हाला मिळालेल्या पहिल्या ट्रॉफीच्या/ बक्षिसाच्या आठवणी इथे शेअर करा. त्यासाठी ‘हवा येऊ द्या’ मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. मला सुद्धा वाचायला आवडेल.

लेख वाचताच भावाने ट्रॉफीचा फोटो पाठविला. इथे डकवतोय.
WhatsApp Image 2020-03-24 at 12.52.31 PM.jpegडॉ. राजू कसंबे
मुंबई

Group content visibility: 
Use group defaults

वाह ! छान आठवण आणि लेख. चित्राची कल्पनापण छानच होती तुमची.
माझी पहिली ट्रॉफी तुमच्या ट्रॉफीइतकी मोठी नक्कीच नव्हती. जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प विभागात मिळाली होती. Happy

छान आठवण आणि लेख. चित्राची कल्पनापण छानच +१
---------
पहिली ट्रॉफी आवडता क्रीड़ा प्रकार (KARATE) अंर्तगत राज्य स्तरावर असलेल्या स्पर्धेत ८वीत असताना मिळाली. तिथून सुरु झालेला प्रवास राष्ट्रीय स्पर्धेच्या परीक्षक होण्यापर्यंत आपसूक घडत गेला आणि पुढेही सुरु आहेच.

छान . चित्र कसे असावे ही संकल्पना पण मस्तच. मला पाचवीत असताना तालुका स्तरावर वक्तृत्व स्पर्धेत एक छोटी कप ट्रॉफी मिळालेली. खरं तर तेव्हा ट्रॉफीपेक्षा शिक्षकांबरोबर दुसऱ्या गावी जायचं , मोठ्या शाळेत जायचं , परत आपल्या शाळेत आल्यावर सगळ्या शिक्षकांकडून शाबासकी घ्यायची याचं अप्रूप खूप वाटलेलं.
अज्ञानी -- मस्तच .

कुसुंबे सर तूमच्याकडून मुळीच ही अपेक्षा नव्हती. आता प्रामाणिकपणे सांगून उपयोग काय. तेव्हा सांगायची हिम्मत करायला हवी होती. आयुष्यात असाच अप्रामाणिकपणा तूम्ही वेळोवेळी करुन प्रगती साधली असू शकते. तसं नसेल तर चांगलंच आहे. कृहघ्या.

खूप छान लेख... आणि ट्रॉफी त्याच्या मूळ मालकाजवळ आहे हे ऐकून आनंद झाला.
कलाकारांच्या आयुष्यावर लेख वाचायला नेहमीच मजा वाटते, आणि भारावून जायला होतं.
सच्चा कलाकार नेहमी त्याच्या कलेनेच ओळखला जातो.